ताज्या घडामोडी

एक एक करत अक्षरेच बाद केली तर अर्थाचा घोटाळा होईल.

  • एक एक करत अक्षरेच बाद केली तर अर्थाचा घोटाळा होईल.

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 98 60 95 97 64

अकलूज दिनांक 02/03/2024 :
आपल्या वर्णमालेतले ‘ष’ हे अक्षर(ही) अलीकडे अनेकांना खुपू लागले आहे. नागरी लिपीच्या वर्णमालेतून ऋ ,ॠ, लृ, ङ, ञ यांबरोबरच ‘ष’ हे अक्षर वगळण्याचे प्रयत्न चाललेले दिसतात. मराठीतल्या काही प्रकाशकांनी छापलेल्या मुलांसाठीच्या अंकलिपीतून ङ आणि ञ ही दोन अक्षरे अनावश्यक ठरवून गाळूनही टाकली आहेत! हा चुकीचा पायंडा आहे. ‘ष्’ हा एक स्वतंत्र ध्वनी आहे; उच्चार आहे. मूर्धन्य स्थानचा हा संघर्षी उच्चार / ध्वनी (रिट्रोफ्लेक्स् फ्रिकेटिव्) आहे. हे झाले त्याचे वर्णन. थोडक्यात सांगायचे तर हा ध्वनी ट, ठ, ड, ढ, ण आणि ळ ह्यांच्या पट्टीतलाच ध्वनी / उच्चार आहे. (तसा ‘र’ हाही मूळचा तिथलाच म्हणजे मूर्धन्य ध्वनी आहे.)
‘एक उच्चार = एक अक्षर’ आणि ‘एक अक्षर = एक ध्वनी’ या ब्राह्मीतल्या आणि नागरी लिपीतल्या मूळ नियमानुसार ‘ष’ हे अक्षर ब्राह्मीत अगदी सुरुवातीपासून अस्तित्वात आले. नंतरच्या काळात ब्राह्मीची ग्रंथलिपी, शारदा, मलयाळम्, तेलुगू, कन्नड, बंगाली, उडिया आदी अनेक प्रादेशिक वळणे तयार झाली. भारतातल्या या सर्व प्रादेशिक लिप्यांमध्ये ब्राह्मी/नागरीतली सर्व अक्षरे समाविष्ट झालेली होती.
अगदी अलीकडे सुलभीकरणाच्या नि उच्चारानुसारी लेखनाच्या नावाखाली नागरी लिपीतली बरीच अक्षरे गाळली जात आहेत. याबाबत उत्साही लोक म्हणतात की ‘सर्वसामान्य माणसे ह्या अक्षरांचे उच्चार वेगळे करत नाहीत, म्हणून ही अक्षरेच लिपीतून बाद करावीत. ‘श’ आणि ‘ष’ यांचा उच्चार एकच प्रकारे केला जात असेल, तर ‘ष’ हवाच कशाला? रु नि रू असताना मग ऋ नि ॠ कशाला हवेत?’ हा युक्तिवाद तर्कदुष्ट असला, तरी घातकही आहे. याच तर्कानुसार, सर्वसामान्य लोक ‘साही सक्कं सत्तेचाळीस’ म्हणतात म्हणून गणितात ते ग्राह्य मानायचे की सर्वसामान्यांचे पाढे सुधारायचे, असा प्रश्न विचारता येतो. अर्थात, पाढे सुधारायचे, हे प्रश्नावरील उत्तर आहे. त्याचप्रमाणे लिपीबाबतही प्रबोधन करणे हेच उत्तर असू शकते. ऋ, ॠ, लृ, ङ, ञ, ष हे उच्चार आपल्या भाषाबांधवांना नीटपणे शिकवायचे, अक्षरे गाळायची नाहीत!
मध्यंतरी कटकचा एक पत्रकार भेटला होता. तो म्हणाला की, ‘हल्ली आम्ही उडिया लिपीतला ऋषी या शब्दातला ऋ बाद केला आहे.’
‘मग तुम्ही ऋषी शब्द कसा लिहिता,’ मी त्याला विचारले.
‘हल्ली आम्ही उडिया भाषेत ऋषी हा शब्दच वापरत नाही, मुनी वापरतो,’ पत्रकार विजयी मुद्रेने उत्तरला.
‘अच्छा,’ मी म्हटले, ‘पण ऋषी कपूरबाबत बातमी द्यायची झाली तर तुम्ही काय करणार? ऋषी कपूरला मुनी कपूर म्हणणार का,’ मी विचारले. पत्रकार विचारात पडला.
आपण एक एक करत अक्षरेच बाद केली तर अर्थाचा घोटाळा होईल. मूळ शब्दांशी असलेले नाते लुप्त होईल. लेखनात अराजकता माजेल. हिंदी, बंगाली, तमिळ, कन्नड अशा सुप्रतिष्ठित भाषिकांनी आपल्या लिप्यांबाबत असे आततायी निर्णय घेतलेले नाहीत, शब्द गाळले नाहीत की अक्षरे बाद केली नाहीत. आपणही असा आत्मघात करू नये.
जगातल्या भाषांचा नि लिप्यांचा इतिहास पाहिला तर अशा तऱ्हेच्या – उच्चार नि अक्षरे ह्यांच्या संदर्भातल्या अडचणी उर्दू, फारसी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन वगैरे भाषिकांनाही आल्या तेव्हा त्यांनी आपल्या लिपीतली अक्षरे गाळली नाहीत, तर प्रसंगी नव्या अक्षरांची भरच घातली. उदाहरणार्थ उर्दूत ड़, ढ़, फ्रेंचमध्ये w, k, q, ç इंग्लिशमध्ये w, q, c इत्यादी. आपल्या भाषाबान्धवांच्या विशेष शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची सोय केली. जगात भाषांच्या नि लेखनाच्या संदर्भात काय काय घडले, कोणाला काय अडचणी आल्या, त्यांनी त्या कशा सोडवल्या ह्याचा विचार मराठी भाषिकांनी अभ्यासला तर योग्य मार्ग नक्कीच दिसेल. आततायीपणा होणार नाही.
