ताज्या घडामोडी

मराठी साहित्यिकांना ‘गांधी’ का पेलला नाही?

मराठी साहित्यिकांना ‘गांधी’ का पेलला नाही?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 02/10/2023 : आज महात्मा गांधी यांची १५४ वी जयंती. या महात्म्याला अभिवादन… याच दिवशी जयंती असलेल्या, ‘इतका लहान- इतका महान’ असलेल्या लाल बहाद्दूर शास्त्री या नेत्यालाही अभिवादन. अशी माणसं आता जगात होणार नाहीत. समाधानाची गोष्ट अशी की, १ ऑक्टोबरच्या ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या रविवार पुरवणीत ‘महात्मा गांधी आणि मराठी साहित्य : एक कोडे…’ हा विचार करायला लावणारा आणि अस्वस्थ करणारा एक जबरदस्त लेख डॉ. अभय बंग यांनी लिहिला. या लेखात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे इतके लाख मोलाचे आहेत की, ‘मराठी साहित्यिकांनी महात्मा गांधी यांच्या चरित्राला हात का घातला नाही?’ याची त्यांनी अतिशय स्वच्छपणे मिमांसा केलेली आहे आणि ती तंतोतंत योग्य वाटते. मराठी साहित्यिकांना गांधी या ‘चारित्र्या’ला, ‘चरित्र’ म्हणून हात घालावा, असे वाटलेच नाही ही गोष्ट तर स्पष्टच आहे. त्याची कारणे अभयजींनी अगदी स्पष्टपणे मांडली. त्यांना महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून उत्तर हवे आहे. मराठी साहिति्यक पुढे काय करणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारलेला आहे… या लेखाने अस्वस्थ होऊन त्या विषयाचा विचार करताना जे मनात आले ते नोंदवावे, त्यासाठी या काही नोंदी आहेत.
माझे पहिले निरीक्षण असे आहे की, अभय बंग यांना मराठी साहित्यिक महात्मा गांधी यांच्या विषयापर्यंत पोहोचायला थिटे पडले, असे वाटत असेल… तर तेही योग्य म्हणायला हवे. परंतु हा महत्त्वाचा लेख छापताना तो शेवटच्या पानावर छापायचा आणि पहिल्या पानावर कोणी पंकज त्रिपाठी या लेखकाला महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोठे करायचे, यात संपादनाच्या विचारातसुद्धा मला थिटेपण जाणवले. दुसरा मुद्दा असा की, मराठी साहित्यिकांना महात्मा गांधी खरंच पेलवले असते का? गांधींचे समकालीन मराठी साहित्यिक जे होते- ज्याचा उल्लेख अभयजींनी केलेला आहे त्यामध्ये विनोबा, काका कालेलकर, आचार्य जावडेकर, दादा धर्माधिकारी ही थोर मंडळी होती. त्यांनी लिहिलेही खूप… पण ती नेतेमंडळी गांधीजींच्या जीवनशैलीचा आणि तत्त्वज्ञाानाचा एक भागच होती. साहित्यिक म्हणून ते वेगळे नव्हते. विनोबा हे तर प्रकांडपंडित पण, ते स्वत: गांधीविचार जगले आणि त्यांनी तो कृतितही आणला. मराठी साहित्यिकांपुढे मुख्य प्रश्न हाच आहे… गांधी लिहण्याकरिता ‘गांधी’ जगायला हवे. गांधी पचायला हवेत.. आणि रूचायलाही हवेत…. यातील ‘रूचायला हवे’ हा शब्द अधिक महत्त्वाचा आहे. कारण त्या काळातल्या आणि महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरच्या गेल्या ७५ वर्षांत जे अभिजनांमध्ये साहित्यिक म्हणून पुढे आले, त्यांना गांधी रूचलाच नाही. गांधींच्या भीषण हत्येनंतर उच्चवर्णीयांनी ‘महात्मा गांधी यांची हत्या’ किंवा ‘महात्मा गांधी यांचा खून’ असे न मानता सर्रासपणे ‘गांधी वध’ असा शब्द वापरला. त्यावेळी मी ९ वर्षांचा होतो… माझे वडिल रोह्याच्या संघाचे संघचालक होते. त्यांच्याही तोंडून मी ‘गांधीवध’ हा शब्द ऐकला. मला त्या वयातच तो शब्द खटकला. दुसऱ्या दिवशीच्या ‘लोकमान्य’ वृत्तपत्रात ‘महात्मा गांधी यांचा खून’ असा मथळा होता. मी वडिलांना विचारले होते… ‘वध का म्हणता… त्यांचा खून झाला असे छापून आले आहे…’ माझे वडिलही समर्पक उत्तर देवू शकले नव्हते… हे सांगायला मला आजही संकोच वाटत नाही. त्यावेळच्या उच्चवर्णीय समाजात हीच मानसिकता असेल तर मग या समाजातील साहिति्यक गांधीजींवर चरित्र लिहितील, अशी अपेक्षा कशी ठेवता येणार…?
