ताज्या घडामोडी

माझी लेक डॉ.मृदुलाने साकारला बालगणेश

माझी लेक डॉ.मृदुलाने साकारला बालगणे

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क/ वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे                          मुंबई दिनांक 6 सप्टेंबर 2024 :
आज माझी लेक डॉ.मृदुला हिच्याबद्दल लिहिताना मला माझ्या भावना काबूत ठेवणे कठीण होत आहे. गेली २२ वर्षे डाॅ. मृदुला नेत्र विशारद म्हणून यशस्वी झालेली आहे. ती एम. बी. बी. एस. झाली. पुढे पुणे विद्यापीठातून डी. ओ. एम. एस. झाली… त्याच विषयात एफ. आर. सी. एस. झाली आणि घरी अभ्यास करून तिने एम. बी. ए.चा एक नवीन विषय हाताळून पहिल्या वर्गात यशस्वी झाली. तिचे हॅस्पिटल, तिच्या पेशंटची ॲापरेशन्स, याखेरीज तिला दिवसभरात वेळ मिळत नाही. मात्र तिच्यामध्ये एक अभिजात कलावंत दडलेला आहे. त्याची चुणूक तिने अधून-मधून दाखवली… त्यावेळी आश्चर्य वाटले होते की, ही कला तिने कुठून आत्मसात केली? तिच्या ठाण्यातील घरात नवीन प्लॅस्टर आणि रंगकाम करण्याचे काम सुरू होते तेव्हा, तिने एक हार्डबोर्ड आणून त्याच्यावर भिंतीला लावली जाणारी पुट्टी थापून घेतली. ती काय करणार आहे, हे काहीच समजत नव्हते. आणि त्यातूनच तिने अष्टमीची चंद्रकोर तयार केली.

आजही घरातील बाहेरच्या खोलीत ती चंद्रकाेर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण, परवा तिने कमाल केली.
एक खोका आणला… त्याचे ती काय करणार होती, हे काहीच सांगितले नव्हते. मी दोन दिवस कराड-सातारा येथे कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथून परत आलो तर त्या पुठ्ठ्याच्या खोक्यापासून तिने एक सुंदर मंदिर तयार केले होते. त्याला तिने नंतर गोल्डन स्प्रे केला. आणि मग म्हणाली, ‘यंदा गणपती या मखरमध्ये बसवायचा…’ मी म्हटलं, ‘गणपती कुठून आणणार?’ ती म्हणाली, ‘बाबा, मीच करणार…’ आणि रात्री दोन-दोन वाजेपर्यंत जागून तिने बाल गणेशाची मूर्ती साकारली. तिच्यामधील या सुप्तगुणांची मला कल्पनाही नव्हती. ती आज ५३ वर्षांची आहे. या ५३ वर्षांतील तिच्या जीवनात अनेक संकटावर मात करून, तिने नेत्र विशारद म्हणून स्वत:ची एक प्रतिमा निर्माण केली आहे. ठाण्यातील डॅा. राजेश्वरजी मोघेकर हे तिचे नेत्र शस्त्रक्रियेतील गुरू. त्यांच्याच रुग्णालयात ती काम करते. तिने आता नेत्र विशारद म्हणून स्वत:ची एक ओळख निर्माण केलेली आहे. तिच्यामध्ये दडलेला एक कलावंत गेल्या १५ दिवसांत मला अधिक प्रभावीपणे पाहता आला. यापूर्वी तिने भिंतीवर लावण्यासारख्या काही प्रतिमा बनवल्या होत्या. पण, मध्ये खूप वर्षे निघून गेली… आणि गेल्या आठ दिवसांत अचानक तिने पुन्हा दोन अप्रतिम कलाकृती निर्माण केल्या.


प्रत्येक बापाला आपल्या लेकीचे कैातुक असतेच… आणि असायलाच हवे… अनेकवेळा आपल्या मनाची घुसमट होत असते. त्या घुसमटीत आयुष्यातील काही दु:ख व्यक्तही करता येत नाहीत आणि आनंदाच्या आणि कैातुकाच्या क्षणी बापाला एकदम मोहरूनही जाता येत नाही. आज माझी तीच अवस्था आहे. माझ्या आयुष्याच्या संध्याकाळी मावळतीचा सूर्य मी पाहात आहे. तरीही खंबीरपणे उभे राहून दिवसातील १० तास काम करताना माझी कन्या मला काळजीपूर्वक जपत आहे. तिच्यातील कलावंताचे कैातुक मी शाबासकी देवून केलेही. पण, जाहीरपणे सांगितल्याशिवाय राहवत नाही, म्हणून मी लिहित आहे…. आणि ते फोटोही प्रसिद्ध करत आहे. मला हे माहिती आहे की, हे तिला आवडणार नाही… माझे राजकीय लेखन, माझे साहित्य हा विषय घरात अगदी वेगळा आहे.
‘डाेळा’ हा विषय सोडला तर आणि तिचा आवडता कुत्रा लिओ, तिचे आवडते मांजर टिटू… तिचे पेशंट आणि तिचे डॅाक्टरांचे फ्रेंडसर्कल यात ती खूष आहे… अशा प्रसिद्धीची तिला अजिबात सवय नाही…. आणि आवडही नाही… ती माझ्यावर रागवेल, हे मला नक्की माहिती आहे… पण आयुष्याच्या संध्याकाळी प्रेम करणारी माणसं थोडी असली तरी, रागावणारे कोणीतरी हवेच ना…. तिच्या त्या रागातही एक वेगळा आनंद मला वाटणार आहे.
मला तिसरी इयत्तेत एक कविता होती…
‘ताई गुणाची… माझी छकुली…’
गेले आठ दिवस माझ्या मनात तेच गाणे मी गुणगुणत आहे.
शनिवारी गणपतीबाप्पाच्या दर्शनाला जरूर या…


मधुकर भावे 9869239977

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करु नये.