झाडूवाली चा पोर
कथा
झाडूवाली चा पोर
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15/04/2025 : मी बदलीने एका गावी ऑफिसात रुजू झालेलो आहे. ऑफिसच्या समोर मोठा डांबरी रोड आहे. त्यावर सतत वाहनांची ये जा वर्दळ आहे. ऑफिसात मला हजर होऊन तीन ते चार दिवसाचा कालावधी झालेला असावा. ऑफिसात लिखाणाचे काम करीत असताना पेनमधील रिफील संपली. त्यामुळे मी त्या रोडच्या पलीकडे असलेल्या वस्तीमधील दुकानातून रिफील आणण्यासाठी रोड ओलांडून जात होतो. समोरील वस्ती ही गरीब लोकांची झोपडपट्टीची होती. बहुधा सर्व मोलमजुरी कामकरी वर्गाची वस्ती होती. पहिल्या समोरच्या छोट्याशा दुकानात पेनची निळ्या शाईची रिफील मागितली. पण दुकानदार म्हणाला, “साहेब आमच्याकडे पेनची रिफील नाही.”
मी म्हणालो, “मग रिफील कुठे मिळेल?” त्यावर दुकानदार म्हणाला, “असेच थोडेसे पुढे जावा. दुकान दिसेल. तिथे नक्कीच मिळेल.” मी आतील झोपडपट्टीतील दुकानाकडे निघालो. माझ्या जवळच किंचितसे मागे, एक मध्यमवयीन स्त्री हातात झाडू म्हणजे कडू गवताचा झुडपाचा केलेला खराटा घेऊन चालत आहे. तिच्या अंगावर मळकट पांढरट असा रंग असावा साडीचा. त्याची किनार निळी असावी. पण मळून ती मातकट होऊन काळसर किनार वाटते आहे. ती झाडू घेतलेली स्त्री आतील दुकानापर्यंत येते आणि बाजूच्या एका घराच्या समोरील बाजूस भिंतीला टेकून झाडू बाजूला ठेवून बसते आणि आवाज देते,
“अगं ये बाळे कुठे हायेस? मी आले गं.” बाजूच्या झोपडीतून अंदाजे आठ ते नऊ वर्षाची मुलगी हातात पाण्याचा तांब्या घेऊन येते आणि झाडूवाल्या बाईच्या हातात देते. झाडूवाली बाई थोडीशी चूळ भरून तोंडावर पाण्याचा हबका मारून तोंड पदराने पुसून घेते. आणि तांब्यातलं पाणी पिऊन संपविते. मुलीचे रडणे चालू असते. “हं हं हं आईऽ मला लई भूक लागली गं. मला खायला काय तरी दे ना गं. भुकेने माझ्या पोटात दुखू लागलंय. आई मला काय तरी दे. लई भुक लागली. हं हं हं. करीत मुलगी रडत” समोर उभी असते.
कर्म माझं मेलीचं. माझ्या मागं भूत होऊन मागे लागलात. सारखं
खायला पाहिजे म्हणतावं. कुठून आणून खाऊ घालू तुम्हास्नी.” असं म्हणत कमरेतील चंची काढत चंचीत शोधून आठ आणे मुलीस ती देते. “जा घिवुन खा जा. काहीतरी.” तेवढ्यात एक मुलगा पळत झाडूवाली जवळ येतो.
“मायो मला बी देना गं. मला बी लई भूक लागलीया.” त्या मुलाच्या अंगावर चिंध्या झालेले फाटकेच मळकट बनियन छिद्राने भरलेले आहे. त्यामुळे सगळं अंग, त्याचे उघडेच असल्यासारखे आहे. हाफ चड्डीची तीच अवस्था आहे. मागे पुढे फाटलेले आहे. त्यामुळे पुढचे व मागचे अवयव अंग, शरीराचा भाग दिसत आहे. डोक्यावरचे केस मळकट विखुरलेले आहे. अंगावर कपडे असूनही नसल्यासारखेच आहे. ढुंगण व पुढची बाजू उघडीच आहे. मुलाचे वय अंदाजे दहा ते अकरा वर्षाचे असेल. अशा अवस्थेत मुलगा झाडूवाली बाईजवळ उभा आहे आणि तोही रडतो आहे.
