बांगला देशी, रोहिंग्यांना पिटाळा, देशाची सार्वभौमता सुरक्षित ठेवा
बांगला देशी, रोहिंग्यांना पिटाळा, देशाची सार्वभौमता सुरक्षित ठेवा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/11/2024 : महाराष्ट्र राज्याच्या विधान सभा निवडणुकीच्या रणधुमाळीत टाटा सोशल सायन्स इन्स्टीट्युटचा एक अहवाल समोर आला आहे. सुरुवातीला भाजपाचे किरीट सोमय्या यांनी हा अहवाल उघड केला. नंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी या अहवालाचा प्रचाराचा मुद्दा केला. या अहवालाकडे राजकीय दृष्टीकोणातून न पाहता या अहवालाची प्रत्येक राजकीय पक्षाने आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाने गंभीर दखल घेण्याची गरज आहे. याचे कारण या अहवालातील तथ्य जर भविष्यात सत्यात उतरले तर महाराष्ट्र राज्य लयाला जाईलच. या देशाचा कणाही मोडला जाईल.
टाटाच्या संस्थेने दिलेला या अहवालात म्हटले आहे की, मुंबईत बांगला देशी नागरिक आणि म्यानमारचे रोहिंगे यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढ अशीच कायम राहिली तर येत्या दहा वर्षात मुंबईतील हिंदुची संख्या ५० टक्क्याच्या खाली जाईल. अहवालात आज हा धोका मुंबईला दाखविला आहे. भविष्यात तो सर्व राज्याला व देशाला होईल. सर्वात प्रथम या अहवालाकडे हिंदू-मुस्लीम या धार्मिक भावनेने पाहण्याची गरज नाही हे लक्षात घेतले पाहिजेत. या अहवालाकडे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाहिले पाहिजे. दुर्देव म्हणा की काही म्हणा, भारत देशाच्या अवती भवती जे देश आहेत त्यातील एकही देश भारताचा हितचिंतक नाही हे लक्षात घेतले पाहिजेत. पाकिस्तान उघड शत्रू आहे. चीन सदैव संधीच्या शोधात असतो. बांगला देश विश्वासू मित्र आहे असे म्हणता येत नाही. जमिनी सरहद्दीला लागून असलेल्या या तीन देशाकडूनच देशाला खरा धोका आहे. पाकिस्तानची निर्मिती भारताच्या फाळणीतूनच झाली. त्यावेळी धार्मिक आधारावर फाळणी झाली. मुस्लीम समाजाचे नागरिक पाकिस्तानात गेले. पुढे त्याच पाकिस्तानचे दोन तुकडे होऊन बांगला देशची निर्मिती झाली. बांगला देशची निर्मितीही भारताच्या सहकार्यानेच झाली. स्व. इंदिरा गांधी यांनी वंगबंधु शेख मुजीबूर रहेमान यांच्या मुक्तीवाहिनीच्या मदतीला भारतीय सैन्य पाठवून बांगला देशची निर्मिती केली. तेव्हापासून पाकिस्तानात भारताबद्दल रोष आहे. अगोदरची फाळणी आणि नंतर बांगला देशची निर्मिती अशा दुहेरी कारणाने पाकिस्तान भारताचा शत्रू बनला. काश्मीर तर चिघळती जखम आहेच. पुढे भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तान काय काय कुरापती करतो हा इतिहास ताजाच आहे आणि तो सर्वाना ज्ञात आहे. हाच पाकिस्तान भारताचे शत्रू असलेल्या इतर देशातील भारताच्या शत्रूंना धर्माच्या आधारावर भारताविरोधात कुरापती करण्याला प्रोत्साहन देतो. दहशतवाद्यांना मदत करतो. हा सर्व संदर्भ घेऊन भारतात येणा-या बांगला देशी व रोहिंग्याकडे पाहिले पाहिजेत.
