ताज्या घडामोडी

आचार संहिता लागू असतांना शेतकर्‍यांचे अश्रू कोण पुसणार ?

संपादकीय…………….✍️

आचार संहिता लागू असतांना
शेतकर्‍यांचे अश्रू कोण पुसणार ?

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 13/0/2024 :

देशासह राज्यात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरू असतांना राज्यात ‘अवकाळी’ने पुन्हा शेतकर्‍यांच्या तोंडातला घास हिसकावून नेला आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी वादळी पावसाने झोडपून काढले आहे. यात शेतकर्‍यांच्या पिकांची प्रचंड नुकसान झाले असून सत्तेच्या मस्तीत आणि प्रचाराच्या धुराळ्यात आचार संहिता लागू असतांना शेतकर्‍यांचे ‘अश्रू’ कोण पुसणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.राज्यात हवामानासंदर्भात वर्तविलेल्या अंदाजनुसार सलग तिसर्‍या दिवशी विदर्भ, मराठवाड्यासह खान्देशात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, बोधवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात केळी, उन्हाळी मका, आंबे, भाजीपाला, लिंबूबागा, यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी दोन दिवस गारपीठ झाली असून जालना, बिड, लातूर जिल्ह्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. तर बिड, परभणी, हिंगोलीत जवळपास अर्धातास गरपीठ झाली. विदर्भात देखील बुधवारपासून सुरू झालेला पाऊस गुरूवारी, शुक्रवारीही कायम होता. नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती आणि पुढील दोन दिवस अजूनही गारपीठसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात खान्देशासह मराठवाड्यात काही ठिकाणी वादळासह गारपीठ देखील झाली. त्यामुळे हळद, आंबा, ज्वारीसह काढणीस आलेल्या गव्हाची व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकेठिकाणी वीज पडून महिलेसह एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 300 घरांचे नुकसान झाले असून जवळपास 20 गुरे मृत्यूमुखी पडले ओहत. त्यात वीज पडून झाडाखाली 13 जनावरे दबली गेली. सर्वाधिक नुकसान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात झाले असून जवळपास 35 हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकासह फळबागांना पाऊस व गारपीटीचा फटका बसला आहे. चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, अचलपूर या चार तालुक्यात सर्वाधिक नुकसार झाले असून 19 हजार हेक्टरवरील संत्री, मोसंबी, केळी, आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. तर अकोला जिल्ह्यातील 75 गावातील साडेचार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात शंभर गावांमध्ये साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात अडीचशेवर गावातील दोन हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. एकट्या केळापूर तालुक्यात आठशे हेक्टरवरील पिके उध्वस्त झाली असून शेतकर्‍यांच्या तोंडाचा घास या अवकाळीने हिरावून नेला आहे. संपूर्ण विदर्भात अवकाळीमुळे यवतमाळ, अकोला, अमरावती व बुलढाणा या चार जिल्ह्यांमध्ये 50 हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली असून भर उन्हाळ्यात शेतकर्‍यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो आहे. मराठवाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या या नुकसानीवर राज्यकर्ते दिलासा देण्याचे दोन शब्दसुद्धा बोलू शकत नाही. अशा प्रकारची ही आचार संहीता कोणत्या नालायक भूमीहीन पुत्राने (अधिकार्‍याने) बनविली असावी याचे आश्चर्य वाटते. कारण निवडणूका लागल्या, आचार संहिता लागली म्हणून राज्यावर अस्मानी संकट आले असेल, लोक मृत्यूमुखी पडले असतील तरी सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री हे शेतकर्‍यांच्या बांधावर जावून त्यांना दिलासा देवू शकत नाही. परंतू राज्यकर्त्यांनो याद राखा, तुमच्या प्रचाराचा धुराळा उडत असतांना शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी आचार संहिता आडवी येत असेल तर हा शेतकरी सुद्धा तुम्हाला ‘आडवा’ केल्याशिवाय राहणार नाही. उन्हाळ्यातील रब्बी पिके आणि फळबागा यावर पुढील खरीप हंगामाचे शेतकर्‍यांचे गणीत अवलंबून असते. उन्हाळ्यातील हंगाम अशा प्रकारे अवकाळीमुळे हातातून हिरावून नेला जात असेल तर खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारा खर्च शेतकर्‍यांनी आणायचा कुठून ? राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 40 टक्क्यांवर आला आहे, शेतांमधील विहिरींचे पाणी आटले आहे, वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो आहे अशाही परिस्थितीत काढणीस आलेली पिके अवकाळीने हिरावून नेली आहेत. आधिच दुष्काळी तालुक्यांमध्ये घोषित केलेल्या मदतीचा पैसा केवासीच्या सक्तीमुळे शेतकर्‍यांना मिळालेला नाही. तर कांदा-मका पिकांचा विमा अद्यापही जमा झालेला नाही. कपाशी पिक विम्याची अवघी 25 टक्के रक्कम कपाशी पिकाला मिळाली आहे. त्यामुळे हमीभाव, हमीभाव खरेदी केंद्र्र, पिकविमा, दुष्काळी मदत यासर्व गोष्टींसाठी दिलेली आश्वासनेही खोटारडी असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे ‘नेमीची येतो पावसाळा’ किंवा रोज मरे त्याला कोण रडे या म्हणींप्रमाणे शेतकर्‍यांची अवस्था झाली आहे. म्हणून या अवकाळीत आणि वादळात शेतकर्‍यांचे अश्रू कोण पुसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या यक्ष प्रश्नाचे उत्तर निवडणूका होईपर्यंत कुणीही देणार नाही. म्हणून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचा हंबरडा राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत पोहचला पाहिजे. एव्हढेच खरे. तूर्तास एव्हढेच…
(साभार : दैनिक पोलीस शोध)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button