ताज्या घडामोडी

भिकार राजकारणाचा बेकार निकष…

भिकार राजकारणाचा बेकार निकष…

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 03/01/2026 :
महापालिकेत निवडून येणारा जर पाच वर्षात बंगले, गाड्या, जमिनी, फ्लॅट्स, झोपड्या, गाळे इत्यादी घेण्याच्या, लाटण्याच्या, कमावण्याच्या उद्देशानेच आलेला असेल तर मग कुणाला कुठेकुठे आणि कशाकशात रोखायचे?
कार्य, कर्तृत्व, वैचारिक प्रगल्भता, सामाजिक पार्श्वभूमी, स्वीकृती, निष्ठा, ध्येय – उद्दिष्टं वगैरे अशा अनेक निकषांतून पाझरत येणाऱ्यांपैकी एका इच्छुकाला पक्षाकडून निवडणुकीत उमेदवारी दिली जायची. ही प्रक्रियाच मुळी लोकप्रतिनिधींसाठी सामाजिक व राजकीय वर्तवणुकीचा एक आदर्श निर्माण करायची. अशातूनच या देशाला सुसंस्कारी, तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक लोकप्रतिनिधी लाभत आले होते. त्यामुळेच काही तुरळक अपवाद वगळता, साधुसंतांच्या या भारतभूमीतील जननायक हे संस्कारांच्या चौकटीत राहून जबाबदारीने वागत. परंतु स्वार्थांधपणाच्या विकृतीचे इथे संक्रमण झाले आणि सारेच बदलले, बदलत चालले आहे. नैतिकतेला प्राधान्य देणारी ती निवड प्रक्रिया आता दुर्मिळ नाही तर नामशेष झाली असल्याचे दिसते. त्याचेच परिणाम म्हणजे, ‘आजचे राज्यकर्ते’.
राजकारणात आजकाल उमेदवारी देताना एकच निकष बघितला जातो आणि तो म्हणजे ‘जिंकून येण्याची क्षमता’. इच्छुक उमेदवार या एकाच निकषामध्ये जरी अव्वल असेल आणि बाकीच्या सर्व निकषांमध्ये तो नालायक असला तरी त्यालाच प्रथम पसंती असतो, ही आजची शोकांतिका राजकारणातील ‘न्यू नॉर्मल’ झाली आहे. आजचा राजकीय गलिच्छपणा, पक्षव्यभिचार, निर्लज्जपणा आणि त्यातून केवळ जिंकून येण्याचीच क्षमता असलेले राजकारणी ही सारी याच निकषाची कटु फळे आहेत.
आता निवडून येण्याची क्षमता म्हणजे नक्की काय ? या चिखलात बरेच काही सामावलेले असलं तरी, ‘मनी पाॅवर ॲण्ड मसल पाॅवर’ या दोन गोष्टी सर्वाधिक प्रभावी. या श्रेणीत येणाऱ्यांमध्ये ‘मसल पॉवरद्वारे मनी पाॅवर’ उभी करणाऱ्यांना अधिक पसंत केले जाते. दहशत हे यांचे सर्वात प्रभावी अस्त्र होय आणि याच्याच सहाय्याने त्यांचे हात मतदारसंघात सर्वत्र पोहोचलेले व सगळ्यात रुतलेले असतात. या दृष्टिकोनातून सगळ्यांना त्यांचा परिचय असणे स्वाभाविकच नव्हे तर अपरिहार्य होते. यालाच काहीजण ‘अफाट जनसंपर्क’ समजतात. त्यातून लाभलेल्या सुप्रसिद्धी वा कुप्रसिद्धीमुळे त्यातील बरेच निवडूनदेखील येतात वा येऊ शकतात. एखाद्या मतदारसंघात जेव्हा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व राज्य करते तेव्हा त्या मतदारसंघाची याच्या विळख्यातून सहजासहजी लवकर सुटका होणे मुश्किल होऊन बसते. राजकीय पक्षांना हे माहीत असल्याकारणाने ते आपल्या पक्षाला बहुमत मिळावे यासाठी असल्यांना आपलेसे करतात.
अगोदर राज्यात एक कोणीतरी असा बाहुबली हेरला जायचा. पुढे प्रत्येक विभागाचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा, गावाचा, मतदारसंघाचा आणि आज तर प्रत्येक गल्लीत आपला असा एखादा हस्तक असलाच पाहिजे अशा मनस्थितीत आजचे राजकीय पक्ष पोहोचले आहेत. गुन्हेगारांना जेव्हा असा राजाश्रय प्राप्त होतो तेव्हा त्यांच्या कुकर्मांना मर्यादा राहत नाहीत. हे असे जेव्हा निवडून येतात तेव्हा मग पुढे काय ? भ्रष्टाचार, अत्याचार, दुराचार आणि सारे काही अवैध, असंवैधनिक, अन्यायकारक. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार जर करोडो रुपये खर्च करत असेल तर निवडून आल्यावर या खर्चाच्या कमीतकमी पन्नास पट वसूल करण्याची त्याची नियोजित महत्त्वाकांक्षा त्याला सारे गैर मार्ग पत्करायला प्रोत्साहित करते. महापालिकेत निवडून येणारा जर पाच वर्षात बंगले, गाड्या, जमिनी, फ्लॅट्स, झोपड्या, गाळे इत्यादी घेण्याच्या, लाटण्याच्या, कमावण्याच्या उद्देशानेच आलेला असेल तर मग अशाला कुठेकुठे आणि कशाकशात रोखायचे ?
सर्वात आश्चर्याची बाब ही की हे सगळे केवळ गुन्हेगारी प्रवृत्तीचेच करतात असे नाही तर, व्हाईट कॉलर, सुशिक्षित, सुसंस्कृत म्हणून राजकारणात आलेलेसुद्धा पुढे हेच वळण घेताना दिसतात. त्यामुळे राजकारण या क्षेत्राचीच बदनामी झाली आहे. मतदाराला काय अपेक्षित आहे, हे कधीच जाणुन घेतले जात नाही आणि जरी याची जाण असली तरी, सत्ताखुर्चीसाठीच्या राजकारणात कराव्या लागणाऱ्या तडजोडीत अगोदर बळी दिला जातो तो मतदाराच्या याच आशा – अपेक्षांचा, पक्षाच्या विचारधारेचा, संघटनेच्या तत्त्वांचा, निष्ठेच्या सन्मानाचा.
जनता प्रत्येक वेळेस काही अपेक्षा ठेवून एखाद्याला निवडून आणत असते पण त्यापैकी किती गोष्टींची पूर्तता होते? तेव्हा, असलेले व येणारे हे सारेच जर एका माळेचे मणी असणार असतील तर मग त्यावर स्वताचे सांत्वन करण्यासाठी ‘नोट दो – वोट लो’ चा उपचार अनेकांनी स्विकारला आहे. आपण आयकराच्या रूपात भरलेले आणि यांनी ते भ्रष्टाचार करून लुटलेले जर आपल्याला पाच वर्षातून एकदा येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून परत मिळवता येऊ शकत असतील तर काहीच चुकीचे ठरत नाही, असा विचार आता पैसे घेणारा मतदार करू लागला आहे. आता हे पाप मतदारांवर शेकू शकत नाही कारण त्यांना याची सवय याच पैसे वाटणाऱ्या नेतेमंडळींनी घालून दिली आहे. एकेका मताला दहा ते पंधरा हजारांचा आकडा आज ऐकायला मिळणे म्हणजे ‘एकदमच भारी’ आणि याचसाठी राजकीय पक्ष त्या तोडीचा भारी उमेदवार मिळावा म्हणून ‘सगळं सोडून’ शोधत फिरत असतात. असा आणि इतका पैसा ओतू शकणारा कोणी सापडलाच की हे त्याला गडप करण्यासाठी त्यावर तुटून पडतात. मग, तो कसाही – कितीही भयानक- भयंकर असला तरी चालतो. या अशा घृणास्पद राजकारणात जो सर्वात कुशल आहे, मुरलेला आहे, धूर्त आहे तोच सत्ताखुर्ची जिंकून त्यावर विराजमान होऊ शकतो, असे म्हणण्यात अतिशयोक्ती काय आहे.
देशाचे – राज्याचे – शहराचे भावी नेतृत्व हे आजच्या अशा निवडणुकींच्या पायऱ्या चढूनच येत असते आणि म्हणून आपण स्थानिक पातळीवर कसा उमेदवार दिला पाहिजे, याचे भान आणि जबाबदारी प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. उमेदवार निवडीचे निकष हे स्वच्छ, आदर्श, अनुकरणीय असावेत. या प्रक्रियेतून निवडून येणारा लोकप्रतिनिधी उद्या कसा निघेल हे जरी आज सांगता येऊ शकत नसले तरी, सर्वच पक्षांनी याबाबत दक्षता आणि कटाक्ष ठेवला तर राजकारणात चांगल्या लोकप्रतिनिधींची एक परिसंस्था तयार होण्यास मदत होईल आणि ज्यातून राजकीय विकृती आपसूकच बाहेर फेकली जाणारे वातावरण निर्माण होईल. त्यासाठी आजच्या ‘भिकार राजकारणाचे बेकार निकष’ खोडून काढणे आवश्यक आहे.
9326 36 5396

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button