स्वप्ने पेरणारा देवमाणूस – जयसिंह मोहिते पाटील

स्वप्ने पेरणारा देवमाणूस – जयसिंह मोहिते पाटील
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 30/11/2023 :
जबरदस्त इच्छाशक्ती, त्या इच्छाशक्ती मधून निर्माण होणारी प्रचंड महत्वकांक्षा! ती स्वप्नवत महत्त्वकांक्षा सत्यसृष्टीत आणण्याचा त्यांचा आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासाच्या जोडीला असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा! या प्रयत्नांच्या सोबतीला सामान्यांबद्दल संवेदनशील मन आणि सहानुभूतीयुक्त अंत:करण आणि त्यागमय सेवेची जोड मिळाली, की त्या सामान्य माणसामधूनच असामान्य माणसे उभी राहतात त्यातीलच एक नाव म्हणजे जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा. विचार आणि कार्य या दोन्ही माध्यमातून व्यक्त होणारे बहुपरिचीत व्यक्तीमत्व. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक व सांस्कृतिक क्षेत्राची आवड, अगत्य आणि अस्था असणाऱ्यांना जयसिंह मोहिते पाटील यांचा चांगलाच परिचय आहे. दादांनी स्वतःला घडवत अनेकांना घडवले. हजारो लोकांच्या मनात स्वप्न पेरून आस्तित्वात उतरवणारा हा देवमाणूस.
“रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” असे संत श्रेष्ठ तुकारामांनी काढलेले उद्गार बाळदादांना यथार्थपणे लागू पडतात. नवनिर्मितीच्या कार्यात आपल्या सर्व शक्ती ओतणाऱ्या प्रत्येक ध्येयवाद्याला संघर्ष करावा लागतो. जुन्या वाटा मोडायच्या आणि नवे मार्ग शोधून काढायचे, तर पारंपारिक तटबंदी मोडून काढल्याशिवाय नव्याचा शोध लागत नाही. बाळदादा म्हणजे सोलापुर जिल्ह्याचा अक्षांश रेखांश माहित असणारं चालत बोलत गुगलच. अफाट वाचन, स्मरणशक्ती, जनसंपर्क, प्रबळ इच्छा शक्ती, संयम असलेलं एक दिलखुलास व्यक्तिमत्व. कामातले सातत्य, ऊर्जा आणि नाविण्य अनुकरणीय आहे. ही व्यक्ती शब्दांच्या पलीकडची आहे, कल्पनेच्या कक्षेत बसु शकत नाहीत. कामातील बदल हाच खरा आराम या तत्वानुसार बाळदादा नेहमी नवनवीन ठिकाणी जाऊन निरनिराळी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. जे आपल्याकडे करणे शक्य आहे असे तंत्रज्ञान त्यांच्या नजरेतुन सुटत नाही मग ते शैक्षणिक, शेती, क्रीडा व सहकाराच्या असो किंवा पर्यटन क्षेत्राच्या बाबती असो. सतत काहीतरी नवीन करण्याचा संकल्प दादांचा असतो. असे संकल्प, कल्पना सत्यात उतरवण्याची ताकद होती आणि ती आम्ही याची देही याची डोळा, ऐसी देखिले सोहळे….. आपल्या मायभूमीच्या शिरपेचात आनंदयात्रा व महालेझीम विश्वविक्रमाचा तुरा रोवला, गौरव मराठी मातीचा, गौरव भारतीय लोककलेचा, छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, रयतेचा राजा राजा शिवछत्रपती महानाट्य, दिल्ली धरतीवर आधारित प्रजासत्ताक दिन सोहळा. असे काय काय सांगू ते कमीच आहे. आमचे परम भाग्य की आम्ही माळशिरस तालुक्यात जन्माला आलो.
राम लक्ष्मणानंतर बंधू प्रेम शिकावे व महाराष्ट्रात सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत फक्त बाळदादांनीच. असे उद्गार हजारो लोकांचे आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराचा आधार घेऊन अकलूज पर्यटन क्षेत्र बनविले. त्यामध्ये भुईकोट किल्ल्यातील शिवसृष्टी, आनंदी गणेश, अकलाई देवी मंदिर, सयाजीराजे वाॅटर पार्क, शिवामृत बाग, यशवंतनगर येथील महादेवाचे मंदीर अशा अनेक गोष्टी एका दिवसात पर्यटकांना पाहता येत नाहीत. उत्कट समाज जाणीव असलेला, जिवंत मनाचा मानवप्रेमी मनुष्य हाताशी फारसे साधने किंवा सत्ता नसताना आपल्या आंतरिक सामर्थ्याने परिवर्तनाचे, नवरचनेचे कार्य कसे जोमदारपणे करू शकतो याचे हे एक असमान्य दर्शन आहे. रात्रंदिन झगडत राहण्याची रग असलेली व्यक्तीच नवी स्वप्ने पाहू शकते व ती स्वप्ने साकार करू शकते. बाळदादांचे कार्य म्हणजे “अवधियांपुते वोसांडले पात्र” असेच संत तुकारामांच्या शब्दात म्हटले पाहिजे. समाजकार्य करत असताना त्याला अध्यात्माची जोड देऊन विकास केला. राजकारण, शैक्षणिक कार्यात त्यांनी कधीच जातिभेद केला नाही. नेहमी बहुजनांना सोबत घेऊन अस्पृश्यतेचे निर्मूलन, मानवी समता व बंधुभाव निर्माण केला.
मेडिकल मध्ये गेल्यावर प्रत्येक दुखण्यावर औषध जसे दिसते तसे माळशिरस तालुक्यातील प्रत्येक समस्या, अडचणीवर उपाय म्हणून बाळदादा दिसतात. बाळदादांमध्ये एक चित्रकार ही लपलेला आहे. त्यांनी काढलेली चित्र म्हणजे शब्द नसलेली बोलकी कविताच असते. हजारो शब्दांचे चित्र जणू रसिकांच्या मनात रुंजी घालत असते. प्रत्येक कलाकृती ही एक अद्वितीय स्वभावाचा अद्वितीय परिणाम असतो. महाराष्ट्रातील राजकारणात मोहिते- पाटील परिवाराची जादू आजही कायम आहे. सहकाराच्या माध्यमातून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी केलेले काम महाराष्ट्रात आदर्श ठरलेले आहे. त्यांचाच वारसा बाळदादा जपताहेत. सहकार, समाजकारण, माय मातीतल्या कला, खेळ, परंपरा जपल्या पाहिजेत, जोपासल्या पाहिजेत त्या टिकल्या पाहिजेत यासाठी ते मनोन्मनी कार्यरत आहेत. लेझिम, लावणी पासुन ते आट्यापाट्यापर्यतच्या स्पर्धा आयोजित करून माय पंढरीचं ऋण फोडणाऱ्या, लाखो लोकांच्या मनात स्वप्न पेरून प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी मदत करणाऱ्या जाणत्या राज्यास मानाचा मुजरा करून त्यांच्या अमृतमहोत्सवी वाटचालीस व वाढदिवसाच्या अनंत अनंत शुभेच्छा……
प्रा. तात्यासाहेब शिवाजी काटकर, अकलूज
9226144836
(लेखक करिअर समुपदेशक असून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक, सामाजिक विषयावर लेखन करतात)