जुलै महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर…!!!
जुलै महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर…!!!
🟢”संगीत ऐकायला ते दरवेळी कळावंच लागतं असं काही नाही…. मैफिल जमली की, गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते, ती ऐकू आली म्हणजे झालं !” : डॉ. अभिजीत सोनवणे.
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 31/7/2023 :
“संगीत ऐकायला ते दरवेळी कळावंच लागतं असं काही नाही…. मैफिल जमली की, गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते, ती ऐकू आली म्हणजे झालं… ! ”
रस्त्यावर जमलेल्या अशा अनेक मुक मैफिलींचा साक्षीदार होता आलं… !
एखाद्याला छातीशी लावलं…तेव्हा त्याच्या हृदयाच्या धडधडीत, तबल्याचा ताल जाणवला… !
कसे आहात ? बरे आहात ना …? यावर खाली मान घालून त्यांनी दिलेले उत्तर, ‘होय आम्ही बरे आहोत’… यानंतर ढोलकी वर मारलेली “थाप” आठवली… !!
नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पतीची कहाणी सांगता सांगता, फुटलेल्या बांगड्यांची किणकिण, सतारीशी स्पर्धा करतात…. !!!
आणि हुंदके देत शब्द बाहेर पडतात त्यावेळी, बीन तालासुरांचं हे गाणं हृदय भेदत जातं…
ढोलकी गत दोन्ही बाजूंनी थपडा खाणारी ही माणसं… आयुष्याचा “तमाशा” कधी होतो तेच कळत नाही….!
गाण्यातला सूर हरवला की ते गाणं बेसूर होतं…. परंतु आयुष्यातला सूर हरवला की आयुष्य भेसुर् होतं…
अशीच काही फसलेली गाणी आणि कविता या महिन्यात हाती आल्या….
आपल्याच साथीने… अशा काही बेसुर गाण्यांना सुरात बांधून चाली लावण्याचा प्रयत्न केला…
ज्या कवितांतून शब्द निसटले होते… तिथे योग्य ते शब्द टाकून, त्या कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला….
जे काही घडलं, ते आपल्या साथीनं…. आपल्या मुळेच…. आणि म्हणून जुलै महिन्याचा लेखाजोखा आपल्या पायाशी सविनय सादर….!
🔹वैद्यकीय
1. भीक मागणाऱ्या लोकांच्या नेमक्या समस्या ओळखण्यासाठी, त्यांच्या अंगातले कलागुण शोधण्यासाठी, वैद्यकीय सेवा देण्याच्या निमित्ताने जेव्हा त्यांच्यात बसून जेवतो खातो त्यावेळी परकेपणा आपोआप संपुष्टात येतो. यावेळी आपोआपच सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टींच्या आधाराने काही आराखडे बांधुन त्यांना आपल्या सर्वांच्या साथीने छोटे मोठे व्यवसाय टाकून देत आहे.
डॉक्टर म्हणून रस्त्यावर जे काही करणे मला शक्य नाही, अशा सर्व बाबींसाठीआपण इतर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना ऍडमिट करत आहोत. यामागे हेतू हाच की आजारपणाचे निमित्त करून त्यांनी भीक मागू नये, आजार बरा झाल्यानंतर त्यांना जो जमेल तो व्यवसाय त्यांनी सन्मानाने करावा.
भिक्षेकरी नाही तर कष्टकरी होऊन गावकरी म्हणून जगावे… !
या महिन्यात जवळपास 600 रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले आहेत. अति गंभीर अशा रस्त्यावरील 3 निराधारांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचले आहेत.
गंमत अशी की या तिघांच्याही नातेवाईकांना संपर्क साधून मोठ्या ऑपरेशन पूर्वी त्यांची संमती घेण्यासाठी /सहीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला… परंतु कोणीही पुढे आले नाही.
झाल्या असतील यांच्याही काही चुका….
पण, माणसाची चूक म्हणजे पुस्तकातलं एक पान आहे….नातं म्हणजे आख्खे पुस्तक आहे…. चुकलं असेल काही तर ते एक पान फाडावं ना … आख्खे पुस्तक फाडण्यात कोणता शहाणपणा आहे ???
असो, सर्व संमती पत्रावर पालक म्हणून माझी सही आहे…. !
एकाच महिन्यात तीन वयस्क आणि जीर्ण पोरांना जन्माला घालताना, बाप म्हणून, किती आनंद होतो ? शब्दात कसं सांगू…. ???
2. रस्त्यावरच रक्त लघवी तपासण्या, वॉकर, कुबड्या, काठी, मानेचे, पायाचे पट्टे यासारखी वैद्यकीय साधने देतच आहोत. पुन्हा हेतू एकच… व्यंगावर मात करत यांनी , माझ्या कुबड्या सोडून, स्वतःच्या पायावर सन्मानानं उभं राहावं… !!!
