ताज्या घडामोडी

जून महिन्याचा लेखाजोखा…!!!

जून महिन्याचा लेखाजोखा…!!!
(अर्थात जून महिन्यात केलेल्या कामाचा आढावा.)

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 12/07/2024 :

मागे एका आजोबांशी बोलत होतो त्यांच्या बोलण्यात आलं, आता राहिलंय काय ? आता पूर्णविराम देण्याची वेळ आली बाबा…
यावर माझी विचार चक्र सुरू झाली… पूर्णविराम म्हणजे खरंच अंत असतो का… ? पूर्णविराम दिल्यानंतरच नवीन वाक्याची सुरुवात होते… मग पूर्णविराम अंत कसा असेल ?
पूर्णविराम म्हणजे पुन्हा नवीन वाक्य सुरुवात करण्याची उमेद…!!!
ज्यांनी आपल्या आयुष्यांपुढे, थकून असे पूर्णविराम दिले आहेत, त्या पूर्णविरामानंतर आपण पुन्हा “श्री गणेशा” लिहून आयुष्याची सुरुवात त्यांना नव्याने करून देत आहोत.
आमच्यात हि पात्रता तुम्हांमुळे आली आणि म्हणून भेटलेल्या लोकांचे पूर्णविराम, अल्पविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, अनुस्वार, उकार, रूकार लेखाजोखाच्या स्वरूपात आपणास सविनय सादर !
1. एक जूनला कापडी पिशवी प्रकल्प सुरू झाला. भीक मागणाऱ्या पाच लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिले, मला मिळणाऱ्या जुन्या कपड्यांचा वापर करून, आपण कापडी पिशवी शिवत आहोत….
पुलाखाली / झोपडपट्टीत किंवा आणखी जिथे जमेल तिथे हे आमचे पाच लोक कापडी पिशवी शिवत आहेत आणि इतर पाच याचक लोक कापडी पिशवी विकत आहेत.
यातून प्रत्येकाला रोजचा पाचशे रुपयाचा व्यवसाय मिळत आहे. या एका प्रकल्पामुळे दहा कुटुंबं पोटाला लागली आहेत.
“प्लास्टिक पिशव्या वापरू नका, कापडी पिशव्या वापरा” या अर्थाचे आपण तयार केलेले पुणेरी टोमणे घेऊन; समाजामध्ये माझे याचक लोक प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत प्रबोधन करत आहेत.
रस्त्यावर भीक मागणाऱ्या आपल्या याचक मंडळींनी समाज प्रबोधन करावे, कापडी पिशव्या विकाव्या हा जगातील पहिलाच प्रकल्प असेल.
2. या महिन्यात काही अंध आणि अपंग याचकांना वजन काटा घेऊन दिला आहे. शनिवार वाड्याच्या भिंतीलगत आपले हे लोक वजन काटा घेऊन बसले आहेत. लोक येतात आणि वजन करून त्यांना पैसे देतात. भीक मागण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं… !!!
लोकांनी केलेल्या “वजनामुळे” आपल्या लोकांच्या डोक्यावरचा “भार” हलका होईल हे निश्चित…!
शनिवार वाड्याच्या भिंतीलगत अनेक लोक अनेक प्रकारचा व्यवसाय करत आहेत….
पूर्वी हे कधीतरी भीक मागत होते…. आज आपलं बोट धरून ते स्वाभिमानाने जगत आहेत.
कुणी टॅटू काढतंय, कोणी पोस्टर विकतंय, कोणी चप्पल विकतंय, तर कोणी आणखी काय करतंय….!
कधी इकडे आलात तर…. गरज असो नसो… त्यांच्याकडून एखादी वस्तू घ्या…
यामुळे तुमचं फार काही जाणार नाही; परंतु त्यांना लाखमोलाचा आत्मसन्मान मात्र मिळेल !
पूर्व आयुष्याबद्दल विचारून त्यांना लाजिरवाणं मात्र नको करू या…!
3. कोणाचाही आधार नसलेल्या एका ताईला नवीन हातगाडी घेऊन दिली आहे. या हात गाडीच्या सहाय्याने व्यवसाय करून आपलं घर ती चालवत आहे.
वर वर्णन केलेले पंधरा-वीस लोक… प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे…
यांच्या हातातला कटोरा या महिन्यात सुटला आहे…
हे मला भेटायला येतात त्यावेळी रडतच येतात… !
त्यांना काहीतरी बोलायचं असतं, पण त्यांना बोलताच येत नाही…
आणि कान असून मी बहिरा होतो..
शब्द इथे थिटे पडतात पण अश्रू बोलू लागतात…. तेही ताठ मानेने…!!!
शब्दातूनच सर्व काही व्यक्त होत असतं तर अश्रूंची गरजच राहिली नसती…!!!
शब्दांच्या पलीकडचं मांडण्यासाठीच निसर्गाने अश्रू दिले आहेत…!!!
रडण्याचा आशीर्वाद निसर्गाने फक्त माणसाला दिला आहे…
ज्याच्या समोर रडावं… त्यानं आपल्या माथ्यावर प्रेमानं, मायेनं हात ठेवावे… आणि रडणं पूर्ण झालं की आपण त्याच्या चरणावर माथा ठेवावा…
हे चरण जिथे सापडतील ती आपली माणसं… तेवढीच आपली संपत्ती…. तोच खरा श्रीमंत… !!!
बाकी घरदार, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पद पैसा प्रतिष्ठा सगळं झूट…!!!
*शैक्षणिक
– माझ्या आयुष्यावर जे मी पुस्तक लिहिलं आहे…
वर्षभर ते विक्री करतो…. त्या पैशाला हात लावत नाही, परंतु एप्रिल मे जून जुलै या महिन्यात पुस्तक विक्रीतून मिळालेला सर्व पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो.
जे या अगोदर कधीही शाळेत गेले नाहीत अशा सर्व मुलांना मॉडर्न मराठी मिडीयम, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन दिले आहे.
जी मुलं या अगोदर कोणत्यातरी शाळेत शिकत होती, तिथल्या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत.
सॉक्स युनिफॉर्म पासून दप्तरापर्यंत आणि दप्तरापासून कंपास पेटी पर्यंत सर्व बाबी मुलांना घेऊन दिल्या आहेत.
आमचा एक मुलगा कॉम्प्युटर सायन्स करत आहे, दुसरी मुलगी एमबीए करत आहे, तिसरी मुलगी आयएएस करत आहे, चौथ्या मुलाची पोलीस भरतीसाठी नुकतीच नोंद केली आहे.
याव्यतिरिक्त नुकताच बारावी पास झालेला मुलगा; त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचे आहे, समाजासाठी स्वतः घातक होता होता वाचलेला हा मुलगा त्याच्या मागील पिढीला घातक होण्यापासून वाचवत आहे. “घातक” या लेखामध्ये त्याच्याविषयी सविस्तर सर्व काही लिहिलं आहे…
आमच्या शैक्षणिक प्रकल्पात मदत करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक; चॉईस बुक शॉप चे मालक, श्री अजय कटारिया नुकतेच आपल्याला सोडून गेले… “अशी पाखरे येती”… या नावाने लेख लिहून त्यांना आदरांजली समर्पित केली आहे.
*वैद्यकीय
1. अनेक वृद्ध लोकांना कानाला ऐकू येत नाही किंवा डोळ्यांना दिसत नाही, या कारणास्तव; रस्ता ओलांडताना किंवा इतर ठिकाणी त्यांचे रोड एक्सीडेंट होतात. यात कधी हात मोडतो कधी पाय मोडतो, कधी डोके फुटते, कधी इतर गंभीर दुखापत होते किंवा कधी कधी जीव सुद्धा जातो.
अशा अपघाताची कुठेही नोंद होत नाही… कोणालाही शिक्षा होत नाही… कारण त्यांना माणूसच समजलं जात नाही.
असे लोक उपचाराविना रस्त्याकडेला तळमळत पडून राहतात. जखमांमध्ये अक्षरशः किडे पडतात.
अशा सर्वांना या महिन्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांच्यावर उपचार केले, ऑपरेशन केले. या सर्वाचा खर्च संस्थेने उचलला आहे.