“आई मला भूक लागलीय. नुसतं पाणी पिऊनच बसलो आहे. आयो कितीदा पाणी पिऊन तसंच बसू, आयो लई जोरात भूक लागलीया आयो दे ना काही तरी खायाला.” त्याचे ते बोलणे ऐकून, पाहून माझे हृदय पिळवटून दुःख आतले आत मुसमुसते आहे. भुकेची तडफड काय असते ते भाकरीविना म्हणा किंवा अन्नाविना तडफडणाऱ्यासच कळते. झाडूवाली ओरडत म्हणाली, “अरे हयवाना, मेल्या मुडद्या राक्षसा नुसतं खायलाच मागतो. कुठून देऊ तुला? काळ पैदा झालात, माझ्या मागं ह्यो लचांड ठिवून गेलाय त्यो कसं पोसू, ह्या हयवानला? माझा जीव खायला लागलेत. रगत पियाला लागलेत माझं भूतं होऊन.” असे म्हणून डोळ्याला पदर लावून मुसमुसते.
“मलाही भूक लागलीय मी काय करू ? झाडू मारून आल्या आल्या एक तांब्या पाणी ढोसून बसलीय नव्हं ? तू पण पाणी पिवून बस. कुठून खायला आणून घालू तुमच्या भडकुळीला?” म्हणून झाडूवाली पुन्हा डोळ्याला पदर लावून मुसमुसत रडू लागली. “तुझा बा दारू पिऊन पिऊन कर्ज करून मेला. त्याच्या कर्जाच्या व्याजातच माझं झाडूकामाचा पगार जातुया. सावकार दर पगारीला येऊन पैसे हिसकावून घेऊन जातात, कर्जापायी कर्ज नसतं तर, थोडं तरी पोटाला मिळालं असतं. काय करू तरी काय, मी तुम्हाला पोताया ? आणि परत पुन्हा त्यात तुमची शाळा, शिकवाया पैसा लागतंय. जावा कुठतरी जाऊन भीक तरी मागून खावा. नाहीतर कुठतरी जावून जीव तरी द्या. माझ्या
मागचं झंजट तरी सुटेल. मलाबी मरायला मार्ग मोकळा होईल. तुम्ही मेलात तर मी तरी कुणासाठी जगू. मी पण मरून जाते. नको असलं दळभद्री जगणं.”
मुलगा पुन्हा ओरडतो, “आयो मी शाळेला जाणार नाय बघ.” “कां रे मुडद्या? शाळा सोडून घुळीवाणी नुसता खेळत हुंदडणार हायस का? तुझं मढं बसवलं.” म्हणून एक दगड मुलाला मारते. दगड चुकवितो. बाजूला होतो. तो दगड माझ्या पायाजवळ येऊन थांबतो. मी म्हणालो, “अहो ताई कशाला मारताय मुलाला ? दगड दुसऱ्यांना लागेल ना?”
झाडूवाली बाई म्हणाली, “अवं सायब तसं नाय हो. हा सारखा सतावतोय. खायला मागतो. शाळेच्या नावानं पैसा मागत असतो.”
“कुठून दिवु ह्याला सारखं पैसे. कसली शाळा शिकतोय ? आणि शाळंवाले मास्तर, शिकवायचं काम करतात की, शिकवण्याचं निमित्तानं शाळा शिकणाऱ्या मुलांकडून सारखे पैसे मागतात. कळत नाय बघा असले कसलं हाय, ह्यो शाळा शिकणं, शिकवणं. मला तर बाई शाळा शिकवणं नकोसं वाटू लागलंया बघा.”
मुलगा म्हणाला, “तसं नाय आयो. शाळेत दहा रुपये भरायची हायत. दहा रुपये दिले तरच मी शाळेत जाईन. मास्तरानं मागितलय. गृहपाठाच्या वहीसाठी हवंय. नाहीतर मार खावं लागणार त्यापेक्षा शाळेत नाही गेलेलं बरं. पैसाबी वाचंल आणि मला मार खावं लागणार नाय.”
मी म्हणालो, “अहो ताई असं करू नका. शिकवा भरपूर मुलाला. शाळा
शिकून सायब झाल्यावर तुमची गरिबी हटंल. त्याला नोकरी. लागल्यावर
तुम्ही आरामात बसून खाचाला की.” असे म्हणत त्या मुलाला जवळ घेत
त्याच्याजवळच कटड्यावर उभ्या उभ्याच टेकलो. मुलगा जणू नागडाच होता.
