ताज्या घडामोडी

रानभाजी – चुका

रानभाजी – चुका
शास्त्रीय नाव : Rumex Vesicarius
कूळ : पॉलीगोनेसी
मराठी नाव : चुका, आंबट चुका
इंग्रजी नाव : ब्लॅडर डॉक सॉरेल
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/वृत्त एकसत्ता न्यूज
संग्राहक : प्रविण सरवदे/ आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 17/9/ 2024 : चुका ही वनस्पती ओसाड जमिनी मध्ये वाढलेली दिसते. तसेच काही ठिकाणी शेतात, बागेत लावली जाते. ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते. या वनस्पतीचे मूळ स्थान पश्चिम पंजाब असून, ती भारताबरोबरच अफगाणिस्थान, पर्शिया व उत्तर आफ्रिकेत आढळते.
खोड – ताठ, उंच वाढणारे, खोडाच्या तळापासूनच फांद्या तयार होतात.
पाने – साधी, एकाआड एक, २.५ ते ७.५ सेंमी लांब, विशालकोनी, लंबवर्तुळाकार, अंडाकृती, हृदयाकृती किंवा शराकृती. पाने, फांद्या, खोड मांसल, थोडेसे जाडसर असते.
फुले – लहान, हिरवट पिवळसर, काही वेळा फुलांना व फळांना गुलाबी छटा. फुले द्विलिंगी, नियमित, पानांच्या बेचक्यातून किंवा फांद्यांच्या टोकांवर येणाऱ्या लांब पुष्पमंजिरीत येतात. पाकळ्या सहा. पुंकेसर पाच ते आठ. बीजांडकोश त्रिकोणी, एक कप्पी.
फळे – लहान, त्रिकोणी, साधारण पंखधारी, पाकळ्यांनी झाकलेली. बिया एक ते दोन, तांबूस रंगाच्या. सहा पाकळ्या पैकी बाहेरील तीन पाकळ्या वाळून पडतात. आतील तीन पाकळ्या फलधारणेनंतर आकाराने मोठ्या बनतात व फळा भोवती झाकल्या जातात. जानेवारी ते मार्च महिन्यात या वनस्पतीला फुले व फळे येतात.

औषधी उपयोग
# ही औषधी वनस्पती असून, पाने व बिया औषधात वापरतात. ही वनस्पती खूप आंबट, विरेचक (मलातील गाठी मोडणारे), दीपक, शीतल, शोथघ्न व वेदनास्थापन गुणधर्माची आहे.
# ही वनस्पती हृदयाच्या आजारावर, छातीत दुखणे, बद्धकोष्ठता, प्लीहारोग, उचकी, उदरवायू, दमा, श्वासनलिका दाह, अपचन, वांती व मूळव्याध अशा विकारांवर, रोगांवर उपयुक्त आहे.
# ही वनस्पती मांसपाचक म्हणून शीघ्र काम करणारी व लोह विरघवळणारी आहे.
# ही पित्तजनक आहे. वानशूल, गुल्म, प्लीहा व अदावर्त विकारांत उपयोगी आहे.
# श्वासकास, अरुची व अजीर्ण यात ही इतर औषधांसह वापरतात.
# खरूज, कोड, विंचूदंश व गांधीलमाशी यासारख्या विषारी प्राण्यांच्या चावण्यावर, दंशावर वापरतात.
# शिसारी प्रतिबंध आणि भूकवर्धक हे गुणधर्म या वनस्पती मध्ये आहेत.
# डोकेदुखीवर चुका व कांद्याचा रस चोळावा.
# चुक्याची पाने शीत, सौम्य विरेचक आणि मूत्रवर्धक आहेत.
# पानांचा रस दातदुखीवर उपयुक्त आहे. ही दाहशामक म्हणूनही वापरतात.
# चुक्याच्या बिया शीत व पौष्टिक आहेत. बिया भाजून आमांशात देतात. चुका पचननलिकेच्या रोगात वापरतात. सुजेवर चुक्याची पाने वाटून त्याचा लेप करतात.

