ताज्या घडामोडी

“घालीन लोटांगण” या प्रार्थनेचे रहस्य ….!

संपादकीय…..✍️

“घालीन लोटांगण” या प्रार्थनेचे
रहस्य….!

Akluj Vaibhav News Network.
Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude.
Akluj , Taluka Malshiras District Solapur Maharashtra State, India.
Mo. 9860959764.

अकलूज दिनांक 22/9/2023 :
आरती झाल्यानंतर एका लयीत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हणले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हे एक मंत्र आहे. प्रार्थनेतील चार कडव्यांचे कवी हे वेगवेगळे आहेत. ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत. वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे. अशी चार वैशिष्ट्ये या प्रार्थनेमध्ये समाविष्ट आहेत.
आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया.
१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे. याचा अर्थ..
कृष्णाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.
२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
हे कडवे आद्यगुरू शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे. याचा अर्थ.. तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.
(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
हे कडवे श्रीमदभगवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.
याचा अर्थ… श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.
(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||
वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे. याचा अर्थ…
मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.
हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे |
हा सोळा अक्षरी मंत्र ‘कलीसंतरणं’ या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री राधाकृष्णाला समर्पित आहे.
अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.

Share

Chief Editor

भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे Chief Editor Bhagywant Laxmanrao Naykude. Akluj, Taluka Malshiras, District Solapur. Maharashtra state, India. Mo. 98 60 95 97 64

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button