स्मृती जयांची चैतन्य फुले…’ – मधुकर भावे

स्मृती जयांची चैतन्य फुले…’
– मधुकर भावे
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 22/11/2023 : आयुष्यात मदत केलेल्या सर्वांबद्दल आदराची आणि कृतज्ञातेची भावना आपल्या मनात असतेच. परंतु काही व्यक्तीमत्त्वांना मनाच्या खोल कप्प्यात अत्तरकुपीसारखे जपून ठेवले जाते… त्यात आचार्य अत्रे पहिले. ज्यांनी मिडास राजासारखे, हात लावून माझ्या आयुष्याचे सोने केले. नाहीतर माझ्याजवळ काय होते? त्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, आमच्या ‘लोकमत’चे बाबूजी, प्रिय विलासराव देशमुख, जोधपूरचे विश्वविख्यात धन्वंतरी डॉ. गोवर्धनलाल पाराशर अशी काही व्यक्तिमत्त्वे माझ्या मनाच्या कप्प्यात जपून ठेवली आहेत. आज सर्वांसोबत असलेल्यांमध्ये श्री. शरद पवार, श्रीमती प्रतिभाताई पाटील, श्री. सुशीलकुमार शिंदे, श्री. बाळासाहेब थोरात डॉ. पी. डी. पाटील, श्री. रामशेठ ठाकूर ही व्यक्तिमत्त्वेसुद्धा माझ्यासाठी अत्यंत आदराची आहेत. काही व्यक्तिमत्त्वे रोज सहवासात नसतानाही आपलीशी होतात आणि जीव लावतात.
आज नसलेल्या व्यक्तिमत्त्वामध्ये यशवंतराव चव्हाण हे असे व्यक्तिमत्त्व आहे… २५ नोव्हेंबर रोजी यशवंतरावांची ३९ वी पुण्यतिथी आहे. १२ मार्च १९१३ ते २५ नोव्हेंबर १९८४… तसे पाहिलं तर यशवंतराव अकालीच गेले आहेत. अवघ्या ७१ व्या वर्षीच ते गेले. महाराष्ट्राला पोरकं करून गेले. लोकमान्य टिळकांनंतर त्यांच्या तोडीचा नेता झाला नाही आणि आता होणारही नाही. राजकारणातील भारदस्तपण, विचार, आचार, चारित्र्य, दूरदृष्टी, महाराष्ट्राच्या बांधणीचा मनात तयार झालेला आराखडा… सगळ्यांना सोबत घेवून काम करण्याची सहज असलेली सवय. तोंडातून एकही अपशब्द न उच्चारण्याची सुसंस्कृतता. सारेच काही विलक्षण होते. यशवंतरावांना विरोध झाला नाही, असे नाही. पण, विरोधकांना त्यांनी शत्रू मानले नाही. मित्रच मानले. विरोधी पक्षातील चांगल्या नेत्यांना त्यांनी काँग्रेस पक्षात घेतले. ते वैचारिक भूमिकेने घेतले. धाक-दपटशा दाखवून घेतले नाही. ‘महाराष्ट्राची बांधणी करण्यासाठी तुमची गरज आहे. महाराष्ट्र राज्य झालं त्याचा आनंद आहे… आता तुम्ही या राज्याची बांधणी करायला माझ्यासाेबत या’ ही महाराष्ट्राच्या व्यापक हिताची भूमिका त्यांनी घेतली. शंकरराव मोहिते-पाटील असतील… भाऊसाहेब थोरात असतील… किंवा यशवंतराव मोहिते असतील… या सर्व नेत्यांना यशवंतरावांनी सन्मानाने सोबत घेतले आणि महाराष्ट्राच्या बांधणीचा एक नकाशा डोळ्यांसमोर ठेवला. राज्याला कुठे आणि कसे घेवून जायचे आहे, याची चर्चा प्रथम काँग्रेस पक्षात केली. कार्यक्रम ठरवला. तो कार्यक्रम सरकारला अंमलात आणायला सांगितला. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर भांडण मिटले. महाराष्ट्र उभारणीच्या कामासाठी कामाला झटून सुरुवात झाली. आज डोळ्यासमोर येत आहे ते १९६१ सालचे ऑक्टोबर महिन्यातील महाबळेश्वर येथे झालेले तीन दिवसांचे काँग्रेस शिबीर. कार्यकर्ता तयार व्हायला १० वर्षे लागतात. महाबळेश्वरच्या तीन दिवसांच्या शिबिरातील कृषी-औद्योगिक उद्योगांवर महाराष्ट्राची बांधणी कशी करायची, यावर झालेल्या सहा व्याख्यानातून एकेक कार्यकर्त्याची मानसिक घडण झाली. त्यानंतरच्या २० वर्षांत कृषी औद्योगिक क्रांतीत महाराष्ट्र क्रमांक एक वर हाेता. सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या… सहकाराचे सामर्थ्य आणि त्यातून उभा राहणारा रोजगार… यावर यशवंतरावांनी त्यावेळी केलेले भाष्य… सहकाराचे त्यांनी सांगितलेले पावित्र्य… त्यांचे एक वाक्य होते… ‘सरकार आपल्या हातात असले तरी सरकार हे तोंडी लावण्यापुरतं आहे… मुख्य जेवण सहकार आहे… हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.’
