ताज्या घडामोडी

चंदगड तालुक्यातील तृतीयपंथी देणगीदार देवमामा अर्थात पांडुरंग गुरव

संपादकीय……..

चंदगड तालुक्यातील तृतीयपंथी देणगीदार देवमामा अर्थात पांडुरंग गुरव

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ माहिती सेवा ग्रुप पेठ वडगाव
आकाश भाग्यवंत नायकुडे/ अनिल आनंदा पाटील
मुंबई दिनांक 22 ऑगस्ट 2024 : तसा तो यल्लमा देवीचा जोगी. सर्वजण त्याला देवमामा म्हणूनच ओळखतात. नशीबी आलेला भोग म्हणून तो गावोगावी जोगवा मागून व देवीचे जागरण करुन स्वतःचा चरितार्थ चालवीत आहे. पण त्याच्यात सामान्य माणसालाही लाजवेल एवढी संवेदनशीलता व समाजभान भरुन उरलेले आहे. त्याचाच प्रत्यय म्हणून आदमापूर च्या प्राथमिक शाळेच्या इमारतीची झालेली दूर्दशा पाहून तो अस्वस्थ झाला आणि जोगवा मागून जमा केलेल्या पैशातून त्याने जिल्हा परिषदेच्या शाळेला एक लाख रुपये देणगी दिली. या ध्येयवेड्या तृतीयपंथीचे नाव आहे पांडुरंग गुरव(देवमामा).आसगोळी,ता.चंदगड येथील या देवमामाने यापूर्वी ही विविध मंदिरांना व सरकारी शाळांना स्वतः च्या वृद्धापकाळाचा विचार न करता लोखो रुपयांची देणगी दिली आहे. ते आदमापूर येथे बाळूमामांच्या देवदर्शनाला आले असता येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अपूर्ण इमारत बघून शाळेला चक्क एक लाख रुपये देणगी दिली. सरकारी नोकरी, भरपूर पगार असूनही आपण ज्या शाळेत शिकत मोठं झालो त्या शाळेला कोणी फुटकी कवडी सुद्धा देत नाहीत. भ्रष्टाचारी कर्मचारी व अधिकारी हे तर गेंड्याच्या कातडीचे असतात. देव मामा यांचे गाव वा शाळा आदमापूर नसतानाही एक लाख रुपये जोगवा मागत देतात म्हणूनच ही मदत उच्च कोटीची आहे. कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता,मदत केल्याचा व्हिडिओ शेअर न करता, प्रसिद्धी साठी पेपर बाजी न करता अतिसामान्य माणसं दुसऱ्यांच्या मदतीसाठी जेव्हा उभी राहतात तेंव्हा ती हिमालयाच्या उंचीची वाटतात. तृतीयपंथी पांडुरंग गुरव हे जोगवा मागत आपला उदरनिर्वाह करतात. लोक देव मामा म्हणून जोगवा व पैसे देतात. स्वत:ची उपजिविका साध्या पद्धतीने करत साठवलेले पैसे देव मामा शाळा वा मंदिराला दान करत असतात. देव मामा यांना वृद्धापकाळात जोगवा मागणे बंद झाल्यावर उदरनिर्वाह होणं अवघड आहे. आपल्या वृद्धापकाळासाठी पैसे साठवून औषध व भोजन यांची व्यवस्था करायचे सोडून साठवलेले पैसे दान करत फिरणारे देव‌ मामा म्हणजे दानी हात लाभलेला संवेदशील माणूसच.


शाळेत शिक्षण घेऊन मुले, मुली मोठी व्हावीत, स्वत:च्या पायावर ऊभी रहावित म्हणूनच सरकारी शाळेला मदत करतात. देव मामा कोणत्याही ग्रंथालयात गेलेले नाहीत. कोणतेही पुस्तक वाचलेलं नाही. शिक्षण तर कोसो दूर असताना, कोणताही गुरु , शिक्षक वा मार्गदर्शक भेटला नसतानाही लाचार व अपमानास्पद जीवन जगत अनुभवांच्या पुस्तकातून देव मामा यांच्याकडे समाजभान वा दातृत्व आहे. दातृत्व उच्च शिक्षणावर ,उच्च पदावर ,दर्जेदार स्कूलवर वा श्रीमंती वर अवलंबून नसते , तर त्यासाठी लागतो अंत:करणात मायेचा ओलावा, करुणा वा संवेदनशीलता.
समाजात भिक्षा मागून उदरनिर्वाह करणारे, असहाय दिव्यांग,जोगवा मागून जीवन जगणारे अथवा भविष्याची, वृद्धापकाळाची कोणतीही तरतूद नसणारी वेडी माणसं आपली अर्धवट भरलेली ओंजळ भुकेल्या, रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी रिती करतात तेंव्हा आश्चर्यचकित व्हायला होतं.समाजात काही लोक वा संस्था क्राऊडफंडिग द्वारे देणगी जमा करून गरीब, गरजू, वंचित, भुकेलेल्या व वयोवृद्ध यांच्यासाठी माध्यम म्हणून सेवा करत असतात हे निश्चित कौतुकास्पद व गौरवास्पद आहे. पण स्वतः अपमानित होत जमा केलेले सर्वच पैसे दान करण हे तर फारच मोठं सेवाभावी कार्य आहे.

फोटो: आदमापूर- शाळेला एक लाख रुपयांची मदत केलेबद्दल मुख्याध्यापक डी.डी.पाटील यांच्या हस्ते पांडुरंग गुरव (देवमामा) यांचा सत्कार करण्यात आला.
: – सुभाष पाटील, कूर,

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button