धर्म और जात मत पूछो, ज्ञान ही पूछो !

धर्म और जात मत पूछो, ज्ञान ही पूछो !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 14/11/2025 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्व धर्माचा आदर केला आणि सर्व धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धार्मिक कार्यातून लोकांमध्ये भेद न ठेवता सर्वांना एकत्र आणले. त्यांच्या मते मंदिरे ही पूजा अर्चा करण्याच्या जागा नसून ती राष्ट्र आणि धर्म रक्षणाची जागा आहे. त्यांनी जातीभेदाच्या निर्मूलनावर भर दिला. तसेच सर्व लोकांना समान वागणूक देण्यावर जोर दिला. त्यांच्या मते जात, पंथ आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेची एकता महत्वाची आहे. त्यांनी जातीय मतभेद दूर केले, त्यामुळे श्रीमंत आणि गरीब लोक एकत्र येऊ लागले. त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षणावर भर दिला.
धर्म और जात क्या पूछो,
पूछो तो ज्ञान ही पूछो ||टेक||
एखाद्या व्यक्तीची जात किंवा धर्म विचारण्या ऐवजी तिचे ज्ञान आणि विचार विचारावेत. कारण व्यक्तीचे खरे मूल्य तिच्या ज्ञानामध्ये असते. धर्म आणि जात विचारल्याने वादविवाद वाढतील. संत कबीर म्हणतात, “जाति न पूछो साधूकी, पूछ लीजिए ज्ञान | मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान ||” साधू असो वा ज्ञानी माणसाची जात, धर्म विचारु नये तर त्यांचे ज्ञान आणि विचार विचारावेत. तलवारीचे मोल तिच्या धार आणि उपयोगात असते. तर म्यान (तलवारीचे कवच) हे फक्त तिचे आवरण असते. त्यामुळे तलवारीच्या योग्य मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करा, तिच्या आवरणावर नाही. थोडक्यात बाह्य ओळखीपेक्षा आंतरिक ज्ञानाला अधिक महत्व देण्याचा प्रयत्न करा.
किसी को भी भला पूछो,
किसीका भी भला पूछो |
गुण सन्मान कर पूछो,
ओ अपना जानकर पूछो ||1||
प्रत्येकाच्या कल्याणाची, चांगल्याची कामना करा आणि नेहमी कल्याणकारी भावनेने वागा. समोरचा व्यक्ती कसाही असला तरीही आपण मात्र आपल्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार न ठेवता चांगुलपणा ठेवला पाहिजे आणि त्याचे भले चिंतले पाहिजे. कोणताही माणूस मग तो आपला मित्र असो वा शत्रू, आपल्या विचारामध्ये सर्वांसाठी चांगुलपणा असावा.
भला किसी का कर ना सको तो |
बुरा किसी का मत करना |
पुण्य नहीं बन सकते तो तुम |
कांटे बन कर मत रहना ||
यावरून परोपकाराची भावना व्यक्त होते. जर दुसऱ्याला मदत करु शकत नाही तर कुणाचही नुकसान करु नये. गुण सन्मान पूछो म्हणजे गुणवान व्यक्तीला विचारा किंवा चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या. कारण गुण म्हणजे चांगल्या गुणांनी युक्त व्यक्ती आणि सन्मान करणे म्हणजे आदर करणे, विचारपूस करणे. दुसऱ्याशी आपलेपणाने वागणे म्हणजे प्रेम, आदर आणि विश्वास दाखवणे, त्यांच्याशी सहानुभूती पूर्वक वागणे तसेच योग्य नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करणे होय. पण यात स्वतःचा आत्मसन्मान गमावणे अपेक्षित नाही. दुसऱ्याशी चांगले वागूनही लोक आपल्याशी वाईट का वागतात? कारण आपण चांगले तर जग चांगले, ही थोरामोठ्यांची शिकवण आपण अमंलात आणावी. चांगले वागणे हा आपला स्थायीभाव असावा. उदा:- साधूने शिष्याला एक अंगठी दिली आणि किंमत किती येते ते पाहायला पाठविले. शिष्य व्यापारी कडे गेला. व्यापारी अंगठीचे हजार रुपये देतो म्हणाला. दुसऱ्या व्यापारीकडे गेला, तेथे दहा हजार देतो म्हणाला. नंतर सोनाराकडे गेला तर सोनार अंगठीचे एक लाख देतो म्हणाला. शिष्य जवाहिराकडे गेला तर जवाहिर म्हणाला की, माझी सर्व संपत्ती दिली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही. शिष्य साधूकडे आला. शिष्याने सर्व ठिकाणी सांगितलेले मोल साधूला सांगितले. साधू म्हणाला, जो खरा रत्नपारखी होता त्याने अंगठीचे मोल सांगितले. यावरून असे दिसते की, गुण ओळखणारा, त्या गुणाची कदर करणारा सुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. तुम्ही तुमचा चांगुलपणा कायम ठेवा. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच मिळेल. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचाराची पाठराखण काही उपयोगाची नसते.
