ताज्या घडामोडी

अजितदादा “लोकनेते” असल्याचा रोहित पवारांना साक्षात्कार

अजितदादा “लोकनेते” असल्याचा रोहित पवारांना साक्षात्कार

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 18/10/2023 :
जयप्रकाश नारायण हे देश पातळीवर तर बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्रातील राजकारणात लोकनेते म्हणून नावलौकिक असणारे नेते कारण त्यांना ही पदवी कुणी आयऱ्यागैऱ्याने नाही तर जनता जनार्दनाने दिली होती. पण आजकालच्या उठवळ राजकारणात कुणीही कुणाला कोणतीही पदवी देऊन आपली राजकीय दिवाळखोरी बिनबोभाटपणे जाहिर करतो. हेच तर पैसा पाणी असणाऱ्यांच वैशिष्ट्य आहे. असो , तर काल महाराष्ट्राच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या संदर्भात येरवड्यातील तीन एकर जमिनीच्या न झालेल्या लिलावाचा दाखला देत दादा आणि जमीन घोटाळा याचा पर्दाफाश केला. त्यावर हे सर्व कटकारस्थान असून अजितदादा हे लोकनेते आहेत म्हणून त्यांची इमेज डाऊन करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा जावई शोध कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी लावला. याचाच अर्थ त्यांना अजितदादा हे “लोकनेते” असल्याचा साक्षात्कार झाला आहे. हे काय कमी आहे का ॽ
आमदार रोहित पवार हे जागतिक पातळीवर राजकारणात स्थिरस्थावर झाल्यावर जसे नेते आपली प्रतिक्रिया देतात त्यापेक्षाही उथळ पाण्याला खळखळाट अधिक असतो त्याप्रमाणे ते अगदी युक्रेन व रशियाचे युद्ध असो की मागील आठवड्यात सुरू झालेले हमास आणि इस्त्राईल युद्ध असो यावर आपले अगाध ज्ञान व्यक्त करत असतात त्यामुळे ते राजकारणात आजोबांच्या पाठकुळीवर बसलेले भातुकलीच्या खेळातील आमदार वाटतात. म्हणून तर सोलापूरच्या काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांची खिल्ली उडवताना
‘ वो तो नया नया है ‘ ! असा उपरोधिक टोला लगावला होता. कारण त्यांच्या मते रोहित यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे. पुढे पुढे शिकतील अशी ठेवणीतले शब्द वापरले होते .
मीरा चढ्ढा बोरवणकर यांनी अजितदादा पवार यांच्यावर आरोप केलेल्या अन् न झालेल्या जमीन घोटाळ्यावर बोलताना शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मात्र बोरवणकर मॅडम यांचा हा आरोप नसून ते तथ्य असल्याची मल्लिनाथी केली. तर त्यांचे भाचे रोहित पवार हे अजितदादा यांना रातोरात लोकनेते बनवून रिकामे झाले. याचा अर्थ आपले पुतणे अजित पवार हे आजपर्यंत लोकनेते होते याचा मागमूसही त्यांचे काका दस्तूरखुद्द शरदचंद्र पवारसाहेब यांना नव्हता असाच याचा अर्थ निघतो नाही का ॽ आणि जर तसा मागमूस काकांना असता तर मात्र अजितदादा पवार यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपवण्यात साहेबांनी क्षणाचाही विलंब लावला नसता. पण जे नातवाला उमगले ते आजोबांनी जाणिवपूर्वक दुर्लक्षित करून राष्ट्रवादी काँग्रेसच मातेर केलं असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही .
आत्या आणि त्यांचा भाचा आमदार रोहित पवार यांनी काल विविध ठिकाणी ही जी दोन भिन्न मते व्यक्त केली आहेत ती जाणिवपूर्वक केली असावीत असे कुणाला वाटत असेल तर त्यात माझ्या मते नक्कीच तथ्य आहे. कारण आजकाल बारामतीच्या पवार कुटुंबात ‘ तु कर मारल्यासारखे मी करतो रडल्यासारखं ‘ अशीच सारी त्रेधातिरपीट सुरू आहे , परिणामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अजितदादा पवार हे त्वेषाने आपल्या गटाचा उमेदवार उभा करतात का ॽ अथवा भाजपने उभ्या केलेल्या उमेदवाराचा अधिक कडवा प्रचार करुन आपल्या चुलत बहिणीचा पाडाव करतात हे पाहणे फारच मनोरंजक असणार आहे कारण बारामतीच्या बागायती राजकारणात कोणतीही निवडणूक असली की घरोघरी पैशाचे वाटप होते हे आजपर्यंतचे उघड सत्य आहे तेच सत्य आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पवार कुटुंबाच्या माध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करताना अनुभवता येणार आहे तोपर्यंत जरा हटकेच श्वास रोखून हा बारामतीचा डाव कोण कोणावर उलटवतोय ते पहा कारण जे थोरल्या पवारांनी पेरल ते धाकले पवार उगवायला निघाले आहेत हे नक्की.

राजाभाऊ त्रिगुणे.
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button