धनगर आरक्षणप्रश्नी बारामतीत २९ जुलैला जवाब दो धरणे आंदोलन
धनगर आरक्षणप्रश्नी बारामतीत २९ जुलैला जवाब दो धरणे आंदोलन
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
बारामती दिनांक 24/7/2023 :
राज्यातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी सरकारने धनगर एसटी आरक्षणप्रश्नी सकारात्मक पावले टाकावीत, यासाठी बारामती येथे २९ जुलै २०२३ रोजी जवाब दो धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी अकलूज वैभव, वृत्त एकसत्ता, aklujvaibhav.in ला दिली.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रकात ढोणे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या काही वर्षांपासून एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी संघर्ष करीत आहे. याप्रश्नी बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी आश्वासने दिली आहेत, मात्र त्यादृष्टीने सकारात्मक कृती केलेली नाही. त्यामुळे समाजाची सातत्याने फसवणूक होत आली आहे. बारामती येथे जुलै २०१४ मध्ये ऐतिहासिक आंदोलन झाले.आंदोलनादरम्यान झालेल्या उपोषणाच्या सांगता कार्यक्रमासाठी तत्कालिन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे २९ जुले रोजी बारामतीत आले होते. भाजपची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून धनगर बांधवांनी एकतर्फी मतदान भाजपला केले व भाजपला सत्ता मिळाली, तसेच स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या, मात्र पहिली कॅबिनेट दूरच, फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या काळात एकाही कबिनेटमध्ये हा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे फडणवीस यांनी आश्वासन दिलेली २९ जुलै ही तारीख आम्ही विश्वासघात दिवस म्हणून पाळत आहोत. त्याअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून आम्ही बारामती येथे धरणे आंदोलन करून याप्रश्नी लक्ष वेधत आहोत.यंदाही, २९ जुलै २०२३ रोजी आम्ही बारामती प्रांताधिकारी कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करत आहोत.यानिमित्ताने धनगर एसटी आरक्षण प्रश्नी राज्य शासनाने केलेल्या सकारात्मक कार्यवाहीबाबतचे उत्तर आम्हाला हवे आहे, असे ढोणे यांनी सांगितले.