देवेंद्र फडणवीस “अग्निदिव्य”

- देवेंद्र फडणवीस
“अग्निदिव्य”
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 06/12/2024 :
“देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी” हे पाच शब्द आहेत आणि पाच शब्द एकत्र करून बनलेल्या मुठीने गेल्या साठ वर्षाच्या राजकारणावर, डाव्यांवर त्याचबरोबर हिणवणाऱ्या तमाम शक्तींवर एक मुक्का प्रहार केलाय. देवाभाऊंचा शपथविधी होतोय म्हणून लांगूनचालन करणारा हा लेख नसून महाराष्ट्राच्या राजकारणाची सद्यस्थिती मांडणारा लेख आहे.
ही अतिशयोक्ती नव्हे पण देवेंद्र फडणवीसांचा काल झालेला शपथविधी याची तुलना रामायण, महाभारत त्याचबरोबर शिवकाळाबरोबर करतोय. रामाला वनवास भोगल्यानंतर सिंहासन मिळाले, तेच पांडवाबद्दल घडलं, वनवासानंतर युधिष्ठीर सिंहासनावर बसला. आणि तेच छत्रपती शाहू महाराजांबद्दल घडले. या तिन्ही घटना वनवासानंतर आणि आप्तस्वकीयांनी केलेल्या घातपातानंतर घडल्या आहेत. प्रभू रामचंद्र, युधिष्ठीर आणि छत्रपती शाहू महाराजांच्या यादीमध्ये आणखी एक नाव जोडले गेलंय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. फडणवीसांचे राज्य होतं, नंतर आप्तस्वकीयांनी घातपात केला. त्यांना वनवासात धाडलं, आणि वनवास भोगून, शोषून पुन्हा ते सिंहासनाधिश्वर झालेत. देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी हा विरोधकांनी कितीही नाकारला तरी ऐतिहासिक ठरला आहे. त्यामुळेच त्यांच्या शपथविधीला देशाच्या पंतप्रधानांपासून आजूबाजूचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह महाराष्ट्राच्या जनतेचे प्रचंड बहुमत आणि आमदारांचे प्रचंड संख्याबळ हजर होते. प्रचंड यातना, अवमान आणि हाल अपेष्टेनंतर सिंहासनावर निर्विवाद वर्चस्व ठेवणारे देवेंद्र खरचं ‘समुंदर’ आहेत. ज्या वाक्याची महाराष्ट्राने सर्वात जास्त खिल्ली उडवली, ते वाक्य आज खरं होतंय. देवेंद्र म्हणाले होते,
‘मेरा पाणी उतरा देख
मेरे किनारे पे घर मत बसाना
मै समुंदर हूँ
फिर लौटके आऊंगा’
या वाक्याची खिल्ली उडवणाऱ्या साऱ्या शक्तींची देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी या पाच शब्दांच्या बुक्कीने बत्तीशी घशात घातली आहे. देवेंद्र फडणवीसांना असाच राजमुकुट मिळालेला नाही, त्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘अग्निदिव्य’ पार करून राज्याभिषेक झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील गेल्या दहा वर्षांचा प्रवास साऱ्यांनाच माहित आहे. नैसर्गिक नियमानुसार भाजपा आणि शिवसेना यांचा घरोबा होता. विरोधात कित्येक वर्षे काढली. बऱ्याच तपश्चर्येनंतर सत्ता आली आणि आलेली सत्ता पाच वर्षातच गेली. अशावेळी देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा महायुती सत्तेपर्यंत पोहोचवली. पुढे उद्धव ठाकरेंचा इगो आडवा आला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने करवट बदलली.
*देवेंद्र फडणवीस विरूद्ध आख्खा महाराष्ट्र
उद्धव ठाकरेंनी केवळ घातपातच केला नाहीतर देवेंद्र विरूद्ध आख्खा महाराष्ट्र असं वातावरण तयार केलं. देवेंद्र विरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह छोट्या पक्षांनी मिळून सरकार बनवले. देवेंद्रंच्या साथीदारांवरही अंकुश ठेवला. देवेंद्र फडणवीस हे यावेळी एका राजकीय पक्षाचे गटनेते आहेत, असं न मानता देवेंद्र फडणवीस यांनाच एक व्यक्ती मानून टार्गेट करण्यात आले. महाराष्ट्राच्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून दिलेला कौल मागे पडला आणि देवेंद्रंना विरोधी बाकावर बसावे लागले. विरोधी पक्षनेता म्हणून यापूर्वी खणखणीत काम केलेला देवेंद्र जरी एकटा पडला असला तरी आता नव्या दमाने सज्ज झाला होता.