दुसरा मुद्दा आहे, तो ‘ळ’ चा. बहुतेक मराठी भाषिकांचा समज असतो, की ‘ळ’ हा ध्वनी (रेट्रोफ्लेक्स, लॅटरल स्टॉप) फक्त मराठीत आहे. ‘ळ’ अक्षर असलेली मराठी ही जगातली एकमेव भाषा आहे, असे सांगणारेही भेटत असतात. संस्कृतात ‘ळ’ अक्षर नाही हे खरे; पण अभिजात संस्कृतहूनही जुन्या असलेल्या ऋग्वेदाच्या वैदिक भाषेत ‘ळ’ आहे. ऋग्वेदाची सुरुवातच ‘अग्निमीळे पुरोहितम्’ अशी आहे. (ऋग्वेद काळातला ळ यजुर्वेदात ‘ड’ होतो. मराठीच्या विदर्भ बोलीतही ‘ळ’चा ‘ड’ होतो.) इतर तीन वैदिक भाषांमध्ये (यजुर्वेदीय, अथर्ववेदीय, सामवेदीय) आणि अभिजात संस्कृतात ळ् ध्वनि नसला, तरी प्राकृत नि बऱ्याच आधुनिक भाषांमध्येही तो आहे. खुद्द भारतातच मराठीखेरीज गुजराती, राजस्थानी, पंजाबी, हरियाणवी, उडिया, कन्नड, तेलुगू, तमिळ, मलयाळम् या भाषांमध्ये ळ् ध्वनी आहे. तमिळ आणि मलयाळम् भाषांमध्ये ‘ळ’चे स्पर्श (स्टॉप) आणि घर्ष (फ्रिकेटिव्) असे दोन्ही प्रकार आहेत.
युरोपातल्या भाषांमध्ये ‘ळ’ नसला, तरी आशियातल्या इतर अनेक भाषांमध्ये ‘ळ’ ध्वनी प्रचुरतेने आढळतो. चीनमध्ये चिनी परिवारातल्या सात प्रमुख भाषा आहेत. (चीनमध्ये तिबेटी, उग्य्हूर, कज़ाक वगैरे अनेक भाषा आहेत, पण त्या वेगळ्याच परिवारातल्या.) चिनी परिवारातल्या मुख्य भाषा अशा – मन्दारिन्, यूए (कॅन्टनीज़), शिआङ्, मिन्, गान्, वू, हाका.
विशेष म्हणजे या सातही भाषांमध्ये ‘ळ्’ हा ध्वनी येतो. ‘ळ्’ हा ध्वनि जगातल्या कोणत्याही भाषेत शब्दाच्या सुरुवातीला येत नाही हे त्याचे जागतिक वेगळेपण आहे. ळ् ध्वनि असलेल्या या भाषा बोलणाऱ्यांची संख्या चीनमध्ये १२० कोटींहून अधिक आहे. भारतात ‘ळ्’ असलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे ५० कोटी आहे. काही अभ्यासकांचा दावा असतो की ‘ळ्’सह सारे मूर्धन्य (रेट्रोफ्लेक्स) ध्वनी द्रविडी भाषांमध्येच येतात / असतात; पण ‘ळ’चा हा विस्तार पाहता तो मुद्दाही गळून पडतो. मूर्धन्य ध्वनी ही काही तथाकथित द्रविडी भाषांची मक्तेदारी नाही. वैदिक नि संस्कृत भाषांमध्ये ‘र्’ हा ध्वनीही मूर्धन्य आहे. दक्षिण अमेरिकेत पैराग्वेतल्या ‘ग्वाराणी’ भाषेत खणखणीत ‘ड्’ नि ‘ण्’ हे दन्तमूलीय (अल्व्हेलर) ध्वनी वापरात आहेत.
‘ष’ आणि ‘ळ’ या अक्षरांच्या निमित्ताने आपण आपल्या भाषांकडे कसे पाहतो याचा विचार करायला हवा. आपल्या भाषेचा उत्कर्ष आपल्याच हाती असून, तिचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. आपल्या बोली महत्त्वाच्या आहेतच. भाषा आणि संस्कृती यांचे थेट नाते असल्याने बोलीभाषा टिकविणे गरजेचे आहे. मात्र, बोली भाषांचे संवर्धन म्हणजे प्रमाण भाषेला विरोध असे नाही. त्यामुळे प्रमाण उच्चारांचे शिक्षण किंवा प्रशिक्षण सर्व शिक्षकांना देऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत झिरपेल यासाठी व्यापक प्रयत्न हवेत. सर्वच भाषाप्रेमींनी ह्या कामात मदत करावी. हे काम फार अवघड नाही; पण ते आपोआप होणारे नाही. आपण सर्वांनी ते प्रामाणिकपणे नि नित्यनेमाने करायला पाहिजे! मराठीचा उत्कर्ष म्हणजे मराठी भाषिकांचा उत्कर्ष; म्हणजे आपलाच!

अविनाश बिनीवाले
(लेखक भाषाशास्त्राचे अभ्यासक आहेत)

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button