माढा लोकसभा मतदार संघात कुणाचे पारडे जड,,,,?

विशेष संपादकीय……✍️
माढा लोकसभा मतदार संघात कुणाचे पारडे जड,,,,?
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.
🔷अकलूज येथील ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक ऍड. अविनाश टी. काले यांच्या लेखाचा सुसुत्र घोषवारा संपादकीय सदरी घेत आहोत – संस्थापक संपादक.
अकलूज दिनांक 06/02/2024 :
पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे (राखीव )2008 साली विभाजन करून दोन मतदार संघ बनवले गेले आणि त्याची पुनर्रचना होऊन सोलापूर लोकसभा (राखीव)बनला तर माढा लोकसभा मतदार संघ हा (ओपन ) बनला, पहिल्याच टर्म मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी ही निवडणूक लढवली. त्यांचे विरोधात उभे असलेले तत्कालीन आ. सुभाष बापू देशमुख भाजपा यांचा दारुण पराभव या निवडणुकीत झाला.
याचे कारण माढा मतदार संघातील बहुतेक तालुके हे काँग्रेसच्या विचारधारेच्या प्रभावात होते आणि शरद पवार यांचे विरोधात जाण्याची प्रज्ञा बहुतेक नेतृत्वात शोधून ही सापडत नव्हती. 2014साली याच मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यांचे विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन नेते व आजच्या रयत शेतकरी संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली , त्यांची उमेदवारी या मतदार संघात नवखी असताना ही मोहिते पाटील यांना विरोध करण्याची भूमिका घेतलेले व या एकाच मुद्द्यावर सहमती असलेले विरोधी व स्व पक्षातील नेत्यांनी ही त्यांना खुले आम मदत केली. परंतु जनतेचे प्रेम आणि नेतृत्व म्हणून असलेला विश्वास या आधारे विजयसिंह मोहिते पाटील निवडणुकीत विजयी झाले.
2019साली तिकीट वाटप करताना दुसऱ्या टर्म साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोहिते पाटील यांना पूर्णतः डावलण्याचा प्रयत्न करीत नव्या उमेदवाराची चाचपणी सुरू केली. आणि याच प्रयत्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मोहिते पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाला व त्याचे रूपांतर पक्ष त्याग करून मोहिते पाटील भाजपा मध्ये गेले.
राजकीय दृष्ट्या कोणतीही अट न घालता त्यांनी भाजपा चा स्वीकार केला. परंतु पडद्या आड कोणती गणिते शिजली हे ज्ञात नाही परंतु ही उमेदवारी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना मिळाली. या काळात या मतदार संघात राजकीय दृष्ट्या अनेक बदल
झाले आणि अनेक नेते भाजपात गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आ. संजय शिंदे यांच्या खांद्यावर आली. आणि ही उमेदवारी त्यांनी लढवली.
परंतु त्यांचे दुर्दैव हेच राहिले की मोहिते पाटील यांना विरोध म्हणून त्यांनी ज्यांना जवळ केले होते त्यांनी ही त्यांचे मित्रत्व सोडून भाजपा शी घरोबा केला. परिणामी माळशिरस तालुक्यात भाजपला विरोध करू शकेल असा राजकीय दृष्ट्या प्रभावी गट च शिल्लक राहिला नव्हता