नंतरच्या अवघ्या दोन वर्षांत महाराष्ट्राने जिल्हा परिषदेचा जो प्रयोग केला हा ग्रामीण नेतृत्वाला राजकीयदृष्ट्या सक्षम करणारा सगळ्यात मोठा राजकीय निर्णय होता. गुजरातने त्यापूर्वी (१९६१) जिल्हा परिषद स्थापन केली होती. पण त्यांच्या जि.प.चा अध्यक्ष कलेक्टर होता. यशवंतरावांनी ते प्रारूप अमान्य केले. आणि देशात पहिल्याप्रथम १३ मार्च १९६२ रोजी लोकांनी निवडून दिलेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष खुर्चित बसला. यशवंतराव तेव्हाही म्हणाले होते की, ‘या ग्रामीण नेतृत्त्वाने महाराष्ट्राचे नेतृत्त्व करावे, ही माझी अपेक्षा आहे….’ त्याचा अर्थ असा होता की, ‘उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीही जिल्हा परिषदेच्याच रस्त्याने मुख्यमंत्रीपदापर्यंत येईल.’ अनुभवातून मिळणारे शहाणपण, ग्रामीण प्रश्नाची जाण, ते प्रश्न सोडवण्याचा आवाका या अनुभवावर यशवंतरावांनी हे वाक्य उच्चारले होते त्याप्रमाणेच सुधाकरराव नाईक (१९९१), विलासराव देशमुख (१९९९), आर. आर. आबा(उपमुख्यमंत्री:१९९९) हे नेतृत्त्वनेतृत्त्व ही यशवंतरावांच्या व्यापक दृष्टीकोनाची महाराष्ट्राला मिळालेली देणगी आहे. आणि ते नेतृत्त्व जिल्हा परिषदेतून आलेले आहे.
आणखी एक मोठे काम यशवंतरावांच्या दूरदृष्टीने केले… बारामतीचे गोविंदराव पवार आणि शारदाताई पवार हे घराणे शे.का. पक्षाशी जोडली गेले होते. यशवंतराव चव्हाणांनी त्याच घरातील त्यावेळचे तरुण शरद पवार यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी त्यांच्या मातोश्रींचीच भेट घेतली. ‘हा तुमचा तरुण मुलगा काँग्रेससाठी मला द्या….’ अशी मागणी केली…. एखाद्या वधूपित्याने वराची मागणी करावी, त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा राजकीय संसार यशवंतरावांना अपेक्षित असलेल्या भूमिकेने चालवण्याकरिता शरद पवारांना त्यांनी काँग्रेसमध्ये आणले. मुलासारखे सांभाळले. आणि आज ६० वर्षांनी मागे वळून पाहिल्यानंतर यशवंतरावांच्या बहुसंख्य राजकीय गुणांचा सगळ्यात मोठा समुच्चय शरदरावांच्या व्यक्तिमत्त्वात काठोकाठ भरलेला दिसतो. सुसंस्कृत राजकारण करताना कसं वागावं, कसं बोलावं, हे सगळे धडे पवारसाहेबांनी गिरवले ते यशवंतरावांकडून. त्यामुळे यशवंरावांच्या एकूण कर्तृत्त्वामध्ये शरद पवार यांचे नेतृत्त्व यशवंतरावांकडूनच महाराष्ट्राला मिळाले. या मोठ्या देणगीचाही अत्यंत गौरवानेच उल्लेख करावा लागेल. शरद पवार यांच्या मोतोश्री शे. का. पक्षाच्या होत्या. त्यांची सख्खी बहीण शे. का. पक्षाचे नेते एन. डी. पाटील यांची पत्नी होती. त्यांचे बंधू वसंतराव पवार संयुक्त महाराष्ट्र समितीचे शे. का. प. चे उमेदवार होते. या सगळ्या परिस्थितीत पवारसाहेब काँग्रेसबरोबर राहिले. आज यशवंतराव नाहीत… त्यांच्या तोडीचा नेता नाही. पण, देशाच्या राजकारणातसुद्धा शरद पवार यांच्या तोडीचा सत्तेत नसलेला नेता कोण आहे, तो सांगा… हातात सत्ता असलेले नेते बरेच आहेत. म्हणून ते नेते आहेत…. सत्तेत नसताना जो लोकांमध्ये आहे तो खरा नेता…
