ताज्या घडामोडी

अहिल्यादेवी होळकर, म्हणजे भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’- एक इंग्रजी लेखक

अहिल्यादेवी होळकर, म्हणजे भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’- एक इंग्रजी लेखक

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 31/05/2024 :
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म – ३१ मे १७२५ चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर.
स्मृती – १३ ऑगस्ट १७९५ (इंदोर,मध्यप्रदेश)

अहिल्यादेवींचा जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर मधील जामखेड तालुक्यातील चौडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या ‘कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट’ म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी १७६६ ते १७९५ म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते. चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा. कूच करतांना, मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा. पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.
पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्या बाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या. भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे, काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर, जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते. अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.


अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे. भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा कर घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत आंग्ल लेखक माल्कम यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले. महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला, उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली. एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही. राजकारणातील बारकावे व तत्व व्यावहारीक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या. ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किवा म्ह्टले तर नव्हती अशी परस्थिती होती अश्या खडतर काळात त्यांनी भारतातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली. आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्य कला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत. वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संकृतीचा वारसा तर जपलाच पण त्याच बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चीतच अभिमानास्पद आहे .’शेतकरी सुखी तर जग सुखी’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले. अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या. शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्त्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले.
*गुणग्राहता
मातोश्रीची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकुन अनेक विद्वन लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत. अनेक विषयाचे विद्वान, शास्त्री पंडीत, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम यानाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या राजाश्रय देत असत. महेश्वर नगरीत वास्तव करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्याकाळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारूपाला आली होती. ग्रंथ संपंदा, निर्मिती छापखाने नसल्याने त्या काळी धर्माचे तत्वज्ञान जाणून घेण्याकरिता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावे लागत होते. हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत. ज्या प्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या विद्द्येची महत्त्व जाणत असल्याने त्याच्या मागणी प्रमाणे रक्कम देऊन ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्याप्रसाराचे काम केले.
*अंधश्रद्धा निवारण
या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाहीत असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने १८२९ साली राजाराम मोहन रॉय यांचा प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टतेची प्रचीती आपणास यते.
*चोर व दरोडेखोर यांचे मत परिवर्तन
त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना गायी, म्हशी आणि जमीनी दिल्या व त्यांचे मत परिवर्तन केले व ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला. भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली. एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा नर्माण केला.
*न्यायप्रियता
अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले. अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना ‘तत्त्वज्ञानी राणी’ असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक ‘तत्त्वज्ञानी राजा’ भोज याच्याशी असावा. अहिल्यादेवी होळकर या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे. वाघा सारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे. या इंदूर मधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब, घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची नेआण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी भिल्ल लोकांना त्यापासून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते. वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत मावळली. भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतिशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती. अहिल्यादेवींच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ या दिवशी एक टपाल तिकिट जारी केले. या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव ‘देवी अहिल्याबाई विमानतळ’ असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास ‘देवी अहिल्या विश्वविद्यालय’ असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ आहे.
*किल्ले व भुईकोट
* किल्ले महेश्वर
* इंदोरचा राजवाडा
* चांदवडचा रंगमहाल
* वाफगाव – यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ
* खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा
* काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकिपीडिया

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.