संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान व अर्थ

संत ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान व अर्थ
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10 ऑगस्ट 2024 : आपल्या सर्वांना तोंडपाठ असलेले हे पसायदान संत ज्ञानेश्वर माऊली यांनी लिहले. प्रार्थना, किर्तन, भागवत, हरिपाठ, आरती संपल्यानंतर प्रसाद घेतो, तेव्हा हे पसायदानआपण म्हणतो पण त्याचा कधी आपल्याला कोणीही अर्थ सांगितला नाही आणि तो समजला नाही हे आपले दुदैव आहे. खरचं आयुष्यात इतके मोठे कार्य ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. ते सर्व विश्वातील प्राणीमात्राच्या भल्यासाठीच मागितले. ज्ञानसूर्य ज्ञानयोगी ज्ञानराज माऊलींनी लिहिलेल्या पसायदानाचा भावार्थ समजून घेऊ या.
आता विश्वात्मके देवे । येणे वाग् यज्ञे तोषावे ।
तोषोनी मज द्यावे । पसायदान हे ।।१।।
ज्ञानराज माऊली परमेश्वराजवळ मागणे मागतात, ते स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगातील प्राणीमात्रांसाठी, माऊली हे सर्व विश्वालाच आपले घर समजत आहे. विश्वातील सर्व जीव हे त्यांचे सगेसोयरे होतात म्हणून त्यांनी स्वतःचा कधीच विचार न करता सर्वासाठी सर्वाच्या सुखासाठी मागणे मागितले आहे. माऊली म्हणतात, सर्व विश्वाला व्यापून असलेल्या आत्मरुपी परमेश्वरा मी आरंभलेल्याद शब्दरुपी यज्ञाच्या सेवेने संतुष्ट होऊन माझ्यावर प्रसन्न हो आणि मला पसाभर दान दे. तुझा दानरुपी प्रसाद मला मिळू दे. जेणेकरुन जगातील सर्व प्राणीमात्र सुखी होतील.
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो ।
भुता परस्परे जडो । मैत्र जीवांचे ।।२।।
विश्वाला व्यापलेल्या आत्मरुपी देवा मला हे दान दे की, दुष्ट लोकांची दुष्ट बुद्धी नाहिशी व्हावी व त्यांना सद्बुद्धी प्राप्त होऊ दे. सद्बुद्धीमुळे त्यांना सत्कर्म करण्याची आवड निर्माण होऊन सर्व जीवांच्या ठिकाणी आपसात परस्परांबद्दल मित्रत्व निर्माण होऊन सर्व एकत्र नांदावेत.
दुरीतांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्य पाहो ।
जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ।।३।।
सर्व जगातील मनुष्य प्राण्यात स्वस्वरुपा विषयी असलेला अंधकार नाहिसा होऊन स्वधर्म सूर्य म्हणजे आत्मरुपी सूर्याचा उदय व्हावा. मनुष्य सदा स्वस्वरुपातच मग्न राहून स्वतःच्या जन्माचं सार्थक कशात आहे. काय केलं तर भवसागर तरुन जाता येईल, याचं चिंतनात असावा. स्वरुपाची जो प्राप्ती इच्छा करील त्याची इच्छा फलद्रुप व्हावी असे मला दान मिळावे. असे माऊली आत्मारामाकडे मागणी करतात.
वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भुतां ।। ४।।
संत ज्ञानेश्वर यांना आपली काळजी आहे. त्यांना सतत वाटत आहे की, जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मोक्षाला जावा तसेच त्याचा संसारही सुखाचा व्हावा म्हणून ते विश्वव्यापी आत्मारामाला मागणे मागतात की, मला फक्त पसाभर दान दे. ज्याच्या प्रसादाने सर्वाचं कल्याण होईल. त्यासाठी या पृथ्वीवर वावरणारे सदा आत्मरुपात मग्न असलेले, ईश्वराशी एकनिष्ठ असलेले जे संत सज्जन आहेत ते सदा भूतलावरील सर्व प्राणिमात्रावर मांगल्याचा सदोदित वर्षाव करत आहेत. त्यांचा समुदाय एकत्र येवो व तो सर्व वर्षाव करत आहेत. त्यांचा समुदाय एकत्र येवो व तो सर्व जीवाच्या उद्धारासाठी सर्वांना भेटावा इतकच मला दान दे.
