मनोज जरांगे हे आरक्षणा विरोधात लढाई लढत आहेत : ऍड अविनाश टी काले

मनोज जरांगे हेआरक्षणा विरोधात लढाई लढत आहेत : ऍड अविनाश टी काले
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharastra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 21/11/2023 :
मराठा हे कुणबी च आहेत आणि अशा निजाम स्टेट मधील कुणबी नोंदीच्या आधारे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचा समावेश सरसकट ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी घेऊन ते आंतर वाली सराटी येथे उपोषणाला बसले.
महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री ना. एकनाथ जी शिंदे साहेब यांनी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याला साक्षी ठेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार च अशी भीष्म प्रतिज्ञा केली.
कोणाच्या ही आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल असे अभिवचन सरकारच्या वतीने दिले जात होते तर 50%चे आत च हे आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील रेटत राहिले.
दुसऱ्या बाजूने अभ्यासक म्हणून प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी नवीनच युक्तीवाद पुढे आणला. 1994 चा जी. आर. लागू करून पवार साहेब यांनी 34% वरील आरक्षण 50% वर नेले परंतु त्यांनी मराठा समाजाला आरक्षण कक्षे बाहेर जाणीव पूर्वक ठेऊन समाजावर अन्याय केला.
भावनिक पातळीवर गरिबांच्या पोराला 95% मार्क मिळून ही आरक्षण मुळे कमी मार्क असलेली मुले भरती होत आहेत, आणि अशा लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली आमच्या पोरांना काम करावे लागत आहे. आणि याचे दुःख गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा यांना ही आहे.
पुणे येथील खराडी येथे भाषण करताना अचानक त्यांचे पोटातील ओठावर आले. आणि ओबीसी चे एक टक्का ही आरक्षणाला हात न लावता , मराठा आरक्षण द्यावे
असे म्हणताना , घटने नुसार लोकसंख्या चे प्रमाणापेक्षा अर्धे आरक्षण असले पाहिजे परंतु एस सी , एस टी यांना 100%आरक्षण लोकसंख्या चे प्रमाणात आहे असे वक्तव्य त्यांनी केले. या वरून या सर्व लढाई मागे शातीर मेंदू आहे, विकृत मेंदू आहे , जो मेंदू एस सी / एस टी प्रवर्गा ला सर्व आर्थिक , प्रशासकीय , शैक्षणिक प्रगती पासून रोखू पाहत आहे. ही बाब आत्ता स्पष्ट झालेली आहे.
या वर्गाला कोणताही युक्तीवाद नको आहे. त्यांच्या कडे आलेल्या व अस्तित्वात असलेल्या जमिनीची मालकी का व कशी आली? या उच्च वर्णीय समाजाकडे सर्व आर्थिक , राजकीय , सामाजिक शक्ती कुठून आली? ती या व्यवस्थेने नाकारलेल्या वर्गा कडे का नाही ? याची कोणतीही कारण मीमांसा त्यांना आत्ता नको आहे.
मुळात इंद्रा सहानी यांनी च मंडल आयोग लागू झाल्या नंतर जी याचिका दाखल केली होती त्या केस नुसार व आरक्षण निती आखताना आरक्षण हा अपवाद आहे नियम नाही म्हणून आरक्षण मर्यादा 50%चे वर असू नये असे घटनात्मक बंधन घालून देणाऱ्या राज्य घटनेच्या नियमाने 85%समाज 50% त बसवून उर्वरित 50% मुक्त ओपन साठी ठेवलेले असताना ही त्यांची भूक भागत नाही.
सर्व साधन संपत्ती, सर्व प्रकारचे राजकीय वर्चस्व, बँकिंग, कारखानदारी, शैक्षणिक संस्था या उच्च वर्णियांचे ताब्यात असताना ही या वर्गा ला या सर्व लोकांचे अधिकार संपुष्टात आणावयाचे आहेत. आणि तेंव्हाच खरी लोकशाही व समानता येईल, मुक्त स्पर्धा होईल आणि देश महासत्ता बनेल असे त्यांचे म्हणणे आहे.
आम्ही त्यांचे राजकारण, त्यांच्या मागण्या या कडे गांभीर्याने न पाहता , उलट छगनराव भुजबळ यांना टार्गेट करून मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन करतो. ते करणारे व्यक्तित्व मोठे असते, राजनीती निपुण असते त्या मुळे आमच्या सारख्या छोट्या लोकांना गप्प बसावे लागते.
