कां वाचावी ग्रामगीता?

कां वाचावी ग्रामगीता?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 2/11/2023 : राष्ट्रहिताचा, उच्च दर्जाचा असा ग्रामगीता ग्रंथ वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिला. ग्रामगीता या ग्रंथाची रचना प्रासादिक आहे. लोकजीवन पावन करणारा प्रवाह अंतःकरणाला स्पर्श करणारा आहे. हा ग्रंथ शिकवण्या सारखा सोपा व सहजगम्य आहे. महाराजांना ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा पंढरपूर येथेच झाली. भगवान श्रीकृष्णाने मायेच्या बंधनामध्ये अडकलेल्या अर्जूनाला गीता सांगून धर्माचा मार्ग सांगितला तर आधुनिक युगामध्ये कर्मकांड आणि अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या सामान्य जनांना उपदेश करण्यासाठी महाराजांनी ग्रामगीता हा लिहून पूर्ण केला. याबाबत स्पष्टपणे ग्रामगीतेत लिहितात.
पुण्यक्षेत्र पंढरपूरी, बैसलो असता चंद्रभागेतीरी ।
स्फूरु लागली ऐसी अंतरी, विश्वाकार वृत्ती ।।
जोपर्यंत बाहेर सुख आहे असे वाटते आणि खरे सुख आत आहे, हे कळत नाही तोपर्यंत सुखाचा शोध चालू राहतो. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत सांगायचे काही शिल्लक ठेवले नाही. आम्ही ग्रामगीता वाचत नाही, ऐकत नाही तसेच ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायात जे जे सांगितले आहे ते सर्व स्वतः आचरणात आणावे व तसेच वर्तन करावे. ऋषी घुसरकर महाराज म्हणतात.
वाचता वर्तता नित्य ग्रामगीता ।
होईल सार्थकता जीवनाची ।।
राष्ट्रसंत श्री तुकडोजी माऊली ।
हितार्थ बोलली समाजाच्या ।।
व्यक्ती गाव देश किंबहुना विश्व ।
होईल आदर्श आचरिता ।।
सर्व धर्म पंथ आणि सांप्रदाय ।
साधे समन्वय तियेचेनी ।।
दास घुसरकर विनवी सप्रेम ।
सोडू नका नेम वाचण्याचा दं।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आदर्श गाव कसे असावे यावर भर टाकण्यासाठी लिहिलेल्या ग्रामगीतेला वाचून आदर्श ग्रामाची संकल्पना पूर्ण करावी. मुलांच्या शिक्षणात ग्रामगीतेचे वचन कामी पडणारे आहे म्हणून प्रत्येकाने ग्रामगीता वाचावी असे मला वाटते. महाराजांनी ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माण, ग्रामरक्षण, ग्रामआरोग्य, ग्रामशिक्षण, ग्रामकुटूंब, ग्रामप्रार्थना, ग्राममंदिरे, ग्रामसेवा, ग्रामसंस्कार, ग्रामउद्दोग, ग्रामसंघटन, ग्रामआधार या सर्वांचा सूक्ष्म विचार ग्रामगीता या ग्रंथात केला. ग्रामगीतेतील हा विचार प्रत्येक गावोगावापर्यंत पोहोचावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत गाव कसं असलं पाहिजे याची संकल्पना मांडली आहे. आपण कसं जीवन जगले पाहिजे ते कळेल म्हणून ग्रामगीता वाचावी.
आजकाल गावात महाराजांच्या चरित्रावर, ग्रामगीतेवर मोठमोठी भाषणे ठोकणं काही लोकांची फॕशन झाली आहे. “ग्राम हा विश्वाचा नकाशा, गावावरुन देशाची परीक्षा । गावची भंगता, अवदशा येईल देशा ।।” येथून सुरु करतात. ग्रामगीता पाठांतर करुन येतात आणि पटपट बोलतात. काय बोलत आहे याचे भान विसरतात. असे करावे, तसे करावे लंबे भाषण देतात. महाराजांनी सत्याचे आचरण करायला सांगितले आहे. मन आणि चारित्र्य शुद्ध असलं पाहिजे. त्यागही सांगितला आहे. भ्रष्ट वृत्ती, लोभ यापासून दूर रहायला सांगतात. सर्व धर्म, सर्व जाती समभाव, उच्च निच, गरीब-श्रीमंत असा भेद दूर करा. गावात एकता निर्माण करा. हे गावात होत असेल तर गाव आदर्श होईल.