🔹अन्नपूर्णा प्रकल्प
रस्त्यावर असहायपणे पडून असलेले गोरगरीब आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे गोरगरीब यांना आपण दररोज जेवणाचे डबे देत आहोत. (दिसेल त्याला सरसकट आम्ही डबे देत नाही)
जेवण तयार करणे त्याचे पॅकिंग करणे आणि ते योग्य त्या व्यक्तींपर्यंत वितरित करणे हे सर्व काम आमचे सहकारी श्री अमोल शेरेकर हे त्यांच्या पत्नीच्या साथीने करत आहेत.
अन्नपूर्णा हा संपूर्ण उपक्रम डॉ मनीषा यांच्या देखरेखी खाली सुरु आहे.
आमचे हात हा प्रकल्प राबवत असले, तरीही देणारे हात मात्र तुम्हा सर्वांचे आहेत.
एक बाबा… यांना आम्ही जेव्हा डबा द्यायचो, त्यावेळी हात जोडून, ते छताकडे पाहून, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुट पुटायचे… एकदा गमतीने मी त्यांना म्हणालो काय मागताय बाबा ?
यावर ते म्हणाले, ‘अरे बाळा, ज्यांनी माझ्या मुखात आज हा घास घातला…त्याला आणि त्याच्या पोरा बाळांना सुख, शांती, समृद्धी आणि समाधान दे… अशी देवाकडे प्रार्थना करतोय… !
हे बाबा स्वतः इतक्या त्रासात आहेत, परंतु मागणे मागताना त्यांनी इतरांसाठी मागितले….
शेवटी काय ? स्वतःसाठी मागणं हि झाली लाचारी… पण दुसऱ्यासाठी मागणं हि खरी प्रार्थना… !!!
त्यांची हि प्रार्थना आपणा सर्वांसाठी होती…
त्यांच्या मुखात घास खरंतर आपण सर्वांनी घातले आहेत मी फक्त पोस्टमनचं काम केलं…. तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभु देत हिच माझी शुभेच्छा !
🔸खराटा पलटण
खराटा पलटण म्हणजेच Community Cleanliness Team !
अंगात व्यवसाय किंवा नोकरीचे कोणतेही कौशल्य नसणाऱ्या लोकांची एक मोळी बांधून, त्यांच्याकडून पुण्यातील अस्वच्छ भाग स्वच्छ करून घेत आहोत, त्या बदल्यात त्यांना पगार किंवा किराणा माल देत आहोत.
सध्या एकूण 100 सेवेकरी या टीम मध्ये आहेत.
या महिन्यातही खराटा पलटणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे आणि त्या बदल्यात टीममधील प्रत्येकाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा दिला आहे.
रस्त्यावर वृद्ध याचक पावसात भिजत आहेत, त्यांना रेनकोट देणे गरजेचे आहे…. परंतु सरसकट हे रेनकोट न वाटता, हे जिथे बसतात तिथली स्वच्छता यांच्याकडून करून घेऊन यांना सन्मानाने रेनकोट दिले आहेत.
हे रेनकोट देताना मी त्यांना सांगितलं आहे ही रेनकोट भीक म्हणून देत नाही तुमच्या कष्टाची मजुरी म्हणून देत आहे.
आपण सर्वांनी सुद्धा कोणतीही गोष्ट “भीक” म्हणून देण्यापेक्षा “मजुरी” म्हणून द्यावी अशी माझी आपणास विनंती आहे.
दोन पाच रुपये देऊन पुण्य मिळवण्याच्या मागे लागू नका, पुण्य इतके स्वस्त नाही…! दोन पाच रुपयात पुण्य विकत घ्यायची, लोकांची सवय सुटली, तर भीक मागणाऱ्या लोकांची भीक मागण्याची सवय सुद्धा नक्की सुटेल…. ! माझं हे वाक्य कदाचित कोणालातरी बोचेल परंतु माझा नाईलाज आहे, सध्याची हिच वस्तुस्थिती आहे….!!!
रस्त्यावर भिक्षेकरी दिसायला नको असतील, तर तुम्ही भीक देणे बंद करा !!!
“एका दिवसात” हे होणार नाही…. परंतु “एके दिवशी” नक्की होईल…
🔹भीक नको बाई शिक
1. मागील दोन वर्षांची फी भरली नाही म्हणून शाळेने ऍडमिशन देण्यास नकार दिला या मुलीची दोन्ही वर्षांची फी भरून पुन्हा शाळेत तिला ऍडमिशन घेऊन दिले आहे.
2. थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असलेल्या आणखी अनेक मुला मुलींना शैक्षणिक साहित्य दिले आहे. शाळा कॉलेजच्या फी भरून झाल्या आहेत.
दुर्बल घटकातील अशाच आणखी 52 मुली मुलांना तुम्हा सर्वांच्या साथीने शैक्षणिक मदत करत आहोत… !
यातील आमच्या एका मुलाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये Bsc Computer Science, साठी मागील वर्षी प्रवेश घेऊन दिला, तो प्रथम वर्षात शिकत आहे, हेच मुळात विशेष… !!
आज रिझल्ट लागला आणि तो A+ ग्रेडने उत्तीर्ण झाला…!
जीचे पालक भिक मागत आहेत, अशी मुलगी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (BBA) करत आहे ती सुद्धा A+ ग्रेडने उत्तीर्ण झाली…!
