“शहीद दिन”

“शहीद दिन”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/03/2025 :
सहज मनात प्रश्न उभा राहीला,खरचं व्यक्तीला सगळ्यात जास्त प्रिय काय असावं बरं ?, ह्या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळालीत.पण त्यातल्या त्यात एका उत्तराने जरा ह्या प्रश्नाचं जास्त समाधान केलं.व्यक्तीला स्वतःचा लाखमोलाचा जीव म्हणजेच स्वतःचा प्राण हा जास्त प्रिय असतो.तो राखायचा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत पोटतिडकीने प्रयत्न करतो. खरोखरच मानवी जीवनच अनमोल आहे जीव सगळ्यात प्यारा.
आपल्या आवडीच्या गोष्टीचा त्याग करणचं मुळी एक अवघड काम , मग हे अवघड काम जर कुणी हसतहसत स्विकारीत असेल वा त्याला हसतमुखाने सामोरा जात असेल तर आपण अशा व्यक्तींपुढे आपोआप नतमस्तक होऊ. अशा स्वात़ंत्र्यलढ्यातील तीन सिंहाचा आज स्मृतिदिन. आजचाच दिवस “शहीद दिन” म्हणून ओळखल्या जातो.
23 मार्च 1931 रोजी भारताच्या स्वात़ंत्र्यलढ्यातील तीन सुपुत्रांना फाशीवर चढविल्या गेले,नव्हे ते तीनही जिगरबाज भारतमातेचे सुपूत्र स्वतः आपल्या केलेल्या कृत्याचा अभिमान बाळगत फाशीचा दोर ही जणू पुष्पमाला असल्यागत तिच्याकडे हसतमुखाने सामोरे गेलेत. हे तीनही सुपूत्र म्हणजे जणू स्वातंत्र्यलढ्यातील त्रिमूर्ती दत्तचं. फक्त शरीर वेगवेगळं बाकी उद्देश,विचार,कृती, कार्य हे एकच. हे तीन भारताचे सुपुत्र म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू.
स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला स्वातंत्र्याच महत्त्व तितकसं नीट कळतचं नाही कारण त्यांनी पारतंत्र्याच्या झळा ह्या मुळी सहनच केल्या नसतात. कुठलीही गोष्ट आयती अलगद विनासायास हातात पडली तर तीचं महत्त्व हे मुळापासून आपल्याला नीटस नाही उमगत परंतु आपला देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणतांना ज्या सगळ्या भारतमातेच्या सुपुत्रांनी आपल्या घरादारासकट सुखचैनीची जी होळी केली तिच्यापुढे खरोखरच नतमस्तक व्हायला होतं.
२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली. क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांनी 1928 मध्ये लाहोरमधील ब्रिटिश ज्युनिअर पोलीस अधिकारी जॉन साँडर्स याची बंदुकीची गोळी घालून हत्या केली होती. या खटल्याच्या सुनवाणीसाठी तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी विशेष ट्रायब्युनल तयार केलं होतं. त्याच ट्रायब्युनलने या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण या क्रांतिकारकांच्या कृत्यामुळे संपूर्ण देशात ब्रिटिशांविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. डिसेंबर १९२८ मध्ये, भगतसिंग आणि त्याचे सहकारी, शिवराम राजगुरू यांनी २१ वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन साँडर्सला लाहोर येथे गोळ्या घालून ठार मारले. जेम्स स्कॉट ह्यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून साँडर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट याने हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय ह्यांच्यावर लाठी चार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय दोन आठवड्यांनंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरी राजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व राजगुरू यांचा शोध घेत होते.ह्या तिघांनी आपले जीवन देश स्वतंत्र करण्याच्या सर्वोत्कृष्ट कामासाठी समर्पित केले होते.
“देशाचे स्वातंत्र्य हे माझे ध्येय आहे. त्यामुळे, कोणताच आराम किंवा कोणतेच भौतिक सुख माझे आमि़ष असू शकत नाही'” असे ठासून विधान ह्यांच्यासारखे देशप्रेमीच करु शकतात.आज त्यांच्या ह्या देशप्रेमापुढे दिलेल्या आहुतीसमोर नतमस्तक होऊन त्यांना त्रिवार वंदन.
सौ.कल्याणी बापट (केळकर)
9604947256
बडनेरा, अमरावती