ताज्या घडामोडी

पचनी न पडणारा अभूतपूर्व निकाल

संपादकीय पान……….

पचनी न पडणारा अभूतपूर्व निकाल

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 24/11/ 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या अगदी विपरीत आणि अनपेक्षित असा निकाल लागला आहे. एका शब्दात सांगायचे म्हटले, तर राज्यात सुमारे अडीच वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या महायुतीची त्सुनामी आली आहे. लोकसभेनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या या निवडणुकीत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांचे झालेले परिवर्तन आश्यर्चकारकच म्हणावे लागेल. पक्षफूट, त्यानंतर न्यायालयाकडून निकाल देण्याबाबत सुरू असलेली चालढकल पाहता उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट अशी अचानकपणे कोठे विरली, हे कळायला मार्ग नाही. शनिवारी (दि. २३) सकाळी टपाली मतमोजणीनंतर जवळपास सर्वच ठिकाणी भाजप उमेदवारांनी घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत टिकून राहिली. हा निकाल म्हणजे, राज्यातील प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वच नाकारणारा ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा स्ट्राइक रेट जपणाऱ्या शरदचंद्र पवार गटाला मिळालेल्या केवळ १० जागा पाहता मतदारांच्या मनाचा ठाव कळेनासा झाला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून ४५ जागादेखील जिंकता आलेल्या नाहीत. मनसेच्या राजकीय मान्यतेवरच या निकालातून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीलाही मतदारांनी वंचित ठेवले. ही सर्व किमया लाडक्या बहिणींची असल्याची चर्चा आता रंगली आहे. मात्र, महिलांच्या ४३ लाख मतांनी एवढे मोठे परिवर्तन खरोखरच घडून आणले का? हादेखील प्रश्न आहे. मतमोजणीनंतर राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होऊन अपक्ष व बंडखोरांशिवाय पर्याय राहणार नाही, असे वाटत असताना, भाजपने पुन्हा सन २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे अभूतपूर्व (?) यश मिळविले आहे. अर्थात, त्यावेळी ‘मोदी लाट’ होती मात्र, यावेळी राजकीय लाट येण्याऐवजी विविध योजनांच्या लाटांनी राज्यातील महायुतीचे सरकार तारले नाही तर पार केले, असे समजावे का, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे.
राज्यातील २०२४ ची विधानसभा निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी होती. दोन प्रादेशिक पक्षांचे विभाजन होऊन राज्यात महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वात आली. दोन प्रमुख राजकीय पक्ष भाजप व काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त सहा प्रादेशिक पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सन २०१९ च्या निवडणुकीनंतर बरोबर आजच्याच दिवशी म्हणजे २३ नाेव्हेंबर रोजी राज्यात न भूतो न भविष्यति असा पहाटेचा शपथविधी राजभवनात घडून आला होता. त्यावेळी राज्यात १०५ जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला होता, पण शिवसेनेने साथ सोडल्याने देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न स्वप्नवतच वाटत होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार गटाला फोडून हा पहाटेचा शपथविधी घडवून आणला होता. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यानंतर जवळपास अडीच वर्षांनी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत हाच प्रयोग शिवसेनेसोबत करत एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी शिवसेनेतून फोडले. त्यानंतर काही महिन्यांनी अजित पवार पुन्हा एकदा आपल्या जुन्या शिलेदारांना घेऊन या युती सरकारमध्ये सामील झाले व राज्यात महायुती सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर कोर्टकचेऱ्या होऊन खरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कोणती, याचा अद्याप न्यायालयीन निकाल लागलेला नाही. मात्र, जनतेच्या न्यायालयात आता खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच व खरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची, अशीच