नेत्यांचे मधुर मिलन होईल का? – डी एस गायकवाड

नेत्यांचे मधुर मिलन होईल का? – डी एस गायकवाड
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras District Solapur Maharastra State, India. 9860959764.
अकलूज दिनांक 21/11/2023 :
नातेपुते येथे दीपावली स्नेह मेळावा व स्नेहभोजनाच्या माध्यमातून मधुर मिलन घडवून आणण्याचा प्रयोग खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून सध्या केला जात असला तरी पाठीमागील काळात घडलेल्या काही अनाकलनीय राजकीय घटना आणि त्यामाध्यमातून दुखावलेली मने अशी जेवणावळीवरील पतरवाळीने एकत्र येतील याबाबत शंका आहेच पण यापलीकडे जावून आधी दुखवायचे आणि पुन्हा जुळवायचे ही राजनीती लोकांना पचनी पडताना दिसत नाही.
मागील काही दिवसात बरेच पाणी पुलाखालून गेले आहे त्यामुळे अनेक दुखावलेल्या मनांच्या जखमा खोलवर रुजल्या गेल्या आहेत त्या भरून काढणे एवढ्या सहजासहजी शक्य नाही राजकारणात विश्वासार्हता महत्त्वाची असते ज्यांनी आपल्याला पदे दिली त्यांना जपावेच लागते. पण खासदार नाईक निंबाळकर यांचे कडून मोहिते पाटलांना लक्ष करत जे डाव पाठीमागील काळात खेळले गेले त्यातून जो नाराजीचा सूर उमटत गेला तो सध्या इतका प्रचंड मोठा झाला आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची तीव्रता कळते… एकतर माळशिरस तालुक्याने भरभरून खासदार साहेबांवर विश्वासार्हता दाखवली पण खासदार साहेबांना मात्र या विश्वासार्हतेला जपता आले नाही… एक विशिष्ट राजकीय हेतू मनात ठेवून त्यांनी नेहमी मोहिते पाटील यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला… एकही संधी सोडली नाही… अगदी महाळुंग नगरपरिषदेपासून ते पुणे सिंचन भवन पाणी परिषद, पालकमंत्री विखे यांना विरोधकांच्या दारात नेणे, नीरा देवधर बाबत तालुक्यातच मोहिते पाटलांना वगळून सभा घेणे अशा एक ना अनेक घटना दरम्यानच्या काळात घडल्या आहेत… त्यामुळे मने पूर्णपणे दुभंगली आहेत… पक्ष एकच आहे मात्र आता मनोमिलनाची शक्यता धुसर वाटत आहे.. न भरून निघणाऱ्या जखमा मनामध्ये निर्माण झाल्यानंतर त्याला कोणतेच औषध चालत नाही… विषय आता खूप पुढे गेला असल्याचे वाटत आहे मोहिते पाटलांनी ही सध्या खासदारकीसाठी दंड थोपटले आहेत… झालेल्या चुका पुढे घडू नयेत… याबाबत कोणताही राजकारणी दक्ष असतो.. तीच परिस्थिती सध्या आहे… खासदार निंबाळकर हे मधुर मिलन स्नेहभोजनाच्या माध्यमातून आणखी खोलात जाताना दिसत आहेत.. सर्वच मोहिते पाटील विरोधकांना एकत्रित करण्याचा त्यांचा डाव लपून राहिलेला नाही.. त्यामुळे मोहिते पाटील समर्थक सतर्क आहेत… अशी परिस्थिती आहे… आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची पोस्ट कार्यकर्ते अभिमानाने सोशल मीडियावर फिरवताना दिसत आहेत… यातच याची तीव्रता कळते…
आदरणीय श्रीकांतजी भारतीय यांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे… सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ येतात त्यात माढा हा महत्त्वाचा मतदार संघ आहे.. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव पत्रिकेत दिसत नाही… गटा तटाच्या राजकारणाला भाजपा मध्ये देखील सुरुवात झाली की काय अशी ही शंका आता येऊ लागली आहे… शेतकऱ्यांचे जागतिक नेते सदाभाऊ खोत हे देखील या कार्यक्रमाला असणार आहेत त्यांच्यावरील लोकांचा अजूनही विश्वास ढळलेला नाही…अशा महान खोत यांच्या नेतृत्वाच्या साक्षीने हा स्नेहभोजन सोहळा होणार आहे… सुरुवातीच्या पत्रिकेत उत्तम जानकर यांचे नाव देखील वगळले होते…. त्यांच्यातील काहींनी नाराजी व्यक्त करताच दुसऱ्या पत्रिकेत त्यांचे नाव ॲड करण्यात आले… आमदार रामभाऊंनी सदाशिवनगर कारखान्याच्या मोळी कार्यक्रमात उत्कृष्ट भाषण ठोकले… यावर श्रीकांत भारतीय यांनी त्यांचे गुणगान आणि तारीफ(उध्दार) एकाच वेळी केल्याची सुप्त चर्चा आहे…त्यामुळे ते मधुर मिलनात समरूप होतात की नाही याबाबतही शंका आहे… शिंदे बंधू येतील आणि खुन्नस देऊन जातील त्यांना खासदाराचे काही देणे घेणे नाही… तुमच्या भांडणात मी का मधी पडू म्हणत प्रशांत मालक येतील की नाही याबाबत शंकाच…पहिल्या पत्रिकेत नाव नसल्याने जानकर देखील नाराजच दिसत आहेत..
त्यामुळे आता भविष्यात मधुर मिलन होतंय की आणखी काही हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.