राष्ट्र चेतना अभियान ! आमचा देश आमचं संविधान !! राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान !!! भारतीय स्वातंत्र्याचा अभिमान !!!!

राष्ट्र चेतना अभियान !
आमचा देश आमचं संविधान !!
राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान !!!
भारतीय स्वातंत्र्याचा अभिमान !!!!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 1/8/2023 :
येत्या 15 ऑगस्ट रोजी आपण भारताचा वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. लाखो क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. मिळवलेल्या स्वातंत्र्याचा सन्मान वाढविणे, हे स्वातंत्र्य देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवणे हेच इथल्या देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य आहे. हे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे केवळ भारतीय संविधानाच्या आधारानेच शक्य होणार आहे. त्यामुळेच भारतीय संविधानाविषयी इथल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात सन्मानाची भावना असली पाहिजे. ती आदराची भावना रुजविण्यासाठीच संविधान समता दिंडी गेली दहा वर्षे काम करीत आहे. कीर्तन-प्रवचन, व्याख्यानातून संविधानाचा विचार लोकापर्यंत पोहचविण, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडीच्या माध्यमातून संतविचार आणि संविधान यांच्यातील परस्पर पुरकता समजून सांगणे आदी उपक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहेत.
पुढच्या टपाप्याकडे
भारतीय संविधान बरोबरच राष्ट्रीय प्रतिकांबद्दल लोकांमध्ये जागृकता होणं हे महत्वाचे आहे. राष्ट्रीय प्रतिकं म्हणजे राष्ट्र ध्वज, राष्ट्रगीत या बद्दलचा आदरभाव वाढविणे, राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट) प्रजासत्ताकदिन (26 जानेवार) याबद्दल लोकांमध्ये सन्मानाची भूमिका रुजविणे हे काम करावे लागणार आहे. म्हणूनच या वर्षी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे पंधरा दिवस ‘राष्ट्र चेतना अभियान’ संविधान समता दिंडीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ज्ञ, प्रवचनकार ह.भ.प. भारत घोगरे गुरुजी सन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना वारीकरी कीर्तनकार, प्रभावी वक्ते, विविध सामाजिक संघटना सहकार्य करीत आहेत.
आपणही होऊ शकता
राष्ट्र चेतना अभियानाचा भाग
राष्ट्र चेतना अभियानात आपणही सहभाग घेऊ शकता. आपल्या गावात, संस्थेत, शाळा, महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करू शकता. कोणत्याही गावात कार्यक्रम करायचा असेल तर तेथील मंदिरात कीर्तन-प्रवचनाचे आयोजन करता येईल. शहरात असेल तर एखाद्या हॉलमध्ये कीर्तन किंवा प्रवचनाचे आयोजन करता येईल. शाळा, महाविद्यालय येथे व्याख्यानाचे आयोजन करता येईल.
आपण फक्त हाॅल, साऊंड सिस्टीमचे नियोजन करायचे आहे. कार्यक्रम व्याख्यान स्वरूपात करायचा असेल तर स्थानिक संयोजकांपैकी एकाने प्रस्ताविक करावे, एक अध्यक्ष निवडावा, एकाने सूत्रसंचालन करावे आणि एकाने आभार मानावेत. मुख्य विषयाच्या मांडणीसाठी संविधान समता दिंडीच्या वतीने वक्ता पाठविण्यात येईल.
या अभियानात तिरंगा झेंड्याचा इतिहास आणि महत्व, जन-गण-मन या राष्ट्र गीतकचा इतिहास आणि महत्त्व, स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विषद केले जाईल.
🔹तिरंगी राष्ट्रध्वजाचा इतिहास
भारत 15 ऑगस्ट रोजी 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावत असतील. भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा झेंडा स्वीकारण्यात आला आहे. त्याचा मोठा इतिहास आहे. राष्ट्रीय ध्वजाची कल्पना पिंगली वैंकैयानन्द यांनी मांडली. 22 जुलै 1947 रोजी आयोजित भारतीय संविधान सभेच्या बैठकीत राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा स्वीकारण्यात आला. मात्र, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यापासून राष्ट्रीय ध्वज मोठ्या बदलांमधून गेला आहे. पहिला राष्ट्र ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक कलकत्तामध्ये फडकवण्यात आला होता. हा ध्वज लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्यांचा होता. तेव्हापासून राष्ट्रीय ध्वजाच्या विकासात काही ऐतिहासिक बदल झाले आहेत. द्वितीय ध्वज पॅरिसमध्ये मैडम कामा यांच्याकडून 1907 साली फडकावण्यात आला होता. हा ध्वज पहिल्या ध्वजासारखाच होता. फक्त त्यामध्ये वरच्या पट्टीवर एक कमळ आणि सात तारे होते. सात तारे सप्तऋणींना दर्शवत होते. बर्लिनमध्ये झालेल्या समाजवादी परिषदेतही हा ध्वज प्रदर्शित करण्यात आला होता. तृतीय ध्वज 1917 मध्ये डॉ. एनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी देशांतर्गत शासन आंदोलनादरम्यान फडकविला होता. यात 5 लाल आणि 4 हिरव्या समांतर पट्ट्या आणि सप्तऋषीच्या आकृतीमध्ये त्यावर सात तारे बनलेले होते. वरच्या कोपऱ्यात यूनियन जॅकलाही स्थान देण्यात आले होते. एका कोपऱ्यात पांढरा अर्धचंद्र आणि ताराही होता. 1921 मध्ये विजयवाडा येथे अखिल भारतीय काँग्रेस कमेटीचे अधिवेशन झाले होते. येथे आंध्रप्रदेशच्या एका युवकाने महात्मा गांधी यांना झेंडा दिला होता. यात हिंदू आणि मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. भारताच्या उर्वरित समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक पांढरी पट्टी यात असावी असं महात्मा गांधींनी सुचवलं होतं. तसेच राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतिक म्हणून चरखा यात दाखवण्यात आला होता. 1931 मध्ये तिरंगा ध्वज आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यासाठी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ध्वजामध्ये केसरी, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी गांधीजींचा फिरता चरखा होता. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने त्याला स्वंतत्र भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या रुपाने स्वीकारले. यावेळी ध्वजामध्ये फिरत्या चरख्याऐवजी सम्राट अशोकाचे धम्म चक्र दाखविण्यात आले. तिरंगा स्वतंत्र राष्ट्राचा ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला.
