जनतेच्या उपकाराची व आशीर्वादाची जाण ठेवणारा नेता म्हणजे रणजितदादा…!!

जनतेच्या उपकाराची व आशीर्वादाची जाण ठेवणारा नेता म्हणजे रणजितदादा…!!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 01/10/2024 : ज्येष्ठ नेते सुशीकुमार शिंदे साहेब यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त मोहिते पाटील परिवाराने जवळपास ३० हजार लोकांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. मोहिते पाटील यांनी हा सत्कार समारंभ आयोजित करून आपले राजकीय संस्कार, वारसा व दिलदारपणाचं दाखवून दिला. त्याची कबूली सत्कारमूर्ती सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी त्यांच्या भाषणात ही दिली. त्यांनी आवर्जून सांगितल की “सोलापूर जिल्ह्याच राजकारण करत असताना माझ्यात व विजयदादा यांच्यात शितयुद्ध चालायचं पण आम्ही कधी राजकीय मर्यादा सोडल्या नाहीत. कधी एकमेकांबद्दल मनात राग धरला नाही. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने मोहिते पाटील परिवाराने माझा जो भव्य सत्कार केला असा सत्कार करायला हि खूप मोठ मन लागत . आपल्या विरोधकांना संपवण्याच सध्या महाराष्ट्रात जे सुडाच व द्वेषाचं राजकारण चालू आहे; त्या राजकारणाला चपराक देणारं व महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची सर्वांना आठवण करून देणारा हा कार्यक्रम ठरला.
या कार्यक्रमात एक भावनिक व हृदयस्पर्शी भाषण झालं ते म्हणजे मोहिते पाटील परिवाराचे कुटुंबप्रमुख मा. रणजितसिंह मोहिते पाटील यांचं. रणजितदादांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द हि चढउताराचीच ठरलेली आहे. पण या संघर्षाच्या काळात दादांनी कधीच संयम सोडला नाही. आपल्या घराण्याचा जनसेवेचा वारसा, संस्कार व विचार यांच्याशी कायम बांधील राहिले. त्यांना त्याची किंमत ही मोजावी लागली पण त्यांनी त्याची फिकीर केली नाही. राजकारणात सत्तेत पद मिळवण्यासाठी सध्या नेतेमंडळी किती लाचारी पतकरतं आहेत हे संपुर्ण महाराष्ट्रात बघतोय; पण या लाचारीच्या व संधीसाधूपणाच्या काळात रणजितदादांनी जो करारीपणा व स्वाभिमान दाखवला आहे; तो सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब यांची आठवण करून देणारा आहे. या स्वाभिमानी बाण्याचा फटका त्यांना राजकारणात बसला पण त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा घेतलेला वसा सोडला नाही. त्याची प्रचिती दादांच्या भाषणात आली. रणजितदादा म्हणाले; ” हा सोलापूर जिल्हा तुमचा व माझा आहे; या जिल्ह्यांच्या विकासाची जबाबदारी तुमची माझी आहे. महाराष्ट्राच्या व सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मला कितीही तडजोडी कराव्या लागल्या तरी मी करेन. मला थांबावं लागेल तर थांबेल. महाराष्ट्राच्या व सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तर हा रणजितसिंह मोहिते पाटील ती किंमत मोजेल पण महाराष्ट्रच्या व सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसू देणार नाही.” आपल्या आजोबा प्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कोणताही त्याग करण्याची व वेळप्रसंगी संघर्ष करण्याची भुमिका रणजितदादांनी घेतली आहे.
मध्यंतरी मोहिते पाटील परिवार थोडा राजकिय पिछाडीवर होता. त्यांनी जेवढे नेते घडवले; ते सगळे त्यांना सोडून गेले. मात्र तीन पिढ्या जनसेवेसाठी अविरत कार्य करीत राहणाऱ्या मोहिते पाटील परिवाराला जनतेने कधीच अंतर दिल नाही. ज्या ज्या वेळी मोहिते पाटील परिवार राजकीय अडचणींत येईल तेव्हा तेव्हा सोलापूर जिल्ह्यातील जनता त्यांच्या पाठीमागे ठाम उभारली आहे. गेली ५० वर्ष विकासाच्या वारसा असलेलं हे घराणं जनतेने संघर्ष काळात टिकवून ठेवलं आहे. जोपर्यंत मोहीते पाटील परीवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत; तोपर्यंत मोहिते पाटील परिवाराची राजकीय ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. हे लोकसभेला धैर्यशील भैय्यासाहेब यांना मिळालेल्या मत्ताधिक्याने सिद्ध झालं आहे .या सर्वांची जाण असणाऱ्या कुटुंब प्रमुख रणजितदादांनी आपल्या भाषणात तमाम जनतेने संघर्षाच्या काळात आशिर्वाद व पाठबळ दिलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जमलेल्या समुदायासमोर कृतज्ञता व्यक्त करतांना रणजितदादांचा कंठ दाटून आला होता. दाटलेल्या कंठाने दादा म्हंटले ” माझ्या अंगावरील कातडी काढून त्याच पायतान करुन जरी तुमच्या पायात घातलं तरी तुमचे उपकार फिटणार नाही .” हे शब्द होते एका जातिवंत नेत्याचे. जो नेता आपल्या जनतेच्या मताची जाण ठेवतो; त्यांच्याप्रती असणारी आपली बांधिलकी विसरत नाही; त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असतो. त्या नेत्याला कोणतही षडयंत्र व कटकारस्थान संपवू शकत नाही. म्हणूनच सत्तेसाठी हपापलेल्या कावळ्यांच्या गर्दीत, आमचा नेता सत्तेत नसून सुध्दा एखादया राजहंसासारखा शोभून दिसतो.
Proud_Of_You_Dada….
~ मिलिंद पाटील.