अलिकडे तर नथुराम गोडसेची जयंती साजरी केल्याच्या बातम्या आणि फोटो फेसबूकवर झळकतात… आणि आम्हाला त्याचे काही वाटत नाही… आमच्या विचारशक्तीची अवस्था कुठपर्यंत गेलीय याचेच हे निदर्शक आहे.
याच ‘वध’ शब्दाने अभिजनांमधील आणि विशेषत: ब्राह्मण समाजाची गांधीजींकडे पाहण्याची मानसिकता पुरेपूर स्पष्ट झाली होती. ‘वध’ हा शब्द राक्षसाच्या मृत्यूसाठी आहे.. अपप्रवृत्तीच्या मृत्यूसाठी आहे… हिरण्यकशपूचा वध झाला… कंसाचा वध झाला… रावणाचा वध झाला… हाच शब्द गांधीजींच्या भीषण हत्येला लावला गेला. त्यामुळे बहुजनांमधील उच्चवर्णीयांचे किती नुकसान झाले, हे आम्हालाच कळलेले नाही. गांधी पचनी पडण्याआगोदर ते रूचले पहिजेत. ते न रूचल्यामुळे अभय बंग यांना अपेक्षित असलेले या महानायकाचे ललित चरित्र हाती घेण्यास मराठी साहित्यिक धजावले नसावेत. शिवाय लेखकांच्या आवाक्याचाही प्रश्न होता… गांधी या महानायकावर ‘गांधी’ चित्रपट निर्माण करायलासुद्धा त्यावेळचे महान भारतीय दिग्दर्शक कमीच पडले की नाही…? बिमल रॅाय, व्ही शांताराम, सोहराब मोदी, बी. आर. चोप्रा, शक्ती सामंता किंवा दक्षिणेकडील ‘जेमीनी’ चित्रसंस्था…. किंवा ए. व्ही. मय्यपन… यापैकी कोणालाही, ‘गांधीजी’ या विषयाला हात घालण्याचा आवाका नसावा किंवा विश्वास नसावा. त्यामुळे मराठी साहित्यिक असो… किंवा हिंदी चित्रपट दिग्दर्शक असो… गांधी पेलणे त्यांना शक्य झाले नाही.
काही पुरोगामी उच्चवर्णीय समजणाऱ्या साहित्यिकांनी गांधी आणि गांधी विचारधारा याचा आपापल्या साहित्यात पुरस्कार केला… त्यात रामदास भटकळ, सुरेश पांढरीपांडे, सुरेश द्वादशीवार यांच्यासारख्या साहित्यिकांनी फार मोठे काम करून ठेवले आहे.

सुरेश द्वादशीवार यांचे ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’ हे पुस्तक आजच्या मराठी साहित्यातील गांधी जीवनावरची सर्वोत्तम मिमांसा आहे. बहुजनांमध्ये गांधीजींचे टीकाकार कमी होते… आणि अभिजनांमध्ये जास्त होते आणि याच्या उलट साहित्यिकांची संख्या अभिजनांमध्ये जास्त होती आणि बहुजनांमध्ये कमी होती… त्यामुळे फारच थोड्या लेखकांनी ‘गांधी’ या विषयाला हात घालण्याची हिम्मत केली. असाही एक निष्कर्ष नोंदवता येईल. भाऊसाहेब खांडेकर यांनी ‘अश्रू’ या कादंबरीत उभा केलेला शंकर हा शिक्षक गांधीवादी विचाराच्या आधारावरचा आहे. आणि त्यातील खलनायक पापाशेठ याला हा गांधीवादी शिक्षक जे सुनावतो तो शिक्षक म्हणजे स्वत: भाऊसाहेब खांडेकरच आहेत, असा भास होतो. कारण खांडेकरांना गांधीविचार रूचला होता आणि त्यांनी तो पचवला होता.
