ताज्या घडामोडी

गैरसमजाने घेरलेल्या धनगर समाजाने आता तरी मराठा समाजाचा आदर्श घ्या

गैरसमजाने घेरलेल्या धनगर समाजाने आता तरी मराठा समाजाचा आदर्श घ्या

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 27/01/2024 : “गैरसमजाने घेरलेल्या धनगर समाजाने आता तरी मराठा समाजाचा आदर्श घ्या”असे आवाहन सुभाष मासुळे (जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र,मुंबई.शाखा-धुळे) यांनी प्रस्तुत लेखाद्वारे केले आहे – संस्थापक संपादक
महाराष्ट्रात संख्येने नंबर एक वर असलेला मराठा व कुणबी समाज अनेक वर्षे महाराष्ट्राच्या सत्तेत आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून कुणबी मराठे एकत्र येऊन अतिशय नियोजनबद्ध लढा देऊन सरकारला जेरीस आणत आहेत. तसे पाहायला गेले तर मराठा समाज हा ओपन कॅटेगिरीत तर कुणबी समाज ओबीसी कॅटेगिरीत पण कुणबी समाजाने मराठ्यांना आमच्या कॅटेगिरीत आरक्षण देऊ नये असे कधीच म्हटले नाही. उलट मराठा आमचा भाऊच असून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशीच भूमिका कुणबी समाजाने घेतली. मराठा समाजाने गरीब मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी पुढे केली.या मागणीला ओबीसी सह सर्व अठरा पगड जातींनी साथ दिली. त्यातून त्यांना SEBC तून आरक्षण मिळाले पण पुढे कोर्टात ते टिकले नाही. तरी मराठा समाजाने जिद्द सोडली नाही. सतत मोर्चे,आंदोलने, कोर्ट कचेरी करत राहिले. त्यातून त्यांना मनोज जरांगे पाटील सारखा एक सामान्य कुटुंबातील लढवय्या कार्यकर्ता मिळाला व मराठे हे कुणबी असून त्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावे म्हणून लाखोच्या संख्येने लोक एकत्र येऊ लागले मागणी जोरात लावून धरली व सहा महिन्याच्या आत सरकारला सळो की पळो करून सोडले व मनोज जरांगे ज्या ज्या मागण्या करतील त्या सर्व मान्य करायला लागले. हे कशामुळे घडले फक्त एकीच्या बळामुळे तसे धनगर समाजाच्या बाबतीत का घडू शकले नाही. गेल्या ७० वर्षांपासून धनगरचा धनगड झाल्यामुळे ST आरक्षणापासून वंचित आहे. धनगड जात कुठेही अस्तित्वात नसतांना ‘र’ चा ‘ड’ करून जगात अस्तित्वात नसलेली एक काल्पनिक जात राज्यकर्त्यांनी उभी केली आणि त्यातच धनगरांच्या कित्येक पिढ्या वाया गेल्या व आजही धनगर अतिशय खडतर जीवन जगत आहे.त्याला खालील बाबी कारणीभूत ठरल्या.
१)धनगरांचे अज्ञान व आरक्षणाबाबत चुकीची मागणी.२)धनगरांचा असंघटितपणा व शिक्षणाचा अभाव ३)राजकीय नेतृत्वाचा अभाव ४)राजकारण्यांनी स्वार्थासाठी समाजाची केलेली दिशाभूल. ५)समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना समाजाने किंमत न देणे. उलट दुसऱ्याचे ऐकून प्रामाणिक कार्यकर्ता मुख्य प्रवाहातून कसा फेकला जाईल त्यासाठी बदनामीचे अस्र वापरून त्याला कायमचे संपवण्याचे कटकारस्थान रचल्यामुळे बी. के. कोकरे यांच्यासारखे नेतृत्व संपवण्याचे पाप या समाजातील नतद्रष्टांनी केलं. ६) ज्याला काहीही