ताज्या घडामोडी

⭕ वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा: “खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या” डॉक्टर पेशामागचं भीषण वास्तव

वैद्यकीय व्यवसायाचा कॉर्पोरेट धंदा: “खोऱ्याने पैसे ओढणाऱ्या” डॉक्टर पेशामागचं भीषण वास्तव

🎇माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव🎇

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 23/02/2024 :
हॉटेल टाकण्या साठी तुम्ही आचारी असण्याची गरज नाही, तसंच हॉस्पिटल टाकण्यासाठी पण तुम्ही डॉक्टर असण्याची गरज नसते.ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नसते.पण मोठया मोठया उद्योगपतींना हे चांगलंच माहिती होतं. मग त्यांनी टोलेजंग कॉर्पोरेट हॉस्पिटल्स टाकली आणि त्याचा “मनी मेकिंग बिझनेस” बनवायला सुरुवात केली.सोबत कॅशलेस मेडिक्लेम कंपन्यांचं जाळं वाढवायला पद्धतशीर सुरुवात केली गेली. आजारांच्या आणि मरणाच्या भीतीचं मार्केटिंग केलं जाऊ लागलं.
आपल्याला लक्षात येत असेलच की १९९२ पासून खूप गोष्टी कमालीच्या बदलत गेल्यात.
मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलचा डोलारा सांभाळायचा तर मग मेंटेनन्स पण झेपला पाहिजे, त्यासाठी पेशन्ट इनपुट जास्त पाहिजे. मग त्यासाठी सगळे मार्केटिंग स्किल्स वापरले गेले.
कॉर्पोरेट् हॉस्पिटलचे पॅम्प्लेट्स गावोगावी वाटले जाऊ लागले. पेशन्ट कॅचमेण्टसाठी फ्री कॅम्प ठेवले जाऊ लागले.
गरज नसताना (प्रिकॉशन म्हणून) तपासण्या सजेस्ट केल्या जाऊ लागल्या. लोकंही “जरा सगळ्या बॉडीचं चेकप करा बरं” म्हणून भुलू लागले. PRO गावशहरातल्या डॉक्टर्सचे उंबरे झिजवू लागले. कमिशनचं आमिष देऊ लागले. आता वाडीवस्तीवरचा पेशन्ट पण डायरेक्ट पुण्यामुंबईला जाऊ लागला आणि “म्हातारीच्या इलाजासाठी वावर इकलं, पण नीटच करून आणली” हे अभिमानाने सांगू लागला.
जेवढा तुमच्याकडं पैसा जास्ती, तेवढं मोठं हॉस्पिटल निवडलं जाऊ लागलं. आणि जेवढं मोठं हॉस्पिटल तेवढा अभिमान जास्ती वाटू लागला.काहींना तर छोट्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची लाज वाटू लागली. त्यात इन्शुरन्स असेल तर बोलायलाच नको.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,मग कॉर्पोरेट लॉबीनं फार्मा कंपन्यांना आणि सरकारला हाताशी धरलं. सरकारातून आपल्या पथ्यावरचे कायदे आणि नियम करून घ्यायला सुरुवात केली.
Consumer Protection Act नं तर खूप परिस्थिती चिघळवली. डॉक्टरांनी क्लिनिकल जजमेंटची साथ सोडली, आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन बेस्ड होऊ लागलं. तपासण्यांना महत्व आलं. मग उपचाराचा खर्च वाढला.
त्याचा परिणाम म्हणून, समाजाचा डॉक्टरांवर संशय वाढला आणि डॉक्टरांचा समाजावरचा विश्वास कमी झाला.
मग आला CEA.. Clinical Establishments Act. त्यानं तर मध्यम आणि छोट्या हॉस्पिटल्सचं कंबरडंच मोडलं.
हॉस्पिटल कसं असावं याचे युरोपातल्या धर्तीवर बनविलेले नियम लागू केले गेले. तिथले ‘स्टँर्डडस’ जसेच्या तसे लागू केले गेले. तिथली ट्रीटमेंट कॉस्टिंग आणि इथली परिस्थिती याचा विचारच केला गेला नाही.कायद्याप्रमाणे सगळे नॉर्मस् पाळायचे म्हणलं तर छोट्या हॉस्पिटलना अजिबात शक्य नाही, किंवा मग उपचाराचा खर्च तरी अव्वाच्यासव्वा वाढतो. मग समाजासाठी पुन्हा डॉक्टरच रडारवर.