आता मुद्दामहून फडणवीसांचा उल्लेख एकेरी करतोय कारण त्या काळामध्ये विरोधकांकडून देवेंद्र यांना तितकेच क्षुल्लक मानले जात होते.
*विरोधी पक्षनेता असावा तर असा
महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते बनले गेले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री असावा तर असा, असं ठासून सांगितले जातं. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि चारवेळा मुख्यमंत्री झालेले शरद पवार यांचे कौतुक होते. सत्तेवर बसला की तो कौतुकाचा धनी होतो. मात्र सत्ता गमावलेला कधीच कौतुकाचा धनी होत नाही. सत्ता नसतानाही कौतुकाचा धनी झालेला देशातील एकमेव माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस.
जनतेने मुख्यमंत्री म्हणून कौल दिलेला असताना विरोधी पक्षनेता बनलेल्या फडणवीसांनी जे काम केले ते अद्भूत आणि विलक्षण आहे.
सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणे, हे विरोधकांचे काम आहे, पण देवेंद्र फडणवीसांनी विरोधात बसून सत्ताधारी उद्धव आणि शरद पवार यांच्यावर केवळ अंकुशच ठेवला नाहीतर यांच्या कोथळ्याला हात घातला. सत्ताधारी म्हणून मिरवणाऱ्या उद्धव आणि शरद पवार यांच्या कायदेशीर सल्लागारांच्या अॅन्टीचेंबरमध्ये काय चाललंय? याच्यावर लक्ष ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचा या दोघांना कधी पत्ताच लागला नाही.
*पक्षफोड्या नव्हेतर महायुती जोड्या
गेल्या पंधरा दिवसापर्यंत देवेंद्र फडणवीसांना विरोधकांनी पक्षफोड्या असं टोपण नाव दिलं होतं. एकाकी पडलेल्या फडणवीसांना तुमच्या सल्लागारांच्या अॅन्टीचेंबरमध्ये काय घडतेय, हे कळत होतं. तेव्हाच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपापल्या घरात लक्ष देण्याची गरज होती.
विरोधी बाकावर बसून देवेंद्र फडणवीस सत्ताधाऱ्यांची कोंडी करीत होते. ही आमदारांची चाललेली घुसमट उद्धव आणि पवार यांना कळलीच नाही. या घुसमुटीचा उद्रेक पहिला सेनेत झाला. आणि मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते, त्यांच्या आज्ञेत होते. ही पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंसाठी शरमेची बाब होती. त्याला ‘बाप पळवला’ हे उत्तर नव्हते. एकटा देवेंद्र आपला पक्ष शंभर टक्के मजबुत ठेवून 80 टक्के शिवसेना पळवतो, ही कौतुकाची बाब आहे. यात कुणीही अभिमान बाळगावा आणि कुणी लाज बाळगावी, हे ज्यांचे त्याने ठरवावे.
सांत्वन करणाऱ्या पवारांचे पुतनामावशी प्रेम पडलं उघडं
उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्हासह देवेंद्र फडणवीसांनी आपल्या सोबत जोडून घेतला. त्यावेळेला शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या सांत्वनामध्ये व्यस्त होते. फडणवीसांची सत्ता आली त्यांना टार्गेट करण्यासाठी शरद पवार फडणवीसांना पक्षफोड्या हे नॅरेटिव्ह सेट करण्यात व्यस्त होते. उद्धवचं जितकं सांत्वन करू, तितकी फडणवीसांची बदनामी होणार, या न्यायाने ‘फुटली शिवसेना आणि राज्यभर फिरले पवार’ याच दरम्यान पवारांनी आपल्या घरात लक्ष दिले नाही.
शरद पवारांनी राजकारणात चारवेळा आपला पुतण्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं, तरीपण ती त्यांच्या राजकारणाची अपरिहार्यता होती. अजित पवार हे शरद पवारांच्या राजकारणाचे हुकमी टुल होते. अनेकदा पवारसाहेबांच्या राजकारणाचा अजितदादांना अवमान सहन करावा लागला होता. राजीनामा देऊन गायब होणे किंवा कराडात येऊन आत्मक्लेष करणे अशा साऱ्या बाबींवरून साहेबांचे माझ्यावरील प्रेम हे पुतनामावशीचे आहे, हे अजितरावांनी सांगितलेच होते. लेकाचा पराभव हा अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता. अजित पवार अस्वस्थ आहेत, घर डगमगलं आहे, हे पवारांना कळलेच नाही.