परिस्थिती या निकालाने निर्माण झाली आहे. हा प्रश्न न्यायालयाऐवजी जनतेच्या न्यायालयात निकाली निघाला आहे. एवढा सगळा अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण करून भाजप पुन्हा एकदा राज्यातील सर्वांत मोठा व शक्तिशाली पक्ष बनला आहे. भाजपची राज्यात आता एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे १४० आमदार या निवडणुकीत निवडून आल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत दिलेला ‘मी पुन्हा येईन’चा नारा फडणवीस यांनी २०२४ च्या निवडणुकीत शब्दशः खरा करून दाखवला आहे. महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत त्यांनी घडवून आणलेली राजकीय उलथापालथ बहुतेक (?) मतदारांनी दुर्लक्षित केली, असे समाजावे का? उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बाजूने निवडणूकपूर्व उठलेली सहानुभूतीची लाट अचानक या निवडणुकीतून नाहीशी झाली, असे समजावे का? महायुतीने या निवडणुकीत सहज सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीची गाडी ४५ जागांच्या पुढे जाऊ शकली नाही. शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या ४० पैकी ३५ आमदार पुन्हा निवडून आले आहेत. महाराष्ट्रात विरोधी पक्ष काय, पण विरोधी नेतादेखील कोणाला बनवावे अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. बरं झालं शरद पवार यांनी निवडणुकीआधीच राजकीय संन्यास जाहीर केला. कारण शरद पवार यांना राज्यसभेत जाण्याच्या सर्व वाटा या निवडणुकीने बंद केल्या आहेत. महाविकास आघाडीकडे राज्यसभा खासदार निवडून आणण्याइतपतही संख्याबळ राहिलेले नाही.
एकंदरीत हा निकाल सर्वसामान्य जनतेच्या समजण्यापलीकडे गेला आहे. महाविकास आघाडीच्या सभांना जमणारी मतदारांची गर्दी अशी अचानक ‘बेदर्दी’ कशी ठरावी. हा निकाल म्हणजे देशाची वन नेशन वन पार्टीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल समजावी का? महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या रोहिणी खडसे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पराभव हा जिव्हारी लागणारा आहे. कालपर्यंत अटीतटीची वाटणाऱ्या या निवडणुकीचे दुपार उजडेपर्यंत जवळपास निकाल स्पष्ट झाले होते. ही निवडणूक नेत्यांबरोबरच मतदारांची धाकधूक वाढवेल असे वाटत असताना, सहजपणे पार पडली. निकालाच्या एक दिवस अगोदर दोन्ही आघाड्यांनी अपक्ष व बंडखोरांभोवती फास टाकले होते. मात्र, मतदारांनी या बंडखोरांना व अपक्षांना सत्तेतूनच बाहेर फेकले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजाबरोबरच राजकीय पंडितांचे अंदाज या निवडणुकीने फोल ठरवले आहेत. महायुतीने या निकालाचे श्रेय अपेक्षेप्रमाणे लाडकी बहीण व राबविलेला विविध योजनांना दिले आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला महिला मतदानाचे प्रमाण वाढले होते. लोकसभेला दोन कोटी ६३ लाख ४९ हजार ६६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधानसभेला मात्र तीन कोटी ६ लाख ४९ हजार ३१९ महिलांनी मतदान केले. याचा अर्थ ४३ लाख २५३ महिलांचे मतदान वाढले. दुसरीकडे, पुरुष मतदारदेखील २७ लाख ८० हजार वाढले होते. अनेक मतदारसंघांत अत्यंत अटीतटीच्या लढती झाल्या होत्या. आपण मोठ्या फरकाने जिंकणार, असा दावा करणारे नंतर आपण काही हजारांनी निवडून येऊ, असे मतदानानंतर सांगू लागले होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात हा आकडा कैक हजार फरकांचा जाणवत आहे. मराठा आरक्षणासारखे प्रभावी मुद्दे या निकालांवरून निवडणुकीतून हद्दपार झाल्याचे वाटते. नाशिक, पुण्यासह अनेक जिल्ह्यांतून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे. अर्थात, हा जनतेचा म्हणा किंवा ईव्हीएम मशिनचा कौल म्हणा, हा सर्वांना मान्य करावा लागेल. लोकशाहीत जनतेचा कौल सर्वांनाच मानावा लागतो. पाच वर्षांनंतर का होईना राज्यात पुन्हा एकदा ट्रिपल इंजिन का होईना, पण स्थिर सरकार येणार आहे. शेवटी अनपेक्षित का होईना, पण हा लोकशाहीचाच विजय म्हणावा लागेल.

चंद्रशेखर शिंपी
निवासी संपादक, दै. लोकनामा
9689535738

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button