यशवंतरावांचा आणखी एक मोठा निर्णय म्हणजे, उद्योगांचे विक्रेंद्रिकरण. आज महाराष्ट्रामध्ये दिसणारे एम. आय. डी. सी. मधील उद्योग ही यशवतरावांची देणगी आहे. मुंबईत जेवढ्या कामगारांना रोजगार आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक रोजगार एम.आय.डी.सी.मुळे ग्रामीण भागात निर्माण झाला आहे. असे यशवंतरावांचे अनेक पैलू आहेत. केवळ विकास नव्हे तर, सुसंस्कृतराज्याला ‘संस्कृतिचा डोळा’ असला पाहिजे, याकरिता त्यांनी ‘साहित्य-संस्कृती मंडळा’ची स्थापना केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे त्याचे पहिले अध्यक्ष. विश्वकोशाचे १८ खंड ही तर्कतीर्थांची महाराष्ट्राला मिळालेली केवढी मोठी बौद्धिक देणगी आहे. यशवंतरावांच्या मैत्रिचा गोतावळाही असा विद्वजनांमध्ये होता. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज सगळे यशवंतराव डोळ्यांसमोर येतात. त्यांच्यासोबतचा प्रवास… चर्चा… त्यांची भाषणे… ‘काय पत्रकार मित्रा, सध्या काय वाचतो आहेस….’ हा त्यांचा प्रश्न… विरोधी पक्षनेते एस. एम. जोशी यांचे विधानमंडळातील एक वर्षाचे विरोधी पक्षनेतेपद संपल्यावर यशवंतरावांचे आभार मानायला एस. एम. गेले तेव्हा यशवंतराव म्हणाले, ‘आण्णा, माझ्याकरिता तुम्ही कायमचे विरोधी पक्षनेते आहात… ’ उद्धवराव पाटील, एस. एम. जोशी यांचा यशवंतराव चव्हाण यांनी केलेला जाहीर सत्कार… असा सुसंस्कृत महाराष्ट्र आता पुन्हा दिसणार नाही. सध्याच्या भरकटत चालेलेल्या महाराष्ट्राने पुन्हा यशवंतरावांच्या सुसंस्कृत पुरोगामी हमरस्त्यावर यायला हवे… नाहीतर हा धटींगणांचा महाराष्ट्र होईल. यशवंरावांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन…
🟠वसंतदादा
१३ नोव्हेंबर रोजी वसंतदादा पाटील यांची १०६ वी जयंती झाली. २० वर्षे त्यांचा सेवक असलेल्या यशवंत हाप्पे यांच्या धडपडीमुळे आणि सांगली वैभव सहकारी बँकेचे अध्यक्ष पाटील यांच्या सहकार्याने जयंती साजरी होऊ शकली. जेमतेम २०० लोक होते. विधानमंडळाच्या आवारातील दादांच्या पुतळ्याला जयंतीदिनी विधानमंडळाकडून अध्यक्ष, सभापती, उपाध्यक्ष, उपसभापती यांच्यापैकी कोणीही एक, पुष्पचक्र अर्पण करावे, असे विधानमंडळाने ठरवलेले आहे. पुतळ्याजवळही ५० माणसे जमली होती. विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुलजी नार्वेकर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी येणार, हा कार्यक्रमही ठरला. त्यांनी कार्यक्रम घेतलाही होता… ते येणार… आता निघाले… आता येतील… असे सांगण्यातही