त्यामुळेच उद्धव ठाकरेंचे सांत्वन करणाऱ्या पवारांवर सांत्वन घेण्याची वेळ आली. फडणवीसांनी पवारांच्या कासेची लंगोटी काढली. संख्याबळ असतानाही अजित पवारांना सहभागी केलं, तेही राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हासकट.
प्रचंड मानहानी आणि अवमान सहन करून
महाराष्ट्राच्या राजकारणात कोणत्याही खासदार, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इतकेच काय सरपंचालाही मानहानी सोसावी लागली नाही, तितकी मानहानी देवेंद्र फडणवीसांनी गेल्या पाच वर्षांत सहन केली आहे. गेल्या पंचवार्षिकनंतर एकदा देवेंद्र विरूद्ध आख्खा महाराष्ट्र हे नॅरेटिव्ह सेट करण्यात शरद पवार यशस्वी झाले.
मानहानी करण्याचे ठराविक पॅटर्न असतात. पण देवेंद्र फडणवीसांना सगळ्या पॅटर्नमध्ये अडकवण्यात आले.
‘फडणवीस’ म्हटलं की विरोधात रान उठवण्यासाठी त्यांची जात पुढे येते. त्यांच्या जातीवरून महाराष्ट्राने राजकारण खेळलं. जातीचे राजकारण होणारच, पण फडणवीसांना कौटुंबिकरित्या सुद्धा ट्रोल करण्यात आलं. अनेकदा सोशल मीडियावर फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या गायनाच्या आवडीवरून त्यांना ट्रोल केलं गेलं. इतकंच काय भारतामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला प्रकृतीवरून ट्रोल केलं नसेल, ते फडणवीसांना भोगावे लागले. राजकारणाची अक्कल नसणारे त्यांना टरबुज्या म्हणून हिणावत होते. इतकेच काय तर त्यांच्या पुरणपोळी खाण्यावरूनही त्यांना बोलण्यात आलं. एकूणच काय तर देवेंद्र फडणवीसांची जात, कुटुंब, पत्नी, लेक, खाण्याची आवड, गाण्याची आवड, अशा सगळ्यावरून त्यांना घेरण्यात आले. मात्र यातील एकाही ट्रोलिंगला देवाभाऊंनी उत्तर दिलं नाही.
समुद्र मंथनातून निघालेले विष शंकराने एकदाच प्राशन केले. ते देवाभाऊंना पदोपदी पचवावे लागले. देवेंद्र फडणवीसांवर बेछुट आरोप करणाऱ्या काही भंपकांनी त्यांचा उल्लेख ‘अनाजीपंत’ असाही केला. वास्तविकता तर ही देवाभाऊंच्या पक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोन्ही वंशज भाऊंचा मानसन्मान राखतात.
*जातीपलिकडेचे देवेंद्र
फडणवीस सर्वात जास्त ट्रोल झाले ते जातीवरून, महाराष्ट्र हा मराठा जातीबहुल आहे. या साऱ्या संघर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलेली मराठा संकल्पना महाराष्ट्र विसरून गेला. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार ही शिवरायांची संकल्पना महाराष्ट्र विसरला. शिवकाळामध्ये अनाजीपंत होताच, पण बाजीराव पेशवा होता, याकडे साऱ्यांचे दुर्लक्ष झाले. फडणवीसांची जात काढण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. मराठ्यांचे आरक्षण हा विषय महत्त्वाचा आहेच, पण तो फडणवीस सत्तेवर आल्यानंतरच निघतो. काही आंदोलने ही ठराविक काळासाठीच ठरलेली असतात. जसं अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण हा विषय हिंदुत्ववादी संघटना निवडणूक वर्षात आणतात. तसं मराठ्यांचे आरक्षण हे देवेंद्र सत्तेवर बसल्यानंतर पुढे येते. वास्तविक फडणवीसांनी मराठ्यांना स्वतंत्र भारतात आरक्षण दिले, याकडे डोळेझाक करून केवळ जातीचे राजकारण करून अनेक पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली. आंदोलनामध्ये झालेला खर्च हा शासनाचा नाही, तर तो आमच्या मराठा बांधवांच्या खिशातून झाला आहे.