आनंद व्यक्त करण्यासाठी खरंच माझ्याकडचे शब्द संपले… !!
त्याचे पालक म्हणून आम्ही जे काही करत आहोत, त्याचे त्याने चीज केले… !!!
त्यांना आम्ही जी काही शैक्षणिक मदत केली, खरंतर ती तुम्हा सर्वांकडून आमच्या पर्यंत आली आहे…
आपण सर्वजण त्यांचे आणि आमचे सुद्धा पालक झालात… आणि म्हणून त्याचं हे यश आपल्या पदरात घालत आहे…
आम्ही आपल्यापुढे नतमस्तक आहोत.
🔸भिक्षेकरी ते कष्टकरी
1. भीक मागणारं संपूर्ण एक कुटुंब… कुटुंबातील प्रौढ महिला पूर्णतः अपंग. या ताईला नवीन व्हीलचेअर देऊन, या कुटुंबाला रस्त्यावर खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.
2. अनेक वर्षे आजारी असणारी एक प्रौढ व्यक्ती …यांनाही या महिन्यात खेळणी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे.
3. पॅरालीसीस झालेली एक प्रौढ व्यक्ती… यांचा पूर्वी सायकल रिपेअरिंग चा व्यवसाय होता…. पुढे आयुष्याचं चाकच पंक्चर झालं…! ‘मला सर्व साहित्य घेऊन द्या, मी मला जमेल तसं पुन्हा काम सुरु करतो’, त्यांच्या या जिद्दीला सलाम करत सायकल रिपेअर करण्याचं सर्व साहित्य यांना घेऊन दिलं आहे. बाणेर रोड येथे हा व्यवसाय रस्त्यावर सुरू आहे…!
एकदा त्यांची कर्म कहाणी सांगत असताना ते मला कळवळून म्हणाले होते, ‘माज्याच लोकांनी माजे पाय ओढले हो…!
मी म्हणालो होतो, ‘हरकत नाही बाबा, आपण आनंद यात मानायचा की, पाय ओढण्यासाठी का होईना… पण शेवटी आपल्या पायापाशीच बसावं लागलं ना त्यांना…!’
यावर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून, नव्या दिवसाची सुरुवात करणारा, “सूर्योदय” वाटला मला तो चेहरा…. !!!
घर देता का घर ?
🔸रेनकोट आणि छत्री
रस्त्यावर वृद्ध निराधार याचक पावसात भिजत आहेत यांना छत्री किंवा रेनकोट द्यावेत असं वाटलं. पण अशा सरसकट वाटण्याने आपला हात पुन्हा वर राहणार आणि त्यांचा हात खाली…. एकूण काय एक वेगळ्या प्रकारची भीकच ती… !
आणि मग ते जिथे बसतात त्या परिसराची स्वच्छता करवून घेऊन त्यांना चांगल्या क्वालिटीचे रेनकोट किंवा छत्र्या सन्मानाने देत आहोत. सफाई भी सम्मान भी…
यांना छत्री आणि रेनकोट ची “किंमत” नाही समजली तरी चालेल… परंतु देणाऱ्याच्या भावनेचं त्यांना “मोल” कळावं …
हात फक्त भिक मागण्यासाठी नसतात, कष्ट करून सन्मानाने जगण्यासाठी असतात, हे बिंबवण्यासाठी आम्ही केलेला हा एक उपक्रम…. !!!
🔹मनातलं काही
काम करणाऱ्या सर्वांना रेनकोट वाटून झाले…. एक रेनकोट मी स्वतःसाठी ठेवला…. पुढे गेल्यानंतर मला एकाने रेनकोट मागितला… मी मग माझाच रेनकोट त्याला दिला. यानंतर पुढील स्पॉटवर गेलो, तिथे एक व्यक्ती छत्र्या वाटत होती…. काम करत असताना धो धो पाऊस सुरू झाला…. माझा रेनकोट मी दुसऱ्याला दिल्यामुळे माझ्याकडे आता काहीही साधन नव्हते…. !
मी भिजलो…. माझ्याकडचे सर्व साहित्य भिजुन गेले …. !
तेवढ्यात एक भीक मागणारे वृद्ध आजोबा आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर छत्री धरली आणि छत्री माझ्या हातात देऊन ते स्वतः तिथून भिजत निघाले…. !
मी त्यांच्या मागे जात म्हणालो, ‘, अहो, तुम्हाला मिळालेली छत्री तुम्ही मला कशाला देताय ? ठेवा तुम्ही….!
ते बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘मी भीजलो तर मी एकटाच भीजेल… पण तू भीजलास तर हजार लोक भीजतील… माझ्यापेक्षा तुला जास्त गरज आहे…. !
आभाळातल्या पावसाशी माझे अश्रू स्पर्धा करू लागले…. !
ती तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची….. कारण त्या दिवशी कोसळणाऱ्या आभाळाला थोपवणारा मला एक बाप मिळाला…. !!!
प्रणाम…. !!!
दिनांक : 31 जुलै 2023
डॉ अभिजित सोनवणे
डॉक्टर फॉर बेगर्स
सोहम ट्रस्ट
9822267357