येत होते सव्वा तास वाट पाहून अखेर ‘ते येत नाहीत…’ असा निरोप आला म्हणून उपस्थितांनी दादांना अभिवादन केले आणि कार्यक्रम संपला. वसंतदादा किती मोठा माणूस होता… याची महाराष्ट्राला आज आठवण करण्याची गरज वाटत नाही. आणि विधानसभा अध्यक्षांनी यायचे कबूल करुनही ते आले नाहीत.. हेही चांगले झाले नाही. पण, दादांना त्यामुळे कोणताही उणेपणा येत नाही. दादांवर यापूर्वी लिहले आहे… एकच मुद्दा सांगून हा विषय थांबवतो…
१९७७ साली केंद्रात काँग्रेसचा पराभव झाला. इंदिरा गांधी पराभूत झाल्या. काँग्रेसचे सरकार गेले. महाराष्ट्रात विधानमंडळातील आमदारांनी निवडणुकीतून मुख्यमंत्री निवडावा, ही आग्रही भूमिका घेतली. ‘वसंतदादा विरुद्ध यशवंतराव मोहिते’ अशी मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक झाली. विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून दादा १०१ मतांनी विजयी झाले. त्यांचे अभिनंदन करायला यशवंतराव मोहिते त्यांच्या चेंबरमध्ये आले. अभिनंदन केले. आणि लगेच निघाले. दादांनी हाक मारली. ‘अहो भाऊ, कुठे चाललात? बसा… निवडणूक संपली… भांडण संपले… पण, भांडण नव्हतेच… मी जिंकलो… पण, तुम्ही हरलात असा त्याचा अर्थ नाही… महाराष्ट्राला तुमची गरज आहे. उद्याच्या मंत्रीमंडळ शपथविधीला तुम्ही यायचे आहे… तुम्हाला मी सहकारमंत्री करणार आहे…’ आणि दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी वंसंतदादा मुख्यमंत्री आणि यशवंतराव मोहिते यांचा कॅबिनेटमंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यांना दादांनी सहकार खाते दिले….
१९८० च्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्याविरुद्ध शालिनीताई पाटील काँग्रेस उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या. निवडणूक अटीतटीची झाली. शेवटच्या चार दिवसांत वसंतदादांना असा अंदाज आला की, कदाचित गडबड होऊ शकेल… दादांनीच खाजगी मित्रांना सांगितले की, ‘शालिनीबाई पराभूत झाली तरी चालेल… पण साहेब (यशवंतराव) पराभूत होता कामा नयेत…’ शेवटच्या चार दिवसांत चक्रे फिरली. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत यशवंतराव चव्हाण शालिनीताईविरुद्ध फक्त २० हजार मताच्या फरकाने निवडून आले.
१९७८ साली वसंतदादा यांचे सरकार.. किसन वीर, शरद पवार यांच्या पुढाकाराने पडले. शरदराव मुख्यमंत्री झाले. १९८८ साली राज्यात नेतृत्त्व बदल करताना वसंतदादांनी आघाडी उघडली की, ‘आताच्या घडीला राज्याच्या नेतृत्त्वापदी शरदराव असले पाहिजेत’… मंत्रालयासमोरील बी.४ या बंगल्यात शरद पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी जी मोहिम केली गेली त्याचे नेतृत्त्व दादा करत होते. मनाने दादा किती मोठे होते… हे समजून घ्यायला या दोन-तीन घटना पुरेशा आहेत.