किसी को देश मत पूछो,
भेष-प्रादेश मत पूछो |
पूछना है तो दिल पूछो,
खुलाकर दिलसे मिल पूछो ||2||
एखाद्या व्यक्तीची जात, धर्म, प्रांत किंवा बाह्य स्वरुप यावरून त्याची ओळख निश्चित करु नये. तर त्याच्या आंतरिक गुणांवर आणि व्यक्तीमत्वावर लक्ष केंद्रित करावे. माणसांमाणसातील भेदभावाला नकार दिला पाहिजे. जात, धर्म, प्रदेश यासारख्या गोष्टीमुळे व्यक्तीला कमी लेखू नये. या देशात राहणारा व्यक्ती हा कोणताही वेश धारण करो किंवा कोणत्याही प्रदेशात राहो तो माणूसच आहे. जर तुम्हाला काही विचारायचे असेल तर ते मनापासून, मोकळ्या मनाने विचारा आणि हृदयापासून संवाद साधा. म्हणजे खऱ्या मनाने आणि प्रामाणिकपणे प्रश्न विचारा. ज्यात कोणत्या प्रकारचा खोटेपणा किंवा कपट नसावे. तुमच्या मनाच्या गाभ्यातून तुमचे हृदय मोकळे करा. कोणताही पूर्वग्रह न ठेवता, प्रामाणिकपणे आणि मोकळ्या मनाने संवाद साधला पाहिजे.
सभी हम एक मानव है,
विश्व संसार के अंदर |
वो तुकड्यादास कहता है,
एक कैसे रहो पूछो ||3||
सर्व आपण एक मानव आहोत, विश्व संसाराच्या आत. या अफाट जगात मनुष्य हा एक जीव आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक वैयक्तिक विश्व असते, जे त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या मर्यादेनुसार मोठे किंवा लहान असू शकते. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परोपकाराच्या मार्गावर चालत संपूर्ण मानव जातीला एकाच विश्व-सत्याच्या रुपात पाहावे. सर्व मानव एकाच मोठ्या विश्वाचा भाग आहेत आणि एकमेकांचा आदर करावा, सहकार्य करावे, एकतेने राहावे. इतर कर्मकांडापेक्षा मानवतेची सेवा करणे, दया, करूणा, सत्य, परोपकार या मूल्यांना महत्व द्यावे. मानवता धर्म केवळ स्वतःच्या धर्माचे पालन न करता, सर्व मानवाप्रती प्रेम, आदर, सहानुभूती ठेवून त्यांना मदत करावी. शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की, एकमेकांसोबत एकोप्याने कसे राहायचे याचा विचार करा. एकमेकांना मदत करुन सोबत राहण्याचा मार्ग शोधा. महाराजांनी ग्रामविकास आणि ग्रामसंस्कृतीवर भर दिला. समाजातील सर्व मानवाशी एकता, सलोखा आणि सामुदायिक भावनेने वागावे.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677

