ताज्या घडामोडी

शरद पवारमुक्त महाराष्ट्राकडे…

शरद पवारमुक्त महाराष्ट्राकडे…

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 03/10/2023 :
गेल्या शुक्रवारची मध्यरात्र नागपुरात विध्वंस घालून गेली. पाऊस अतिरेकी झाला आणि रस्त्यांच्या नद्या झाल्या. निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही. मात्र, या संकटाचे विरोधी पक्षांनी राजकारण करू पाहिले; ते निंदनीय आहे. समाजमाध्यमाने तर खूप हलकटपणा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागात फिरत असताना एका व्यक्तीचा हात खेचताना दाखवणारी व्हिडीओ क्लिप खूप फिरली. मात्र पुढे काय झाले ते दाखवलेच नाही. प्रत्यक्षात वास्तव काही वेगळे होते. या पुराने अनेकांची घरं धुतली. फडणवीसांनी आपले नुकसान पाहावे असे प्रत्येकाला वाटत होते. त्यातल्या या एका व्यक्तीचा हात धरून फडणवीस त्याच्या घरी गेले. ही व्यक्ती त्यांच्या ओळखीची होती. ओळखीच्या व्यक्तीवर अशा प्रसंगी कोण राग काढेल? फडणवीसांनी इतरांचीही घरं पाहून त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. समाजमाध्यमाने हे दाखवले नाही. विरोधी नेत्यांनीही या निमित्ताने खुन्नस काढली. विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त आहेत. 2024 चे निकाल समोर दिसत असल्याने हल्लाबोल करायची साधीही संधी ते सोडत नाहीत. फडणवीस हे तर विरोधकांचे पहिल्या क्रमांकाचे टार्गेट आहेत. संकट आले तेव्हा देवेंद्र मुंबईत होते. तेथूनच त्यांनी यंत्रणा कामाला लावली. लगेच नागपूरला धावलेही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही फिरले. मात्र, शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांना यावेसे वाटले नाही. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यात उपोषणाला बसले तेव्हा शरद पवार लागलीच तिकडे धावले होते. उद्धवही पाठोपाठ तिकडे गेले. मात्र, उपराजधानीच्या शहरात काही संकट येते तेव्हा या दोघांना तिकडे जावेसे वाटत नाही. हा साधा प्रकार नाही. पवारांची ही विकृत मानसिकता आहे. जनतेने यांचे चेहरे नीट लक्षात ठेवले पाहिजेत. यांचे अश्रू मगरीचे आहेत.
तब्बल 40 वर्षे महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारांभोवती फिरत होते. पवार काहीही चमत्कार करू शकतात, पवारांच्या मनात काय ते कोणालाही कळत नाही, अशा अगम्य कथा त्यांच्या माणसांनी पेरल्या होत्या. मात्र ‘जिधर दम उधर हम’ या पद्धतीचेच पवारांचे राजकारण होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि पवारांची पकड ढिली होणे सुरू झाले. आता तर पवारांची स्थिती केविलवाणी आहे. पवार काहीही नाहीत, संधिसाधू राजकारणी आहेत. हा बुरखा 2014 मध्ये फाटला. दिल्लीत जमलं नाही तर किमान महाराष्ट्रात तरी दुकानदारी चालेल, असं शरद पवारांचं गणित होतं. पण इथेही त्यांचे गणित चुकत गेले. आपण संदर्भहीन होत चाललो आहोत, हे आता पवारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांची चिडचिड वाढली आहे. ती त्यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्यांवरूनही लक्षात येते. समृद्धी महामार्गावर अपघातात कोणी मृत्युमुखी पडला तर तो समृद्धिवासी झाला असे गावकरी म्हणतात, हे त्यांचे वक्तव्य त्याचा नमुना आहे. एक अकेला देवेंद्र काय करील? असे पवारांना वाटत होते. फडणवीसांनी गेल्या नऊ वर्षांत पवारांचे राजकारणच गुंडाळले. 40 वर्षांचे साम्राज्य खालसा केले. हे सारे एका देवेंद्रने केले. सारी ताकद लावूनही पवारांचे पत्ते उलटे पडत आहेत. आताची त्यांची वळवळ त्यातून आहे. पवारांनी जातपातीचे राजकारण केले. स्वतःचा प्रतिस्पर्धी तयार होणार नाही हेच पाहिले. पुतण्याचेही पाय खेचले. संभ्रमावस्था हा स्वतःचा गुणविशेष बनवला. त्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राला झुलवत ठेवले. मात्र, 2014 नंतर त्यांची कल्हई उडत गेली. देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री झाले. उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी राज्यावर घट्ट मांड ठोकली होती. एक एकटा फडणवीसच आपल्याला रोखू शकतो, हे पवारांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांना रोखायला सारी ताकद लावली. सारे डावपेच लावूनही हा गडी चीतपट झाला नाही. पवारांचे वैफल्य त्या पायी आहे.