या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून खा. रणजितसिंह निंबाळकर हे निवडून आले. लोकसभा निवडणुकीत भाजप समवेत असलेले उत्तमराव जानकर यांना माळशिरस राखीव मधून भाजपची उमेदवारी प्राप्त झाली नाही. तद्वत ती मोहिते पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्याला ही प्राप्त झाली नाही. कदाचित बाहेरचा उमेदवार (जो दोन्ही गटाचा नाही) तो दिला तर तसेच समर्थन मिळेल असा अंदाज पक्षाने बांधलेला असेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यातून पुढे आलेले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून गणले गेलेले राम सातपुते यांना माळशिरस विधान सभा (राखीव)चे तिकीट मिळाले. अर्थात विधान सभा तिकीट प्राप्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन लोकसभा निवडणुकीत भाजपाशी जुळवून घेणाऱ्या उत्तमराव जानकर यांनी पक्ष बदलत एक संघ राष्ट्रवादी बरोबर जुळवून घेत या पक्षाची उमेदवारी घेतली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील पडत्या पावसात घेतलेली सभा आणि त्यांच्या मागे उभे राहिलेला मराठा मतदार व पवार यांना मानणारा मतदार उत्तमराव जानकर यांच्या कडे वर्गीकृत झाला. त्या मुळे खुद्द आ. राम सातपुते यांना अत्यल्प मताने विजय मिळवता आला. आजची स्थिती पाहिली तर असे दिसते की खा. रणजितसिंह निंबाळकर याचे सुत पूर्वी प्रमाणे मोहिते पाटील विरोधकांशी जुळते आहे. ज्यात आ. संजय शिंदे , आ. बबनराव शिंदे आणि उत्तमराव जानकर यांचेशी त्यांचे नाते आहे. राजकीय पटलावर आ. शहाजी बापू पाटील आणि आ. जयकुमार गोरे हे ही उत्तमराव जानकर यांचेशी मैत्री भाव ठेवत असतील तरीही सत्ता कारणात ते भाजपा निष्ठ असल्याने आत्ता फक्त मैत्री भावाचे भूमिकेतून ते व्यापक सत्तेचे फायदे सोडून मोहिते पाटील यांना विरोध करतील च अशी शक्यता मला तरी वाटत नाही. माढा लोकसभा मतदार संघातील हे बदल व्यवस्थितपणे लक्षात घेतले तर सत्ता स्पर्धा हेच मूळ कारण आपला शत्रू आणि मित्र निर्माण करताना दिसत आहे. सत्ता स्पर्धे मुळे खा. रणजितसिंह निंबाळकर हे मोहिते पाटील विरोधकांशी समन्वय ठेवतात तर याच सत्ता कारणामुळे आ. राम सातपुते हे मोहिते पाटील यांचेशी जवळीक ठेवतात. ज्यांचा डी एन ए मोहिते पाटील विरोधक म्हणून विकसित झाला असे छोटे गट भजपात ही सक्रिय असल्याने ते ही मोहिते पाटील यांना विरोध असल्याचे दर्शवतात व त्यांचे स्वतःचे स्वंतत्र राजकारण चालू ठेवतात. ज्यांच्या मतदारांचे पॉकेट कांही हजारात आहे असे ही नेते राज्य कार्यकारणीवर असल्याने हे चित्र मोठे भासते परंतु प्रत्यक्षात तो विरोध कडवा म्हणून टिकेल असे मला तरी वाटत नाही. याच मतदार संघातील माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक हे भाजपा निष्ठ असल्याने व मोहिते पाटील यांचेशी त्यांचा तितका कडवा विरोध न राहिल्याने शिंदे गट वगळता फारसा विरोध प्रत्यक्षात दिसण्याची किंवा वास्तवात उतरण्याची शक्यता कमी आहे.
हा झाला राजकीय रचनेचा भाग.
पण इथल्या सर्वसामान्य मतदारांना काय वाटते ? हा खरा प्रश्न आहे.
माढा मतदार संघात माण व फलटण हे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. हे सातारा जिल्ह्यातील आहेत. तर करमाळा , माढा ,पंढरपूर तालुक्यातील कांही भाग, सांगोला , माळशिरस असे मतदार संघ सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
आज अजितदादा गटातील प्रमुख नेते माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचा कडवा विरोध हा खा. रणजितसिंह निंबाळकर यांना आहे. आणि चुकून झालेल्या चुकीची सजा मतदार संघ भोगत असल्याची त्यांनी केलेली स्पष्टोक्ती हेच दर्शवते की ते कसल्याही परिस्थितीत खा. रणजितसिंह निंबाळकर यांना मदत करणार नाहीत. शिंदे , गोरे आणि जानकर या गटाच्या आधारे ते भाजपा ची उमेदवारी टिकवू पहात आहेत इतकाच याचा अर्थ आहे.