दुसरा महत्वाचा मुद्दा असा की, हे सर्वजण मुंबईतच का येत आहेत? याचे वरकरणी कारण मुंबईतील अवाढव्य लोकसंख्या लक्षात घेता मुंबईत सहज मिसळून जाता येते. पण याही पेक्षा महत्वाचे कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई नेस्तनाबूत झाली तर देश नेस्तनाबूत करायला वेळ लागणार नाही याची जाणीव देशविरोधी सर्व घटकांना आहे. यामुळे अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी मुंबईत बाँम्बस्फोट घडवून आणले. बाबरी जर अयोध्येत पाडली तर त्याचा बदला मुंबईत का घ्यायचा? त्याचा बदला अयोध्येत घ्यायला पाहिजे होता. फार तर उत्तर प्रदेशाच्या राजधानीत घ्यायला पाहिजे होता. परंतु तसे न करता अतिरेक्यांनी मुंबईची निवड केली. साखळी बाँम्बस्फोटानंतरही जेव्हा मुंबई पूर्वपदावर आली तेव्हा अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी पुन्हा मुंबईवरच हल्ला केला. याचा स्पष्ट अर्थ असा की, भारत विरोधी ज्या काही आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत त्यांना मुंबईला लक्ष करुन हा देश खिळखिळा करायचा आहे. या पार्श्वभूमिवर मुंबईत येणा-या बांगला देशी नागरिक व रोहिंग्या यांच्याकडे पाहिले पाहिजेत. ते केवळ मुस्लीम आहेत, त्याच्यावर कारवाई केली देशातील मुस्लीम नाराज होतील, त्याचा फटका निवडणुकीत बसेल असा विचार करुन जर त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली नाहीत एक दिवस देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्यात देशातील केवळ हिंदुचेच नाही तर देशातील मुस्लीमांचेही प्रचंड नुकसान होणार आहे. आज आपण देशात उघडपणे राजकीय वाद घालतो, सामाजिक वाद घालतो एवढेच काय हिंदू-मुस्लीम वादावरही उघडपणे बोलतो. याचे महत्वाचे कारण हा देश स्वतंत्र आहे, सार्वभौम आहे. उद्या देशच राहिला नाही तर कशाचे वाद घालणार व कोणाशी वाद घालणार याचा विचारही देशातील सर्वच धर्माच्या लोकांनी केला पाहिजेत. निवडणुकीच्या प्रचारात केवळ सत्ता मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांनी काहीही म्हणू द्या, या देशातील सर्व धर्म आजमितीला सुरक्षित आहेत. १२०० वर्षाच्या मुस्लीम राजवटीत जो हिंदू धर्म टिकून राहिला त्याला आज कोणता धोका आहे? मुस्लीम धर्मालाही कोणता धोका नाही. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, पारशी आदि सर्व धर्माचे लोक आजवर या देशात गुण्यागोविंदाने नांदतच आले. राजकीय दृष्टीकोणातून जे वाद आहे ते धर्माच्या दृष्टीकोणातून नाहीत तर माणसाच्या आचरणातून निर्माण झाले आहेत. ते पुढे मागे सुधारता येतील पण उद्या जर परकिय शक्तींनी पुन्हा हा देशच नेस्तनाबूत केला तर तो उभा करायला किती काळ जाईल आणि या देशातील भावी पिढ्यांना किती संकटांना तोंड द्यावे लागेल याचा विचार आता प्रत्येकांनी केला पाहिजेत.
मुंबईत आलेले बांगला देशी किंवा रोहिंगे या देशाच्या प्रेमापोटी किंवा या देशाच्या विकासासाठी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचा सर्वप्रधम शोध घेऊन त्यांना पिटाळून लावले पाहिजेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अगोदरच या देशातील लोकसंख्या भरमसाठ वाढली आहे. त्यात परकीय देशातून आलेल्या नागरिकांची अशीच भर पडत राहिली तर एक दिवस या देशातील अन्नधान्य, पाणी आदि सर्व जीवनावश्यक गोष्टी अपु-या पडतील. अन्नधान्य पिकविता येईल. परंतु जमीन निर्माण करता येत नाही. एवढ्या लोकांचे पालनपोषण करण्यासाठी लागणारी जमीन या देशात राहील का? याचाही विचार केला पाहिजेत. १९७१ च्या बांगला देश युध्दाच्या वेळी बांगला देशातील निर्वासितांचे जे लोंढे आमच्या देशात आश्रयाला आले आहे त्याचा आमच्या अर्थव्यवस्थेवर भार पडत आहे. तो भार आम्ही सोसू शकत नाही असे कारण देत इंदिरा गांधींनी आपले सैन्य बांगला देशात पाठविले आणि बांगला देशाची निर्मिती केली. मग आता येणा-या बांगला देशी आणि रोहिंग्याचा भार आपल्या अर्थव्यवस्थेला सोसवेल का याचा राज्यकर्त्यांनी विचार केला पाहिजेत. आपल्या देशातील लोकसंख्या रोखण्याला या देशातील सत्ताधा-यांना यश आले नाहीच, किमान परकिय नागरिकांचे येणारे लोंढे तरी थांबवा. त्यासाठी धर्माच्या नावावर कोणी अडथळा आणत असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यास हयगय करु नका. याचे कारण हा देश सुरक्षित राहिला तरच आपण सर्व सुरक्षित राहू. निवडणुका येत राहतील, जात राहतील. देशाचे अस्तित्व ही महत्वाची बाब आहे. आज एक जण म्हणतो, बटेंगे तो कटेंगे, दुसरा म्हणतो, एक है तो सेफ है, त्याला उत्तर देताना तिसरा म्हणतो डरोगे तो मरोगे. हे सर्व केव्हा, जेव्हा हा देश सुरक्षित, सार्वभौम राहिल तेव्हा. म्हणून आज सर्वानी एक लक्षात घेतले पाहिजेत, बचेंगे तो रहेंगे. त्यानंतर मग बाकीच्या सर्व गोष्टी होतील. बांगला देशी, रोहिंग्याचा प्रश्न हा स्थानिक हिंदू-मुस्लीमांशी कोणी जोडू नये. हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. त्याकडे त्यादृष्टीनेच पाहिले पाहिजेत.
विनायक एकबोटे
ज्येष्ठ पत्रकार नांदेड
मो.नं. ७०२०३८५८११