ताज्या घडामोडी

सनातन धर्म

सनातन धर्म

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
दिनांक 29/01/2025 : आज विधानसभेमध्ये लोकांच्या ह्रदयात काय आहे ते स्पष्टपणाने बाहेर आले. माझे भाषण सुरु असतांना सनातन धर्माला आम्ही स्विकारणार नाही त्याला कायम विरोध करणार, असे बोलताच भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी सनातन धर्म की जय हो ! या घोषणा द्यायला सुरुवात केली. ह्याचे मला आश्चर्यच वाटले. अनेक सदस्य शाब्दिक रुपांनी माझ्या अंगावर येत होते. मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम होतो की, सनातन धर्म आम्ही स्विकारणार नाही आम्ही टोकाचा विरोध करु.
त्याचे कारण असे की, सनातन धर्माला पहिल्यांदा आव्हान बुद्धांनी दिले व माणूसकीचा –हास होतो म्हणून सनातन धर्म मान्य नाही अशी बुद्धांची त्यानंतर महावीर जैन यांची भूमिका होती. किंबहुना सनातन धर्मातून बाहेर जाऊन बुद्ध धर्माची आणि जैन धर्माची स्थापनाच विद्रोहातून झाली. त्यानंतर बसवेश्वर महाराज आले. त्यांनी देखिल सनातन धर्माला विरोध केला आणि लिंगायत धर्माची स्थापना केली. त्यानंतर चक्रधर स्वामी आले. चक्रधर स्वामींनी साहित्य लिहीत उघडपणाने सनातन धर्माला विरोध केला आणि महानुभव पंथ स्थापन केला. ही सनातन व्यवस्था ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडीलांच्या मृत्यूला जबाबदार ठरली आणि त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना देखील विरोध केला. नंतर आलेल्या संत परंपरेतील सगळ्याच संतांनी सनातन धर्म आणि कर्मकांड ह्यांना विरोध करणारी भूमिका घेतली. सावता माळी असो, चोखामेळा असो, संत गोरा कुंभार, संत तुकाराम असो, संत एकनाथ असो, संत गाडगेबाबा असो, संत तुकडोजी महाराज असो. संत तुकाराम महाराजांचे तर शारीरीक हाल केलेच. पण, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेली, लिहीली गेलेली गाथादेखिल ह्यांनी फाडून फेकून दिली. सनातन्यांनी त्यांचे न भुतो न भविष्यतो हाल केले. त्याचकाळात छत्रपती शिवाजी महाराजांना देखिल छळण्याचे काम सनातन व्यवस्थेने केले. पण, त्या सनातन व्यवस्थेवर मात करीत इथे पहिल्यांदा स्वराज्य धर्म स्थापन करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांना छळण्याचे काम हे औरंगजेबाबरोबर सामिल होऊन सनातनी लोकांनीच केले होते. म्हणूनच् पाच सनातन्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी केले.
काही काळ पेशवेकालीन व्यवस्थेमध्ये सनातन्यांची समाजावरची पकड घट्ट होत गेली आणि अस्पृश्यता अधिक वेगाने पुढे आली. त्यामध्ये बहुजनांचे अनेक हाल झाले. पण, त्यानंतर 1818 च्या पराभवानंतर पेशवाई लोपली व हळुहळु महात्मा जोतिबा फुले ह्यांच्या लिखाणातून त्यांच्या विचारातून सनातन्यांना टोकाचा विरोध होऊ लागला. सनातन धर्मामध्ये स्त्रीयांना स्थानच नव्हतं. कारण, मनूच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रीया ह्या वासनेने वकवकलेल्या असतात. त्या उपभोगाच्या वस्तू असतात आणि स्त्रियांना कुठल्याही प्रकारे समाजव्यवस्थेमध्ये स्थान नाही. त्याविरोधात महात्मा फुले यांनी भूमिका घेतली. शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. स्त्री शिकली तर घर शिकेल ह्या भूमिकेतून त्यांनी समाजात विद्रोह केला. स्वत:च्या पत्नीलाच स्त्री शिक्षणासाठी बाहेर काढले. “फुले दाम्पत्याला मारण्याचा कट देखिल झाला”. त्यांच्यावर अनेक हल्ले झाले. पण, स्वत: त्यांनी कधिही हार मानली नाही. ते मागे हटले नाहीत आणि आज देशात ज्या शिकलेल्या स्त्रीया दिसत आहेत; त्या कुठल्याही जाती धर्माच्या असो, त्याचे एकमेव कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.