स्वातंत्र्याचे महाभारत घडताना हा महानायक ‘चले- जाव…’ ‘छोडो भारत’… ‘जय-हिंद’ या दोन शब्दांनी स्वातंत्र्याची चिंगारी देशभर पेटवू शकतो… हे अफाट पसरलेल्या या देशातील ग्रामीण भागात साहित्याशिवाय जनतेला कळले. याचे कारण गांधीजींच्या ‘चरित्रा’पेक्षा त्यांचे ‘चारित्र्य’ अधिक महत्त्वाचे होते. बहुजनांना ते कळले होते. त्यामुळे फारशा न शिकलेल्या ग्रामीण भागातील बहुजनांच्या नेत्यांनी त्यांच्या चळवळीमध्ये ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा दिल्या. ‘गांधी’ आणि ‘गांधीविचार’ गावागावात पोहोचवला. अभय बंग यांनी महाराष्ट्राची चर्चा केलेली आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी खेड्या-पाड्यांत पोहोचवण्याचे काम साहित्यिकांनी नव्हे, तर गांधी विचारांनी भारलेल्या बहुजन नेत्यांनी केलेले आहे. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व पणाला लावलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात पहिलवानासारखा शडडू ठोकून ‘महात्मा गांधी की जय’ याच घोषणेने केली. मग ते वसंतदादा असोत… किसन वीर असोत… नागनाथ नायकवडी असोत… बापू लाड असोत… या सगळ्या बहुजनांनी गांधी विचार महाराष्ट्रभर पोहोचवला. हजारो सामान्य लोक सत्याग्रहात उतरले. त्यांनी कोणीही ‘गांधी वाचून’ हा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे अभिजनांनी काय लिहले किंवा काय विरोध केला, याचे महत्त्व त्यावेळी अजिबात शिल्लक राहिले नव्हते. अगदी नंदूरबारच्या सातपुडा पर्वताच्या टोकापर्यंत कोवळ्या शिरीषकुमारला गांधीजी काही भेटायला गेले नव्हते…. त्याला गांधीजी माहितीही नव्हते. पण, ‘मला देशासाठी काहीतरी केले पाहिजे’ ही त्यावेळच्या भारलेल्या वातावरणातील भावना हेच मोठे सामर्थ्य होते. म्हणून कोवळा शिरीषकुमार सहज बलिदान करू शकला. आणि बाबू गेनू हा परदेशी कपड्यांच्या गाडीपुढे आडवा पडला. चळवळीने भारावलेल्या काळात साहित्यिक काय सांगतात, यापेक्षा नेता काय सांगतो, तो कसा राहतो… तो आपल्या दु:खाशी समरस होतो की नाही… हे सगळे प्रश्न या अफाट पसरलेल्या गरीब देशाच्या सामान्य माणसांशी पूर्णपणे निगडीत होते. आणि त्या भावभावनेशी समरस झालेले बापू, लोकांनी ‘महात्मा’ म्हणून डोक्यावर घेतले होते. आजही गांधीजींच्या मणिभवन येथील स्मारकात महात्मा गांधींचा चरखा आणि महात्मा गांधी यांनी वापरलेले धोतर आणि उपरणे… अगदी जाडावासुद्धा, यांना नमस्कार करायला जाणारे कोण आहेत? त्यात परदेशी नागरिक किती मोठ्या प्रमाणात आहेत… गांधी जगाला कळला असला तरी आणि जगातल्या ६०० विद्यापीठांत गांधीजी शिकवला जात असला तरी, आमच्या साहित्यिकांना गांधीजी समजायला फार अवघड वाटतो आहे… रूचायला आणि पचायलाही अवघड आहे, हेच यामागचे जळजळीत वास्तव आहे.

अपवाद म्हणून आमच्या सदानंद मोरे यांनी ‘लोकमान्य ते महात्मा’ या चांगल्या ग्रंथाची निर्मिती केली. हे अभियंदनीय आहे. नरेंद्र चपळगावकर यांनी ‘लोकमान्य ते गांधी’ या पुस्तकानंतर पंडित नेहरूंवरील पुस्तकही अतिशय प्रभावीपणे लिहिलेले आहे. अशी अपवादात्मक पुस्तके आहेत… पण, प्रभावी चरित्र जे अभय बंग यांना अपेक्षित आहे तसे मात्र नाही.