बऱ्या झालेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवलं आहे, तिथे त्यांना झेपतील असे व्यवसाय उघडून दिले आहेत.
2. एक्सीडेंट टाळता यावेत यासाठी, ज्यांना दिसत नाही, अशा वृद्ध याचकांना आपण डोळ्याच्या दवाखान्यात नेऊन तपासणी करून चष्मे देत आहोत, मोतीबिंदूचे ऑपरेशन करत आहोत. आज पावतो 2000 पेक्षा जास्त रुग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे.
यात अनेक रुग्ण असे आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे सुद्धा शक्य नाही, अशांसाठी आपण आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे.
3. ऐकू येत नसल्यामुळे होणारे एक्सीडेंट रोखता यावेत; यासाठी “मांडके हियरिंग सर्व्हिसेस, पुणे” यांच्याशी आपण करार केला आहे. वृद्ध याचकांची आपण कानाची तपासणी करून त्यांना कानाची मशीन सुद्धा देत आहोत.
4. कोणत्याही आजाराचे निदान करायचे झाल्यास रक्त – लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या बाबींची सुद्धा आवश्यकता असते. या तपासण्या न केल्यामुळे आजाराचे नेमके निदान कळत नाही आणि अचानकपणे मृत्यू होतात.
हे टाळण्यासाठी वरील सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच करून घेत आहोत. ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, त्या तपासण्या “रेड क्रॉस सोसायटी, पुणे” मधून आपण करून घेत आहोत.
5. संपूर्ण दवाखाना मोटरसायकलवर घेऊन भिक्षेकरी जिथे बसतात तिथेच उकिरडा फुटपाथ किंवा सुलभ शौचालय शेजारी दवाखाना रस्त्यातच मांडून बसतो. त्यांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा देतो. वैद्यकीय सेवा देता देता त्यांच्याच बरोबर जेवतो खातो, गप्पा मारतो … विनोद करतो, त्यांच्या सुखदुःखात समरस होतो.
ते काही काम करतील का ? याची चाचपणी करतो आणि त्यांना मग या आधारे आपण छोटे मोठे व्यवसाय टाकून देतो आहोत.
पुणे आणि चिंचवड मिळून भीक मागणाऱ्या लोकांचे असे 60 स्पॉट निश्चित केले आहेत, रोज चार याप्रमाणे पंधरा दिवसात हे सर्व स्पॉट आपण कव्हर करत आहोत.
“भिक्षेकरी” म्हणून न राहता; त्यांनी “कष्टकरी” व्हावे आणि कष्टकरी होऊन “गावकरी” म्हणून सन्मानाने जगावे… हा आपल्या कामाचा मूळ हेतू आणि गाभा आहे…!!!
6. डॉ मनीषा सोनवणे हि योगशिक्षक आहे. रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा एक छान पहाट यावी, आनंद लहरी तरंगाव्या यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रस्त्यावरील सर्व याचकांचा रस्त्यावरच योग अभ्यास घेतला.
हास्ययोगा घेऊन त्यांना थोडं हसवण्याचा प्रयत्न केला…!!!
रस्त्यावर चालणाऱ्या या योग अभ्यासामध्ये घराबाहेर काढलेल्या अनेक “आईंचा” समावेश होता.
मृत्यूचे अनेक पर्याय आहेत….
जन्म घ्यायचा तर आई शिवाय कोणताही पर्याय नाही… !
तुम्ही जगात कोणालाही भेटा…. आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते, ती आपली आईच…!
या जगात सगळ्यात अडाणी कोण असतं तर ती आई… तिला हिशोब कळतच नाहीत..!
मुलांसाठी खाल्लेल्या खस्तांची नोंद ती कुठेही ठेवत नाही…
पण हि नोंद दिसते तिच्या रापलेल्या हातावर…! चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर.. !!
आईला हिशोब कळतच नाहीत.. तरीही जगातली सर्वात मोठी गणितज्ञ तीच असते.
कायम पोरांच्या सुखाची बेरीज करत, पोरांच्या आनंदाचा गुणाकार करते. भेगा पडलेल्या टाचा घेऊन, पदरात कायम भागाकारच घेऊन फिरते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला मुलांकडून वजा केलं जातं. या टप्प्यावर मग ती “शून्य” होऊन जाते.