अंगावर फाटक्या कुजक्या मळक्या चिंद्या, नावालाच कपडे अंगावर होते.
अंगावर कपडे असूनही नसल्यागतच होते. झाडूवालींने चंचीतील तंबाकू हातावर
मळून थापटून तोंडात चिमूट कोंबली. पचकन बाजूला थुकून म्हणाली,
“अहो सायब दहा रुपये दे म्हणतो. सारखा पैसा मागतोय शाळेच्या नावानं. शाळा काय सारखं पैसे मागण्याचं काम करतंय कां सायब?” मी म्हणालो, “लागतंय ताई. काहीतरी कारण असते. कारणाशिवाय शाळा मास्तर
पैसा मागत नसत्यात. मागेल तस पुरवठा करावाच लागतंय.”
झाडूवाली म्हणाली, “कुठून शिकवू ह्यांना शाळा. पोट भागीना आणि यांना कुठं शिकवत बसू ? अन् कुठून शाळेला पैसा पुरवठा कर वैताग आणलाय पोरांनी.”
“हो बघा सायब माझ्या चंचीत पैसे हायत का बघा.” म्हणत चंची पालथी घातली. त्यातून तंबाकूचा चुरा आठ आण्याचा नाणे आणि बारीक सुपारीचा चुरा खाली जमिनीवर पडला. मग मी माझ्या खिशातून दहाची नोट काढून मुलाच्या हातात दिली. मुलगा दहाची नोट घेत माझ्याकडे पाहू लागला.
मी म्हणालो, “शाळेत भरायचे आहेत ना ? जा भर जा. शाळेला रोज जा.” मुलाच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर चमकू लागली.
“बर सायबं जातो मी शाळेला. माझ्या अंगावर फाटके कपडे असले तरी असाच मी शाळेत जाईल. मी शिकेन शाळा शाळा शिकून मी पण सायब होईन तुमच्या सारखा.” म्हणत मुलगा शाळेचे फाटके दप्तर घेत, तशा अवस्थेतच शाळेला गेला.
त्या मुलाच्या पाठमोरी आकृतीकडे पाहत मी माझ्या बालपणात शिरलो. मीही अशाच अवस्थेत शाळेला जात होतो. माझीही अवस्था ह्या मुलाप्रमाणेच होती. अन्नासाठी, भाकरीसाठी भीक मागून पोट भरत होतो. माझे. बालपण ह्या मुलामुळेच आठवलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी झाडूवाल्या ताईस म्हणालो,
“ताई मीही लहानपणी तुमच्या मुलाप्रमाणे शाळा शिकलो. शाळा शिकल्यावर परिस्थितीत बदल होतो. मुलांना शाळा शिकवा, हे घ्या दहा रुपये असू द्या. म्हणून दिले. गरिबी फार वाईट असते ताई. असे म्हणत अश्रू ढाळत हुंदके देत ऑफिसकडे निघालो. ऑफिसात जाऊन खुर्चीत बसलो. डोळ्यातून धारा वाहत होत्या. माझं बालपणाचं चित्र डोळ्यासमोर ताजं होतं. भाकरीसाठी तळमळणारा. माझी बालपणीची आठवण ताजा झाली. डोळ्यातून अश्रू ओघळत होता. मी सुखात असतानाही गरिबीचे चटके बसत असल्याची जाणीव झाली.
झाडूवाली त्यांचे दारिद्र्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून जाता जाईना.
तेवढ्यात ऑफिसातला सहकारी शिपाई माझ्या भोवती उभारून रडण्यांच कारण विचारू लागला.
