ताज्या घडामोडी

रानभाजी – गुळवेल
शास्त्रीय : टिनोस्पोरा कॉरडीफोलिया
कुळ : मिनीर्स्पमेसी
स्थानिक : वारुडवेल, अमृतवेल, अमृतवल्ली
इंग्रजी : हार्ट लिव्हड मूनसीड

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/09/2024 :
गुळवेल ही बहुवर्षायू वेल महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ही वनस्पती प्रामुख्याने भारत, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार या देशांत आढळते. गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.
खोड – वेलीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान लहान छिद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो.
पाने – साधी, एक आड एक, हृदयाकृती, गडद हिरवी व गुळगुळीत असतात. पानांचे देठ लांब. पानांवर ७ ते ९ शिरा दिसतात व पानांची रुंदी ५ ते १० सेंमी असते.
फुले – लहान पिवळसर हिरवी नियमित व एकलिंगी असतात. पानांच्या बेचक्‍यातून आलेल्या लांब, नाजूक, खाली लोंबणाऱ्या पुष्पमंजिरीत येतात. नर व मादी फुले वेगवेगळ्या वेलींवर येतात. पुष्पमंजिरीत नरफुले गुच्छात तर मादी फुले एकांडी येतात. पाकळ्या सहा, पुंकेसर सहा, बीजांडकोश तीन कप्पी, पराग धारिणी तीन विभागी.
फळे – गोलाकार, मोठ्या वाटाण्याएवढी, कठीण कवची. पिकल्यावर लाल, गुच्छाने येतात. बी एक, खडबडीत कवच असणारी. गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात.# गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.
# गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक, मूत्रजनन, ज्वरहर व नियतकालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे. # ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहेआहेळ # ती रक्तसुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे. # मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहावृद्धीत उपयुक्त आहे. # गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे. # गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्यातील अर्क ज्वरनाशक म्हणून वापरतात. # गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. # गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्ल अतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्यासाठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची मानली जाते. # सौम्य विषमज्वरात आणि जीर्णज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो. # गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कटपणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते. कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारी आहे. # ही वनस्पती त्वचारोगातही उपयुक्त आहे, यामुळे अशाची खाज व दाह कमी होतो.
भाजीचे औषधी गुणधर्म
# गुळवेलीच्या कोवळ्या पानांपासून भाजी करतात. या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरातील पचनाचे कार्य अधिक चांगले होते. # कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्या नंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते. # मधुमेहामध्ये ही भाजी पथ्यकर आहे. साखरेचा इष्टानिष्ट परिणाम शरीरावर होतो, त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचेवर खावी. # वरचेवर येणारी सर्दी, खोकला, ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते. # त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्यासाठी ही भाजी उपयोगी आहे. # कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो. तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.
पाककृती
# साहित्य – गुळवेलीची कोवळी पाने, चिरलेला कांदा, लसूण, तेल, तिखट, मीठ इ.
# कृती – गुळवेलीची पाने स्वच्छ धुऊन, चिरून घ्यावीत. तेलात कांदा व लसूण लालसर होई पर्यंत भाजून घ्यावी. नंतर त्यामध्ये चिरलेली भाजी, तिखट, मीठ घालून चांगले परतून घ्यावे. वाफ देऊन भाजी शिजवून घ्यावी.

संदर्भ : विकासपीडिया/अ‍ॅग्रोवन
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.