भाजीचे औषधी गुणधर्म
# भाजी तयार करण्यासाठी चुक्याची पाने, कोवळ्या फांद्या व खोड वापरतात. ही भाजी आंबट गोड असून, वातदोष कमी करते. पचनास हलकी असून, जेवणास चव आणणारी आहे. भूक लागत नसल्यास किंवा भूक लागूनही जेवण जात नसल्यास चुक्याच्या भाजीमुळे भूक लागते, जेवण जाते आणि पचनक्रियाही सुरळीत होते. ही भाजी थंड असल्याने हातापायांची जळजळ, मूत्रमार्गाचा दाह, आदी उष्णतेच्या विकारात भाजीचा उपयोग होतो.
# ज्यांना आतड्यांमध्ये, जठरामध्ये गरम दाह जाणवतो व उलट्या होतात, अशा रुग्णांनी चुक्याची भाजी नियमितपणे खावी.
# आमांश (ॲमॉबियॉसिस) या विकारात अन्न न पचताच पातळ मलाबरोबर बाहेर पडते व शरीराचे पोषण नीट होत नाही, अशा वेळी चुक्याची भाजी खाल्ल्याने अन्नपचन नीट होते व मल बांधून होतो व चांगला गुण पडतो.
# चुका भाजी वांग्याच्या भाजीत मिसळून केल्यास अतिरोचनी म्हणजेच अतिशय रुचकर लागते, म्हणून चुक्याचे पर्यायी नाव ‘रोचनी’ असे आहे.

१) पाककृती
# साहित्य – चुका वनस्पतीची कोवळी पाने व फांद्या, शेंगदाणे, हरभरा डाळ, लसूण, कांदा, आले, हिरव्या मिरच्या, तेल, जिरे, मीठ इ.
# कृती – चुक्याची भाजी स्वच्छ धुऊन कांड्यासहित बारीक चिरावी. शेंगदाणे व हरभरा डाळ एकत्र करून कुकर मध्ये बोटचेपी शिजवून घ्यावी. आले, लसूण ठेचून घ्यावे. कढई मध्ये तेल घालून, जिऱ्याची फोडणी करून त्यात आले लसूण व बारीक चिरलेली मिरची घालावी. चिरलेला चुका, मग शिजवलेली डाळ व शेंगदाणे घालावेत. नंतर मीठ घालून मंद आचेवर दहा मिनिटे भाजी शिजू द्यावी. मधून मधून भाजी हलवावी.
२) पाककृती
# साहित्य – चिरलेली चुका भाजी, गाजर फोडी, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चिरलेल्या लसूण पाकळ्या, तिखट, मीठ, हळद, हिंग, जिरे, तेल इ.
# कृती – कढईत तेल घेऊन तेलात जिरे व हिंग घालावे. त्यात लसूण व मिरची घालून लाल झाल्यावर गाजरे व हळदपूड घालावी. नंतर चिरलेली भाजी घालावी. मीठ घालून भाजी शिजवावी. झाकण ठेवू नये. थोडे तिखट घालून परतून भाजी काढावी.
३) पाककृती
# साहित्य – चिरलेला चुका, तुरीची डाळ, चिरलेल्या मिरच्या, आले लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, सुके खोबरे, धने, खसखस, जिरेपूड, फोडणीचे साहित्य तेल, गूळ, मीठ इ.
# कृती – चुका, मिरच्या, तुरीची डाळ एकत्र शिजवून घोटावे. फोडणीत कांदा, टोमॅटो परतावा. लसूण आले पेस्ट, घोटलेली भाजी, खोबरे, धने व खसखस यांचा एकत्र वाटलेला मसाला, जिरेपूड, मीठ घालून उकळावे. नंतर गूळ घालून भाजी खाली उतरावी.
४) चुक्याची चटणी
# साहित्य – निवडून धुतलेली चुक्याची पाने, मीठ, हिरव्या मिरच्या, साखर, कोथिंबीर इ.
# कृती – सर्व साहित्य एकत्र घेऊन पातळसर वाटावे. यामध्ये थोडे दाण्याचे कूट घालावे, यामुळे चटणीला वेगळीच चव येते.
५) मेथी-चुका मिश्र भाजी
# साहित्य – दोन वाट्या प्रत्येकी चिरलेली चुका व मेथी, एक वाटी तूरडाळ, हिरव्या मिरच्या, लसूण, गूळ, हिंग, मीठ, तेल, मोहरी इ.
# कृती – दोन्ही भाज्या स्वच्छ धुवाव्यात. तेलावर हळद व हिंग घालून तूरडाळ घालावी. हिरव्या मिरच्या तुकडे करून घालाव्या. मेथी व चुका घालून सर्व एका डब्यात घालून कुकर मध्ये शिजवावे. नंतर चांगले घोटावे. मीठ, गूळ घालून उकळावे व वरून लसूण ठेचून केलेली खमंग फोडणी द्यावी.

संदर्भ : ऍग्रोवन/डॉ. मधुकर बाचुळकर
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button