आजच्या राजकीय वातावरणात आणखी एक प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहे… सरदार पटेल यांच्या पुतळ्याची उंची वाढवली गेली. सरदार फार प्रभावी आणि निर्णयक्षमता असलेला नेता होता. वल्लभभाईंना ‘सरदार’ ही पदवी महात्मा गांधी यांनीच दिली होती. पण त्यांच्या पुतळ्याची उंची वाढवल्यावर देशात महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू यांची उंची कमी होत नाही, हे जाणवू लागले. सरदार पटेल यांनीच लिहून ठेवले आहे… ते जेव्हा १, औरंगजेब रोड या दिल्लीतील रस्त्यावरील बंगल्यात रहायला गेले तेव्हा ते लिहितात की… ‘ज्याने देशावर राज्य केले तो औरंगजेब एका रस्त्यापुरता मर्यादित झाला. आणि ज्यांनी पाकिस्तान निर्माण केले त्या नेत्याला मुंबईतील एका रस्त्याच्या (महम्मद अली रोड) नावावर समाधान मानावे लागले. आणि आपले नेते बापू जगात वंदनीय आहेत… अगदी नेल्सन मंडेलाही गांधीजी यांना गुरू मानतात.’
गांधी आणि नेहरू किती मोठे होते हे आता देशातील नव्या पिढीला अधिक प्रमाणात जाणवू लागले आहे. चांद्रयान ज्या दिवशी चंद्रावर उतरले त्यादिवशीच्या देशभराच्या जयजयकारात ‘इस्त्रो’ची स्थापना करणाऱ्या पंडितजींचा जयजयकार झाला. ‘जी. २०’ परिषद यावर्षी भारतात झाली. ती परिषद झाल्यानंतर जगातील २५ देशांतील मान्यवर दुसऱ्या दिवशी सकाळी महात्मा गांधी यांच्या समाधीवर दर्शनासाठी राजघाटावर गेले. गांधीजी किती देशांत पोहोचले आहेत… याचे भान जगाला आहे. पण आमच्या मराठी साहित्यिकांना फार जाणवलेले नाही. गांधी म्हणजे त्याग… गांधी म्हणजे सेवा… गांधी म्हणजे समर्पण… चरखा हा आजच्या राजकारणात टिंगलीचा विषय झाला असेल… पण आजच्या राज्यकर्त्यांना गांधींचा चेहरा वजा करून त्यांच्या ‘चष्मा’ स्वच्छता अभियानासाठी वापरावाच लागला.. हा गांधी विचारांचाच विजय आहे. आमच्या साहित्यिकांनी तो चष्मा लावून तरी गांधीजी लिहावेत…
मराठी साहित्यिकांप्रमाणेच महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या साहित्य संमेलनांमध्येही ‘गांधी आणि गांधीविचार’ याच्यावर कधी परिसंवाद झाले नाहीत. किंबहुना ही साहित्य संमेलने म्हणजे वार्षिक उत्सवच आहेत. सरकारी मदतीवर होणारी साहित्य संमेलने ही अजूनही अभिजनांची आहेत… बहुजनांची झालेली नाहीत. एखादा अपवाद आहे… की ज्या साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या दृष्टीने काही अमूल्य निर्मिती झाली ते संमेलन होते, २०१६ साली पिंपरी-चिंचवड येथे झालेले ८९ वे मराठी साहित्य संमेलन. त्या संमेलनामध्ये ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी अतिशय मेहनतीने ‘मराठी भाषा – संचित आणि दिशा’ या ग्रंथाची निर्मिती केली. आणि तो मोठा दस्तावेज ठरला. श्री. गणेश देवी यांच्यापासून विजय भटकर यांच्यापर्यंत अतिशय अभ्यासपूर्ण लेख त्यात आहेत. सरकारी मदत न घेता… डॉ. पी. डी. पाटील यांनी त्यांच्या ताकतीवर एक अप्रतिम संमेलन यशस्वी केले. रघुनाथराव माशेलकर, गुलजार, जावेद अख्तर, ज्ञाानेश्वर मुळे, संदीप वासलेकर, अमेरिकेतील श्री. श्री. ठाणेदार अशा नामवंतांची वैखरी संमेलन गाजवून गेली. सचिन इटकर, साहित्यिक अरुण शेवते यांचे त्यासाठी चांगले श्रम कारणीभूत आहेत.