“घरी काय झालं आहे का ? तुम्हाला कशाचं शारीरिक त्रास होतोय का?” मी भानावर आलो. माझं मला कसं तरी वाटलं, डोळे पुसलो. शिपाई ग्लासात पाणी आणून दिला. मी पाण्याचा हबका चेहऱ्यावर मारून रुमालानं पुसलं. थोडं पाणी पिलो. म्हणालो, “मित्रांनो, काही नाही, झाडूवालीच्या पोराच्या कुटुंबातील गरिबीची व्यथा पाहिलो. माझे बालपणातील गरिबीची चटके, वेदना ताजी झाली. आठवणीने अश्रू आवरणे कठीण झाले. आज मी सुखात आहे. दारिद्र्याने बालपणी भाकरी, शिक्षण, कपडे व्यवस्थित नसताना भोगलेले हाल ताज झालं. झाडूवालीचे पोरं पाहून दुःखाचा माझे आवेग आवरता आला नाही.’
सहकारी मित्र म्हणाला, “न्नागनाथ गायकवाड रावसाहेब तुम्ही रडत असल्यानं आम्ही फारच घाबरलो. तुम्हाला काय होतंय का म्हणून ? सगळेजण तुम्हाला दवाखान्यात नेण्याच्या तयारीनं आलोत. बरं झालं तसं काही पाहिलं की दुःख अनावर होतं. अशी वेळ कुणावर येऊच नये असंच वाटतं.” सहकारी म्हणाला, “चला चहा घेवूयात.” मी म्हणालो, “ऑफिसातल्या सगळ्यांना चहा द्या.” मी चहा पाजतो. शिपायाने चहा केटलीत आणून सगळ्यांना चहा दिला. सायंकाळी घरी गेलो. डोळ्यासमोरून झाडूवालीच पोर ते दारिद्र्याचं केविलवाणं दृश्य जाईना. रात्रभर झोप आलंच नाही. कधी सकाळ होईल, असे वाटू लागले.
दिवस उजडू लागताच मीही लवकरच उठून अंघोळ उरकून नाष्टा करून कामाला निघालो. जाता जाता गावात दुकानातून मुलास युनिफॉर्म घेतला. दप्तर घेतला. झाडूवालीचं पोर शाळेला जाण्याअगोदर झोपडपट्टीतील त्यांचे झोपडीजवळ पोहोचलो. मुलगा शाळेला जाण्याच्या तयारीत होता. मुलाला युनिफॉर्म घालण्यास सांगितलं. मुलगा आनंदानं हसत युनिफार्म घातला. नवीन दप्तरात वह्या पुस्तकं भरला. म्हणाला, “सायब जातो मी शाळेला उशीर झालंय.” मी म्हणालो, “बरं रोज वेळेवर शाळेला जात जा. वह्या पुस्तक की काय लागलं तर मला सांगायचं, अजिबात लाजायचं नाही, संकोच करायचं नाही बरका. झाडूवालीचा पोर म्हणाला, होय साहेब, जातो मी आता शाळेला.” मी बाय
बाय केला. ऑफिसला गेलो. गरजवंताला मदत केल्याचं एक समाधान मनाला झाल. त्या समाधानाचं भावछटा मुखावर तरळत असाव, पाहून सहकारी म्हणाला, “रावसाहेब काल तुम्ही रडत होता. आज आनंदी दिसता. आनंदाचं का कारण आम्हाला समजेल का?” मी किंचीतसा हसून म्हणालो, “भाऊसाहेब तुम्ही विचारला म्हणून सांगतो. काल झाडूवालीच्या पोराची गरिबीचे हाल पाहून तुम्हळलो, रडलो होतो. आज झाडूवालीच्या पोराला एक नवीन यूनिफार्म आणि नवीन दप्तर देऊन असाच ऑफिसला आलो. मदत केल्याचे हे एक समाधानाचा आनंद वाटतं. हे समाधान तात्पुरतं आहे. पुढचं शिक्षण तो कसं पूर्ण करणार? याचीच काळजी मनाला सतावत आहे. बदली झालं की, कुठल्यातरी गावी मी दूरवर जाणार, पुढे त्यांना कोण मदत करणार? मी येथे असेपर्यंत जमेल तेवढे मदत करू शकेन. शासन सर्व विद्यार्थ्यांकरिता जेवण, निवास शिक्षणाची सोय केली तर शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सगळ्याच मुलामुलींची सोय होईल. बहुसंख्यं विद्यार्थी शिक्षणाने सुशिक्षित बुद्धिमान होऊन तंत्रज्ञान क्षेत्रात जगात भरारी घेतील, देशाच नावलौकिकात वाढ होईल वाटतं.” este
सहकारी म्हणाला, “सरकार असं करायला पाहिजेना. असं केले तर शिक्षण
घेण्यात अडचण भासणार नाही. ही अशक्य गोष्ट आहे.” मी म्हणालो, “सरकार अशी सोय केली तर भारतातील मुलं जगात आपल्या देशाचं नावलौकिक वाढी बरोबर परदेशी चलन वाढवतील. श्रीमंत राष्ट्राच्या रांगेत भारतदेश नंबर एकवर असेल. ही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकेल.” “पण तसं होणार नाहीच. त्यापेक्षा आपणच जमेल तसे गरिबांना मदत करू लागलो तर, त्याचे आयुष्य सुखदायी होईल.” सहकारी म्हणाला, अगदी बरोबर बोललात साहेब आपण. “म्हणून तर मी वैयक्तिकरित्या जमेल तसं मदत
करत असतो. मदत केल्याचा समाधान मिळतो. छोट्याशा मदतीनं झाडूवालीचं
पोरांच आयुष्य सुखात होईल. शाळा शिकून तोही पुढे कदाचित साहेब होईल.