भविष्यात महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा फडणवीस यांच्या राजकारणावर प्रामुख्याने लिहिले जाईल. दगाबाजीचा बदला कसा घ्यायचा त्याचा धडा फडणवीस यांनी घालून दिला. 2019 मध्ये फडणवीस दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झाले असते तर शरद पवार एव्हाना संपले असते. धूर्त पवारांनी ते ओळखले. त्यातूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोडले. ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पवारांनी महाआघाडी बनवली नव्हती. स्वतःला राजकारणात जिवंत ठेवण्यासाठी पवारांची ती खेळी होती. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवणे हा त्यांचा डाव होता. मुख्यमंत्रिपदाच्या लालसेने हुरळून गेलेले उद्धव ठाकरे पवारांच्या जाळ्यात अलगद अडकले. आज काय चित्र आहे? भाजपशी दगाबाजी करणारे उद्धव घरी आहेत. पक्ष, सत्ता, आमदार… सारे काही धुवून नेलं. फडणवीस यांच्याशी पंगा घेणारे शरद पवार पुतण्याच नव्हे तर पक्षही गमावून बसले आहेत.
चाणक्य काय असतो ते फडणवीस यांनी दाखवून दिले. त्यांनी शिवसेना फोडली, पवारांची राष्ट्रवादी फोडली. 40-40 आमदार बाहेर पडून फडणवीस यांच्याकडे गेले. हे सोपे ऑपरेशन नाही. त्यासाठी विश्वासार्हता कमवावी लागते. 24 तास अविश्वासाच्याच हिंदोळ्यावर झुलणार्‍या शरद पवारांना ते कसे जमणार? शरद पवार ही मोठी शोकांतिका आहे. त्यांना पंतप्रधान व्हायचे होते. झालेही असते. मात्र, दर काही वर्षांनी सवतासुभा उभा करण्याच्या नादात मार खाल्ला. जन्मतःच बिघाडी झालेल्या इंडिया आघाडीतही भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. त्यांना आपल्या मुलीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करायचे होते. तिथेही मार खाल्ला. पवारांची माणसे फुटत नाहीत, असे म्हटले जात होते. माणसेच काय इथे पवारांचे घरच फुटले. पुतण्या म्हणजे अजितदादांकडे पक्ष सोपवून पवारांना रिटायरमेंट साजरी करता आली असती; पण कन्यामोह नडला. पुतण्या निघून गेल्यानंतर संपलेल्या पक्षावर कन्या राज्य करील, अशी परिस्थिती नाही. रोहित पवार यांच्या रूपाने एक नातू जोर मारतो आहे. बारामती भानामती झाली आहे. पवारांचा राष्ट्रवादी आज एक उद्ध्वस्त धर्मशाळा झाला आहे. तब्बल 40 वर्षे महाराष्ट्राला आपल्या इशार्‍यावर नाचवणार्‍या पवारांची ही मोठी शोकांतिका म्हटली पाहिजे. आज वयाच्या 83 व्या वर्षी त्यांचे दोन्ही हात रिकामे आहेत. महाआघाडी म्हणून आणलेलं उद्धव ठाकरे नावाचे पार्सल आता आपल्या उपयोगाचे नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. मात्र, गळ्यातले हे लोढणे घेऊनच त्यांना अखेरची धडपड करावी लागत आहे.
कुठे पवार आणि कुठे फडणवीस? मुख्यमंत्रिपदावर हक्क असताना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून फडणवीस यांनी केलेला त्याग हल्लीच्या राजकारणात दुर्मिळ आहे. विकासाचेच राजकारण शाश्वत असते हे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एका दाखवून दिले आहे. पवारमुक्त राजकारणाकडे महाराष्ट्र निघाला आहे.

मोरेश्वर बडगे
लेखक, ज्येष्ठ पत्रकार
दैनिक तरुण भारत, नागपूर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button