बारामतीच्या सुनेत्राताई पवार नव्या खासदार असतील ?

बारामतीच्या सुनेत्राताई पवार नव्या खासदार असतील ?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64.
अठराव्या लोकसभा निवडणुकीची सांगता येत्या चार जूनच्या निकालानंतर होत आहे. पण या निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या चित्त थरारक लढती आहेत त्यामध्ये बारामतीचा समावेश आहे. आजपर्यंत या मतदारसंघातून पवार कुटुंबाची विशेषतः शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांची एकहाती मक्तेदारी होती. कालांतराने ही मक्तेदारी त्यांच्या सुकन्या विद्यमान खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांची तीन निवडणुकीत राहिली अर्थात या मक्तेदारीचा सारा भार राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वाहून घेतला होता. पण आता या निवडणुकीत सर्व फासे उलटे पडले असल्याने अजितदादा पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई पवार याच अखंड राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आपले नशीब अजमावत आहेत तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच चुलत भावजय सुप्रियाताई या आहेत. त्यामुळे एकीकडे जितका पैशाचा धूर निघत आहे तितकाच जाळ दूसरीकडे निघत आहे. परिणामी या लोकसभा मतदारसंघातील मतदारांची यंदाच्या सात मे ला चांगलीच चांदी झाली आहे आता चार जूनला निकाल हा सुनेत्राताई यांच्या पारड्यात जाईल असा माझा राजकीय अंदाज आहे.
बारामतीच्या लोकसभा मतदारसंघात बारामती , इंदापूर , पुरंदर , भोर , दौंड आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी पुरंदर , इंदापूर , भोर आणि दौंड हे चार मतदारसंघ निवडणूकीच्या पंधरा दिवस अगोदर तिढयातले होते पण या चारही मतदारसंघांत भाजपचे चाणाक्य व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल चातुर्य दाखवत हा तिढा सोडवला अर्थात यासाठी पराकोटीचा संयम अजितदादा पवार यांनी दाखवला, म्हणून तर पुरंदरचे माजी आमदार दादा जाधवराव यांच्यासह माजी मंत्री विजयराव शिवतारे यांच मतपरिवर्तन झाले. त्यामुळे पुरंदरचा मतदारसंघ सुनेत्राताई यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. जी परिस्थिती पुरंदरची तिच परिस्थिती इंदापूरची होती तिथं तर अजितदादा आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वितुष्ट सर्वज्ञात होत तरीसुद्धा हर्षवर्धन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे दादांशी चांगलच जुळवून घेत आमदार दत्तामामा भरणे यांच्या हातात हात घालून प्रचारात कमालीची आघाडी घेतली ती मतदान संपता दिसून आली .
त्यामुळे या मतदारसंघातून सुनेत्राताई यांना मोठी आघाडी मिळेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही किंबहुना ही आघाडी उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक आघाडी असेल इतकं चांगलं वातावरण आहे .
दौंड मध्ये तर आमदार राहुल कुल व सौभाग्यवती कांचन कुल या दाम्पत्याचा प्रचार पाहता या मतदारसंघातून सुनेत्राताई यांना बारामतीच्या तोडीसतोड इतकं पसाभर मताच दान मिळणार आहे. भोरमध्ये मात्र काॅंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच शेवटपर्यंत तळ्यात मळ्यात असल्याने या ठिकाणी सुनेत्राताई यांच्या मतात काही अंशी घट होण्याची शक्यता आहे कारण आमदार संग्राम थोपटे आणि त्यांचे पिताश्री माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचा शरदचंद्र पवारसाहेब यांच्या कुटुंबीयांचा राजकीय संघर्ष परंपरागत आहे. तरीही मताची भिक मागण्यासाठी दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेब यांनी थोपटेंच्या घरी पाय धूळ झाडली खरी पण त्यातून काही हाती लागेल अशी अजिबात खात्री नसली तरी या मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांच्या पारड्यात मतांची चांगली बेगमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात अजितदादा यांनी हा मतदारसंघ काही वाऱ्यावर सोडून दिला असा काही प्रकार नव्हता. तरीही इथे मात्र सुनेत्राताईं पेक्षा सुप्रियाताई यांना चांगल मताधिक्य मिळेल हे त्रिकालाबाधित सत्य आहे .
आता राहता राहिला पुणे शहरालगतचा खडकवासला मतदारसंघ. हा मतदारसंघ जवळपास पुण्यातच असल्याने येथे भाजपचे चांगलेच प्राबल्य आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुणे जिल्हाचे मागील अनेक वर्षांपासून पालकमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क या मतदारसंघात असल्याने येथून सुनेत्राताई यांना मतांची मोठी आघाडी मिळू शकते. कारण मागच्या निवडणुकीत खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मतात कमालीची घसरण झाली होती. म्हणून त्यांनी मागील काळात या मतदारसंघात चांगलाच जनसंपर्क वाढवला होता याचा फायदा निश्चित त्यांना होणार असला तरी मतपेटीतून सुनेत्राताईंना मतांचा मोठा गठ्ठा मिळेल अशी आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान परिस्थिती त्यामुळे काही केल्या सुनेत्राताई या सुप्रियाताई यांच्यापेक्षा काकणभर नाही तर चांगल्याच उजव्या ठरतील. परिणामी त्यांचा विजय हा आता केवळ एक औपचारिकता असेल असे वाटत असले तरी दोन्ही बाजूंनी लक्ष्मी दर्शनाचा भलताच लाभ या सहा विधानसभा मतदारसंघातील बहुतांश मतदारांना झाला की जे मतदार कायमच कोणतीही निवडणूक आली की लक्ष्मीची पावले ओळखून आपली झोळी भरली की मगच मतदान केंद्रावर आपल्या मतांच्या माध्यमातून आकडा वाढवतात हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही , तर असो आता चार जूनला नक्की काय घडते ते पाहू कारण या निकालावरच महाराष्ट्राच पुढचं राजकारण कसं असणार आहे याची प्रचिती येईल म्हणून तर काकांनी वर्षानुवर्षाचे विरोधक असणाऱ्या पुरंदरचे दादा जाधवराव तर बारामतीचे पृथ्वीराज जाचक , चंद्रराव तावरे आणि संभाजीराव व बाबालाल काकडे कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली हे कशाचे द्योतक आहे.
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक
🔰 संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.