त्याच्या कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावण्यास माझा खारीचा वाटा महत्त्वाचा असू
शकेल.”
सहकारी म्हणाले, “साहेब, तुमच्यासारखं सगळ्यांना जमत नाही. फार मोठ्या मनाचे आणि मोठ्या उदार अंतःकरणाचे मानवतावादी विचारसणीचे माणसं लागतात.”
मी म्हणालो, “आपल्यासारखे उच्च व मध्यमवर्गीयांनी गरिबांना मदत केली तर, देशात एकाही गरिबाला दारिद्र्याला होरपळावं लागणार नाही. तेव्हाच संविधानिक समता बंधुतेचा पाया मजबूत होईल नाही का?”
सहकारी म्हणाला, “साहेब तुमचं अगदी बरोबर आहे हो, मोठ्या मनाचे फार कमी माणसं आहेत. तुमच्यासारखं जमणार नाही. सरकारी पगारात कुटुंबाचा खर्च सांभाळून गरिबांना मदत करणे अशक्य आहे. आपल्या कुटुंबाचा खर्च पगारात भागत नाही.”
मी म्हणालो, “बालपणातील दारिद्र्याने भयानक होरपळलो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या मानवतेच्या विचारामुळे त्यांचं आदर्श घेऊन काही प्रमाणात घडलो. बाबासाहेबांनी माणूस म्हणून जगण्याचं हक्क अधिकार दिले. महामानवाच्या विचारांच्या प्रेरणेने, माझ्याप्रमाणे शिक्षणासाठी चटके सोसणाऱ्याना छोटासा मदत करण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येकानं मानवतेच्या भावनेतून शक्य असेल तेवढी गरिबांना मदत करावी, असे माझे मत आहे, मदत करा म्हणून कुणावरही बळजबरी करता येत नाही, ज्याची त्याची मर्जी आहे, ठीक आहे चला आता ऑफिसची वेळ संपली भेटू उद्या. सहकारी म्हणाला, चला भेटूया आता उद्या.”
सायंकाळ झाली ऑफिसची वेळ संपली. सर्व सहकारी आपापल्या घरी निघाले. मानवतावादी विचाराने मदत केल्याच्या समाधानाने घरी गेलो. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा प्रतिमेकडं सहज लक्ष गेलं. बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या चेहऱ्यावर तेज जाणवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवांची प्रतिमा हसरी पाहून बाबासाहेबांच्या मानवतावादी विचाराने भारावून गेलो. मुलास मदत केल्याचा आनंद तनामनात ओसंडून वाहत होता. सायंकाळी रात्रीचं जेवण झाल्यानंतर लगेच झोपेची डुलकी आली. समाधानानं गाढ झोप लागली. सकाळी आनंदाने उठून कामाला जाण्याची तयारी करू लागलो. शिक्षण घेऊन नोकरी मिळवल्याने हे मानवतावादी विचाराने मदत करणे शक्य झाले. सर्व श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचे आहेत. कामाला जाताना बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन करून कामास निघालो….
लेखक
नागनाथ गायकवाड ,सोलापूर
भैरू वस्ती, लिमयेवाडी सोलापूर.
413001.
Mobile number
9850280836