ताज्या घडामोडी

मोदीजी पंतप्रधान असतानाच पवारसाहेबांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणत्या कारणाने दिला?

मोदीजी पंतप्रधान असतानाच पवारसाहेबांना ‘पद्मविभूषण’ पुरस्कार कोणत्या कारणाने दिला?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj Taluka Malshiras District Solapur ओMaharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 28/10/2023 :
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात काही विकासकामांचे लोकार्पण झाले. ‘श्री. शरद पवार हे कृषीमंत्री असताना त्यांनी काय केले?’ असा एक राजकीय प्रश्न या विकास कामांच्या लोकार्पणात पंतप्रधानांनी विचारला. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याचे लोकार्पण त्यांनी केले. विकासकामांच्या कार्यक्रमात राजकीय विषय पंतप्रधान असलेल्या नेत्याने सहसा आणू नयेत. निवडणुकीच्या भाषणात ते ठीक आहेत. परंतु, श्री. शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला त्यामुळे महाराष्ट्रात चर्चा होणे स्वाभाविक आहे… कारण, पवारसाहेबांनी कृषीमंत्री असताना काय केले… त्याहीपेक्षा त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळानंतर २०१७ साली श्री. मोदी पंतप्रधान असताना त्यांच्याच सरकारच्या शिफारशीने राष्ट्रपतींच्या हस्ते श्री. शरद पवार यांना कृषी आणि सहकार क्षेत्रातील प्रभावी कामाबद्दल पद्मविभूषण किताब सन्मानपूर्वक देण्यात आला. याची मोदींजींना कल्पना असेलच… त्यावेळचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मूळचे काँग्रेसचे होते. तरी ‘पद्म’ पुरस्कार देण्यासंबंधिचे निर्णय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट समिती करते. त्या नावांची शिफारस राष्ट्रपतींकडे होते. पवारसाहेबांना पद्मविभूषण देताना आज आणि त्यावेळी असलेले पंतप्रधान हे मोदीजीच होते. पुरस्कार का दिला जातो, याचे कारणही त्यांना माहिती होते. त्यामुळे नगर दौऱ्यात त्यांनी विचारलेला प्रश्न एकतर चुकीच्या व्यासपीठावरचा प्रश्न आहे. आणि तो राजकीय आहे. आता त्यांना असाही प्रश्न विचारता येईल की, पवारसाहेबांना पद्मविभूषण किताब कोणत्या कारणाकरिता दिला?
आता निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. परंतु ते राजकीय व्यासपीठावर व्हावेत… विकासकामांच्या व्यासपीठावर नव्हे. शिवाय श्री. शरद पवार यांच्या संबंधात बोलताना पूर्वी आपण काय बोललो होतो… बारामतीमधील विकासप्रकल्प पाहून याच पंतप्रधानांनी काय निवेदने केली होती हे महाराष्ट्र जाणतो. पंतप्रधानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला पवारसाहेब उत्तर द्यायला समर्थ आहेतच… त्यांनी पत्रकार परिषद घेतलीसुद्धा. पंतप्रधानांचा आरोप वस्तुिस्थीतपासून दूर आहे, हे ही त्यांनी सांगून टाकले. निवडणुका आल्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्रात तरी शरद पवारसाहेबांची राजकीयदृष्ट्या भीती वाटते, हे समजण्यासारखे आहे. कारण कितीही कार्यक्रमांचे लोकार्पण केले तरी येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात काय होणार आहे, याचा अंदाज सर्वांनाच आलेला आहे. त्या कार्यक्रमात खटकणारी गोष्ट एवढीच होती की, माननीय पंतप्रधान श्री. शरद पवार यांनी काय केले, असा प्रश्न विचारला जात असताना बिचारे अजितदादा मान खाली घालून शांतपणे ते आरोप ऐकत बसले होतेत! कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहत असताना उपमुख्यमंत्रीपदाची जागा, दादा आणि त्यांची सत्ता खूप केविलवाणी वाटली!
आता मुख्य विषय असा की… २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या काळात पवारसाहेबांनी कृषीमंत्री म्हणून काय केले? २३ मे २००४ रोजी श्री. शरद पवार हे कृषीमंत्री झाले. त्यावेळचे पंतप्रधान डॉ. श्री. मनमोहन सिंग यांनी श्री. शरद पवार साहेबांना विचारले होते…. ‘तुम्हास कोणते खाते हवे आहे….?’ संरक्षण मंत्रीपदाचाही विषय िनघाला होता… त्यावेळी शरद पवार यांनी स्वत:हून ‘कृषी खाते’ मागून घेतले होते. थोडे जाऊन मुद्दाम आठवण करून देतो… १९७२ साली महाराष्ट्रात वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात शरद पवार राज्यमंत्री म्हणून आले. त्यावेळी त्यांच्याकडे गृह, माहिती ही खाती होती. पण १९७४ साली ते जेव्हा कॅबिनेट मंत्री झाले तेव्हाही त्यांनी कृषीखातेच मागून घेतले होते. केंद्रामध्ये कृषीखाते घेतल्यानंतर त्यावेळचे जेष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केले होते. पवारसाहेबांनी एक अट घातली. कृषीखाते देताना पशुपालन, अन्न प्रक्रिया (प्रोसेसिंग) , अन्न नागरी पुरवठा व जलसंधारण ही सर्व खाती कृषी खात्यात समाविष्ट होत असतील तरच मला हे खाते द्या… त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ते मान्य करून ही सगळी खाती एकत्र केली.