संकटाच्या काळात मूल जेव्हा “एकक” म्हणून जगत असतं; त्यावेळी आधीची चुकलेली सर्व समीकरणे पुसून, ती त्या “एकक” मुलाच्या मागे उभी राहते आणि त्याला दशक बनवते… शतक बनवते…. सहस्त्र बनवते…!
आई, शेवटी स्वतः मात्र शून्यच राहते…!!!
रस्त्यात सापडलेली आई नावाची *”शून्ये”* आपण पदरात घेत आहोत…!!!
उकिरड्यावर पडलेली, हिच शून्ये गोळा करता करता…. मीच कधी श्रीमंत झालो… मलाच कळलं नाही…!
*अन्नपूर्ण प्रकल्प
पूर्वी भीक मागणारी काही दांपत्य… यांच्याकडून आपण जेवण तयार करून घेत आहोत… (पोळी भाजी वरण भात)
या जेवणाचा एक डबा रु 50 प्रमाणे आपणच त्यांच्याकडून विकत घेत आहोत.
विविध हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब लोक विविध योजनांखाली उपचार घेत आहेत परंतु त्यांना डबा आणून देणारे कोणीही नाही. अशा निराधार आणि निराश्रीत लोकांपर्यंत हे डबे आपण पोचवत आहोत.
(रस्त्यात दिसेल त्याला “दे जेवणाचा डबा” असं आम्ही करत नाही, यामुळे ज्याला गरज नाही त्याच्याही हातात अन्न जाते आणि तो नंतर हे नदीपात्रात फेकून देतो….अन्नाची नासाडी होते)
जेवणासोबतच पाण्याची बाटली आणि विविध सणासुदीला लाडू, पेढे, शिरा किंवा इतर तत्सम गोड पदार्थ त्यांना देत आहोत.
*खराटा पलटण
माझ्याकडे अशा अनेक महिला आहेत ज्यांना भिक मागायची नाही, काम करायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही.
मी आदरणीय संत श्री. गाडगे बाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी हातात खराटा घेऊन गावेच्या गावे स्वतः स्वच्छ करून, इतरांनाही करायला लावत असत.
हिच कल्पना कपाळी लावून आपण “खराटा पलटण” या नावाने प्रकल्प सुरू केला आहे.
यात याचक महिलांना हाताशी धरून दिसेल तो सार्वजनिक अस्वच्छ भाग आम्ही सर्वजण मिळून स्वच्छ करत आहोत.
या बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत.
आमच्या सोबत काम करणाऱ्या या 100 महिलांना आपण युनिफॉर्म दिले आहेत.
आज आपले हे लोक काम करून सन्मानाने जगत आहेत.
आपण आंबा खातो पण त्याची कोय कधीही जपून ठेवत नाही…
काही लोकांचं आयुष्य सुद्धा तसंच असतं….
त्यांची मुलं बाळ सूना नातवंड त्यांचा गर काढून घेतात आणि आयुष्याच्या शेवटी कोय म्हणून फेकून उकिरड्यावर फेकून देतात…
लोकांनी फेकलेल्या अशा कोयी आपण उचलत आहोत आणि पुन्हा त्यांना जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत…
त्यांना खत पाणी घालून तुम्ही हापूसचं आंब्याचं झाड आहात… याची जाणीव करून देत आहोत !
*मनातलं काही
टळटळीत दुपारी, कडाक्याच्या उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झाला; की आपण दुकानातून वीस रुपयाची पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावतो.
याच टळटळीत दुपारी आणि कडकडीत उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झालेल्या रस्त्यावरील निराधार निराश्रित याचकांनी कुठे जायचं… ? पक्षी पाखरांनी कुठे जायचं…?
याचसाठी मार्च एप्रिल मे आणि मध्य जून पर्यंत आपण रस्त्यावर ठिकठिकाणी माठ भरून ठेवले होते.
पाणी भरण्याची जबाबदारी तिथल्याच एका याचकाला दिली होती.
पक्ष्यांसाठी नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं.
सुरुवातीला वाट्या घेऊन हे पाणी ठेवलं होतं… पण या वाट्या सुद्धा चोरीला गेल्या आणि नंतर माठही.