चला कल्पतरुचे आरव । चेतना चिंतामणीचे गांव ।
बोलते ते अर्णव । पियुषाचे ।।५।।
सर्व संत, सद्गुरु हे चालते बोलते कल्पतरुचे बगीचे आहेत. त्यांच्याकडे जे मागाल ते प्राप्त करून देण्याचे त्यांना सामर्थ्य प्राप्त आहे. अशा सर्व संतांचे सानिध्य हे भूतलावरील चिंतामणीकडे आपण जी मागणी करु, ती पूर्ण होते पण चिंतामणी हा ज्याच्या जवळ आहे, त्यांची एकट्याचीच मागणी पूर्ण करील पण संत हे असे चिंतामणी आहेत की, ते न मागताही सर्वांची, सर्व गावांची मागणी पूर्ण करु शकतात. फक्त मागणाऱ्याने काय मागावं याच भान ठेवायला हवं. संत हे चैतन्याने भरलेले चालते बोलते वृक्ष आहेत. चालते बोलते चेतनामय गावच आहेत. जो भवसागर तरुन जाण्याची इच्छा करील ती इच्छा त्याची पूर्ण करण्याची क्षमता संताच्यात आहे. संत म्हणजे चालते बोलते अमृताचे सागर आहेत. संतांची वाणी ही फक्त इश्वराची भक्ती करण्यासाठीच असते. त्यामुळे त्यांनी उच्चारलेला एक एक शब्द खरा होत असतो म्हणून माऊली विश्वात्मक परमेश्वराला विनंती करतात की, असे जे संत आहेत ते सर्व प्राणिमात्राला भेटावे व त्यांना जन्ममरणाचा फेरा चुकवून ते मोक्षाला जावेत हेच मला दान दे.
चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।६।।
संत ज्ञानेश्वर म्हणतात की, चंद्राला डाग आहे तो एकप्रकारे त्याला लांच्छनच आहे पण तत्त्वज्ञानी संत हे डाग विरहीत असतात. त्यांना कोणत्याही प्रकारे लांच्छन लागलेले नाही. असे संत चंद्र जसा शीतल प्रकाश देतो, त्या प्रकाशाचा कुणालाच त्रास होत नाही. त्याचप्रमाणे लांच्छन विरहीत संत हे संपूर्ण प्राणिमात्राला ज्ञानरुपी शांत, शीतल प्रकाश देऊन शहाणे करत असतात. सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो. परंतु त्याचा प्रकाश उष्णतेने भरलेला असतो. त्याचा प्राण्यांना ताप सहन करावा लागतो परंतु ज्ञानसूर्य असे ते संत त्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशात सर्व प्राणिमात्र उजळून निघतात. परंतु त्यांच्या प्रकाशाचा कुणालाच ताप सहन करावा लागत नाही म्हणून त्यांना तापहीन मार्तंड म्हणतात. असे सर्व संत सर्व लोकांच्या प्रेमाचे स्थान असू देत. ज्ञानी संत हे सर्वांचे सोयरे व्हावेत अशी प्रार्थना माऊली विश्वाला व्यापून असलेल्या आत्मरुपी परमेश्वराकडे करतात.
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनी तीही लोकी ।
भजीजो आदि पुरुखी । अखंडित ।।७।।
चालत्या बोलत्या चिंतामणी व कल्पवृक्षाच्या सानिध्यात राहून सर्व जगातील मानवजात ज्ञानामृत पिऊन संताच्या संगतीत भक्तीच्या वाटेने जाता जाता जे ज्ञानसूर्य म्हणजे संत आहेत, त्यांचा आशिर्वाद मिळवून सर्व सुखी होवोत. त्यांना आत्मरुपाच दर्शन होऊन परिपूर्णतेणे भक्ती मार्गात रममाण व्हावे व त्यांनी आदि पुरुषाचं म्हणजेच विश्वाला व्यापून असलेल्या आत्मरुपाचं अखंपणे भजन करावं ही बुद्धी मनुष्य प्राण्याला व्हावी म्हणून माऊली विश्वात्मक देवाकडे दान मागतात.
आणि ग्रंथोपजीविये । विषेशी लोकी इथे ।
दृष्टादृष्ट विजये । हो आवे जी ।।८।।
आता मात्र माऊली आपणास एक महत्त्वाचा संदेश देतात. ज्यांनी हा देहरुपी ग्रंथ ( ज्ञानेश्वरी म्हणजे संपूर्ण आपल्या देहात असलेल्या शक्तीच चांगल्या वाईट प्रवृत्तीचं वर्णन केलेला ग्रंथ आहे.) वाचायचं ठरवलं आहे, त्याचा अभ्यास करायचं ठरवलं आहे त्यांनी या लोकांतील एक विशेष गोष्ट म्हणजे आपली बाह्य दृष्टी जी संसारावर जडली आहे. मोह मायेत अडकली आहे. या बाह्य दृष्टीवर विजय मिळवून अंतरदृष्टीने देहातील आत्मारामाला भेटायला पाहिजे. तरच मनुष्याला सर्व सुख प्राप्ती होईल म्हणून माऊली विश्वात्मक परमेश्वराची करूणा भाकून आपल्यासाठी दान मागतात.
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखीया झाला ।।९।।
अशाप्रकारे अलौकिक दान आमच्या सारख्या पामरांच्या उद्धारासाठी योगीराज ज्ञानेश्वर माऊलींनी ईश्वराकडे मागितलं तर अलौकिक मागणीने संपूर्ण विश्वाचा पालनकर्ता आनंदीत झाला आणि त्यांनी सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मुखातून माऊलींना सांगितलं की, हे तुझं मागणे पूर्ण होईल. तुझ्या मागणीने सर्व मानवजात सुखी होईल. अशा प्रकारचा प्रसाद मिळाला हे ऐकून ज्ञानराज माऊली सुखी झाले, आनंदीत झाले. संत हे स्वतःसाठी कधीच काहीच मागत नाहीत तर ते इतराचं कसं भलं होईल याचाच विचार करतात.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७