🟣बाबूजी
शनिवार दिनांक, २५ नोव्हेंबरला ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्री. जवाहरलाल दर्डा (आमचे बाबूजी) यांची २६ वी पुण्यतिथी आहे. बघता-बघता २५ वर्षे कशी गेली… समजले नाही. बाबूजींबद्दल अनेक समज-गैरसमज पसरवले गेले. पण या व्यक्तिमत्त्वाला आयुष्याची तब्बल २७ वर्षे मी खूप जवळून न्याहाळले आहे. पाहिले आहे… समजून घेतले आहे… बाबूजी हे एक विद्यापीठ होते. न बोलता कामे करणारा हा नेता होताच… पण, विचारांशी किती प्रामाणिक राहता येते, हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. स्वातंत्र्यसैनिक होते. ‘ते स्वातंत्र्यसैनिक नाहीत’ असा आरोप विधानमंडळात झाला… शांतपणे बाबूजींनी सगळे आरोप सहन केले. अध्यक्षांनी विचारले, ‘तुम्ही खुलासा का करत नाही?’ बाबूजींनी तेवढ्याच शांतपणे उत्तर दिले… ‘आरोप करणारे जे कोणी आहेत त्यापैकी कोणीही स्वातंत्र्य संग्रामात नव्हते… त्यांना मी स्वातंत्र्य संग्रामात १८ माहिने शिक्षा भोगली आहे, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही… ’ बाबूजींचे साधेपण त्यांच्या विचारांत होते. ते सरकारात मंत्री होते.. पण, ते मंत्री असताना ‘लोकमत’मध्ये सरकारविरुद्ध लिहिण्याची वेळ आली तर त्यांनी मला संपादक म्हणून सांगून ठेवले होते की, ‘बातमी सत्य असेल तर पहिल्या पानावर छापा… मी सरकारात आहे.. ‘लोकमत’ सरकारात नाही…’ बाबूजींच्या या उत्तराने त्यांच्यामधील कणखर पत्रकार पुरेपूर पाहता आला. काँग्रेससोबतची त्यांची निष्ठा त्यांनी कायम ठेवली. पक्ष न बदलणारे जवळपास ते एकटेच होेते. आयुष्यभर खादी वापरत राहिले. राष्ट्रीय विचार, सर्वधर्म समभाव, लोकशाही या संबंधात त्यांची भूमिका स्पष्ट होती. त्यांच्यामुळे मी ‘लोकमत’ चा समूह संपादक झालो, हे मी कसे विसरू शकतो?
पत्रकारितेवर त्यांची निष्ठा होती. असे वृत्तपत्र दाखवा…, जे पाक्षिक म्हणून जिल्हा पातळीवर सुरू झाले… मग साप्ताहिक झाले… मग दैनिक होवून महाराष्ट्रात क्रमांक १ चे वृत्तपत्र झाले. हे फक्त बाबूजींनी करून दाखवले. (चिपळूणच्या नाना जोशी यांनी तालुका पातळीवर ‘सागर’ दैनिक सुरु करून कोकणापुरता विक्रम केला आहे.) बाबूजींना कशाचाही अहंकार नव्हता. हजारो लोकांना त्यांनी मदत केली. पण डाव्या हाताचे उजव्या हाताला कळले नाही. ते आरोग्य मंत्री असताना शेकडो रुग्णांना त्यांनी बाँम्बे हॉसि्पटलमध्ये ॲडमीट करून घेतले… त्यांची बिले त्यांनी स्वत: भरली. या कानाचे त्या कानाला सांगितले नाही… अनेकांना माहितीही नाही. सरकारी रुग्णालयात ते सहज पाठवू शकले असते…
यशवंतरावांनी एकदा बाबूजींना विचारले, ‘आम्ही सह्यादी आणि नागपूरचे महाराष्ट्र यात लाखो रुपये ओतले… पण आमचे वृत्तपत्र बंद करावे लागले. तुमच्या यशाचे रहस्य काय?’ बाबूजी म्हणाले, ‘ रहस्य सांगायचे नसते… पण तुम्हाला सांगतो… मी माझे वृत्तपत्र पाच वर्षांत फक्त दोन महिने पक्षासोबत ठेवतो बाकी सर्व लोकांसोबत ठेवतो. त्यांच्या प्रश्नांसोबत असतो…’ गेली २५ वर्षे स्मृतिदिनी यवतमाळला जाताना बाबूजी सतत समोर येत असतात.