अलीकडे छोट्या आणि मध्यम हॉस्पिटल्ससाठी प्रॅक्टिस करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. स्वतःचं हॉस्पिटल टाकायची हिम्मतच बहुतांश जण करत नाहीत. मग काय, व्हा कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन. आणि डावही तोच आहे.
कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स हे फक्त प्यादे म्हणून वापरले जातात. तिथे कन्सल्टंट म्हणून राहायचे असेल तर मंथली टार्गेट कंप्लिट करावे लागते.
हॉस्पिटलला किती बिझनेस करून दिला, यावर त्या डॉक्टरचे तिथले भवितव्य अवलंबून राहते. बिलिंग डॉक्टरांच्या हातात नसतंच. लोकांना वाटतं तिथं डॉक्टरच लुटतात, पण ते मॅनेजमेंट कडून लुटले जात असतात.
पण तरीही तिथे जॉईन राहण्याशिवाय कित्येक स्पेशालिस्ट आणि सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांकडे पर्यायच् नसतो. कारण स्वतःचं सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल काढणं हे बहुतांश डॉक्टरांना परवडणारं नसतं.
ही सगळी सिस्टिम खरंतर आपणच जन्माला घातली आहे.. छोटे दवाखाने, छोटे नर्सिंग होम, फॅमिली डॉक्टर या सगळ्या संकल्पनांचा बळी देऊन..!
त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावला – सरकार नवनवीन कायदे आणतंय की ज्याची पूर्तता करणे वैयक्तिकरीत्या डॉक्टरला बहुतेक वेळा शक्यच होत नाही. त्यामुळे छोटी हॉस्पिटल्स बंद पडत चालली आहेत.त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले – त्यामुळे वैयक्तिक हॉस्पिटल्स काढण्यापासून डॉक्टर्स पळ काढायला लागले आहेत.
समाजात डॉक्टर्सची संख्या कमी आहे म्हणून सरकारी कॉलेजेस वाढविण्यापेक्षा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचं कुरण चरायला मोकळं केलं गेलं, आणि डॉक्टरांचं भरमसाठ उत्पादन सुरू झालं. त्यातून अमाप पैसा ओतून जे डॉक्टर झाले, ते एक तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन झाले किंवा आपापली हॉस्पिटल्स टाकून हप्ते फेडत बसले.
MBBS साठी पन्नास लाख डोनेशन आणि पुढे PG साठी एक ते दोन कोटी डोनेशन देऊन शिक्षण घेतलेला, चारपाच गुंठ्यांच्या हॉस्पिटलसाठी दीड कोटी आणि बिल्डिंगसाठी एक कोटी मोजलेल्या, आणि सर्व सोयीनींयुक्त हॉस्पिटल टाकलेल्या डॉक्टरला “तू समाजाची सेवा कर” असं तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणणार आहात..?
लोकांना वाटतं डॉक्टर खोऱ्याने ओढतात. पण खोरे असण्याचे दिवस गेलेत.
प्रत्येक स्पेशालिटीत शंभरात दहाबारा जणच चांगलं कमवित असतात, आणि समाजाच्या डोळ्यासमोर तेच येतात. आणि मग जनरलाईझ्ड स्टेटमेंट होते की डॉक्टर लोक खोऱ्याने ओढतात म्हणून.मग छोट्या हॉस्पिटल्सनी ह्या मल्टीस्पेशालिटी आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल्स समोर कसा तग धरायचा सांगा?येणारा काळ हा पूर्णपणे मल्टीस्पेशालिटी कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचा असणार आहे. पण तोपर्यंत मेडिकल फिल्डचं बरंच चारित्र्यहनन झालेलं असेल.
आणि छोट्या हॉस्पिटल्सचा पूर्णपणे बळी गेलेला असेल…

लेखक : डॉ सचिन लांडगे,
भुलतज्ञ,
अहमदनगर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button