सत्त्व अन् स्वबळाची परीक्षा
अग्रलेख………………✍️
सत्त्व अन् स्वबळाची परीक्षा
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/10/ 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने एक महिना उशिरा का हाईना राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील सहा प्रमुख पक्षांसाठी त्यांचे सत्त्व म्हणजे संतुलन, एकात्मता, एकनिष्ठता यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. निवडणुकीत मतदारराजा जो काही कौल देईल तो या सहा पक्षांना दिलदार मनाने स्वीकारावाच लागणार आहे. मागील पाच वर्षांत युती, आघाडीच्या माध्यमातून याच पक्षांनी जनतेकडे कौल मागितला. मात्र, जनतेने दिलेला कौल या सर्वपक्षीयांनी अव्हेरला. राज्यात ‘न भुतो न भविष्यति’ असे पक्ष फोडाफोडीचे राजकारण रंगले. पक्षाच्या विचारधारेला सर्वांनीच तिलांजली दिली. ज्यांच्यावर जनतेने विश्वास टाकला त्यांनी राजकीय व्यभिचार केला. घरभेदी, गद्दारांचे पीक उदंड जाले. ‘मी पुन्हा येईन’ व ‘मरण पत्करेन, पण पक्षाशी गद्दारी करणार नाही’, अशा गर्जना करणाऱ्यांनी असंगाशी संग केला. आता हेच सर्वपक्षीय ताठ मान करून पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात उभे आहेत. यात सत्तेपासून ‘वंचित’ राहू नये म्हणून वेळोवेळी घरोबा बदलणारे व ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणून ‘मला एकदा सत्ता देऊन तर पाहा’ असे म्हणणारेदेखील आहेत. या सर्वपक्षीयांनी जनता जनार्दनाला पुन्हा एकदा गृहीतच धरले आहे. मात्र, या सर्वांना या निवडणुकीत योग्य तो धडा मतदार शिकवतील, अशी आशा आपण बाळगू शकतो. कारण आशेवरच आज जग टिकून आहे. मागील पाच वर्षांतील राजकीय उलथापालथ पाहता देशात फक्त नावालाच लोकशाही शिल्लक आहे. ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही राज्यव्यवस्था’ हा एक आत्मविश्वासाचा फुगा बनला आहे. तो एकदा फुटला की, त्याचा आवाज हाच देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याची वर्दी देणारा ठरणारा आहे. पावसाळ्यापूर्वी ‘पेरते व्हा रे’ असा नारा देणाऱ्या पावशा पक्ष्याप्रमाणे ‘लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सतर्क व्हा रे’ अशी आळवणी करणाऱ्या एखाद्या लोकशाहीतील अंतरात्म्याची गरज आहे. अर्थात, हा अंतरात्मा मतदारांच्याच ठायी आहे. त्याला फक्त त्याची जाणीव करून देणारा कोणी हवा आहे. ज्यांना आपण पाच वर्षांपूर्वी एकमेकांविरोधात लढताना पाहिले तेच आज गळ्यात गळे घालून आपल्यासमोर येणार आहेत. पाच वर्षांत पक्षीय राजकारणाचा खेळखंडोबा करून आज तेच पुन्हा आपल्याला आश्वासनरूपी रेवड्यांचा प्रसाद देणार आहेत. निवडणुकीत घोषणांचा भंडारा उधळून आपल्या हाती खोबऱ्याचा एखादा तुकडा ठेवणार आहेत. आज हे राजकारणी आपल्याला गृहीत धरत आहेत, कारण आपले मनच मुडदाड झाले आहे. सत्तेच्या सारीपाटावर ते आणि त्यांचे सेनापती शाबूत आहेत. मात्र, सैन्य म्हणून गणले जाणारे आपण त्यांच्या राजकीय युद्धात बेकारी, महागाई, अराजकता, अनागोंदीच्या तोफेचे बळी ठरत आहोत. त्यांना सैन्य नाही; त्यांचे शिलेदारच प्रिय आहेत. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर विविध पदांची खिरापत वाटून त्यांना खूश केले जात आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांचा वाद राज्यपालांचा दरबार सोडून न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचला. मात्र, तेथेही त्यावर निर्णय झाला नाही. निवडणूक जाहीर होताच हा वाद एक दिवसात मिटला. विविध समाजासाठी १८ महामंडळे स्थापन झाली आणि एकूण २७ महामंडळांवर संभाव्य बंडखोरांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या. महामंडळे, विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदार ही बंडखोरांची राखीव क्षेत्रे बनली आहेत. कारण येथे पोसलेल्या भ्रष्टाचाराच्या कुरणावर यथेच्छ ताव मारता येतो. राज्यातील विचारवंतांना, कलावंतांना, निष्ठेने समाजसेवा करणाऱ्यांना सत्तेत आता जागा राहिलेली नाही. त्यांच्या विचारांची, कलेची, समाजसेवेची राजकारण्यांना गरज राहिलेली नाही. कारण राजकारणीच आता विचारवंत झाले आहेत. पक्ष, नाती, नेते कसे फोडायचे हे राजकीय कसब त्यांच्याकडे आहे. सत्तेसाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांना कलाकारांची काय कदर राहणार? आणि समाजसेवा हा तर त्यांचा पिंडच आहे. यासाठीच तर त्यांचे सर्व राजकारण सुरू आहे. राजकारणातील काका, मामा, भाऊ, नाना, अशी सोज्वळ नावे कालबाह्य झाली आहेत. त्यांच्या जागी आता भाई, देवा अशी नावे, बिरुदे रूढ होऊ लागली आहेत. सत्तेसाठी ज्यांनी आघाडी, युती तोडली त्यांच्या पक्षरूपी घराचे वासे फिरले आहेत. हा नियतीचा सूडच म्हणावा लागेल. ‘माझ्या हाती एकदा सत्ता देऊन तर पाहा’ असे म्हणणाऱ्यांचे ‘मन’ एकीकडे धावत आहे, तर त्यांच्या पक्षाचे ‘इंजिन’ दुसरीकडे धावत आहे. त्यांच्या या धरसोड वृत्तीमुळेच आज त्यांच्या इंजिनाला ‘लोकल’चे डबे जोडले जात नाहीत. तो करारी बाणा, ती निष्ठा त्यांनी जपली असती, तर सत्तेच्या ट्रॅकवर त्यांची एक्स्प्रेस तुफान धावली असती. राजकारणापासून ‘वंचित’ राहणारे आज ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग करू पाहत आहेत. मात्र, ते हे विसरले की, असा प्रयोग यापूर्वी ज्यांनी राबवला ते सत्तेपासून दूर फेकले गेले आहेत. आज सर्वपक्षीय सत्त्व तर हरवून बसलेच आहेत. मात्र, त्यांच्यात स्वबळदेखील राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा युती, आघाडीचा आधार घ्यावा लागत आहे. अर्थात, याला जातपात, गट-तट यात विखुरला गेलेला मतदारदेखील कारणीभूत आहे. वयाची ६४ वर्षे पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रात पंधरावी विधानसभा निवडणूक होत आहे. यात तरुण तुर्कापासून ते ज्येष्ठांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांना कोण असली, कोण नकली हे मतदानातून दाखवून द्यायचे आहे. गटातटापेक्षा सत्तेचा न्यायनिवाडा करायचा आहे. ही पंधरावी विधानसभा मतदारांची सत्त्व पाहणारी आहे. कारण सरकारी तिजोरी रिती करून बहीणभावाचं नात जपता येत नाही. करारी बाणा व तलवार म्यान करून सत्ता हस्तगत करता येत नाही. वय वाढलं म्हणून सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही. घर फोडून सत्तेचा डोलारा टिकवता येत नाही आणि ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणून सत्ता टिकवता येत नाही.
चंद्रशेखर शिंपी
निवासी संपादक, दै. लोकनामा
9689535738