असाच धावत येशील का? पावन मजशी करशील का?

असाच धावत येशील का?
पावन मजशी करशील का?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 03/01/2026 :
मनुष्य म्हणजे गरजांची एक यादी आहे. जे जे काही दिसत आहे, दिसलं आहे, दिसणार आहे ती प्रत्येक गोष्ट त्याला हवी असते. ईश्वर आपल्यासाठी नक्कीच धावत येतो. निस्सीम भक्ती, निखळ श्रद्धा आणि आर्त हाकेला देव तात्काळ प्रतिसाद देतो. जेव्हा माणूस पूर्णपणे “मी पणा” सोडून देवाला शरण जातो तेव्हा ईश्वर त्याची जबाबदारी घेतो. ईश्वराचे स्मरण आणि भक्तीमुळे मनातील काम, क्रोध, लोभ यासारखे विकार दूर होतात. ज्यामुळे मन शांत आणि निर्मळ (पवित्र) बनते.
असाच धावत येशील का?
पावन मजशी करशील का? ||धृ.||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे एक लोकप्रिय भजन आहे. जे भक्तीची तिव्रता दर्शवते. हे देवा, मी तुला हाक मारत असताना तू भक्तांच्या मदतीला विनाविलंब धावून येशील का? तुझ्या भक्ताला तत्परतेने प्रतिसाद देशील का? संकटात किंवा आर्ततेच्या वेळी तुझी तत्परता मला हवी आहे. तुझी कृपा होऊन तुझे दर्शन मला मिळेल का? तुझ्या पवित्र दर्शनाने मी अंतर्बाह्य (पवित्र) होईल का? तुझ्या दर्शनाने मला पवित्र करावे अशी आर्त विनवणी आहे. मला तुझ्या अस्तित्वाचा अनुभव देशील का?
सुंदर सगुण गुणाचे रुप हे |
ठसले नयनी तसे स्वरुप हे ||
पाहता मन हे तन्मय होते |
मनीच ऐसा शिरशील का? ||1||
सगुण म्हणजे ज्याला आपण पाहू शकतो, स्पर्श करु शकतो. गुणसंपन्न म्हणजे सत्व, रज, तम या गुणांनी युक्त असे रुप. निर्गुण म्हणजे गुण नसलेला, रुप नसलेला देव, ईश्वराचे रुप गुणसंपन्न आहे. सगुण म्हणजे गुण, रुप आणि आकार असलेली ईश्वरी मुर्ती. हे रुप अत्यंत देखणे आणि आकर्षक आहे. जसे- पंढरपूरचा विठ्ठल किंवा श्रीकृष्ण. भक्ताने देवाची मूर्ती इतक्या प्रेमाने पाहिली की, ते रुप त्याच्या डोळ्यात (नयनी) कायमची ठसली आहे. (रुतून बसली आहे) आता डोळे मिटले तरी तेच रुप मला दिसते. डोळ्यात मुर्तीचे स्वरुप ठसणे म्हणजे भक्ती भावाचा कळस दर्शवते. जिथे बाह्य रुपाच्या माध्यमातून अंतर्मनात ईश्वराचे अस्तित्व भिनले आहे. ईश्वराची मूर्ती पाहून मन इतके मंत्रमुग्ध, गढून किंवा मग्न होते की, त्याला स्वतःचे व आसपासच्या जगाचेही भान राहत नाही, देहभान हरपून पूर्णपणे त्या गोष्टीत समरस होण्याची अवस्था आहे. मनीच ऐसा शिरशील का म्हणजे मनाला बाह्य गोष्टीपासून दूर करुन पूर्णपणे आपल्या मनात स्थिर करणे, ज्यामुळे आत्मा आणि परमात्मा एकरुप झाल्याची अनुभूती येते. आपली चित्तवृत्ती आतल्या आत वळवावी.
स्थूल मंदिरी मन शृंगारी |
विवेक त्यावर स्थिरता वारी ||
ज्ञानांजन संकल्प करोनी |
द्वैत-भाव मम हरशील का? ||2||
स्थूल देह म्हणजे पंच महाभूतांपासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यापासून बनलेले आपले भौतिक, दृश्यमय शरीर होय. स्थूल मंदिरी म्हणजे आध्यात्मिक तत्वज्ञानातील स्थूल देह (दृश्यमय शरीर) जे अन्नापासून बनलेले आणि डोळ्यांना दिसणारे जीवाचे भौतिक रुप आहे. मन शृंगारी म्हणजे स्थूल देहाने मनाला प्रेमाने, सौंदर्याने आणि आनंदाने सजवणे. मनाची अवस्था जी आनंदाच्या आणि प्रेमाच्या भावनांनी परिपूर्ण असते. मानवी प्रेम आणि ईश्वर यांच्यातील संबंध दृढ करणे होय. विवेक आणि स्थिरता वारी म्हणजे देहभाव विसरुन केवळ विठ्ठलाचे नामस्मरण करुन मनाला शांत आणि स्थिर ठेवणे. वारी म्हणजे केवळ पायी प्रवास नसून ती मनाची एकाग्रता आणि समरसतेचा एक सोहळा आहे. भक्तीच्या मार्गावर स्थिर राहून पंढरीची वाटचाल करणे.