साधे पाणी पिण्याचा हक्क ही आमच्या पिढ्यांना संघर्ष करून मिळवावा लागलेला आहे.
घोड्यावर बसून वरात का काढली ? मिशा का ठेवल्या ? मुजरा का केला नाही ? म्हणून आमच्या तील अनेकांना जिवे मारले गेले. 10/12 वर्षाची मुले देवळात गेली म्हणून त्यांना नग्न करून तापलेल्या फरशी वर बसवून मारण्यात आले.
हातात जमीन नाही, कारखानदारी दूर राहिली, दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून, मेन होल उघडुन गटारी साफ करून जगताना विषारी गॅस ने कित्येकांचा बळी गेला आहे. मानवी मैला डोक्यावरून वाहणारे कोण आहेत? आज ही दुसऱ्यांची शौचालये साफ करून, शहरातील रस्ते झाडून जगणारे कोण आहेत?
शहराचे विद्रुपीकरण करून झोपड पट्ट्या उभ्या आहेत म्हणून नाके मुरडणारे, त्या झोपड्यांवर दिवसा बुलडोझर फिरविणारे कोण आहेत ? कोणती व्यवस्था आहे जी माणसाला नरक यातना देते? घराच्या छतावर शे दोनशे रुपयाचे प्लॅस्टिक पांघरून घरकुल बनवणारे कोण आहेत ? यातील एखादा दुसरा पदवीधर होतो. तळमळीने शिकतो आणि आयुष्याच्या उत्तरार्धात प्रमोशन ने अधिकारी बनतो ही बाब सुद्धा प्रस्थापितांना रुचली नाही. त्यांनी पदोन्नती नाकारणारा कायदा बनवला. कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण रद्द करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सेवा, सरकारी दवाखाने, विमानतळ, आणि आत्ता जिल्हा परिषद शाळा यांचे ही खाजगीकरण चालू ठेवले. त्याचा वेग झपाट्याने वाढवला.
कंत्राटी पद्धतीे ने सर्व विभागातील अगदी डॉक्टर , इंजिनिअर, शिक्षक आणि पोलीस व लष्कर भरती ही करण्याचे धोरण त्यांनी आखले. त्याची अंमलबजावणी ही सुरू केली.
आमचे राखीव जागेवरील लोकप्रतिनिधी म्हणजे ⅚ प्रस्थापित पक्षाचे , प्रस्थापित उच्च वर्णीय समाजाचे पाळीव श्वान बनल्याने आमच्या हक्काचे कोण रक्षण करणार ?
भारतीय समाज हा जातिग्रस्त समाज आहे. प्रत्येक जात स्व जातीचे हित रक्षण करण्यास प्राधान्य देते. हे हेरून च प्रस्थापित वर्गाने बुध्दी भेद करून एस सी वर्गात अबकड वर्गीकरणांची चळवळ सुरू केली.
आरक्षणाची विहिरीत च पाणी न ठेवलेल्या व्यवस्थेविरोधात लढायचे सोडून ते पोहऱ्या चे खडखडाट करू लागले ,
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि प्रा. विद्या पंडित स्मृती शेष कॉम्रेड शरद पाटील यांनी दास शुद्राची गुलामगिरी यात पूर्ण अभ्यासाअंती निरीक्षण नोंदवले होते
या देशातील उच्च वर्णीय लोकांनी चालू केलेल्या अल्पसंख्याक लोकां विरोधातील आंदोलनाचा शेवट हा नेहमी शूद्र समाजविरोधी च परावर्तित झालेला आहे.
राज्य घटना किती उत्कृष्ट आहे यावर तिचे यश अपयश अवलंबून नाही तर ती राबवणारे कोण आहेत यावर ते ठरणार आहे.
75वर्षा नंतर ही मागासवर्गीय समाजाचा विकास का साधता आला नाही याचे कारण त्याची प्रभावी अंमलबजावणी झालीच नाही. त्यांचा आर्थिक अनुशेष भरला गेला नाही. त्यांचा आर्थिक निधी दुसरीकडे वळवण्यात आला. या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना ही प्रस्थापित वर्गाच्या हाताला लकवा मारतो हे वास्तव भीषण आहे.
आम्ही क्रांती करू शकत नाही. कारण आम्हाला मार्क्सवाद ही नको असतो.
आम्ही सैताना पुढे बुध्द सांगत आहोत.
ते तलवारी पाजळत असताना आम्ही त्यांचे पुढे शांती चे गीत गात आहोत.
आमची लढण्याची जिद्द हरपली आहे. आमच्या चळवळी कोलमडून पडल्या आहेत.