पण, बाकी संमेलनांमध्ये साहित्य कमी आणि मिरवणे जास्त… मराठी साहित्यिकांच्या या संमेलनात एका तरी अध्यक्षाने त्याला मिळालेल्या अध्यक्षीय वर्षात ग्रामीण भागातील पाच-दहा नवीन लेखकांना पुढे आणले का? त्यांची पुस्तकं शहरातील वाचनालयत येतील, असा खटाटोप केला का? यशवंतराव चव्हाण हे फक्त राजकीय नेते नव्हते… ते विचारवंत होते… ते मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात त्यांनी ‘साहित्य संस्कृती मंडळ’ स्थापन केले. आणि त्याचे पहिले अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी हे होते. विश्वकोशाचे १८ खंड शास्त्रीजींनी तयार केले. ही महाराष्ट्राची केवढी मोठी ज्ञाानसंपदा आहे. पण, त्यानंतरची ४० वर्षे… त्यात जमेकडे किती आणि मिरवण्यासाठी किती?
डॉ. अभय बंग यांच्या लेखाच्या निमित्ताने आणखी एक विचार मनात आला… आज जे राजकारणात नाहीत… त्यांनाही आता आजच्या व्यवस्थांवर आणि समाज जीवनात जे काही चालले आहे, त्या विरोधात सामाजिक दायित्त्व म्हणून अवाज उठवण्याची वेळ आली आहे… गांधीजींच्या मार्गाने रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. आणीबाणीविरुद्ध साहित्यिक रस्त्यावर उतरले होते.. आणीबाणी उठल्यानंतरच्या निवडणुकीत ते काँग्रेस विरोधात प्रचारात उतरले होते. आज ती सगळी मंडळी कुठे गायब झाली आहेत..? ते गांधीवादी आण्णा हजारे यांचा सध्याचा पत्ता काय आहे….? जे साहित्यिक नाहीत आणि सामाजिक कामात ठामपणे उभे आहेत, आजच्या सामाजिक जीवनाला घाणेरडे वळण लागताना, या सामाजिक नेत्यांची काही जबाबदारी राहते की नाही? आज राजकारणात बोकाळलेला पैसा, जातीयवाद… धर्मवाद… धार्मिक उन्माद ही आजच्या काळातील आव्हाने राजकारण्यांनी उभी केलेली आहेत. त्या विरोधात साहित्यिक बोलत नसतील तर सामाजिक नेते बोलणार आहेत की नाहीत? साहित्य संमेलनात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विरोधाचा ठराव करण्याचीही ताकद नसलेले साहित्यिक कोणते समाजपरिवर्तन करणार आहेत? मग हे काम कोण करणार आहे? आज गांधी नाहीत… नेहरू नाहीत… उलट त्यांचा विचार संपवण्याची स्पर्धा लागलेली आहे. आणि तो विचार संपत नाही, म्हणून अस्वस्थता आहे….. अशावेळी अभय बंग असतील… बाबा आढाव असतील… प्रकाश आमटे असतील… आप्पासाहेब धर्माधिकारी असतील… पोपटराव पवार एकेकाळचे राजकारणी आणि आताचे समाज काम करणारे पाशा पटेल असतील… नागपूरचे गिरीश गांधी असतील…, आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील असतील…. असे शहर आणि ग्रामीण भागात समाजपरिवर्तन करणारी जी जी आदरणीय व्यक्तिमत्त्वे आहेत त्यांची जबाबदारी अधिक वाढते आहे…
आजच्या साहित्यिकांना गेल्या ६५ वर्षांत देशात काय झाले, आणि गेल्या दहा वर्षांत देशात काय झाले, याचे ऑडिट करता येणार आहे का? पंडित नेहरू यांनी भाक्रा-नानगल धरण बांधायला घेतले… देशातील हजारो लोक धरण पहायला… त्याची बांधणी पहायला सहली काढत होते… मराठीतील साहित्यिक गो. नि. दांडेकर तीन वर्षे तिथे मुक्कामाला गेले. आणि त्यातून ‘आम्ही भगिरथाचे पुत्र’ ही कादंबरी तयार झाली.
गांधी यांच्या जीवनपैलूवर एक नव्हे, अनेक काबंदऱ्या होतील… पण, त्या का होत नाहीत? अभय बंग यांनी त्याचे उत्तर मागितले आहे…. त्यांचा असा समज असेल की, कोणीतरी मराठी साहित्यिक कादंबरी लिहून त्याचे उत्तर देईल… तर त्यांना फार वाट पहावी लागेल… कदाचित या महानायकाची कादंबरी लिहायला पुन्हा रिचर्ड ॲटनबरोसारखा कोणीतरी अवतरेल… आणि मराठी साहित्यिक त्याच्यावर टीकात्मक विश्लेषण करायला पुढे सरसावतील… कारण आम्ही टीका करण्यात, चुका दाखवण्यात फार पुढे असतो…
सध्या एवढेच..

मधुकर भावे
9892033458

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button