ताज्या घडामोडी

महाराष्ट्रातील सत्तातुरांना भाजपचा दे धक्का

महाराष्ट्रातील सत्तातुरांना भाजपचा दे धक्का

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 11/03/2024 :
काल काय ऐकलं ते खरं आहे का ॽ यापेक्षा आज सकाळी काय झालं तेच खरं आहे त्यामुळे आपण आता अती सावधान स्थितीत राहून भाजपच्या लोकसभेतील विजयी रथावर स्वार होऊन महाराष्ट्रातील सत्ता अबाधित ठेवली पाहिजे अन्यथा ‘तेलही गेलं आणि तूपही जाऊन हाती मात्र धुपाटणे येईल ‘ याचा विचार करण्याची वेळ सध्याच्या सत्ताधारी गटावर विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर आली आहे , भाजपच हे धक्कातंत्र अती घातक आहे कारण ते आता काही केल्या केंद्रातील सत्तेसाठी अजिबात तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यामुळेच तर त्यांनी हरियाणाच्या खुर्चीला लाथ मारत दुष्यंत सिंह चौटाला यांनाच लोकसभा निवडणुकीतील सौदेबाजीवरून जसा जोरदार धक्का दिला तसाच मनोहरलाल यांच्या अंतर्गत असलेल्या दंडेलशाहीचा तो राजकीय अंत आहे परिणामी या निमित्ताने महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तिकडमबाजी आता पुरती ओसरली असावी असे वाटते .
शिवसेना आता आपलं बळ दाखवायला लागली आहे त्यामुळे त्यांचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी उसणे अवसान आणून आमचे चाळीस आमदार आहेत म्हणून भाजपच्या एकशे पाच आमदारांना सत्तेचा फायदा मिळत आहे नाहीतर त्यांना सत्तेपासून वंचित राहावे लागले असते अशी पोपटपंची केली होती , पण भाजप सत्तेसाठी अजिबात भुकेला किंवा कंगालखोर झालेला नाही असा जाता जाता नाही तर थेट इशारा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा कथानकातून देण्यात आला आहे , आता भाजप दुष्यंत सिंह चौटाला यांना चक्क गुडघ्यावर रांगायला लावत यदाकदाचित लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी करत तर नाही ना अशी शंका येते पण तस काही दिसत नाही म्हणून तर खट्टा खट्टरांना दूर करत त्याठिकाणी सैनी यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची बहाल करण्यात आली .
हरियाणाची ब्लुप्रिंट महाराष्ट्रात होईल का ॽ याच उत्तर येणारा काळच देईल पण अगदी तंतोतंत तशीच अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ शकते अर्थात जर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या निमित्ताने अशीच काहीशी ताठर भूमिका राहिली तर भाजप महाराष्ट्रातील सरकारमधून अगदी अलगदपणे बाहेर पडून सहा महिने अगोदर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवू शकते , मग याचा परिणाम अथवा दुष्परिणाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाला भोगावा लागू शकतो म्हणून संजय शिरसाट , रामदास कदम , संजय बनसोडे तसेच अती उतावीळ असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कोल्हेकुई लागलीच थांबली पाहिजे नाहीतर यांची पाचावर धारण बसेल यात काही शंका नाही .
हरियाणात आज मनोहरलाल खट्टर सरकार अचानकपणे पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल कारण अतिशय शुल्लक होत त्या राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत सिंह चौटाला यांना लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर समझोता करताना वाढीव दोन जागा हव्या होत्या पण त्या देण्यासाठी भाजपचे चाणक्य तयार नव्हते म्हणून एकवेळ सरकार कोसळलं तरी बेहत्तर पण या जागा द्यायलाच भाजपचा तीव्र विरोध होता परिणामी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि आता दुष्यंत सिंह चौटाला यांना चक्क गुडघ्यावर बसून रांगण्याची वेळ आली आहे , जर तशीच अवस्था आली तर महाराष्ट्रात सुध्दा हाच प्रयोग होऊ शकतो म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या बगलबच्यांना वेळीच अवर घालावा नाहीतर चाळीसीत असणाऱ्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला आगामी काळात पन्नाशी सुध्दा गाठता येणार नाही मग सत्तेचा विचार तर फारच लांबची गोष्ट आहे त्यामुळे जे पदरात पडतय ते ‘ पदरी पडल अन् पवित्र झालं ‘ म्हणून स्विकाराव नाहीतर तेलही जाईल आणि तूपही जाऊन हाती मात्र धुपाटणे येईल हे अती शहाण्यांनी वेळीच ओळखायला हवं
नाही का ॽ
अर्थात हरियाणाच्या राजकारणात जातीय समीकरण साधण्यासाठी इतर मागासवर्गीय समाजातील नायब सिंह सैनी यांचा आजच लगोलग मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला , सैनी हे कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून मागील निवडणुकीत तब्बल साडेतीन लाख मतांनी निवडून आले होते तर मागील चार वर्षांपूर्वी यापूर्वी ते मनोहरलाल खट्टर यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते .
लोकसभा निवडणुकीत जागांचा तट निर्माण करणारे दुष्यंत सिंह चौटाला यांना शह देण्यासाठीच त्यांचे चुलते असणाऱ्या रणजित सिंह चौटाला यांना मंत्रिपद देण्यात आले वास्तविक हरियाणात सरकारमध्ये अदलाबदल का झाला याच तात्पर्य माझ्या दृष्टीने एकच असू शकतो तो म्हणजे एकतर दुष्यंत सिंह चौटाला यांचा अहंकार जसा कमी करणं तसाच तो याच राज्यात शेतकरी आंदोलन आक्रस्ताळेपणा करत असताना त्यातील आंदोलकांचा बंदोबस्त करण्यात मनोहरलाल खट्टर हे बऱ्यापैकी कुचकामी ठरत होते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

राजाभाऊ त्रिगुणे
सातारा .
दिनांक – १२/०३/२०२४ .
पत्रकार, जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button