कृषी खाते हातात अल्यानंतर पवारसाहेबांना प्रामुख्याने एक गोष्ट जाणवली…. या खात्यात ‘संशोधन’ (रिसर्च) नावाची गोष्टच नाही… आय.सी.ए. आर. ही कृषीसंशोधनाची मुख्य संस्था. या संस्थेत ५०० पदे रिक्त होती. पवारसाहेबांचा पहिला निर्णय होता तो हि रिक्त पदे तातडीने भरणे. त्यानंतर कृषीविज्ञाान केंद्रांची संस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा िनर्णय घेतला. २००४ पर्यंत देशात २९० कृषी विज्ञाान केंद्रे होती. ती संख्या ३४० पर्यंत वाढली गेली. याच काळात संपूर्ण देशात १३८ नवीन कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत. त्यांच्याच कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात फळबागा कार्यक्रम राबवण्यात आला. रोजगार हमी योजनेला म्हणजे (न.रे.गा.) या कार्यक्रमाला फळबागांसोबत जाेडण्यात आले. या संपूर्ण काळात फळांचे उत्पादन कितीतरी पटीने वाढले… तेवढे उत्पादन कोणत्याही काळात वाढले नव्हते.
शेतीमालाच्या हमीभावाचा एक महत्त्वाचा विषय केंद्रीय कृषीमंत्र्याच्या अखत्यारित असतो. शरद पवार हे कृषीमंत्री असताना तांदूळ उत्पादनाच्या हमीभावात १३८ टक्के वाढ झाली. गव्हाच्या हमीभावात १२२ टक्के वाढ झाली. कापसाची हमीभावात ११४ वाढ झाली. सोयाबीनच्या हमीभावात १५८ टक्के वाढ झाली आणि तुरीच्या भावात २१६ टक्के वाढ झाली. हे शासकीय आकडे आहेत. खरी गोष्ट अशी की, शरद पवारसाहेबांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळातच देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे.
शरद पवार यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात २०१२ ते २०१३ पर्यंत ३९ अब्ज टनापर्यंत कृषीमालाची निर्यात वाढल्याची आकडेवारी सांगते. कापूसगाठीची निर्यात करतानाही ३४ दशलक्ष टनाच्या पलिकडे ही निर्यात पोहोचल्याचे आकडे सांगतात. या सगळ्या आकड्यांची माहिती आजचे माननीय पंतप्रधानांना दहा मिनिटांत त्यांच्या टेबलावर मागवून तपासून पाहता येईल. त्याच काळामध्ये शेतकऱ्यांचे थकीत ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय पवारसाहेबांनी घेतला.
सर्वात अभिमानास्पद बाब अशी आहे की, २०१२ साली संयुक्त राष्ट्र संघाचे आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी तत्कालिन महासंचालक जोस ग्रेझिआनो यांनी एक पत्र लिहून शरद पवार यांचे विशेष आभारही मानले होते. त्याचे कारण पत्रात त्यांनी असे म्हटले होते की, भारत्ाातील छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांनी १०० दशलक्ष टन तांदूळ आणि २५० दशलक्ष टन इतर धान्याचे उत्पादन करुन इतिहास घडवलेला आहे. याबद्दल शरद पवार यांचे त्यांनी आभार मानलेले होते. हे पत्र कृषीमंत्रालयाला आलेले होते. आजही ते माननीय पंतप्रधानांना पाहता येण्यासारखे आहे.
आणखी एक आकडेवारी संदर्भ म्हणून फार मोठी आहे… शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे जास्त आले होते म्हणूनच त्या काळात ट्रॅक्टरचा वाढलेला खप ६ लाखांच्या पुढे गेला होता. ही वाढ तब्बल ६०० टक्यांची आहे. बाकी शरद पवारसाहेब यांची कामिगिरी नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक विषयात अाणि बांधणीत त्यांचे निर्णय किती मोठे आहेत अाणि सत्तेत नसताना पवारसाहेब किती मोठे आहेत हे अख्खा महाराष्ट्र आणि देश जाणतो. आजच नाही… पवारसाहेब सत्तेत नसताना शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर दिल्लीत निघालेल्या दहा लाखांच्या मोर्चाचे अध्यक्षस्थान पवारसाहेबांनी स्वीकारावे… अशी विनंती कर्पुरी ठाकूर, प्रकाशसिंह बादल या नेत्यांनी केली होती. देशभरातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये शरद पवारांच्या संबंधिची प्रतिमा किती उंच आहे याची पंतप्रधानांना कल्पना असेलच… खुद्द याच पंतप्रधानांनी श्री. पवारसाहेब ७५ वर्षांचे झाले तेव्हा दिल्लीमध्ये झालेल्या त्यांच्या सत्कारात सहभाग घेवून त्यावेळी जे भाषण केले होते, ते ही थोडेसे काढून पाहता येईल. या पंतप्रधानांच्या खेरीज देशात आजही सर्वांना प्रिय असलेले माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी हे पवारसाहेबांच्या ६१ व्या वाढदिवसाला म्हणजे १२ डिसेंबर २००१ रोजी थेट टोकियोहून मुंबईला महालक्ष्मी रेसकोर्सवर आले. तेथील समारंभात सहभागी होऊन पाच मिनीटे बोलले. आणि सभा जिंकून गेले. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘देश मे ७५० सांसद हैं… लेकिन अकेले शरद पवार निकलें उन्होने कहा… भूकंपसे कैसा झूंजना मैं जानता हू… लातूर मे हमने सामना किया हैं… मै गुजरात जाना चाहता हॅू. तब गुजरात में भूकंप हुआ था… पवारसाब हमारे दल के नही हैं… लेकिन राजनितीके उपर उठके सोचते हैं… काम करना चाहते हैं… इसलिए मैने उनका दल देखा नहीं. मैने उनको डिझास्टर मॅनेजमेंट का अध्यक्ष बना दिया… और इसलिए मैं उनके सत्कार में आया हूूूूूूूूॅ. पवारसाब कर्मठ हैं… राजनीतीके उपर उठके काम करते हैं… और सबसे बडी बात… वो प्रतिभासंपन्न हैे… इसलिए मैं आया हूूॅ.’ (पवारसाहेबांच्या बाजूला त्यांच्या पत्नी श्रमती प्रतिभाताई पवार बसल्या होत्या. )
वाजपेयींचे भाषण आजही कानात घुमते आहे. कारण त्यांनी विरोधकांना कधीही शत्रू मानले नव्हते.
तर सांगायचे एवढेच, पवारसाहेबांनी काय काम केले हे महाराष्ट्र आणि देश जाणतो. आता निवडणुकीत राजकीय आखाडे जेव्हा सुरु होतील तेव्हाही असे अनेक प्रश्न विचारले जातील… आणि त्यांची उत्तरे पंतप्रधानांना द्यावी लागतील… २०१४ ची महागाई… आजची महागाई… त्यावेळची बेकारी… आजची बेकारी… दर वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे काय झाले? आणि महाराष्ट्रात तुम्हाला तुमच्या पक्षाच्या एकट्याच्या ताकतीवर सरकार का आणता येत नाही..? अनेक कामांची लोकार्पणे झाली.. जाहीरातबाजी झाली… फटाके फुटत आहेत… सभा होत आहेत… ‘मी पुन्हा येईन’ या घोषणा होत आहेत… मग शरद पवारसाहेबांची एवढी भिती का वाटत आहे? शरद पवार आज सत्तेत नाहीत. त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यांनी ‘त्यांनी काय केले?’ असे प्रश्न न विचारता… तुम्ही काय केलेत, ते लोकांना सांगा… त्याची यादी द्या… निर्णय मतदार करतील… पंजाबच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील विधेयक का मागे घ्यावे लागले… शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता पवारसाहेबांना द्यायची नाहीत… ती या सरकारला द्यावी लागणार आहेत. अर्थात हे प्रश्न त्या त्या वेळच्या राजकीय व्यासपीठावरचे आहेत. लोकार्पण कार्यक्रमात हे प्रश्न अप्रस्तुत आहेत. (या लेखातील काही आकडेवारी एका तज्ञा मित्राच्या वाट्सपद्वारे घेतली आहे.)
या विषयाबद्दल सध्या एवढेच…
शेवटचा मुद्दा…


ज्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्ते झाला हे प्रवरा नदीवरील धरण १९९९ साली सुरू झाले आहे. २०११ साली जवळपास पूर्ण झाले. कालव्याची कामे नंतर सुरू झाली. या धरणातील विस्थापितांसाठी

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोर्वे येथील त्यांच्या मालकीची ५ एकर जमीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोफत दिली. ही माहिती महाराष्ट्राला असली पाहिजे. या धरणासाठी ५३५ कोटी रुपयांचा निधी बाळासाहेबांनीच मोठ्या प्रयत्नांनी सरकारकडून आणला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना नाशिक येथील बैठकीत ११०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली होती. या धरणाच्या उभारणीपासून ९७ किलोमीटर उज्ाव्या कालव्याच्या लांबीचा पाठलाग आणि ८५ किलोमीटर डाव्या कालव्याच्या लांबीचा पाठलाग आणि पूर्णत: बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांनी हे काम झाले आहे. हे अख्खा नगर जिल्हा जाणतो. महाराष्ट्राला हे माहिती असावे, याकरिता हा उल्लेख केला आहे.

मधुकर भावे
📞9892033458

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button