बाबूजींना अभिवादन…
🟢डॉ. गोवर्धनलाल पाराशर
११ नव्हेंबरला डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांची पहिली जयंती होती. दिवाळी सणातच ११ नोव्हेंबर आल्यामुळे, जयंतीचा कार्यक्रम १७ नोव्हेंबरला जोधपूर येथे झाला. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते डॉ. पाराशर यांच्या अर्ध पुतळ्याचे लोकार्पण झाले. राजस्थानात विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे आचारसंहिता आहे. कार्यक्रम कुटुंबापुरताच मर्यादित होता. पण, मी मुद्दाम गेलो होतो. मला झालेल्या एका छोट्या अपघातात माझ्या कमरेची दबलेली नस मला सहा महिने घरात जखडून ठेवून होती. बसता-उठता येत नव्हते. अनेक दिग्गज डॉक्टर झाले. दोन मित्रांच्या ओळखीने डॉ. पराशर यांना प्रथम भेटलो तेव्हा अवघ्या दहा मिनिटांत त्यांनी दबलेली नस त्यांच्या धन्वंतरी विद्येने ठीक केली. विश्वास बसणार नाही… असा तो उपचार होता. त्यानतंर त्या परिवाराचा सदस्य असल्यासाखाच मी त्या परिवाराशी जोडला गेलो आहे. तीन वर्षांत १४ वेळा जोधपूरला गेलो. उपचारासाठी नाही… तिथे गेल्यावर जणू ऊर्जा मिळते. महाराष्ट्रात आरोग्य शिबीरे आयोजित केली. सामान्य माणसांना या ॲस्टिओपॅथीचा फायदा झाला पाहिजे म्हणून श्री. अशोक मुन्शी आणि श्री. किशोर आग्रहारकर या मित्रांच्या प्रयत्नांतून पाराशर हिलिंग सेंटर मालाड येथे उभे राहिले.
डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्या ‘अंगठ्याची कमाल’ महाराष्ट्राला लेखातून सांगितली. असा धन्वंतरी मी पाहिला नाही. विना गोळी, विना ऑपरेशन, विना एक्स-रे, विना एम.आर.आय… डॉक्टरांच्या अंगठ्यांतील जादू विलक्षण होती. त्यांची ‘जयंती’ साजरी करावी लागेल, असे कधीच वाटले नाही. गेल्या वर्षी ११ नोव्हेंबरला त्यांचा ६६ वा वाढदिवस केवढ्या आनंदात साजरा केला होता. नियतीचा खेळ भयंकर आहे. २१ मार्च २०२३ रोजी सहा सेकंदाचा जबरदस्त ॲटॅक त्यांना आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली. वज्राघात झाला. पण, त्यांचे डॉक्टर बंधू डॉ. नंदकुमार… दोन सुपूत्र… डॉ. गिरीराज आणि डॉ. हेमंत आणि त्यांची सगळी डॉक्टर टीम यांनी खचून न जाता, त्याच जिद्दीने जोधपूरच्या रुग्णालयात १०० रुपयांत हे उपचार चालू ठेवले आहेत. मी जोधपूरला का जातो? हजारो रुग्णांना रडत येताना पाहतो… उपचार करून परत जाताना ते हसत हसत जात आहेत… हे मी डोळ्याने पाहतो आहे… याचा आनंद वेगळा आहे.
पुतळा लोकार्पण समारंभ फक्त कौटुंबिक होता… तरीही नितीन गडकरी आले. त्यांनी डॉ. गोवर्धनलाल पाराशर यांच्याकडून उपचार घेतले होते… त्यांना आराम पडला आहे. कृतज्ञाता म्हणून ते आले. जोधपूरचे खासदार शेखावतसाहेब… आता ते जलस्त्रोत मंत्रीही आहेत… शिवाय जोधपूरच्या महाराजांचे १९ वे वंशज सध्याचे महाराज, जोधपूरच्या काँग्रेसच्या महापैार कुंतीबेन याही उपस्थित होत्या. खासदार शेखावत यांनी एक वाक्य सांगितले, ‘कुछ साल पहिले जोधपूर की पहाचान जोधपूर के राजा-महाराजोंके नाम पर होती थी… अभी दुनिया को जोधपूर की पहचान होती हैं… डॉ. गोवर्धनलालजी पाराशर इनके नामसें…’
खासदारांच्या त्या वाक्याला पूरा परिवार आणि श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. गोवर्धनलाल पाराशर यांच्या उपचाराची शक्ती विलक्षण होती. रुग्णाला ते सहज म्हणायचे, ‘आपको कुछ नही हुआ… दस मिनट में ठीक हो जाओगे…’ प्रथम त्यांच्या शब्दानेच अर्धे बरे वाटायचे, आणि अर्धे उपचारानंतर. असे हजारो रुग्ण त्यांनी दहा मिनिटांत दुरुस्त केले.
त्यांना आदरांजली.