पण त्या नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहिल्या तर विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार गट भाजपा शी स्पर्धा करून उत्तमराव जानकर यांना तिकीट बहाल करू शकेल काय? याचे उत्तर नकारार्थी आहे. भाजपा कडून ही मिळणार नाही ते अजितदादा गटा कडून ही मिळणार नाही मग त्यांचे पर्याय काय राहतील? हा संशोधनाचा भाग असेल. व संभाव्य सत्ता स्पर्धा विचारात घेतली तर त्यांना विरोधी पर्याय निवडावे लागतील. जे पर्याय आ. संजय शिंदे आ बबनराव शिंदे स्वीकारणार नाहीत. म्हणून पक्षीय राजकारणात उत्तमराव जानकर यांचे राजकारण हे बेस लेस झाले आहे व त्यांचा वापर ज्याचे त्याचे सोईनुसार सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील मतदाराचा जो मानसिक कल अनेक मुलाखती पाहिल्या नंतर हाच दिसतो की शेवट च्या टप्प्यात विकास कामे आणि मोठ मोठाले प्रोजेक्ट याची उद्घघाटने मतदारांना आकर्षित करत नाहीत. सर्व सामान्य मतदारात तुम्ही किती मिसळता ? त्यांच्या छोट्या छोट्या समस्या सोडवणुकीसाठी तुम्ही किती वेळ देता ? तुमचा संपर्क सहज सुलभ आहे की अती दुर्लभ? मतदार आणि कार्यकर्ता याचेशी तुमचे नाते आणि भावनिक बंध जुळलेले आहेत काय? अश्या अनेक बाबी मतदान निच्छित करतात.
मोहिते पाटील यांच्या राजकीय शक्तीला कुमकुवत करण्यासाठी अनेक छोटे मोठे गट एकत्रित आले. तत्कालीन स्व पक्षातील उच्च स्तरीय नेतृत्वाचे कान भरून त्यांनी रसद आणि आशीर्वाद ही प्राप्त करून घेतले. पण मोहिते पाटील यांच्या समकक्ष एकमुखी पर्यायी नेतृत्व विकसित करण्यात हे गट अपुरे पडले. परिणामी सोलापूर जिल्ह्याचा एकत्रित विकासाचा मार्ग खडतर बनला आणि त्याची कटू फळे आज सोलापूर जिल्हा भोगत आहे.
“माकडांच्या समूह शक्ती ने सिंहांना बाजूला सारले पण या मर्कटलीला ने मतदार संघातील गावांना काय मिळाले”? हाच प्रश्न मतदार विचारताना दिसत आहेत.
सहकारी चळवळीचे आणि आज ही अस्तित्वात असलेले कार्यकर्त्यांचे व्यापक जाळे , गाव पातळी पासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेल्या नेतृत्वाचे पाठबळ हे मोहिते पाटील यांच्या मागे उभे राहताना दिसत आहे. उच्च नेतृत्वाशी पक्षांतर्गत सबंध ठेवण्याची क्षमता असलेले नव्या पिढीतील नेतृत्व म्हणून आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि गाव पातळी पासून जिल्हा पातळीवर नेतृत्व म्हणून मातीत पाय रोऊन उभे राहिलेले धैर्यशिल मोहिते पाटील ही जोड गोळी जिल्ह्यातील अनेक समस्या सोडवण्याची क्षमता राखून ठेवतात. आणि म्हणूनच ही उमेदवारी बहुमताने जिंकण्याची ही ते क्षमता ठेवतात. भाजपा ने केंद्रीय मंत्री नारायण राणे ते विखे पाटील यांना जो न्याय दिला तोच न्याय मोहिते पाटील यांना ही द्यावा अशी अपेक्षा मतदार करत आहेत. जी चूक एक संघ राष्ट्रवादी काँग्रेस ने करून स्वतःचे अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून घेतले तीच चूक भाजपा ने करू नये. पक्षाशी इमान ठेऊन समर्पित भावनेने काम केल्याची सजा मिळणार असेल तर मग सोईनुसार जो तो वागेल त्यातून पक्ष स्थिर होत नाही ना पक्षाचे राजकारण स्थिर राहते. ही बाब भाजपाचे वरिष्ठ विचारात नक्कीच घेतील. आमच्या घरातील उमेदवार म्हणून मी धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या उमेदवारी कडे पाहतो. म्हणूनच विना शर्थ त्यांचे उमेदवारी चे समर्थन ही करतो.
माढा लोकसभा मतदार संघातील मतदार या नात्याने आम्ही घोषित करत आहोत की “अब की बार मोहिते पाटील उमेदवार!
ऍड अविनाश टी.काले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक
अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.
मोबा. 9960178213