सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना
संपादकीय पान……….✍️
🔵 सरन्यायाधीशांची शाहू महाराजांना कृतज्ञ आणि कृतिशील मानवंदना
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/8/2025 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांची पहिली भेट कोल्हापूरचे दत्तोबा पोवार यांनी मुंबईत १९१९ मध्ये घडवून आणली होती. त्याच भेटीत बाबासाहेबांनी कोल्हापूर संस्थानाला लवकरात लवकरात लवकर भेट द्यावी यासाठी महाराजांनी निमंत्रण दिले. बाबासाहेबांनीही कोल्हापूर भेटीचे निमंत्रण आनंदाने स्वीकारले होते.
त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी कोल्हापुरातील स्नेही दत्तोबा पोवार यांना पत्र पाठवले आणि कोल्हापूरला येण्याची तारीख कळवली. महाराजांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली. पोवार, त्यांचे मित्र गंगाधर पोळ आणि महाराजांचे खासगी सचिव कुंभोजकर यांनी रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांचे स्वागत केले. तेथून रेल्वेस्टेशनसमोरील महाराजांच्या रेस्ट हाऊसमध्ये म्हणजे जुने शाहूपुरी पोलिस ठाणे येथे त्यांचे चहापान झाले. त्यानंतर कुंभोजकर यांनी त्यांना घोड्यांच्या रथातून नवीन राजवाड्यावर नेले. महाराजांनी मोठ्या उत्साहात बाबासाहेबांचे स्वागत केले. या भेटीतच कोल्हापुरात बहिष्कृत वर्गाच्या लोकांची परिषद घेण्याचे ठरले. परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे डॉ. आंबेडकरांनी मान्य केले. (यातूनच साकारली ती ऐतिहासिक माणगाव परिषद.) कोल्हापूर संस्थानच्यावतीने बाबासाहेबांचा दोन दिवस पाहुणचार करण्यात आला. या दरम्यान महाराज चार घोड्यांच्या रथातून सोनतळी कॅम्पवरून रेस्ट हाउसवर आले. त्यांनी बाबासाहेबांना रथात घेऊन शहरांतून फेरफटका मारला. महाराजांच्या अशा प्रत्येक कृतीमागे हेतू असे. त्यामुळे बहुजन समाजात एक प्रकारचे कुतूहल निर्माण झाले. परत जाताना त्यांनी सोनतळी कॅम्पवर भोजनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. तेथे ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरच्या या पहिल्या भेटीच्या शेवटी महाराजांनी रितीरिवाजानुसार बाबासाहेबांना जरीपटक्याचा आहेर केला आणि त्यांची शहरातून मिरवणूक काढली.
यावेळी बाबासाहेबांनी ‘छत्रपतींनी दिलेला मानाचा जरीपटका माझ्या मस्तकी चढविला त्याचा सदैव मान राखीन…,’ असे भावोद्गार काढले. बाबासाहेबांच्या या पहिल्या भेटीतच त्यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध घट्ट बांधले गेले. ते आयुष्याच्या अखेरपर्यंत राहिले.
ऐतिहासिक माणगाव परिषद हा राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील ऋणानुबंधांचा महत्त्वाचा धागा आहे. दोन महान व्यक्तिमत्त्वे परस्परांचा किती आदर करतात आणि किती जिव्हाळ्याचे नाते जपतात हे तिथूनच दिसून आले. राजर्षी शाहू महाराजांनी समग्र दलित समाजाला, डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हेच तुमचे खरे नेते असल्याची जाणीव माणगाव परिषदेच्या माध्यमातूनच करून दिली.
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध अवघे तीन-साडेतीन वर्षांचे आहेत. कारण दोघांचा परिचय झाल्यानंतर शाहू महाराजांना अधिक आयुष्य लाभले नाही. शाहू महाराजांचे देहावसान १९२२ मध्ये झाले. बाबासाहेब त्यानंतरही अनेक वर्षे जगले, परंतु त्यांच्या त्या प्रवासामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्याप्रती कृतज्ञता ओतप्रोत भरली आहे. शाहू महाराजांच्या नंतरही बाबासाहेबांचे कोल्हापूर संस्थानशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले.
राजाराम महाराजांनी पन्हाळ्यावर दिली जागा
बाबासाहेब कोर्टाचे काम किंवा इतर कामानिमित्त कोल्हापूरला आले की त्यांची पन्हाळ्याची भेट हमखास ठरलेली असे. पन्हाळ्यातील वातावरण त्यांना खूपच आवडे. छत्रपती राजाराम महाराजांनी ही बाब माहीत होती. बाबासाहेब आपल्या संस्थानात वारंवार यावेत आणि त्यांचे वास्तव्य आपल्या नगरीत असावे, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना पन्हाळ्यावर जागाही दिली. त्यात विहीर खोदावी असा विचार बाबासाहेबांच्या मनात आला. काम सुरू केले. पण पाणी लागले नाही. त्यामुळे खोदाईचे काम थांबवण्यात आले.
कोल्हापुरातून लोकसभा लढवण्याची इच्छा
महानिर्वाणाआधी चार दिवस कोल्हापूरचे शामराव जाधव यांना नवी दिल्लीहून लिहिलेल्या पत्रात त्यांनी कोल्हापूरची लोकसभा सर्वसाधारण जागेवरून लढवण्याची इच्छा आणि तयारी केली होती. शामराव जाधव यांनी राखीव जागेवरून निवडणूक लढवावी, असे या पत्रांत त्यांनी म्हटले होते. मात्र सहा डिसेंबर १९५६ ला त्यांचे महानिर्वाण झाले. म्हणजे अखेरच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांचा कोल्हापूरशी जिव्हाळा होता, असे लक्षात येते.
बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात बिंदू चौकात उभारण्यात आला. शाहू विचारांचे कट्टर अनुयायी भाई माधवराव बागल यांनी तो उभारला आहे.
कोल्हापूरचे विद्यमान खासदार शाहू छत्रपती यांनी सरन्यायधीशांचे कोल्हापुरात आगमनप्रसंगी स्वागत केले. त्यावेळी सरन्यायधीशांनी आत्मीयतेने आणि प्रेमाने त्या स्वागताचा स्वीकार केला, महाराजांप्रती आदर व्यक्त केला. ते पाहिल्यानंतर त्यांच्या कोल्हापूरप्रती असलेल्या भावनांची कल्पना येते.
कोल्हापूरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होत असताना या आठवणी विशेष महत्वाच्या आहेत. खंडपीठासाठीचा लढा चाळीस वर्षांचा आहे. अनेक सरन्यायाधीश, राज्यकर्ते आले नि गेले. परंतु सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यावर मोहोर उमटवली. त्यांच्याच हस्ते उद्घाटन होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सच्च्या अनुयायाने राजर्षी शाहू महाराजांना कृतज्ञतेने दिलेली ही कृतिशील मानवंदना म्हणावे लागेल. मोठ्या राजकीय निर्णयांना काही सामाजिक संदर्भही असतात. केवळ आपल्या नेत्यांचे फोटो लावून पोस्टरबाजी करून श्रेयवादाचे राजकारण करणाऱ्यांना त्याची कल्पना येणार नाही.
विजय चोरमारे