त्यानंतर ज्योतिबा फुले यांचेच व्रत पुढे घेत शोषितांना पहिल्यांदा आरक्षणाची व्यवस्था देऊन त्यांना बरोबरीने आणले पाहिजे हे जगातील पहिले आरक्षणाचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यांनी देखिल सनातनी व्यवस्थेला तीव्र विरोध केला. छत्रपती शाहू महाराजांना मारण्याचे काम देखिल सनातन्यांनी केले. पण, हे सगळं घडत असतांना अनेक ब्राम्हण्यवादाच्या विरोधात असलेल्या ब्राम्हणांनी छत्रपती शाहू महाराजांना साथ दिली हे महत्वाचे आहे. त्याचदरम्यान गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले ह्यांनी सनातन व्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्यास सुरुवात केली. तर, सनातन्यांनी आगरकरांना मारण्याची सुपारीच दिली. आगरकरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या काळामध्ये अनेक ब्राम्हण असे होते जे ब्राम्हण्यवादाच्या विरोधात होते व समाजामध्ये जे दुफळी माजवत आहेत हे चुकीचं आहे अशी त्यांची भूमिका होती.
त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी 1920 ते1930 ह्या काळामध्ये मनुस्मृती जाळली.
महाडच्या चवदार तळ्यावर पाण्यासाठी आंदोलन केले आणि पाणी सगळ्यांना पिण्यासाठी मोकळं झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. नाशिकला जाऊन त्यांनी काळाराम मंदिरात प्रवेश केला आणि प्रत्येकाला मंदिरात जाण्याचा अधिकार असला पाहिजे अशा प्रकारचे सनातन्यांविरुद्ध अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. सनातन्यांनी त्यांना शाळेत जाऊ दिले नव्हते. याचा प्रचंड राग त्यांच्या मनात होता. हे सगळे ज्याच्यामुळे निर्माण झाला त्या मनुस्मृतीला अग्नी देत पुढची दिशा स्पष्ट केली हे सगळं तसेच शोषितांवर झालेला अन्याय त्यांनी मनामध्ये ठेवून आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थतज्ञ असतांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वकिल असतांना त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या कमाई करण्यापेक्षा समाजासाठी काम करावं ह्या भूमिकेतून ते शोषितांसाठी काम करीत गेले. ते जागतिक अर्थतज्ञ होऊ शकले असते. ते जगविख्यात वकील होऊ शकले असते. पण, ते काही न करता “त्यांनी शोषितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला”. आणि शेवटी ह्या सगळ्या विचारांचा गाभा आपल्याला संविधानात दिसतो. जिथे सनातन धर्माचा अंत झाला. त्या सनातन धर्माच्या बाजूने उभे राहण्याचे काम आज भाजपाचे काही सदस्य करीत होते. दुर्दैवाने मी सनातन धर्माच्या विरुद्ध बोलत असताना, ही सगळी उदाहरणे देत असताना भाजपाचे आमदार राम सातपुते जे मागासवर्गीय आहेत. त्यांनी सनातन धर्म की जय हो! ही घोषणा दिली. त्यावर मी त्यांना फक्त एवढेच म्हणालो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे म्हणून तुम्ही ह्या सभागृहात आला आहात. तुम्ही एकतर सनातनी होऊ शकता किंवा तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जाऊ शकता.
कालच मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक निर्णय देतांना जस्टीस जोसेफ आणि जस्टीस नागरत्न ह्यांनी देशामध्ये वाढलेली धर्मांधता आणि त्यामुळे खराब झालेला देशातील माहोल, समाजव्यवस्था ह्याबद्दल बोलतांना स्पष्टपणाने नमूद केले की, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. निष्कारण नको ते मुद्दे काढून ह्या देशातील माहोल खराब करु नका. तुमच्यामुळे देशामध्ये द्वेष वाढतोय. अशी समज त्यांनी याचिकाकर्त्याला दिली आणि मा. सर्वोच्च न्यायालयाने आपले मतं नोंदवले. त्यामुळे सनातन काय हे न समजलेले उगाचच सनातन धर्म की जय हो ! ह्या घोषणा देत होते. त्यामुळे त्यांचा चेहराच उघडा झाला. त्यानंतर प्रक्षेपण दाखवू नका असा आदेश निघाला. माझं आजही म्हणणं आहे की, प्रक्षेपण दाखवा. लोकांना कळू द्या की, सनातन धर्माच्या बाजूने कोणी घोषणा दिल्या आहेत? हा सनातन धर्म जर राबवायचा असेल तर बहुजनांनो परत एकदा तुमच्या बापजाद्यांचे जे हाल झाले होते, ते परत येणार आहेत. परत एकदा मंदिर बंदी होणार आहे. परत एकदा पाण्यासाठी पाणवठ्यावर जाता येणार नाही. परत एकदा शाळा बंद होणार आहे आणि परत एकदा आपले बापजादे जसे अनाडी राहीले तसचं आपल्या पुढच्या पिढींना रहावं लागेल. तेव्हा आज जर डोळे उघडले नाहीत. तर पुढचा होणारा अंधार ह्याला आपण वाचवू शकतं नाही. तेव्हा आज डोळे उघडा आणि आपला समाज जिवंत ठेवा. जो शिव, शंभू, शाहू, फुले, आंबेडकरांनी निर्माण केला आहे.
वसुधैव कुटुंबकम मानणारा हिंदू धर्म आम्ही मानतो.
मनुवादी सनातन धर्म मुर्दाबाद!

डॉ. जितेंद्र आव्हाड

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button