खरंतर हे आंदोलन उशिरा सुरू झाले. त्याआधी 2012 साली मी स्वत:
‘मराठा तगले
तर आपण सगळे’
ही टॅगलाईन काम करणारा माणूस आहे. मात्र पुढे जातीचे महत्त्व सांगणाऱ्यापेक्षा जात असणारा महत्त्वाचा ठरला. आरक्षणाचे आंदोलन हे आरक्षणासाठी होतं का, फडणवीसांच्या विरोधात होतं हे मराठ्यांना नक्कीच समजले. म्हणूनच महाराष्ट्राचा हा निकाल लागला आहे. कोण्या फॅक्टरबाबत बोलण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस हे नक्कीच न्याय देतील, या भूमिकेत मराठा समाज आला आहे, असं मानायला हरकत नाही.
*बुथप्रमुख ते राज्यप्रमुख
फडणवीसांच्या राजकारणाचा इतिहास आपण सारे जाणतो. पायऱ्या चढत आलेला माणूस यशोशिखरावर पोहोचतो आणि कायम राहतो. फडणवीसांचे तेच झाले. इंदिरा गांधींच्या पोटी
जन्माला आले म्हणून राजीव गांधी पंतप्रधान झाले, इथं तसं नाही. देवाभाऊंनी महाराष्ट्र, नागपूर जिल्हा, नागपूर महानगरपालिका, नव्हेनव्हे तर आपला पोलिंग बुथचा प्रमुख म्हणून राजकारणाला सुरूवात केली आहे. आणि त्यानंतर एकेक पायऱ्या चढल्या आहेत. सत्तेच्या शिखरापर्यंत पोहोचताना वाटेत किती अडथळे आणि पायात किती काटे टोचतात, हे देवाभाऊंना माहित आहे. महाराष्ट्राने आजवर शरद पवारांचे यासाठी कौतुक केले. यापुढे कौतुक पवारांचे, फडणवीसांचे सुद्धा होत राहील.
*संघाशी एकनिष्ठ असल्याचे कधीच नाकारले नाही
देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. हा काळ 40 वर्षांपूर्वीचा, याच 40 वर्षाच्या सत्ताकारणात सत्तेच्या लालसेपोटी अनेकांनी आपली हाफ चड्डी लपवली. मात्र मी संघाचा स्वयंसेवक आहे, हे फडणवीसांनी कधीच लपवले नाही. आरएसएस म्हणजे बामणांची संघटना, असा विरोध होत असताना सुद्धा फडणवीस हाफ चड्डी घालून संघाच्या संचलनात सहभागी झाले. यालाच एकनिष्ठता म्हणतात.
*अत्यंत हुशार विद्यार्थी
विधानसभा निवडणूक जिंकून पहिल्यांदा आमदार होणाऱ्या लोकांना त्यांचं काम, कर्तव्य आणि जबाबदारी शिकवण्यासाठी मसुरीमध्ये एक प्रशिक्षण शिबिर असते. देवेंद्र जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा त्यांनी हे शिबिर अटेंड केले. वास्तविक आचारसंहिता, निवडणुकीनंतरचा गुलाल यामुळे हे शिबिर सगळ्यांसाठी केवळ टुरिझम असते. जे गेल्या सहा महिन्यात करता आलं नाही, ते सगळे करण्यासाठी आमदार इथे पोहोचलेले असतात. प्रशिक्षणाची उपस्थिती कुणी 10 टक्के पण दाखवत नाही. मात्र या प्रशिक्षणाच्या इतिहासात देवेंद्र फडणवीस एकमेव आमदार आहेत, ज्यांनी 100 टक्के उपस्थिती लावली आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई हा त्याचा पुरावा आहे. शंभूराज आणि देवेंद्र एकाच वर्षी पहिल्यांदा आमदार झाले, आणि त्यातच त्यांची गट्टी जमली.
*पुष्पा मतलब फ्लॉवर समझे क्या, फायर हूँ मैं
राजकारणामध्ये प्रचंड ट्रोल झाल्यामुळे जिभेवर संयम ठेवल्याने अनेकदा देवेंद्र फडणवीस हे अंत्यत शांत आणि संयमी आहेत, असा समज होतो. देवेंद्र म्हणजे अत्यंत शांत मात्र देवेंद्र केव्हाच शांत आणि संयमी नाहीत. त्यांच्या विरोधात जाणारे आज कुठल्या कुठे संपले.
फडणवीसांनी महाराष्ट्रात काँग्रेस संपवलीच. त्याचबरोबर बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांचा पक्ष संपवला. इतकेच काय 40 वर्षाची मैत्री करून दगाफटका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना सुद्धा संपवले. महाराष्ट्रातील सगळ्या पातळीवर विरोध करणाऱ्या सगळ्या विरोधकांना फडणवीसांनी पूर्णत: संपवले. मात्र आजवर तोंडात कधी ब्र शब्द काढला नाही.