आम्ही ही प्रस्थपित म्हणतील तसे नाचून जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत. हेच खरे भीषण सत्य आहे.
“त्यांच्या समोर गुडघे टेकवून शरणागत म्हणून खाली मान घालून जगण्या पेक्षा मी ताठ उभे राहून मृत्यूला ही आनंदाने कवटाळीन” ,,,,
अस म्हणणारा वर्ग समाज व्यवस्थेत तयार झाला नाही तर लक्षात ठेवा गुलामीच्या प्रत्यक्ष अमलबजावणी चे पर्व सुरू झाले आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून हे घडवले जात आहे.
मी नवबौध्द समाजाचा असून ही ओबीसी समवेत आहे. असे समाज माध्यमावर म्हणताच 1 जानेवारीला ओबीसी कुठे होते ? असे प्रश्न विचारण्यात आले.
जे ओबीसी स्वतः ही भेदरलेले आहेत, त्यांच्या हक्कावर वरवंटा फिरवला जात असताना ही जे हार घेऊन उभे आहेत,आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे असे म्हणतात. ते मायक्रो ओबीसी बलदंड , समाजाच्या पुढे कसे उभे राहतील ,? ज्या व्यवस्थेने माणसे जाती जातीत विभाजित केली , ज्यांच्या संवेदना फक्त जाती सीमित राहतात त्या सर्व वर्गाला जागृत करून त्याची राजकीय शक्ती बनवण्या ऐवजी असले फाजील युक्तीवाद पुढे करून कोणीच वाचणार नाही.
दंबंग जातीचे ओबीसी /एस सी/एस टी/व्हीजे एन टी , वर्गावरील अतिक्रमण रोखून आपल्या हित रक्षणासाठी स्वतंत्र पक्ष स्थापन करून सर्व घटकातील सामूहिक नेतृत्व विकसित करून एक संघ बनणे एवढाच उपाय आज आपणासमोर आहे.
ते मते वळवण्याचा खेळ्या म्हणून आंदोलनाचा उपयोग करतील , व आलटून पालटून सत्ता कधी काँग्रेस कधी भाजपा, कधी शिवसेना या कडे वळवतील. तुमच्या हक्काला , आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही असे ही ते म्हणतील, आणि दुसऱ्या बाजूने आरक्षण विरोधी समाज मानसिकता ही ते निर्माण करतील. त्यांच्या कडे असलेल्या साधन सांमुग्रीच्या आधारे ते शक्ती प्रदर्शन ही करतील. प्रत्येक शहरात त्यांच्या टोलेजंग सभा होतील. हे आपण करू शकणार नाही. आपल्या कडे धनशक्ती मर्यादित आहे. आपल्या कडे सभा घेण्यासाठी जागा ही नाहीत. लोक एकत्रित येण्यासाठी वाहने नाहीत.
पण आपण लोक शक्तीने मोठे आहोत. प्रत्येक कार्यकर्ता हे आपले साधन बनू शकते व, या सामूहिक दादागिरी विरोधात आपापल्या स्तरावर आपल्या लोकांचे प्रबोधन घडवून आणावे लागेल. आपल्या स्वातंत्र्याची लढाई आपल्या स्वतः ला लढावी लागेल.
आत्ता जोतिबा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , बिरसा मुंडा , तंट्या मामा येणार नाहीत , पण त्यांचेतील अंश घेऊन आपण लढू तरच आपणास कोणी गुलाम बनवू शकणार नाहीत ,
गरीब फक्त मराठा वर्गात नाहीत त्यांच्यात 5% गरीब आहेत पण हेच गरिबीचे आपल्यातील प्रमाण 39 ते 45% आहे.
आदिवासी पाड्यातील मेळघाट मधील कुपोषित बालकांचे मृत्यूचे प्रमाण हेच दर्शवते. पण छातीचा पिंजरा आणि खोलगट गेलेले पोट , डोळ्याच्या खोबणीत हरवलेले डोळे जरांगे पाटील यांना दिसणार नाहीत.
ते उदयनराजे , संभाजी राजे यांच्या मांडीला मांडी लावून गरजवंत मराठ्यांची बात बोलत राहणार आणि आम्ही अंध बनून ते ऐकत राहणार. हे किती दिवस ?
जय अहिल्या,,,, जय जोती,,, जय भीम,,,,जय बिरसा मुंडा.
ऍड. अविनाश टी. काले.
अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर (महाराष्ट्र)
9960178213.