मला गंमत वाटते चोरांची… या बिचाऱ्यांना काय चोरावं तेच कळत नाही.
वाटी आणि माठ चोरून… ते विकून, किती पैसे मिळणार आहेत ? यातून किती आनंद मिळेल ??
चोरायचीच होती, तर एखाद्याची तहान चोरायची, एखाद्या तहानलेल्या मुखात पाणी घातलं असतं, तर त्यातून आयुष्यभर पुरेल इतकं समाधान मिळालं असतं.
स्वतःसाठी काही करून मिळवला जातो तो आनंद… परंतु दुसऱ्यासाठी काही करून मिळवलं जातात ते समाधान… !!!
आनंद थोडा वेळ टिकतो…. समाधान चिरकाल…!!!
माझ्या लेखांच्याही बाबतीत असंच होतं… माझ्या लेखांमध्ये काटछाट करून खाली स्वतःचे नाव टाकून अनेक लोक आपलाच लेख आहे, म्हणून बिनधास्त खपवतात, त्यावर नाटक काढतात, शॉर्ट फिल्म काढतात…
त्यात माझ्या डोळ्यासमोर अनेकांना पुरस्कार मिळालेले मी स्वतः पाहिले आहेत, बातम्या वाचल्या आहेत.
असो; हा झाला त्यांचा तात्पुरता आनंद…!
पण माझे लेख चोरी करण्याऐवजी, माझं काम त्यांनी चोरी केलं असतं, एखाद्याची वेदना चोरी केली असती, तर मिळालं असतं ते आयुष्यभराचं समाधान… त्यांनाही आणि मलाही…!!!
असो…,
मला अनेक वेळा विचारलं जातं, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता ? कोणत्या मंदिरात जाता ? की मशिदीत जाता ? की चर्चमध्ये जाऊन कॅण्डल लावता ??
मी या जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे…
माझ्या हाती स्टेथोस्कोप असतो, तीच माझी आरती… मी तोच ओवाळतो…!!!
दरिद्री नारायणाला, मी जी वैद्यकीय सेवा देतो तोच मी वाहिलेला नैवेद्य…
वेदनेनं तळमळणाऱ्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू हाच मला मिळालेला प्रसाद…
रस्त्याकडेला, फुटपाथ वर गलिच्छ अवतारात पडून माझी परीक्षा घेणाऱ्या प्रभुजींना, मी रस्त्यातच अंघोळ घालतो, तोच मी केलेला अभिषेक… !
देवा, तुझ्यावर लाखो लिटर दुधाचा अभिषेक घालण्याची माझी पात्रता नाही, औकात नाही…
पण ओंजळीत बसेल इतकं दूध घेऊन मी तहानलेल्या बाळांच्या मुखात नक्की घालतो… या बाळांच्या बोबड्या बोलात मी इतका रमतो की मला मंदिरात यायची आठवणच राहत नाही…. मला माफ कर देवा…!!!
थंडीत कुडकुडणाऱ्या लहान पोरांच्या अंगावर आम्ही चादर चढवतो… आणि म्हणून या अल्लाह, मस्जिद मध्ये कधी यायला जमलंच नाही… मुझे माफ करिये…!!!
प्रभू येशू, चर्चमध्ये लावायची कॅन्डल, आम्ही कोणाच्यातरी मनात लावून आलो आहोत… Kindly forgive me… !!!
गुरुद्वारामध्ये मांडायचा लंगर आम्ही रस्त्यावरच मांडला आहे …. वाहे गुरुजी…. मेंनु माफ कर दो…
आणि म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा यापैकी कुठेही जायला मला जमतच नाही…!
हि जी पूजा मांडली आहे, या पूजेचा तुम्ही सर्वजण अविभाज्य घटक आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
शेवटी एका सुप्रसिद्ध वचनाचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, “मी त्या “देवाची” पूजा करतो ज्याला लोक “माणूस” म्हणतात… !!!”

नतमस्तक मी आपणा सर्वांसमोर…!!!

प्रणाम !!!

दिनांक : 30 जून 2024

डॉ.अभिजित सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.