अंमळनेर येथे होऊ घातलेल्या, 97 व्या मराठी साहित्य संमेलचे, बोध चिन्ह!

अंमळनेर येथे होऊ घातलेल्या,
97 व्या मराठी साहित्य संमेलचे,
बोध चिन्ह!
Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra State, India.
Mo. 9860959764.
अकलूज दिनांक 05/10/2023 : बऱ्याच वर्षाने खान्देशांत 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 ला मराठी साहित्य संमेलन होत आहे. गांधी जयंतीचं निमित्त साधून या संमेलनाच बोधचिन्ह प्रकाशित करण्यात आलं आहे. हे बोध चिन्ह प्राचार्य डॉ मिलन भामरे यांनी तयार केलं आहे. अतिशय आशयघन आणि समर्पक असे बोधचिन्ह तयार केल्या बद्दल प्रथम चित्रकार प्राचार्य डॉ मिलन भामरे यांचे अभिनंदन. हे बोधचिन्ह स्वीकारलं म्हणून निवड समितीचे आभार.
या चिन्हतील केळीची पान पाहून काही मंडळींचं पित्त खवळले. आणि त्यांनी त्या विरुद्ध रान उठवायला सुरवात केली. त्यांच्या मते केळीचे झाडं हे फक्त सत्यनारायणाच्या पूजेसाठीच लावली जातात. म्हणून त्याचा इतरत्र वापर होत नसावा अशी या टीकाकाराची धारणा असावी. या बोधचिन्हांत नडगी म्हणजे खान्देशी संबळ दाखविली आहे. तिला हे हळदी कुंकवाच्या डब्या समजत आहेत. आणि त्यावरून या बोधचिन्हचा संबंध थेट सत्यनारायण पूजेशी जोडून त्यावर टिकेची झोड उठविली आहे. हा शुद्ध पोरकटपणा आहे.
अजून एक कोणीतरी म्हटलं आहे कीं, खान्देश म्हणजे फक्त सानेगुरुजी आणि बहिणाबाई चौधरी बस. हे विधानही हास्यास्पद आहे. सानेगुरुजी आणि बहिणाबाई चौधरी हे महान तर आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त खान्देश काहीच नाही असं कसं म्हणता?
खान्देशची स्वतःची भाषा आहे, संस्कृती आहे, वेशभूषा आहे, खाद्यसंस्कृती आहे. वाद्य आहेत. संगीत आहे, नृत्य आहे. पुराण आहे इतिहास आहे. आमच्या स्वतःच्या स्वतंत्र तमाशा आणि वन्ह या लोककला आहेत. त्या सर्वांचा अधिकाधिक त्यात समावेश येईल असं बोधचिन्ह असाव ही अपेक्षा ती, डॉ मिलन भामरे यांनी तंतोतंत पूर्ण केली आहे.
आधी या बोधचिन्हासाठी स्पर्धा भरविण्यात आली त्यात अनेक नामांकित चित्रकारांनी भाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या चित्रातून सर्वांनुमते या चिन्हाची निवड झाली. डॉ मिलन भामरे यांनी तयार केलेल्या चित्रावरून असे वाटते कीं, त्यांच्या रक्तात खान्देश मुरला आहे. अगदी त्यांचं आडनाव भामरे हे देखील 100 नंबरी खान्देशी आडनावं आहे. टीकाकारांनी आधी खान्देशचा अभ्यास केला असता, बोधचिन्हतील प्रत्येक घटकचा अभ्यास केला असता, त्याचा अर्थ समजून घेतला असता, तर त्यांनी अशी टीका केली नसती.
केळी म्हणजे केवळ सत्यनारायण नाही. किंवा केळीचे पान म्हणजे सणासुदीच्या दिवशीची जेवणाची पत्रावळ नाही. सत्यनारायण पूजेसाठी जे केळीचे खांब वापरतात, त्यांना आम्ही पिलं म्हणतो. जे मुख्य झाडा भोंवती फुटले डिर म्हणजे घुमारे असतात. हे खांब आणि पत्रावळी, हे सर्वं टाकीव पदार्थ असतात. याच्यासाठी आम्ही खान्देशी लोक केळी लावत नाही.
