समय आ गया और निकल जा रहा है !

- समय आ गया और निकल जा रहा है !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 07/11/2025 :
वेळ ही शक्तीशाली आहे. व्यक्तीने त्याची प्रतिक्षा करु नये. गरीब असो वा श्रीमंत एक दिवस या जगाचा निरोप घ्यावा लागेल. या जीवनाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळेचं मोल समजून घ्यायला हवं. आपल पद, प्रतिष्ठा, धनदौलत येथेच ठेवून जावं लागेल. “समय बडा बलवान रे, समय बडा बलवान | एक दिन सबको जाना होगा, निर्धन या धनवान रे ||” आपल्याला मनुष्य जीवन मिळाले ते आपले कर्तव्य आणि भजन, ध्यान करण्यासाठी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “उद्या करायचे आज करा काही, भरवसाची नाही आयुष्याचा” काही करायचे असेल तर आजच किंवा आत्ताच करा कारण या क्षणभंगूर जीवनाचा काहीही भरवसा नाही. वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग होणार नाही.
समय आगया और निकल जा रहा है |
इन्सान तू क्यो उसे खो रहा है ||टेक||
हा मनुष्य जन्म एकदाच मिळतो आणि तो अनमोल आहे. जीवनात वेळेला खूप महत्व आहे. पाहता पाहता वेळ निघून जात असते. वेळेचा योग्य सदुपयोग करायला हवा. कारण आपण आपल्या योग्य कार्याला प्राप्त करून जीवन सार्थक बनवू शकता. जीवनात कोणतेही काम वेळेत केले तर त्यापासून मिळणारे फळ हे नेहमी चांगले मिळेल. संत कबिर म्हणतात, “कल करे सो आज कर, आज करे सो अब” याप्रमाणे आपली कामे वेळेत केली तर भविष्यात कुठलीच चिंता करायचं काम पडणार नाही. पैसे खर्च केले तर पुन्हा कमवता येतात पण गेलेली वेळ पुन्हा कधीच मिळवता येत नाही म्हणून आपल्या जवळ असणाऱ्या वेळेचा योग्य तर्हेने वापर करून घेतला पाहिजे. मनुष्य हा वेळेचा सदुपयोग करीत नाही.
अगर कुछ करेगा तो भगवान होगा |
खाली रहेगा तो धोखाही होगा ||1||
जीवनात काहीतरी चांगले केले तर नक्कीच सफलता मिळते. जर आपण दुसऱ्याचे भलं करीत असाल तर भगवान सुद्धा आपलं भलं करील. मानव जन्माला येऊन काहीही कर्म केले नाही तर धोका नक्कीच होईल. राष्ट्रसंत म्हणतात “कामात लक्ष रामावरी ठेव अंतरीचे” ईश्वर चिंतन करीत कर्म केले तर भवसागर तरशिल. म्हणजे परत जन्माला येणे नाही. चांगल्या वाईटाचा हिशोब भगवान ठेवीत असतो. तसेच त्याचे फळ सुद्धा मिळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, “भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती में भी धोका है | बिना चरित्र आचरण से, सारी भक्ती ही खोका है ||” भक्ती करतांना आचरण शुध्द असायला पाहिजे. व्यक्तीने वेळेचा योग्य सदुपयोग केला नसेल किंवा कर्माचे फळ मिळाले नसेल तर दुःखाला सामोरे जावे लागते. संत कबिर म्हणतात, “दुखमें सुमिरन सब करै, सुखमें करै न कोय | जो सुखमें सुमिरन करै, तो दुख काहे को होय ||” सुखात असेल तर ईश्वर चिंतन करीत नाही. जर दुःख झाले तरच ईश्वराचे चिंतन करतोस. योग्य वेळेवर निर्णय घेऊन मेहनत कर नक्की सफलता मिळेल. जीवनात स्थित्यंतरे येतच राहणार. सर्व दिवस सारखे राहत नाहीत. कधी यश तर कधी अपयश येतील.
समय देखकर शूर लडते है रणमें |
चाहे जान जावे न पर्वा है उनमें |
वही नामका बाज बजवा रहा है ||2||
युद्धाच्या रणभूमीवर शत्रूसोबत लढतांना शूरवीर सैनिक वेळेचा सदुपयोग करून लढतो. शूर लढतांना मरणाची पर्वा मुळीच करीत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या ध्येयासाठी किंवा मूल्यांसाठी इतकी प्रामाणिक आणि समर्पित असते की, तो मृत्यूची भीती न बाळगता अत्यंत धैर्याने लढतो आणि प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालतो. केवळ शौर्यच नाही तर त्याग आणि वचन बद्धतेची भावना देखील त्यांच्यात आहे. असाच शूर लढत असतांना त्याला अमरत्व प्राप्त होते. त्याच्या कीर्तीचा नगारा वाजतो आणि देशासाठी शहीद होतो.
गया शांतीका वो जमाना हवासे |
अभी डटके रहना पडेगा दुवासे |
तभी चीज होगा, जनम ये महा है ||3||
सुरुवातीचा काळ शांतीचा होता, त्याची हवा गेली. आता दुःख आणि वाईट गोष्टीचा काळ आला म्हणजे सर्वांमध्ये कली शिरला. डटके रहना म्हणजे माघार न घेणे, ठाम राहणे किंवा कोणत्याही परिस्थितीत दृढ राहणे होय. आपल्या भूमिकेवर न डगमगता टिकून राहिले पाहिजे. ईश्वराचा तसाच मोठ्यांचा आशिर्वाद प्राप्त करावा. हा मनुष्य जन्म महान आहे. काही लोक स्वतःच्या कष्टाने महानता मिळवतात. चांगल्या कर्माच फळ मिळण्यासोबतच जन्माच सार्थक होत.
समय जो गमाता, ओ मूरख कहाता |
न खुद भी तरे ना किसीको तराता |
कहे दास तुकड्य, समझ ये कहाँ है ||4||
राष्ट्संत तुकडोजी महाराजांच्या या अंतिम ओवीचा गहन संदेश मिळतो की, वेळ वाया घालवणारा माणूस मूर्ख असतो कारण तो स्वतः पुढे जात नाहीच पण इतरांना ही पुढे जाऊ देत नाही. जो व्यक्ती स्वतःला वाचवू शकत नाही आणि दुसऱ्याला मदत करू शकत नाही. मौल्यवान वेळेच महत्व माणसाला कळत नाही. वेळेचा सदुपयोग करणारा, समाजाचे कल्याण करणारा सच्चा सेवक हवा. महाराज म्हणतात, हे माझ्या लक्षात येत नाही तसेच समजण्या पलिकडचे आहे. कधी माणसालाला वेळेच महत्व कळेल.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677