*फडणवीसांची एक दुर्मिळ आठवण
फडणवीसांच्या हुशारीचा मी तेव्हा फॅन झालो. वास्तविक नागपूर अधिवेशन हे आमदारांच्या विश्रांतीचा काळ असतो. नागपुरात अधिवेशन सुरू होतं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विरोधी पक्षनेता फडणवीस. त्यादिवसाचे सेशन फार काही चालणार नव्हतं. सत्ताधारी मंत्री आणि आमदार सभागृहाबाहेर गेले होतेच, तर विरोधी आमदारही कोणी नव्हते. गॅलरीमधले सगळे पत्रकारही गेले होते. सभागृहात किरकोळ आमदार आणि गॅलरीत मी एकटा पत्रकार अशा अवस्था असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सरोगसी मदर’ हा विषय मांडला. घमासान राजकारणात हा विषय ऐकायला कोणीच उत्सुक नव्हते. औत्सुक्याचा वाटल्यामुळे मी कान टवकारले. सभागृहात ऐकायला कोणीही नसताना फडणवीसांनी हा विषय 40 मिनिटे अत्यंत तडफेने मांडला. अत्यंत अभ्यासपूर्ण मांडलेला हा विषय गेल्या 15 वर्षात मला सोशल मीडियावरही ऐकायला मिळालेला नाही. विषयाचे महत्त्व आणि विषयाची मांडणी हे सगळे अभूतपूर्व होतं. त्यामुळे हे सारेच अभूतपूर्व होतं.
*पंढरी टाळणाऱ्याला भक्ताला विठ्ठल पावला
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात प्रचंड कट कारस्थाने झाली. जमेल तितक्या बाजूने त्यांना घेरण्याचे राजकारण झालं. वास्तविक राजकीय आणि वारकरी सांप्रदायाच्या नियमानुसार आषाढी एकादशीला विद्यमान मुख्यमंत्र्याने सहकुटुंब आरती करणे हा रिवाज होता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यामुळे अनेकांचा कंडू माजला होता. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. वारकरी सांप्रदायाचा नियम आहे तरी विठ्ठलाच्या आरतीला यायचं नाही, यासाठी विरोधकांनी थयथयाट केला. वारकऱ्यांच्या पायात साप सोडून प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी करू, अशी धमकी दिली.
खरंतर या धमकीला भीक न घालता मुख्यमंत्री विठ्ठल आरतीला पोहोचलेच असते. तरी फडणवीसांनी बळजबरी न करता पंढरीला जाणे टाळलं. संत वाङमयाचे अभ्यासक याच्यावर अधिकारवाणीने बोलू शकतील. पण इतकं खरं की ज्या भक्ताने पंढरीला जाणे टाळलं, आज विठुमाऊली त्यालाच पावली आहे. नामदेवाने जशी वीट फेकली, तशीच देवेंद्र फडणवीसांनी वीट फेकली आणि सत्तेचा विठुराय त्या पायरीवर उभा आहे.
*राजकीय विश्षलेकांची बत्तीशी घशात
महाराष्ट्राच्या समाजकारणात काही मोजके संपादक आणि मोजके राजकीय विश्लेषक यांची मोनोपोली आहे, हे जणू महाराष्ट्राच्या राजकारणाचे ज्योतिषाचार्य असल्यासारखे वागत असतात. या साऱ्यांनी गेल्या पाच वर्षांपासून काहूर माजवला होताच. परंतु आचारसंहिता लागल्यापासून यांचा ठणठणाट चालू होता. गेल्या एक महिन्यातील या तथाकथित ज्योतिषाचार्यांचे लेख किंवा व्हीडिओ काढून बघा, ते बेअक्कल असल्याचे सिद्ध होईल. दरम्यान, महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर त्याच ज्योतिषाचार्यांनी फडणवीसांची ओवाळलेली आरती पहा. अत्यंत विरोधाभास जाणवेल. कोणत्याही राजकीय विश्लेषकाची बुद्धी इथपर्यंत पोहोचली नव्हती, तरी आता तेच अनाजीपंत म्हणणारे विश्लेषक देवाभाऊंच्या लीडरशीपवर बोलत आहेत. झालेली बेअभ्रू लपवण्याच्या क्लृप्त्या या शब्दबंबाळांकडे असतातच.
दीपक प्रभावळकर ✒️
सातारा
9325403232/9528403232