केळी हे आमचं खान्देशचं नगदी पीक आहे. केळीच्या फळ उत्पादनासाठी आम्ही हे झाड वापरतो. खांदेशातील लोकं जीवन आजही मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. भारतातील एकूण केळी उत्पादनातील 20% केळी खांदेशात पिकते. महाराष्ट्रातील एकूण केळी उत्पादनापैकी 60% केळी खान्देशांत पिकते. खांदेशात शेतकरी वर्गात जी काही कमी अधिक समृद्धी आहे त्यात सर्वात मोठा वाटा केळीचा आहे. म्हणून केळीची पानं आहेत बोधचिन्हात.
या चित्राच्या मधोमध “म” आहे. तो मराठीचा म आहे. त्याच्या मध्येभागी जे जात आहे तें बहिणाबाईच्या जात्यावरील गाण्याचा श्रोत आहे. “म” च्या डोक्यावर निब हे ती लिखाणाच प्रतीक आहे. मच्या डाव्या ऊजव्या बाजूला दोन मोर आहेत ते सरस्वतीच वाहन आहेत. या मोरांचा पिसारा ही पावरी आहे. पावरी हे खान्देशी स्वरवाद्य आहे. त्याचा वापर आदिवाशी करतात. या पावरीला ठाणे जिल्ह्यात तारपा म्हणतात पावरी हे पावा या वाद्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. पावा-बासरी-पावरी म च्या खाली 97 हा अंक आहे तो 97 वे मराठी साहित्य संमेलन दर्शविते. त्याच्या बाजूला नडगी म्हणजे खान्देशी संबळ आहे. त्याखाली देवनागरीतील 1111 अंक काढून जी सरस्वती तयार करतात ते दोन आकडे घेऊन सरस्वती तयार केली आहे. त्याच्या मध्ये एका बाजूला अंमळनेर शहरांची ओळख दाखविणारे सखाराम महाराज मंदिर व दुसऱ्या बाजूला मंगळ ग्रह मंदिर दाखवील आहे. त्याच्याखाली “बलसागर भारत हो विश्वास शोभूनी राहो.” या साने गुरुजी यांच्या कवितेची प्रसिद्ध ओळ आहे. थोरा मोठ्या मानवी व्यक्तीच छायाचित्र बोधचिन्हात कोणी वापरत नाहीत. म्हणून बहिणाबाई यांच प्रतीक जात आहे तर साने गुरुजी यांच प्रतिक त्यांच्या कवितेची ओळ आहे
बहिणाबाईच्या सर्वं साहित्याचा श्रोत जात आहे. स्वतः बहिणाबाई तस म्हणते,
अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठी.
तस तस माझ गाण पोटातून येते व्होटी.
घरोटा म्हणजे जात. मूळ अहिराणी शब्द आहे घट्या. त्याच तावडी रूप घरोटा आहे. तावडी भाषा ही अहिराणीची उप भाषा आहे. हे जात आलं तिथ बहिणाबाई आल्या. यातील म, मोर, निब, 97 काय आहे ते वर दिल आहे.
यात मोराचा पिसारा जो पावरी दाखविली आहे तें आदिवाशिंच स्वर वाद्य आहे. नडगी म्हणजे खान्देशी संबळ हे ताल वाद्य आहे. ही दोन्ही खान्देशी वाद्य आहेत. पावरीचा स्वर आणि नडगीचा ताल हे संगीत माणसाला एवढ बेभान करत की, मृत माणूस जिवंत होऊन नाचायला लागेल असा वाक्प्रचार आहे. अस हे जादूई वाद्य आहे.
