ताज्या घडामोडी

रानभाजी – हादगा

रानभाजीहादगा

शास्त्रीय नाव : सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा
कूळ : फॅबेसी

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संग्राहक:आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 4ऑगस्ट 2024 :
हादग्याच्या वृक्षांची लागवड घराच्या परिसरात, तसेच शेतीच्या बांधावर करतात. हादग्याचा वृक्ष ३० फुटा पर्यंत सरळसोट वाढतो. हा वृक्ष जलद वाढतो, पण त्याचे आयुष्यमान कमी असते. खोड व फांद्या नाजूक व ठिसूळ असतात. फांद्या खोडाच्या वरील भागात पसरणाऱ्‍या व खाली झुकलेल्या असतात. हादग्याला ‘अगस्ता’ असेही म्हणतात.
*पाने – संयुक्त, एकाआड एक, १५ ते ३० सेंमी लांब. पर्णिकेच्या १० ते ३० जोड्या.
*फुले – लंबगोलाकार आकारांनी मोठी, अनियमित, द्विलिंगी, पांढरी, पिवळट पांढरी किंवा लालसर रंगाची, पानांच्या बेचक्यातून येणाऱ्‍या लहान पुष्प मंजिरीत येतात. पुष्पकोश ५ संयुक्त दलांनी बनवलेला. पाकळ्या ५, असमान व अनियमित. मोठी पाकळी ६ ते १० सेंमी लांब. दोन पाकळ्या मध्यम आकाराच्या व दोन पाकळ्या लहान, तळाशी साधारण चिकटलेली. पुंकेसर १०, एकमेकांस चिकटून दोन पुंकेसर नलिका तयार होतात. बीजांडकोष लांब, गोलाकार, चपटा, एक कप्पी.
*औषधी उपयोग – ◆हादग्याच्या खोडाची साल, पाने व मूळ औषधात वापरतात. साल फार ग्राही आहे. पाने अनुलोमिक व शिरोविरेचन आहेत. मूळ उष्णवीर्य, वातहर, कफघ्न व शोथघ्न आहे. फुले दीपन व आनुलोमिक आहेत. ◆फुलांची भाजी उपयुक्त आहे. फुफ्फुस सुजून ज्वर, कफ ही चिन्हे असतात, अशा वेळी हादग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानातून किंवा तिचा अंगरस मधा बरोबर देतात, त्यानंतर घाम येतो व कफ पडावयास लागतो.
◆पाने ठेचून व्रणावर बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते. ◆ज्वर, डोळेदुखी, धुंदी यामध्ये पानांच्या रसाचे नस्य करतात, त्याने पुष्कळ पाणी वाहते. ठेचाळलेल्या भागावर पानांचा लेप करतात. ◆दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात. संधिशोथात मुळाचा लेप करतात.
*भाजीचे फायदे – ◆हादग्याची फुले चवीला थोडी कडवट, तुरट असतात. त्याचा पाक तिखट असतो. फुले गुणाने थंड आहेत, त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्या करिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो. ◆चार चार दिवसांनी थंडी वाजून येणाऱ्‍या तापावर हादग्याच्या फुलांची भाजी उपयुक्त आहे. ◆वरचेवर होणाऱ्‍या सर्दीचा त्रास या भाजीच्या तिखट गुणधर्माने कमी होतो. ◆भूक लागत नसल्यास, पोट साफ होत नसल्यासही हादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो. ◆ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते, अंगावरून कमी जाते, पाळीच्या दिवसांत कंबर ओटीपोटी दुखते अशा तक्रारी या भाजीच्या सेवनाने कमी होतात. ◆‘अ’ या जीवनसत्त्वा अभावी रातांधळेपणा निर्माण होतो. यामध्ये रोग्यास संध्याकाळ झाली की दिसावयाचे पूर्णपणे बंद होते, अशा वेळी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो. ◆हादग्याच्या फुलांच्या भाजीने जेवणात रुची निर्माण होते. शेंगांचीही भाजी करतात
*१) पाककृती – फुलांची भाजी
◆साहित्य – हादग्याची फुले, कांदा, लसूण, ओली मिरची, हिंग, जिरे, तेल इ.
◆कृती – फुले स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. कढईत तेल घेऊन चिरलेला कांदा त्यात भाजून घ्यावा. नंतर त्यामध्ये लसूण, जिरे किंवा जिरे पावडर, ओली मिरची घालून परतणे आणि नंतर चिरलेली भाजी घालून परतणे व शिजवून घेणे.
*२) पाककृती – फुलांची भाजी
◆साहित्य – हादग्याची फुले, भिजवलेली मूगडाळ, कांदा, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, गूळ, तिखट, भाजलेले खोबरे व खसखस इ.
◆कृती – फुले स्वच्छ धुऊन ती बारीक चिरावीत. फोडणीत भिजवलेली मूगडाळ, चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. नंतर त्यावर चिरलेली फुलं टाकून परतावीत. शिजत आल्यानंतर मीठ, गूळ, तिखट, खोबरे घालून तीन चार वाफा आणाव्यात. कांदा आवडीनुसार घालावा. तयार झालेल्या भाजीत भाजलेले खोबरे व थोडी भाजलेली खसखस घालावी.
हीच भाजी शिजवल्यानंतर वरून थोडे डाळीचे पीठ लावून परतूनही तयार करतात.
*३) पाककृती – फुलांचे भरीत
◆साहित्य – हादग्याची फुले, दही, मीठ, साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर, तूप, जिरे इ.
◆कृती – प्रथम फुले चिरून उकडून घ्यावीत. फुलां मध्ये मीठ, साखर घालावी व वरून फोडणी द्यावी. फोडणीत मिरची तुकडे घालावेत.
*४) पाककृती – फुलांच्या देठाचे सांडगे
◆साहित्य – हादग्याच्या फुलांचे देठ, दही, धने-जिर पूड, मीठ इ.
◆कृती – हादग्याच्या फुलांचे देठ काढावेत. या देठांचे सांडगे छान होतात. आंबट दह्यात धने-जिरे पूड व मीठ घालून ते चांगले कालवावेत व त्यात देठे बुडवून ती उन्हात वाळवावीत. पुन्हा दोन दिवसांनी तशीच दोन वेळा पुढे घ्यावीत व ती कडक वाळवून तळण्यासाठी वापरावीत. फुलांची भजीही करतात.
*५) पाककृती – शेंगाची भाजी
◆साहित्य – हादग्याच्या कोवळ्या शेंगा, चिरलेला कांदा, तेल, मीठ, तिखट, ओले खोबरे, कोथिंबीर इ.
◆कृती – कोवळ्या शेंगांचे लहान तुकडे करावेत. ते नीट निवडावेत. कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यावा. निवडलेल्या शेंगांचे तुकडे, मीठ, तिखट घालावे व परतावेत. आवश्यकते प्रमाणे पाणी घालवून शिजवावे. गरज वाटल्यास मसाला घालावा. भाजी तयार झाल्यानंतर त्यावर किसलेले ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
संदर्भ : विकासपीडिया/डॉ. मधुकर बाचुळकर

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button