तीन तालुक्यातील पुनर्वसन गावांच्या समस्यांबाबत “शिवरत्न” वर बैठक

तीन तालुक्यातील पुनर्वसन गावांच्या समस्यांबाबत “शिवरत्न” वर बैठक
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 16/10/2023 :
माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील पुनर्वसन झालेल्या गावांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी शिवरत्न येथे आयोजित बैठकीत सरपंच उपसरपंच व राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी आपल्या मागण्या मांडल्या.
पुनर्वसन गावातील समस्या जाणून घेण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शिवरत्न वर बैठक घेतली.
गेल्या सुमारे ४० वर्षात गावाचा नकाशा, सातबारा, रस्ते, गटारी, स्मशानभूमी अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत असून या समस्यातून लवकर मार्ग काढा अशी मागणी पुनर्वसन गावातील पदाधिकाऱ्यांनी केली.
यावेळी भाजप संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुनर्वशीत गावातील जागेचा सातबारा लाभधारकाच्या नावे नसल्याने तो विविध सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. नकाशा नसल्याने जन सुविधाची कामे नाहीत तरी नकाशे तयार व्हावेत. या गावांची महसूल गावात रूपांतर व्हावे. ही गावे जिल्हा परिषदेकडे वर्ग व्हावीत त्याचबरोबर या गावांना जोडणारे रस्ते व्हावेत, या गावातील धार्मिक स्थळांचा पुनर्वसनबाबत मिळालेला निधी सरकारकडे जमा असून तो त्या गावाला व्याजासह मिळावा. या बहुतांशी गावात स्मशानभूमी नाही त्याबाबत सोय व्हावी. अशा विविध मागण्या मांडल्या.
या तिन्ही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते, स्मशानभूमी, गटारी, नदिवरील पूल, महसूल गावाची निर्मिती, ग्रामपंचायतीची निर्मिती, जिल्हा परिषदेकडे वर्ग करणे या सह सुमारे ३० मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरवठा केला असून याशिवाय इतर समस्यांसाठी जिल्हाधिकारी यांची लवकरच बैठक घेऊ त्यावेळी आपण सर्वजण उपस्थित रहा असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.
आत्महत्याच करावी ?
गावातील रस्त्यांसाठी अनेक आंदोलने केली, आंदोलन केले की रस्त्याचे काम सुरू होते परंतु पूर्णत्वाकडे जात नाही त्यामुळे आता ठेकेदाराच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्याच करावी म्हणजे गावातील समस्या त्यांच्या लक्षात येतील आणि रस्ते व इतर सुविधा होतील, अशा तीव्र शब्दात सचिन गावडे यांनी समस्या मांडल्या.
पुनर्वसन गावाबाबत आपण यापूर्वी काही मागण्या मांडल्या असून त्या अडचणी लवकरच सुटतील. त्याशिवाय आज सांगितलेल्या इतर अडचणी सोडविण्यासाठी आपण येत्या अधिवेशनात पुरवणी मागणी मांडणार आहोत.
–आमदार रणजितसिंह मोहिते पाटील.