ग्रामगीता नव्हे पारायणासि ।
वाचतां वाट दावी जनासि ।।
समूळ बदलवी जीवनासि ।
मनी घेता अर्थ तिचा ।।
या ग्रामगीता ग्रंथातील एकेक ओवी नेम न चुकणारा तीक्ष्णबाण आहे. तो सरळ हृदयाला जाऊन भिडतो. जसे छन्नीने घाव ैघालून दगडातून मूर्ती आकारल्या जात असते, तसे या ग्रंथाचे वाचन मनावर दृढ संस्कार करते. ग्रामगीता ही पारायणासाठी लिहिलेली नाही तर तिचे वाचन करतानाच ती उन्नतीचा मार्ग लोकांना दाखविते. तिचा अर्थ मनात ठसला म्हणजे ती वाचकाचे समूळ जीवनच बदलून टाकते. ही हार, फुलांनी पूजा करावयाची पोथी नव्हे. ही गावाच्या उद्धाराची दृष्टी देते. आम्ही ग्रामगीतेला आजच्या युगाची संजीवणी बुटी मानतो. कोणी संसारासाठी, अडचणीने निराश झाला असेल, कोणी निराधार होऊन विपत्तीत पडला तर त्याला ग्रामगीता धीर देते. कोणी अन्यायाने लोकांना छळत असेल त्याला ग्रामगीता सरळ मार्गाला लावते. हे जग दिव्य व्हावे म्हणून ग्रामगीता सर्वांच्या अंतःकरणातील दैविशक्ती जागी करते. ग्रामगीता मनावर उत्तम संस्कार बिंबवतील व मनुष्य सद्गुण संपन्न होण्यास पात्र होईल. या ग्रंथात जे उपाय सांगितले आहेत ते कृतीत उतरविले तर जीवनात सुख व शांती लाभेल. अल्पबुद्धी नाहीसी होऊन वाचताना बोध होईल. त्या बोधाने जीवन प्रकाशित झाले की, मित्र धर्म, इष्ट कर्तव्य अंगी बाणेल. सर्वांविषयी प्रेम आत्मकेंद्रित होईल व मनात करुणा वाढून ग्रंथ वाचनाचे फळ पदरात पडेल.
ग्रामगीता धर्माचरणामुळे मनुष्य जीवनाचा विकास होतो हे शिकविते. प्रत्येकाला धर्माच्या खऱ्या स्वरुपाचे ज्ञान झाले पाहिजे तरच तो त्याप्रमाणे जीवन जगू शकेल. म्हणून “व्यक्ती व्यक्ती व्हावी धार्मिक” असे महाराज म्हणतात. ग्रामगीतेची सुरुवात महाराजांनी परमेश्वराला नमन करुन केली आहे.
ओम नमोजी विश्व चालका ।
जगदवंद्या ब्रम्हांडनायका ।।
एकचि असोनि अनेका ।
भाससी विश्वरुपी ।।
ग्रामगीता वाचल्यानंतर कळते की, महाराजांनी ग्राम निर्माणाचा कृती कार्यक्रमच जणू सर्वांना उपलब्ध करुन दिला. आदर्श गावाच्या निर्मितीसाठी लागणारे आवश्यक ते तत्त्वज्ञान या ग्रामगीतेत उपलब्ध आहे. महाराजांनी गाव निर्माण कसं करायच? त्याकरिता आम्हाला काय काय करावे लागेल याचे यथार्थ वर्णन आपल्या ग्रामगीतेत केलेले आहे. आपले गाव आपणच छान करावे, गोजिरे करावे आणि ते शहराहूनही सुंदर करावे. मग हे होईल कसे? याचे गमकही राष्ट्रसंतानी सांगितले आहे.
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे ।
हे सूत्र ध्यानी ठेवून खरे ।।
आपले ग्रामचि करावे गोजिरे ।
शहराहूनि ।।
सामान्य माणूस उभा झाला, कार्यप्रवण झाला की, गाव व देश उभा व्हायला वेळ लागत नाही. देशातील प्रत्येक गाव असे झाले तर देशाचे सुंदर चित्र साऱ्या जगासमोर येईल. विश्वाची अशीच कल्पना महाराज ग्रामगीतेत मांडतात.
गाव हा विश्वाचा नकाशा ।
गावावरुनी देशाची परीक्षा ।।
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली. शेतकऱ्याला महाराज “ग्रामनाथ” म्हणतात. ग्राम निर्माणाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा म्हणून गो-पालन हा शेती पूरक व्यवसाय करावा. गो-पालन केल्यानंतर शेतीकरिता बैल मिळेल. सर्वांनी लक्षात ठेवावे की, गाय कसायाला विकू नका. गायीच्या शरीरात सर्व देवांचा वास आहे. गाईच्या दुधात कायाकल्प करण्याचे सामर्थ्य आहे.
भारत कृषिप्रधान देश, शेतीसाठी हवा गोवंश ।
गोरसा इतुका नसे सत्वांश, अन्यत्र शुद्ध ।।
औ
राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात की, संसाराच्या गाडीचे स्त्री पुरुष ही दोन्ही चाके आहे. त्यातले एकजरी चाक कमी किंवा कमजोर असलं तर गाडी पुढे जाणार नाही. तो संसार उध्वस्त झाल्या बिगर राहणार नाही. स्त्रीयांना योग्य सन्मान मिळणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणे शक्य नाही.
