संत विचारानेच टिकेल राष्ट्रीय एकात्मता! : बापूसाहेब देहूकर

संत विचारानेच टिकेल राष्ट्रीय एकात्मता! : बापूसाहेब देहूकर
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
पंढरपूर दिनांक 2/8/2023 : वारकरी संतांनी कायम सामाजिक ऐक्याची भूमिका मांडली. सर्व जाती-धर्मांतील संत वारकरी परंपरेत पहायला मिळतात. म्हणूनच या देशातील एकात्मता ही संत विचारानेच भक्कम होईल, असा आशावाद तुकाराम महाराज यांचे वंशज, देहूकर फडाचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर यांनी व्यक्त केला. तर संताचे विचार आणि त्यातील एकात्मतेचं मूल्य टिकवून ठेवण्याचे काम दिंडीकरी-फडकरी परंपरेने केले आहे, असे मत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे संचालक, दिंडीकरी, फडकरी संघटनेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी व्यक्त केले.
संविधानाचा सन्मान आणि राष्ट्रीय प्रतिकांचा स्वाभिमान जागविण्यासाठी संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्रचेतना अभियानाचा प्रारंभ पंढरपूर येथील ‘तुकाराम भवन’ सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रध्वज तिरंगा झेंडा, राष्ट्रगीत जन-गण-मन, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट या राष्ट्रीय प्रतिकांबद्दल समाजातील आदराची भावना भक्कम व्हावी यासाठी संविधान समता दिंडीच्या वतीने राष्ट्रचेतना अभियान सुरू करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या अभियानाचा प्रारंभ पंढरपूर येथून झाला. या अभियानाचे उद्घाटक म्हणून बापूसाहेब महाराज देहूकर, तर अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर महाराज जळगावकर उपस्थित होते. या सोहळ्याचे संयोजक ह.भ.प. भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले. तर ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी प्रास्ताविक करताना या अभियानाचा उद्देश अधोरेखित केला. यावेळी त्यांनी संविधान निर्मिती, राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा, राष्ट्रगीत जन-गण-मन याचा संपूर्ण इतिहास सांगितला.
प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ज्ञ दादासाहेब रोंगे उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाची आज किती गरज आहे, हे समजून सांगितले. मोहन अनपट यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैकाडी महाराज यांचे वंशज मठाधिपती भारत महाराज जाधव, देवराम महाराज कोठारे, एड. कल्याण काळे, दादा महाराज पनवेकर, गणेश महाराज फरताळे यांनी मोलाचे सहकार्य केले. 15 ऑगस्ट रोजी या अभियानाचा समारोपात मुंबई येथे होणार आहे.