दर पाडून दूध उत्पादकांची दररोज 25 कोटी रुपयांची लूट

दर पाडून दूध उत्पादकांची दररोज 25 कोटी रुपयांची लूट
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64
🔰 आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/06/2024 :
खाजगी व सहकारी दूध डेअरी चालक यांचे नेतृत्व करणाऱ्या राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने नेहमीच शेतकरी विरोधी भूमिका घेतली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना स्थान दिले जात नाही आणि सरकार देखील दुधाबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही. दूध विषयक धोरण ठरविणाऱ्या समित्यांमध्ये शेतकरी किंवा दूध उत्पादक प्रतिनिधींचा समावेश केला जात नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली दुध संघ चालवायचा आणि शेतकऱ्यांचीच लूट करायची हे आता चालणार नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली दूध व्यवसाय थाटणाऱ्या डेअरी लॉबीने दुधाचे दर पाडलेले आहेत आणि त्यातूनच दररोज 25 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची लूट केली जात आहे याची आणि दूध दर पाडापाडी प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करावी अशी मागणी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नाराजीचा फटका मतपेटी द्वारे मारलेला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असा जाहीर इशारा शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी प्रसिद्धी माध्यमा द्वारे दिलेला आहे.
“आम्हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना भीक नको, हवे घामाचे दाम!,
दुध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा बेस रेट किंमत जाहीर करा आणि भावांतर योजनेतील प्रति पलिटर 17 ते 19 रुपये डायरेक्ट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी जमा करा. गाईच्या दुधासाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर 48 रुपये तर म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 58 रुपये दर मिळावा. पशुधनासाठी चारा छावण्या उघडाव्यात. कृषी विद्यापीठाने दुधाचा उत्पादन खर्च काढलेला आहे त्यावर आधारित दुधाचे दर लागू करण्यासाठी शासनाने आदेश द्यावेत इत्यादी मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. पशुसंवर्धन मंत्र्यांनी आधी गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये दर देण्याचे जाहीर केले होते त्यानंतर पुन्हा 34 रुपये दराचा आदेश काढण्यात आला. असे का? याचीही चौकशी करावी अशी ही मागणी त्यामध्ये नमूद केलेली आहे. दूध दर अनुदानाची रक्कम थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अनुदानाची रक्कम कोणत्याही संस्थेला दिल्यास आंदोलन उभारू अथवा न्यायालयात जाऊ असा सज्जड इशारा शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.