युट्युब आणि टीव्ही वर काही अहिराणी गाणी धूमाकुळ घालीत आहेत. त्यात बाबू लंगडा ते हाई झूमका वाली पोर ही अहिराणी भिलाऊ गाणी महाराष्ट्रात जी धुमाकूळ घालीत आहेत, त्याचं कारण ही पावरी आणि खान्देशी संबळ आहे. गाण्याचा आशय एवढा खास नसताना ही गाणी मराठी अहिराणी लोकांना वेड लावत आहेत. त्याच कारण पावरीचा स्वर आणि संबळचा ताल आहे. संपूर्ण खान्देश आणि पालंघर जिल्ह्यात एक लोककला आहे तीला धुळे, जळगाव, नंदुरबार येथे वन्ह, नाशिक मध्ये भवाडा आणि पालघरमध्ये बोहाडा म्हणतात. या तीनही कला एकच आहेत. यात रामायणातील पात्राची सोंगे घेऊन पात्र नाचविली जातात. या कलेचा आत्मा ही संबळ आहे. तीच बोध चिन्हात चित्र आहे त्या कुंकवाच्या डब्या नाहीत. विशेष म्हणजे पावरी हे स्वरवाद्य ज्यांनी जोपासले ते आमचे भिल्ल जमात बांधव आहेत. तर खान्देशी संबळ ज्यांनी जोपासली ते आमचे दलित बौद्ध बांधव आहेत. पहिल्यांदा दलित, आदिवाशी बांधवांच्या श्रेष्ठ कलेला या बोधचिन्हावर स्थान दिले, तिचा सन्मान केला, तर त्यात बिघडले कुठे?
मी तर प्रचार्य डॉ मिलन भामरे साहेब यांच्या कल्पना शक्तीला लाख लाख वेळा सलाम करतो. त्यांना हे सुचलंच कसं? अतिशय अर्थ पूर्ण बोधचिन्ह ज्यात संपूर्ण खान्देशचं प्रतिबिंब उमटले आहे.
केळीच्या जातीचा धर्म हिंदू नाही. हे झाड केवळ सत्यनारायण घालायला जन्माला आहे नाही. ते जगातील, अत्यंत स्वछ, स्वस्त आणि पौष्टिक फळ देणार झाड आहे. ते सर्व धर्मातील लोक आनंदाने खातात. या पिकातून खान्देशाला खूप पैसाही मिळतो.
केळीची पान बघून संतापलेल्या महापुरुषांना माझा एक सवाल आहे, मराठी साहित्य मंडळाचं बोध चिन्ह लामण दिवा आहे. मराठी चित्रपट पुरस्कार बाहुलीच्या हाती कळस आहे, मराठी साहित्यिकाना सारस्वत म्हणतात. सारस्वत म्हणजे सरस्वती पुत्र. लमाणदिवा, कळस, सरस्वती आणि सारस्वत हे हिंदू धर्माशी संबंधित आहेत. ते तुम्ही बदलणार आहात का? एका केळीच्या पानांनी संतप्त झालेल्या सज्जन मित्रानी याच उत्तर द्यावे.
खाली सखाराम महाराज मंदिर आहे. हे संपूर्ण खांदेशातील प्रसिद्ध देवस्थान आहे. संत सखाराम महाराज हे पंढरपूरचे वारकारी होते. त्यांचा एप्रिल मे दरम्यान उरूस असतो तेंव्हा एक मोठा रथ फिरवीला जातो. सर्वं खान्देशी लोक या यात्रेला येतात. ती यात्रा खान्देश आणि अमळनेरची शान आहे. मला वाटत वारकरी संप्रदायाच मराठी साहित्यिकाना वावड नसाव. म्हणून या मंदिरावर आक्षेप नसावा. जशी ज्ञानोबांची आळंदी, तुकोबांच देहू, तस सखाराम बुवांच अंमळनेर!
मंगळ ग्रहाच मंदिर हे अमळनेरच खास वैशिष्ट्य आहे. मंगळ ग्रहाच मंदिर अंमळनेर व्यतिरिक्त ईतर कुठेही नाही. देवळाच्या देशात हे आगळ वेगळं देऊळ आहे म्हणून ते घेतलं.
बहिणाबाई चौधरी आणि साने गुरुजी ही तर आमची दैवत आहेत. पण हे दोघेच म्हणजे खान्देश बस. हे बोलणं चूक आहे.
