तन मन धन से सदा सुखी हो | भारत देश हमारा |

तन मन धन से सदा सुखी हो |
भारत देश हमारा |
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 17/01/2026 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या राष्ट्रालाच देव मानले होते. “देश हा देव असे माझा” अशी देशाबद्दलची परंपरा आपली असल्याने सर्वांनी त्यागाची भावना व तेजाची भावना जोपासण्याची आवश्यकता आहे. गावाला जर संपन्नता आली तरच देश संपन्न होऊ शकतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जीवन प्रवास सर्व भारतीयांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. शानदार भारताची स्वप्न पाहणारे राष्ट्रसंत हे “भारत शानदार हो मेरा” म्हणतात. राष्ट्रसंतानी आपले संपूर्ण जीवन भारताला महान, बलशाली, संपन्न करण्यासाठी समर्पित केले. देशसेवेलाच भक्ती आणि मुक्ती मानले. देशसेवा हेच त्यांचे लक्ष होते. महाराज म्हणतात, “राष्ट्रसेवा ही मेरा अंतिम लक्ष है” जो आपल्या देशासाठी इमानदारीने कार्य करतो तीच खरी देवपूजा आहे. मग देवाच्या नामाचा जप केला नाही तरी चालेल.
तन-मन-धन से सदा सुखी हो | भारत देश हमारा |
सभी धर्म अरु पंथ पक्ष को, दिल से रहे पियारा ||
विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा ||टेक||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रवंदना हे भजन लिहिले. ते म्हणतात, आपला भारत देश शरीर (तन), मन आणि संपत्ती (धन) या तिन्ही बाबतीत नेहमी सुखी राहो आणि सर्व धर्म, पंथ आणि गट (पक्ष) एकमेकांना मनापासून प्रिय मानतील. त्यांच्यात प्रेमभाव राहील. हे भजन राष्ट्राची एकता, प्रेम आणि समृध्दीची प्रार्थना करते. ज्यात सर्व धर्मांना एकत्र आणण्याचा संदेश आहे. आपला भारत देश नेहमी विजयी असो, यशस्वी होवो. महाराजांनी यात सामाजिक एकता, सर्व धर्म समभाव आणि देशाच्या विकासाची भावना जागृत केली. भारतातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी असेल.
निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ती कराने |
सत्य-शील अरु निर्मल मन से, वीरों को उपजाने ||
सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने |
रंक-राव-पंडीत-भिकारी, सबको सुख दिलवाने ||
विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा ||1||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, भारत देशातील माता (जनता) कोणत्याही भीतीशिवाय, शूर किंवा निडर होऊन देशाच्या कल्याणासाठी कार्य करो. देशाची कीर्ती मंगलमय होवो. देशाची प्रगती आणि नाव उज्वल होवो. या भारत देशात सत्य, सदाचार आणि शुध्द मनाच्या लोकांकडून वीरांना जन्म दिला जावो. जेणेकरून देश शूर आणि नितीमान नागरिकांनी समृद्ध होईल. या देशातील लोकांनी सद्गुणी म्हणजे चांगल्या गुणांनी युक्त व्हावे. जेणेकरून त्यांचे जीवन आनंदाने आणि सुखाने सजेल, समृद्ध होईल. चांगल्या गुणांमुळेच खरे सुख आणि समाधान मिळते. भारतातील कोणताही व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत, विद्वान असो वा भिकारी प्रत्येकाला सुख मिळावे. सर्व मानव समान आहेत आणि त्यांना सुख मिळण्याचा अधिकार आहे. आमचा भारत देश नेहमी विजयी असो, त्याचा जयजयकार असो. भारताच्या विजयाची, समृद्धीची आणि गौरवाची भावना व्यक्त केली आहे. यात देशाबद्दल भक्ती आहे.
स्पृश्यास्पृश्य हटे यह सारा, देश कलंक मिटाने |
सबके मन कर्तव्यशिल हो, धन-उद्योग बढाने |
सबका हो विश्वास प्रभू पर, अपनी शक्ती बढाने ||
ब्रम्हचारी, अध्यात्म, दैविगुण, घर घर मे प्रगटाने |
सारा भारत रहे सिपाही, शत्रू को दहशाने |
तुकड्यादास कहे स्फूर्ती हो, सबको भक्ती कराने ||
विजयी हो, विजयी हो, विजयी हो, भारत देश हमारा ||2||
अस्पृश्यता आणि स्पर्श न करण्याची भावना (जातीभेद) ही सर्व देशातून नष्ट व्हावी. जातीभेद हा कलंक देशातून दूर व्हावा. ज्यात सर्व लोक समान मानले जातील. कोणताही भेदभाव राहणार नाही आणि देशातील ही मोठी सामाजिक वाईट प्रथा संपवण्यासाठी सर्व प्रयत्न करतील असे राष्ट्रसंत म्हणतात. प्रत्येकाचे मन कर्तव्याची जाणीव ठेवणारे असावे. लोकांनी फक्त स्वतःचा विचार न करता आपल्या जबाबदाऱ्या देशासाठी, समाजासाठी समजून घ्याव्यात आणि त्या पार पाडाव्यात. धन-संपत्ती आणि उद्योगधंदे, व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे. जेणेकरून देशाची आणि समाजाची भरभराट होईल. देवाने दिलेल्या शक्तीचा वापर करून सर्वांचा देवावर विश्वास निर्माण व्हावा आणि स्वतःची आध्यात्मिक तसेच मानसिक शक्ती वाढावी यासाठी प्रार्थना करावी. परमेश्वरावरचा विश्वास आपल्याला आंतरिक बळ देते. प्रत्येक घरात ब्रम्हचर्य (संयम) अध्यात्म (आत्मज्ञान) आणि दैवीगुण (सत्य, प्रेम, करुणा) यांचा प्रसार व्हावा. ज्यामुळे संपूर्ण समाज आध्यात्मिक दृष्ट्या सशक्त आणि शुद्ध होईल. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने ब्रम्हचर्याचे पालन करुन, अध्यात्माचा मार्ग स्विकारुन आणि दैवीगुण आत्मसात करुन आपले जीवन पवित्र, सामर्थ्यवान आणि दिव्य बनवावे. त्यामुळे राष्ट्र प्रगत (उन्नत) होईल. भारत देशातील प्रत्येक नागरिक एक सैनिक बनून शत्रूला घाबरवेल, दहशत निर्माण करेल. म्हणजेच देशातील प्रत्येक व्यक्तीने कर्तव्यनिष्ठ राहून देशाच्या संरक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. भारतातील सैनिक बनून देशाचे रक्षण करून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. आपला भारत देश सदासर्वदा सुखी राहो आणि नेहमी विजयी होवो. शेवटी महाराज म्हणतात, सर्वांना भक्ती करण्यासाठी प्रेरणा, स्फूर्ती मिळो.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180