ज्ञानांजन संकल्प करणे म्हणजे बुद्धीच्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून अज्ञान दूर करण्याचा दृढनिश्चय करणे. अज्ञान रुपी अंधकार नष्ट करुन आत्मज्ञान किंवा सत्य जाणून घेण्याची तयारी दर्शवते. जिथे भक्त देवाची प्राप्ती करण्यासाठी अज्ञान टाकून ज्ञानाच्या मार्गांवर चालण्याचा निश्चय करतात. द्वैत-भाव हरशील का म्हटले आहे म्हणजे भक्ताने देवाला स्वतः मधील मी आणि तू वेगळे असल्याचा अंधकार (दुजेपणा) नाहिसा करण्याची विनंती केली आहे. स्वतःला ईश्वरापासून भिन्न न मानता सर्वकाही ईश्वरमय आहे अशी अद्वैत स्थिती प्राप्त करणे होय. सर्व चराचरात ईश्वर भरलेला आहे हे समजून मी वेगळा नाही अशी समजूत होणे यालाच द्वैतभाव हरवणे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर मी देवाचा अंश किंवा सेवक आहे असे मानणे म्हणजे द्वैतभाव होय. अद्वैत भाव म्हणजे दोन नसून एकच असण्याची जाणीव. माणूस आणि परमात्मा हे भिन्न नसून एकच आहेत.
संसाराचे असत्यपण हे |
तूज पाहता वाटे निर्जन हे ||
तुकड्यादास तूच निरंतर |
सुख तुझे ते देशील का? ||3||
संसाराचे असत्यपण म्हणजे हे जग व त्यातील भौतिक गोष्टी क्षणभंगूर, बदलत्या आणि मायावी (मिथ्या) आहेत, जे अखेरीस नष्ट होणारे आहेत. खऱ्या सुख शांतीसाठी बाह्य जगाचा (संसाराचा) त्याग न करता, त्यातील आसक्ती सोडणे आणि भगवंताच्या स्वरुपात मन रमवणे म्हणजेच संसार असत्य मानून शाश्वत रुप शोधणे होय. हे जग आभास आहे ही जाणीव असणे म्हणजेच संसाराचे असत्यपण होय. देवा तुला पाहताना निर्जन वाटे म्हणजे भक्तीच्या सर्वौच्च अवस्थेत बाह्य जगाचा विसर पडून केवळ ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव येणे होय. हा निजानंदाच्या, आत्म स्वरुपाचा, अनुभवाचा किंवा सगुण रुपात निर्गुण परब्रम्ह पाहण्याचा भाव आहे. जिथे मन भक्तीत मग्न होते. देवाला पाहिल्यावर संसाराची ओढ संपून निर्जन (शांत) वाटणे म्हणजेच खरा ईश्वरी अनुभव घेणे.
निरंतर म्हणजे जे कधीही नष्ट न होणारे, नेहमी टिकून राहणारे (शाश्वत) आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ईश्वराच्या काळाच्या पलीकडील आणि स्थिर मानतात. महाराजांची भक्ती आत्म समर्पणाची सर्वौच्च अवस्था आहे. जी ईश्वरी चैतन्य रुपात आणि काळात निरंतर असणे. ते देवाला तूच निरंतर म्हणतात. ते स्वतःच्या अस्तित्वाचा ईश्वराच्या नित्य अस्तित्वात विलीन करतात. महाराज स्पष्ट करतात की, “हर देश में तू, हर भेष मे, तू” ईश्वर एक निरंतर सत्य आहे. बाकी सर्व नश्वर आहे. महाराज म्हणतात, तुझ्याकडील सुख, समाधान, शांती मला देशील का? असा आर्त प्रश्न ईश्वराला विचारला आहे. त्यातून मनाला शांती आणि आंतरिक समाधानाची प्राप्ती करण्याची तिव्र इच्छा व्यक्त केली आहे. देवा मला सांसारिक सुखाची भुलभुलैय्या नको तर तुझ्या चरणाचा विसर पडू न दे इतकी कृपा कर.
सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख |
पाहता ही भूक, तहान गेली ||
श्रीहरीच्या (विठ्ठलाच्या) मुख दर्शनाने मिळणारा परमानंद हा सर्व सुखापेक्षा श्रेष्ठ असून त्याच्या दर्शनाने मनातील सांसारिक वासना, इच्छा (तहान, भूक) पूर्णपणे शांत होतात आणि आत्मिक समाधान मिळते. देवाचे रुप पाहिल्यानंतर मनातील वासनाची भूक आणि अतृप्ततेची तहान पूर्णपणे नाहिशी होते आणि इच्छा मुळीच उरत नाही. खरे पाहिले तर सुख हे एक मृगजळ आहे. सुखाची संकल्पना व्यक्ती सापेक्ष असते. खूप पैसा मिळाला तर मी खूप सुखी होईन या विचाराने मनुष्य अधिक पैसे मिळविण्याच्या मागे लागतो. खूप पैसा मिळवून सुद्धा त्याला सुखाचा वारा स्पर्श करीत नाही.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677