🔹राष्ट्रगीताचा इतिहास
स्वर्गीय रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचं राष्ट्रगीत जन-गण-मन लिहिलं आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रगीताच्या पहिल्या आणि शेवटच्या ओळीही गायल्या जातात. 24 जानेवारी 1950 ला ‘जन-गण-मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली. रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहीली होती. या कवितेचं पहिलं पद म्हणजे भारताचं राष्ट्रगीत. टागोर यांनी ही कविता बंगाली भाषेत लिहिली होती. ज्यात संस्कृत शब्दांचाही वापर करण्यात आला होता. ‘जन-गण-मन’ हे पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 रोजी काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात गायलं गेलं. त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला रवींद्रनाथ टागोर यांच्या या कवितेला अधिकृतरित्या भारताचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं. राष्ट्रगीताचे बोल आणि संगीत टागोरांनी आंध्र प्रदेशच्या मदनापल्लीमध्ये तयार केली होती.
52 सेकंदांत गायलं जातं राष्ट्रगीत
संपूर्ण राष्ट्रगीत गायनासाठी 52 सेकंदांचा वेळ लागतो. पहिलं आणि शेवटचं कडवं असलेलं राष्ट्रगीताचं संक्षिप्त रुप गायनासाठी 20 सेकंदांचा वेळ लागतो. राष्ट्रगीत म्हणताना काही नियमाचं पालन करणं बंधनकारक आहे. जर कुणी या नियमांचं उल्लंघन करतं तर त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
🔸संयुक्त राष्ट्र संघात घुमला
‘जन-गण-मन’चा आवाज
देश स्वातंत्र्य होत असताना 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री पहिल्यांदा संविधान सभेची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाला ‘जन-गण-मन’ गायलं गेलं. 1947 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत भारतीय प्रतिनिधी मंडळाला भारताच्या राष्ट्रगीताबाबत माहिती मागितली गेली. तेव्हा भारतीय मंडळाने ‘जन-गण-मन’ची रेकॉर्डिंग संयुक्त राष्ट्र संघाला दिली. त्यादिवशी संपूर्ण जगभरातून आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींसमोर भारताचं राष्ट्रगीत अभिमानाने वाजवलं गेलं. त्यावेळी सर्वांनी त्यांची प्रशंसा केली. या घटनेच्या तीन वर्षांनंतर 24 जानेवारी 1950 ला भारताच्या संविधानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सभा बोलवण्यात आली होती. या दिवशी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी अधिकृतरित्या ‘जन-गण-मन’ला राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगाण घोषित केलं.
🔹पंचम जाॅर्जच्या स्वागतासाठी हे लिहिलं
असा खोटा प्रचार पूर्वीपासूनच
‘जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता,’ हे कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत प्रथम जाहीरपणे गायलं गेलं, ते २७ डिसेंबर १९११ रोजी काँग्रेस अधिवेशनात. दुसऱ्याच दिवशी इंग्रजी वर्तमानपत्रांतून ते गीत ‘राजा पंचम जॉर्जच्या’ स्वागतासाठी गायलं गेलं, असं खोडसाळपणे काही वर्तमानपत्रांतून छापून आणण्यात आले.
वास्तविक ‘पंचम जॉर्ज स्तुतीपर’ गीत रामभुज चौधरी यांनी हिंदीतून गायलं होतं.
आरोपांचं वादळ उठलं तेव्हा रवींद्रनाथ टागोर त्यासंदर्भात इतकंच म्हणाले, ‘इंग्रज राजा पंचम जॉर्ज यांच्या स्वागताप्रीत्यर्थ मी हे गीत लिहिण्याचा मूर्खपणा करीन, असा आरोप करणाऱ्यांना उत्तर देणं हाच मला अपमान वाटतो!’
ज्यांनी राष्ट्रगीताबाबत त्यावेळी अपप्रचार केला त्या प्रवृत्ती आजही आहेत. आजूनही त्यांच्याकडून संधी मिळेल तसा अपप्रचार केला जातोय. राष्ट्रप्रेमी नागरिकांनी हे कारस्थान हाणून पाडलं पाहिजे.
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर
संस्थापक अध्यक्ष: वारकरी विचार मंच.
संपर्क: 9892673047
9594999409