शिवरत्नच्या ज्ञान मंदिरात हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळा संपन्न..!

शिवरत्नच्या ज्ञान मंदिरात हरिनामाच्या गजरात दिंडी सोहळा संपन्न..!
Akluj Vaibhav News Network Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 28/6/2023 : वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शिवरत्न नाॅलेज सिटी परिसरात विठू-माऊलीचा दिंडी सोहळा रंगला. शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथून निघालेल्या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी शिवरत्न नाॅलेज सिटी येथे स्वागत केले.
शिवरत्न शिक्षण संस्थेतील शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल व शिवरत्न सीबीएसई स्कूलचे विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. आयोजित दिंडीमध्ये १८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस घेऊन वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.कोणी विठोबा, तर कोणी रुक्मिणी वासुदेव, कोणी तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली बनले होते. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत यावेळी शिवरत्नाच्या ज्ञान मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.हे बघून हे जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.अन अवघी शिवरत्न नाॅलेज सिटी दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
जय जय राम कृष्ण हरी , कानडा राजा पंढरीची, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे शिक्षण व कर्मचारी यांनी गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण निर्माण केले..
शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनपर शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल व शिवरत्न सीबीएसई स्कूलचे प्रिन्सिपल अल्बर्ट थरकन व बिनो के पाऊलस यांनी या शालेय आषाढ दिंडीचे नियोजन केले होते. यावेळेस एस.एम.शिंदे , डाॅ.अरविंद कुंभार,प्रा.प्रसाद पाटील,अश्रफ शेख,इ.मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती शिवरत्न शिक्षण संस्था जनसंपर्क विभागाद्वारे प्राप्त झाली.