संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज अश्व देहूला रवाना

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज अश्व देहूला रवाना
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
भाग्यवंत ल.नायकुडे, अकलूज.
(जयपूर, राजस्थान येथून)
दिनांक 17/06/2025 :
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षीही धवलसिंह मोहिते पाटील यांच्या ‘बलराज’ अश्वाचे विधिवत पूजन करून रवाना करण्यात आले.
‘प्रतापगड’ या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी आश्वाचे धवलसिंह मोहिते पाटील आणि पद्मजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी माणिक मिसाळ, अण्णासाहेब इनामदार,सतीश पालकर,अण्णासाहेब शिंदे, मयूर माने नवनाथ साठे, डॉ.चंद्रकांत कोळेकर,घोडेस्वार वैभव गायकवाड यांच्यासह जनसेवेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोहिते-पाटील कुटुंबांकडून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी मानाचा अश्व देण्याची परंपरा (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरवात केली.ही प्रथा गेली सुमारे ४० वर्षांपासून अखंडित चालू असून (स्व.) प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पश्चात डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून दरवर्षी पालखी सोहळ्यासाठी अश्वसेवा दिली जाते.सालाबाद प्रमाणे याही वर्षी उच्च कुळातील, मारवाडी जातीचा,सर्व शुभ लक्षणे असलेला ‘बलराज’ हा अश्व पालखी सोहळ्यासाठी रवाना करण्यात आला.या अश्वास वर्षभर विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते तसेच भाविकांच्या गर्दीमुळे बुजू नये यासाठी वर्षभर त्याची तयारी करून घेतली जाते.