पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह म्हणजे बलात्कार – उच्च न्यायालय
पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरा विवाह म्हणजे बलात्कार – उच्च न्यायालय
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxman Naykude.
Akluj , Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
मुंबई दिनांक 02/09/2023 : पहिला विवाह अस्तित्वात असताना दुसरा विवाह करणाऱ्या एका शिक्षणतज्ज्ञावरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हे कृत्य केवळ पत्नी हयात असताना पुनर्विवाह केल्याच्या गुन्ह्यात येत नाही तर बलात्काराच्या गुन्ह्यातही मोडते,
असे कठोर निरीक्षणही न्यायालयाने यावेळी नोंदविले.
पुणे पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर भारतीय दंडसंहिता ३७६ (बलात्कार) आणि ४९४ (पती/पत्नी हयात असताना पुनर्विवाह करणे) गुन्हा दाखल केला. गुन्हा रद्द करण्यासाठी संबंधित व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्या. नीलेश सांब्रे व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने २४ ऑगस्ट रोजी गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. संबंधित व्यक्ती व दुसरी पत्नी दोघेही शिक्षणतज्ज्ञ आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीचे फेब्रुवारी २००६ मध्ये निधन झाल्यानंतर संबंधित व्यक्ती महिलेच्या घरी तिच्या सांत्वनासाठी जात असे. पहिल्या पत्नीबरोबर आपले जमत नसल्याचे सांगून तिला घटस्फोट दिल्याची खोटी माहिती आरोपीने दुसऱ्या पत्नीला दिली.
जून २०१४ मध्ये दुसऱ्या स्त्रीबरोबर विवाह केल्यानंतर आरोपी जानेवारी २०१६ पर्यंत तिच्याबरोबर राहिला. त्यानंतर तिला सोडून तो पहिल्या पत्नीकडे गेला.
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचे खोटे सांगत केवळ शारीरिक जवळीक साधण्यासाठी विवाहाचे आमिष दाखविण्यात आले, असा आरोप दुसऱ्या पत्नीने केला. आरोपीने खोटी आश्वासने दिली.
पहिला विवाह संपुष्टात आला नसतानाही दुसरा विवाह केला आणि तो सहमतीने करण्यात आल्याचे दाखविण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले. पहिला विवाह अस्तित्वात असतानाही तक्रारदारासोबत ठेवलेले शारीरिक संबंध आयपीसी कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत येते, असे न्यायालय म्हणाले.