स्त्री पुरुष ही दोन चाके ।
परस्पर पोषक होता निके ।।
गाव नांदेल स्वर्गीय सुखे ।
तुकड्या म्हणे ।।
गावाला आदर्श करायचे असेल तार शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र शिक्षणाची सुविधा गावाताच निर्माण करावी. मुलांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी मुलांना शाळेत घालायला राष्ट्रसंत सांगतात. शिक्षणासोबतच जीवन शिक्षण घेणे महत्त्वाचे ठरते.
याचसाठी शिक्षण घेणे ।
की जीवन जगता यावे सुंदरपणे ।।
आजचा काळ हा संगणक युगाचा व तंत्रज्ञानाचा काळ आहे. मानवी समाजाने भौतिक विकासात नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. भौतिक जीवन समृद्ध दिसत असले तरी मानवतेची मूल्ये मात्र रसातळाला गेलेली आहे. याचे कारण म्हणजे शिक्षणामध्ये असलेला नैतिक मुल्यांचा अभाव होय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत मूल्य शिक्षणाला महत्त्व दिले आहे. आज भारताला खरोखरच जीवन आणि शिक्षण यांचा मेळ साधणारी शिक्षण पद्धती हवी आहे. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. महाराजांनी शिक्षणामध्ये सुसंस्काला फार महत्त्व दिलेले आहे. शिक्षण हे व्यक्तीला स्वावलंबी बनविणारे जे शिक्षण आहे तेच जीवन शिक्षण होय.
नुसते नको उच्च शिक्षण ।
ते गेले मागील युगी लपोन ।।
आता व्हावा कष्टीक बलवान ।
सुपूत्र भारताचा ।।
या देशाची अर्थ व्यवस्था शेतीवर आधारलेली आहे. देशाचा मालक म्हणजे शेतकरी. त्याचे हाल पाहिलेत तर एखाद्या भिकाऱ्याला लाजवेल. देशाच्या पोशिंद्याची हालत जर अशी असेल तर कितीही उद्योगधंदे उभारले तरीही देशाच्या उत्पादनात भर पडणार नाही. या ग्रामनाथाला जीवनदान देण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर आपण जगू. शेतकऱ्याच्या निघून जाण्याने प्रश्न सुटू शकणार का? तो बळीराजा हाडाचे मणी आणि रक्ताचे पाणी होईपर्यंत राबतो. जेवढा माल तयार झाला तो घेऊन बाजाराला जातो, पण बाजारात भाव मिळत नाही. खिशात पैसा नाही, कसं जगावं त्याने?
सर्व ग्रामासि सुखी करावे ।
अन्न वस्त्र पात्रादि द्यावे ।।
परि स्वतः दुःखचि भोगावे ।
भूषण तुझे ग्रामनाथा ।।
वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून व्यक्ती आरोग्य आणि ग्राम आरोग्य या दोहोंची संकल्पना मांडली आहे. प्रत्येक व्यक्ती हा निरोगी रहावा व बलवान व्हावा. ज्यामुळे तो राष्ट्राच्या कार्याला हातभार लावू शकेल. अशी त्यांची धारणा होती. प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या सात्विक असायला पाहिजे. सकाळी उठून आरोग्यदायी हवेचे सेवन करणे, व्यायाम करणे, स्नान करणे यामुळे नवीन स्फूर्ती निर्माण होते. तसेच सूर्य नमस्कार हे व्याधी प्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता आवश्यक आहे. सात्विक अन्नाचे सेवन केल्याने सात्विक विचार प्रवर्ततील. मद्य, मासांहार सेवनाने विकार बुद्धी वाढेल. खरे मनुष्यपण सात्विक आहाराच्या माध्यमातून तयार होते, असे महाराज ग्राम आरोग्य या अध्यायामध्ये निरुपण करतात.
व्यक्ती व्हावया आदर्श सम्यक ।
पाहिजे दिनचर्या सात्विक ।।
सारे जीवन निरोगी सुरेख ।
परीच होईल गावाचे ।।
जीवन सर्वांनाच मिळते पण जगता सर्वांनाच येत नाही. कारण जीवन जगणे ही कला आहे. स्वतः संतोषपूर्ण जीवन जगता जगता इतरांनाही कष्ट पडू नये. अशाप्रकारे दूरदृष्टीचा विचार करुन जे वर्तन करतात तेच खरे मानव. निसर्गाने तर सर्वांनाच सारखे जीवन दिले. परंतु मानवाच्या कलेप्रमाणे त्यात भिन्नता निर्माण झाली. जीवन कला ही मनुष्याने निवडली आहे. राजस, तामस, सात्विकता ह्या सर्व जीवनकला आहेत. अशी जीवनकला आत्मसात करावी की, जी आत्मविकास, आत्मोन्नती साधण्यास साह्यभूत ठरुन मरणोपरान्त कीर्ती प्राप्त करून देईल. तोच खरा कलावंत जो समाजाशी समरस होतो आणि मानवता विकसित करतो. एवढं काही ग्रामगीता शिकविते तर नक्कीच ग्रामगीता वाचावी.
कलेचे ऐसे तीन प्रकार ।
राजस तामस सात्विक सुंदर ।।
जो जयासी सजवी चतुर ।
तो ओळखावा त्या गुणाचा ।।
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७