समजत नाही पण तरीही तो कोणाचं ऐकून घेत नाही व सतत चुकीचे व समाज विघातक विचार पसरवत राहतो. स्वतःही करत नाही व दुसऱ्यालाही करु देतं नाही ही प्रवृत्ती वाढल्यामुळे समाजाचे प्रचंढ नुकसान होत आहे. ७) समाजाचं कितीही नुकसान झालं तरी चालेल पण मला मानसन्मान मिळाला पाहिजे अशा विचाराने प्रेरित झालेल्या लोकांचे समाजात प्रमाण वाढल्यामुळे समाज रसातळाला जात आहे. ८)चांगला कोण नि वाईट कोण? कोण खरं बोलतो नि कोण खोटं बोलतो? कोण समाजासाठी महत्वाचा नि कोण बिनकामाचा याचा अभ्यास न करता नको त्याला किंमत दिल्यामुळे समाजाचा ऱ्हास होत आहे. ९)बदलत्या काळाप्रमाणे बदलेले पाहिजे. समाजहिताचे बदल स्वीकारले पाहिजेत. त्याबद्दल समाजाचे चर्चासत्र घेऊन सर्वांनी एकत्र येऊन समाज जागृतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रवृतींचा अभाव असल्यामुळे आजही समाज बदल स्वीकारत नाही. १०)एका जाती प्रवर्गात समानता, साम्य असणाऱ्या अनेक जाती,पोटजाती,तत्सम जाती व उपजाती असतात पण एका प्रवर्गातील महाराष्ट्रातील सर्व जाती या एकच आहेत आम्ही एकमेकांचे बांधव आहेत हे आम्ही मान्य करत नाहीत व न्याय्य हक्कासाठी दुसऱ्याशी न भांडता सतत एकमेकांशी व आपल्याच माणसांशी भांडत राहतात त्यामुळे समाज एकत्र येत नाही व त्याचा फायदा दुसरेच उचलतात. ११) समाजातील खेकडा प्रवृत्तीमुळे समाजाची प्रगती होण्याऐवजी अधोगतीच होत आहे. १२)समाजातील माणूस गरीब जरी असला, सामान्य असला तरी तो ज्ञानवंत, प्रज्ञावंतव समाजशील असेल तर त्याला समाजाने डोक्यावर घेतलं पाहिजे. जसे मराठा समाजाने मनोज जरांगेना सन्मान दिला तसा सन्मान समाजाने आपल्या समाजासाठी झटणाऱ्या लोकांना दिला पाहिजे. तरच समाजाचे कल्याण होईल. १२) आधी समाज व नंतर मी अशी प्रवृती समाजात वाढली पाहिजे त्यासाठी समाजासाठी तन, मन, धन च नाही तर माझा प्राण गेला तरी चालेल अशी प्रवृत्ती वाढली पाहिजे. समाजातील वरील उणीवा मराठा समाजाने कधीच्या दूर केल्या आहेत म्हणून आज मराठा समाज सर्वच क्षेत्रात पुढे आहे व आपण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकची जमात असूनही आपण शेवटच्या क्रमांकावर कां फेकलो गेलो याचे आपणही आत्मपरीक्षण करून समाजातील उणीवा दूर करण्यासाठी मराठा समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे व त्यांच्यासारखेच नियोजन केले पाहिजे तरच आपल्या समाजाची प्रगती होईल नाहीतर आपली दिवसेंदिवस अधोगतीच होईल म्हणून बांधवांनो,आता तरी जागे व्हा.शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा. या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाचा अवलंब करणार अशी शपथ धनगर समाजाचे दीपस्तंभ कै.बापूसाहेब खंडेराव कोकरे उर्फ बी. के. कोकरे यांच्या आजच्या स्मृतिदिनी घेऊया ही सर्वांना नम्र विनंती.

सुभाष मासुळे, (धुळे, महाराष्ट्रर राज्य)
मोबा-9420179155

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button