खान्देशातील वाडे ता भडगाव येथे ई स 1570 च्या दरम्यान महालिंगदास अहिरराव नावाचे खूप मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांची तुलना केवळ संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्याशीच करता येईल. मराठी भाषेतील पहिली क्रांती महालिंगदास यांनी केली आहे. मराठी भाषेत भक्ती मार्गाच्या बाहेर जाऊन पहिल्यांदा लिखाण करण्याचा मान महालिंगदास अहिराव यांचा आहे. (वाचा इतिहासकार भाऊ मांडवकर यांच गजरा आणि रा. चिं. ढेरे यांचं शिखर शिंगणापूरचा शंभु महादेव). त्यांनी, पंचोपाख्यान, सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, शालिहोत्र आणि चाणक्यनीती हे पाच ग्रंथ लिहिले आहेत. एक एक ग्रंथ पाच पाच हजार श्लोकांचा आहे. पंचोपाख्यान ग्रंथावरून छत्रपती शिवाजी महाराज यांची आज्ञापत्र ही राज्य घटना तयार केली आहे.
मराठी भाषेत दुसरी क्रांती 1880 च्या दरम्यान पारोळा येथील हरी नारायण आपटे यांनी केली. मराठी भाषेत कादंबरी हा लेखन प्रकार सर्वात आधी ह. ना. आपटे यांनी आणला. त्यांची पहिली कादंबरी वज्राघात खूप गाजली. त्यांनी ऐतिहासिक 11 आणि सामाजिक 13 अशा एकूण 24 कादंबऱ्या लिहिल्या. त्यात गड आला पण सिंह गेला ही कादंबरी विशेष आहे. अकोला येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ह. ना. आपटे अध्यक्ष होते.
तिसरी क्रांती पिंपळनेर ता. साक्री येथे जन्मलेल्या तर्कतीर्थ लक्षण शास्त्री जोशी यांनी केली. त्यांनी मराठी भाषा शब्दकोश तयार करण्यात महत्वाची भूमिका पार पडली आहे. त्यांनी वेदावर भाष्य करणारेही लिखाण केले. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.
इतिहासकार वि.का. राजवाडे धुळे, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे धरणंगाव, श्रीराम अत्तरदे, ना.धो. महानोर, भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांनी मराठी भाषेत अत्यंत मौल्यवान कामगिरी केली आहे. त्यांना कसं विसरता येईल?
पाटनादेवी ता.चाळीसगाव येथील महान गणितज्ञ भास्करचार्य त्यांचा लिलावती ग्रंथ तसेच त्याचं खागोल शास्त्र दुर्लक्ष कारण्यासारखं आहे का?
मराठी भाषेतील पहिला शिलालेख एक हजार वर्षा पूर्वीचा आहे. श्रवणबेळगोड कर्नाटक राज्यात.
“चामुंडराय करविले, गंगराज सूत्तालें करविले”.
अहिराणी शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीचा आहे. नाशिक येथील पांडव लेण्यात तो आहे. शालिवाहन राजाने नहपान क्षहरांत या शक सम्राटावर विजय मिळाविला. त्यानिमित्त हा अहिराणी शिलालेख आहे.
“क्षहरात वसं निर्वस करस.” सुमारे पाच हजार वर्ष जुनी अहिराणी संस्कृती आहे. तीच थोडं प्रतिबिंब या साहित्य संमेलनात उमटू द्या भाऊ!
खान्देश बद्दल कोणाला काही लिहायचं असेल तर लिहा पण त्यापूर्वी खान्देशचा अभ्यास करा. बोध चिन्हातील प्रत्येक चित्राचा अर्थ समजून घ्या आणि मग लिहा.
पुन्हा एकदा अंमळनेर येथे भरणाऱ्या 97 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणारे आमचे बंधु प्राचार्य डॉ. मिलन भामरे यांच अभिनंदन आणि बोधचिन्ह निवड समितीचे हे बोधचिन्ह निवडले म्हणून आभार!
बापूसाहेब हटकर.