रानभाजी – उंबर

रानभाजी – उंबर
शास्त्रीय नाव : फायकस रेसिमोसा
कुळ : मोरेसी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक : प्रविण सरवदे / आकाश भाग्यवंत नायकुडे
दिनांक 24 ऑगस्ट 2024 :
उंबराचे झाड हे सदापर्णी वृक्ष आहे. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात. या पानांचा आकार लांबट असतो. तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात. हे झाड साधारणपणे ४० ते ४५ फूट उंच असते. या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी, तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. उंबराचे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो. शिवाय ते अधिक प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही. उंबर हेच याचे फूल. उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. उंबरात किडे असतात.
औषधी उपयोग
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.
वैशिष्ट्ये व वापर
उंबराची सावली अतिशय शीतल असते. झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते स्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण मान्यता आहे. याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होतो. सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते. रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.
उंबराची पाककृती
# साहित्य – पाव किलो उंबराची कच्ची फळे, ३-४ लसूण पाकळया, एक मोठा कांदा, २ मिरच्या, धनापूड पाव चमचा, जिरे फोडणीसाठी, ८-१० काळीमिरी, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी मोहरीचे तेल.
# कृती – उंबराची फळं स्वच्छ धुवून कापून घ्यावीत. त्यानंतर ती उकडून घेऊन व्यवस्थित कुस्कुरुन घ्यावीत. वरील सर्व मसाल्याची सामग्री वाटून घ्यावीत. त्यानंतर कढईत मोहरीचे तेल गरम करावे. या तेलात कांदा फोडणीला टाकावा. त्यानंतर त्यात उंबराची कुस्करलेली फळे घालावीत. त्यात गरम मसाला घालावा आणि १० मिनिटं मंद आचेवर शिजू द्यावी. गरम पोळी किंवा भाताबरोबर ही भाजी उत्तम लागते.
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण